Manish Vasekar

Drama

1.9  

Manish Vasekar

Drama

अक्षय ऊर्जा

अक्षय ऊर्जा

17 mins
9.6K


नखशिखांत सौन्दर्याचा नमुना होती, कुसुम आणि म्हणूनच कुसुमनी केलेला आनंदचा घोर अपमान पचवून ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखा, अहमदनगरच शहरी जीवन सोडून कुसुमच्या मागेमागे इथे रुंभोडी - आदिवासी गावात दाखल झाला होता, तो. नगर कॉलेजला असताना जेव्हा आनंदनी प्रथम कुसुमला बघितलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. ती होतीच तशी, म्हणूनच तिच्या प्रेमात फक्त आनंद एकटा होता असं नाही, असे आशिक बरेच होते, ती कॉलेज क्वीन होती म्हणाना.

कुसुम ही कॉलेजची स्टार होती, तिच्या आसपास कायम मुलामुलींचा घोळका असायचा. तिचा व्यासंग ही तितकाच दांडगा आणि चौफेर होता. ती काही तरी सांगत असायची आणि बाकी ते ऐकत असत. ती तिचे नेतृत्व नेहमीच सिद्ध करायची, आनंदही कायम तिच्या मागेपुढे करायचा पण ती त्याला तसा फारसा भाव देत नसे. मुळात ती कुणाशी सलगी करून राहातच नसे. अनायासे एखादे काम कुसुमनी जर सांगितलेच तर मात्र आनंद बिथरून जायचा 'आका का हूकूम सरआखोंपर'च्या शिरस्त्याने तो काम फत्ते करण्यासाठी कामात बुडून जायचा. पण असे आहे की 'टेन्शन मे कन्फयुजन' सारखं आनंद कामात काहीतरी घोळ करायचा आणि मग कुसुमची बोलणी खायचा. आनंदाला ह्या कुसुमच्या दटावण्यात पण भारी आनंद वाटायचा. रागाने तिचा गोरा चेहरा लालबुंद होत असे, ती तिचे ते नाजूक स्टाॅबेरीसारखे ओठ झटपट खालीवर करत रागवायची आणि रागातही तिचा मुळातच कोमल असलेला आवाज आनंदला फार गोड वाटायचा. तो अशावेळी तिच्याकडे एकटक नजर लावून असायचा. रागात ती फार सुंदर दिसायची.

हा योग तसा क्वचितच, पण जसा आला, तेव्हा तिच्या लोण्यासारख्या मऊ हातांचा स्पर्श आनंदला शहारे आणून सोडायचा. कॉलेजला असताना ह्याच रुंभोडी गावात कुसुमनी एक स्वच्छता अभियान कॅम्प भरवला होता. ह्या रुंभोडीसाठी कुसुमला एवढी आपुलकी का आहे हे खरंतर कोडंच होत. आनंदसकट संपूर्ण क्लास त्या कॅम्पला हजर होता. नगरहून गावाला जायला एक टेम्पो केला होता. टेम्पोत सहज चढण्यासाठी मागच्या बाजूने स्टूल ठेवलं होतं. पण आनंदनी एक शक्कल लढवली, केवळ आणि केवळ कुसुमचा स्पर्श लाभेल म्हणून त्यांनी टेम्पोत प्रथम चढून स्टूलवर चढणाऱ्याला हातानी वर ओढत चढायला मदत करत होता. एक एक करत मुलं-मुली टेम्पोत चढत होती.

सर्व जण टेम्पोत चढल्यावर कुसुम समोर आली आणि ज्या क्षणाची आनंद वाट पाहत होता, ज्या गोष्टी साठी त्यांने एवढा आटापिटा केला होता त्याचं फळ आता मिळणार होतं. कुसुमनी हात वर केला आणि आनंदनी कुसुमचा हात हातात घेतला आणि त्या क्षणी आनंदला ४४० वोल्टचा असा काही झटका लागला की तो एकदम हादरून गेला. दुसऱ्या क्षणी ‘अरे अरे’ म्हणता म्हणता वरून आनंद आणि खालची कुसुम दोघेही तोल जाऊन धाडदिशी खाली आदळले. मग काय सांगायला नको, कुसुमनी आनंदला झाप झाप झापलं. आनंदाला ह्यातही सुख दिसत होतं.

ठरल्याप्रमाणे कुसुमनी शिक्षण पूर्ण झाल्यावर रुंभोडी गावात आपलं ठाण मांडलं. गावाच्या कल्याणासाठी संस्था स्थापन करून समाजसेवेची मुहूर्तमेढ रोवली.

रुंभोडी गाव एकदम टुमदार, गावाच्या मागच्या आणि दोन्ही अंगाला खुज्याच पण वनराईने भरगच्च डोंगर रांगा. डाव्या हाताच्या माथ्यावरून समिधा नदी ओहळत पायथ्याशी येत असे, पण तीपण हंगामी. चार महिन्याच्या वर कधी नदीला पाणी असेल, तर नवल.

पाचशे घरटीच गाव, रुंभोडी. तसं बघायला गेलं तर गाव संपन्न, पण आळशी आणि अशिक्षित गावकऱ्यांच्या पायी दोन वेळचे अन्न-पाणी मिळेल, तर उपकार. विशेष म्हणजे, आजूबाजूच्या दहा बारा गावात हेच काय ते थोडं फार बरं आणि मोठं गाव. गावात झेडपीची शाळा आणि ग्रामपंचायत ऑफिस काय ते डांबरी रस्त्याला लागून, बाकी गाववस्ती डोंगराच्या पायथ्याला नाहीतर डोंगराच्या उताराला, थोडीशी उंचावर. जवळ-जवळ सर्व घरातून शाळा, ऑफिस आणि डांबरी रस्ता अगदी दृष्टीक्षेपात. वस्ती आणि रस्त्याच्या मधल्या मोकळ्या जागेत शनिवारचा आठवडी बाजार भरत. शाळेच्याजवळ पूर्ण गावाला पाणी पुरवणारी एक शासनानी बांधून दिलेली एक भली मोठी विहीर होती. ग्रामपंचायत ऑफिसच्या जवळच महादेव आणि मारुतीचं कॉम्बो मंदिर होत. मंदिर चांगलं बांधून घेतलं होतं. मंदिरासमोरच्या मंडपात आणि बाजूच्या आंब्याच्या झाडाखाली गावातील पुरुष मंडळी आणि उनाड पोरं, घोळका करून दिवसभर चकांड्या मारत बसलेली असत. पण ह्या गोष्टी आता इतिहासात जमा झाल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी कुसुम या गावात आली आणि तिने या गावात परिवर्तन करण्यास सुरूवात केली. विकासाचे वारे गावात आणि आजूबाजूच्या खेड्यात पसरू लागले. सुरवातीचे काही महिने कुसुम आणि तिचे मित्रमंडळ अधूनमधून गावात येत असत आणि श्रमदान, हेल्थ कॅम्प भरवून गावाचं स्वास्थ सुधारण्याचा प्रयत्न करत.

आता तर मागच्या वर्षभरापासुन कुसुमनी गावातच ठाण मांडलं आहे. कुसुमनी सामाजिक संस्था रजिस्टर करून गावात डोंगराच्या पायथ्याशी ऑफिस चालू केलहोत. चार-पाच लोकांचा स्टाफ तिच्या सोबत काम करत होता. गावकऱ्यांची मनं वळवून, गावातूनही बरचसे स्वयंसेवक तिने जमा केले होते. मागच्या चार महिन्यापासून आनंदही तिच्या ऑफिसमध्ये प्रोग्राम ऑफिसर म्हणून जॉईन झाला होता, अगदी नाममात्र मानधनात. कारण एकच कुसुमचा सहवास लाभावा हीच त्याची इच्छा.

कुसुमच्या पुढाकाराने आता गावात बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. ती गावासाठी नवनवीन प्रोजेक्ट प्रपोजलं बनवून ती मान्य करून घेत होती. आनंद आणि इतर गावकऱ्यांकडून तिला ह्या विकासाभिमुख कामात कायम सहकार्य मिळत होत. तिला हरेक प्रोजेक्टसाठी योग्यवेळी अर्थसाह्य मिळत होते. फंडिंगसाठीच्या कामात तिला नगरच्या देशमुख साहेबांची फार मदत होत असे. मागच्याच महिन्यात तिने एक प्रपोजलं फायनल करून नगरला पाठवलं होत पण अजून देशमुख साहेबांचा फोन आला नव्हता. कुसुम थोडी चिंतेत होती. कारण हे क्रिटिकल आणि थोडं मोठं प्रकरण होत. एस्टीमेट बजेटही बरंच हाय होतं आणि हे तिला देशमुखसाहेब रिटायर होण्याच्या अगोदर मान्य करून घायचे होते. ह्या प्रोजेक्टसंबधी तिची देशमुख साहेबांशी मागच्या भेटीत सविस्तर चर्चा देखील झाली होती आणि देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच तिने हे प्रपोजलं बनवले होते. तरीदेखील तिला त्यांचा फोनसुद्धा आला नव्हता.

कुसुमला काळजी वाटत होती. तिच्यासाठी हा प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट होता. ह्या प्रोजेक्टमुळे गावाचा रोजगाराचा कायमचा प्रश्न सुटणार होता. कुसुम तिच्या त्या ड्रीम प्रोजेक्टसंबधीच्या विचारात गडप झाली असतानाच, आजचा डाक तिच्या समोर आनंदनी आणून ठेवला आणि तो समोर खुर्चीत बसला. अर्थात हे काम आनंदच नव्हतंच, तो अश्या कुसुमच्या संपर्कात येण्याच्या संधी कधीच सोडत नसे. थोड्याश्या त्रासिकतेनेच तिने आनंदाकडे बघितंल आणि मग कुणाकुणासाठी डाक आलं हे बघण्यासाठी तिने मान खाली घातली. सर्वात प्रथम तिने नगरहून देशमुख साहेबांचं कुठलं पत्र आलं का हे चेक केलं. नगरची दोन पत्र होती, देशमुखसाहेबांच्या ऑफिस मधून. एक तिच्या प्रोजेक्टफंडिंगसाठी चर्चा करण्यासाठी नगरला येण्यासंबंधी आणि दुसरं खुद्द देशमुख साहेबांच्या निरोप सभारंभच आमंत्रण. पण दोन्हीही पत्रांवर देशमुख साहेबांच्या ऐवजी कुणाल फेर्नांडीसची सही होती. कुसुमने पुन्हा एकदा नावाखालची पोस्ट वाचली. प्रेसिडेंट, जल शिवार म्हणजे देशमुख साहेबाना मुदतपूर्व निवृत्ती दिली होती. तिने समोर नजर टाकली तर आनंद अजून तिच्या पुढ्यात बसून होता. तिने खेकसूनच "काय, काम नाही का" म्हणून आनंदला विचारले. आनंद थोडा गोंधळला, पण सावरत म्हणाला "तुझं काही काम असेल म्हणून मी थांबलो. काही निरोप आला का देशमुख साहेबांचा?" कुसुम आनंदला कितीही हिडीसफिडीस करत असली तरी आनंद तिच्याशी फार जिव्हाळ्याने वागायचा. प्रेम जे होत तिच्यावर.

आनंदच्या ह्या अश्या आपुलकीने कुसुमलाचा स्वतःच शरमल्यासारखं वाटे, पण ते तेवढ्यापुरतं. तिला त्याचं प्रेम समजायचं, पण हेच प्रेम तिला तिच्या समाजकार्यात अडथळा बनेल असं नेहमी वाटे. म्हणून ह्या प्रेमाबिमाच्या भानगडीत कधीच पडायचं नाही हे तिने मनाशी पक्क केलं होतं. कुसुम थोडी शांत झाली, तिने डायरीत काही नोंदी बघून टेबलवरच कॅलेंडर हातात घेत आनंदला म्हणाली “येत्या गुरुवारी मी नगरला जात आहे. आपल्या ड्रीम प्रोजेक्टविषयी नव्या मोठ्या साहेबांना चर्चा करायची आहे, दोन दिवस लागतील. कारण शुक्रवारी देशमुख साहेबांचा निरोप समारंभ, तो अटेंड करूनच मी परतेन. तू सांभाळशील ऑफिस!"

आनंदला असं वाटत होत की तिने आपल्याला सोबत घेऊन जावं. तिच्या ड्रीम प्रोजेक्टवर तो खूप मेहनत घेत होता. नक्कीच तिला त्याची मदत झाली असती. उत्तरादाखल तो "हो. ऑफिसची काळजी नको करू. मी ड्रायव्हरला उद्या सकाळचा सातची वेळ सांगून टाकतो, चालेल ना?" बोलून तो केबिन बाहेर जाण्यास निघाला. कुठल्यातरी पपेरमध्ये डोकं खुपसून कुसुमने फक्त मान हलवली. खरंतर ती खूप काळजीत पडली होती. दरवाज्यापर्यंत जाऊन आनंदने परत तिच्याकडे नजर वळवली. पण तिचं मुळात लक्षच नव्हतं, ती त्याला फार तणावात असल्याच जाणवलं. आनंद परत मागे फिरला आणि तिच्या समोर उभा राहत तिला म्हणाला " तू देशमुख साहेब गेले म्हणून इतकी काय काळजी करतेस. आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये कुठलीही त्रुटी ठेवलेली नाही आणि सर्व काही अगदी नियमात आहे. प्रेझेन्टेशन उत्तम झालं की प्रोजेक्टला फंड नक्कीच मिळणार. साहेब नवीन आले म्हणून काय ते सिस्टिम तोडू शकणार नाही"

कुसुमला खरंतर हे दिलासा देणारं भाषण आवडत नसे, का कुणास ठाऊक यावेळी ती आनंदाला काही बोलली नाही. तिला खरंच आधाराची गरज होती. आनंदने समाजावल्याने तिला थोडं बरं वाटलं. तिने थोडं खुशीतच त्याच्याकडे पाहत "कॉफी घेणार?" म्हणून विचारले.

"मला नको, मी जस्ट घेतली आहे पण तू घे. मी कॉफी सांगतो" असं म्हणत तो केबिन बाहेर गेला.

कॉफी घेता-घेता कुसुम विचार करत होती, ‘हा आनंद, आपण ह्याला किती घालून पाडून बोलतो, पण तरी तो आपली खूप काळजी घेता. आपण याच प्रेम नाकारलं तरी त्याचा त्रागा न करता केवळ शांतपणे सगळं समजून अगदी त्यावेळीही आपल्याला सपोर्ट केला. चांगली भरपूर पगाराची नोकरी मिळत असतानाही माझ्यामागे निःस्वार्थीपणाने रुंभोडी गावात आला. हरएक प्रोजेक्टमध्ये आपल्याला त्याची खूप मदत तर होतेच. आपण मात्र त्याला फार वाईट वागणूक देतो, त्याची काही चूक नसताना.’ कॉफी पिऊन झाल्यावर तिने ड्रीम प्रोजेक्ट प्रपोजल हाती घेतलं आणि प्रोजेक्टसंबंधी विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी ह्याचा ती विचार करू लागली.

ऑफिसची काम आटपून ती घरी आली. कामाच्या फाईलस आणि लागणारं सामान बॅगमध्ये टाकून तिने तिच्या आईने दिलेली एक सुरेख साडी हातात घेत ती सोबत घावी की नको हा विचार करू लागली. साडी खूपच मॉडर्न आणि महागडी होती. तिने ती साडी उद्याच्या मिटिंगला नेसण्यासाठी सोबत घेतली. भूक नसल्याने जेवण न करता, सर्व आवराआवर झाल्यावर ती सरळ झोपण्यासाठी मधल्या रूममध्ये गेली.

सकाळी पावणे सातला ड्राइवर कुसुमच्या घरासमोर गाडी घेऊन हजर झाला, सातच्या ठोक्याला त्याने दार ठोठावलं. कुसुमने दार उघडलं, तेव्हा ड्राइवर थोडा बुचकळ्यात पडला. कारण कुसुम अगदी अप टु डेट, ते देखील प्रथमच साडीत. साडीत कुसुम छान दिसत असावी, ड्राइवर पुन्हा-पुन्हा तिला कौतुकाने पाहत होता.

कुसुम दाराततून थोडी समोर आली. तिने घराला कुलूप लावलं आणि ड्राइवरला बोलली.

"चला, काका निघायचं!"

"कुसुम ताई, द्या ना, डिक्कीत ठेवतो"

"असू द्या, बॅग मी ठेवेन. तुम्ही जरा निघण्याअगोदर ह्या बाहेरच्या झाडांना पटकन पाणी घालता का, आज गडबडीत झालं नाही"

"हो, हो!" म्हणून ड्राइवर लगेच समोरच्या बागेकडे सरसावला. झाडांना पाणी देईपर्यंत कुसुमने सामान गाडीमध्ये ठेवलं आणि तिने गाडी गेट बाहेर रोडला घेतली होती. ड्राइवर काम आटपून आला आणि गाडी बाहेर उभी असल्याचे बघून थोडं ओशाळाला. कुसुम गाडीमध्ये बसलेलीच होती, ड्राइवरही गाडीत येऊन स्टार्टर मारून हायवेकडे निघाला. कुसुमंच घर तसं हायवेजवळच होत. हायवे लागला की गाडीने मस्त वेग घेतला. प्रवास साधारणतः तीन तासाच होता आणि रस्ता ही मस्त. गाडी सुसाट वेगाने अंतर कापत होती. किशोरचू कुठलंस गाणं चालू होतं पण तिचं त्या गाण्याकडे लक्ष नव्हतच. ती केव्हाच नगरला पोहचली होती, मनाने. प्रोजेक्टसंबधी नोंदी, त्या सांगण्याचा त्यांचा क्रम. अगदी मनातच तिने प्रेझेंटेशन दिल्याचा तिला भास झाला. हा काही तिचा पहिला प्रोजेक्ट नव्हता, असे कैक प्रोजेक्ट तिने फंडिंग एजंसी समोर प्रेझेंट केले होते. मग रीतसर ते पास होऊन त्याना आर्थिक मदतही मिळाली होती. पण असं गडबडून जाण्याची तिची ही पहिलीच वेळ.

पण हा तिचा ड्रीम प्रोजेक्ट, कामाचं स्वरूपही थोडं नेहमीपेक्षा जास्त आणि प्रोजेक्टचे खूप सारे गावाला असलेले फायदे, ह्या प्रोजेक्टमुळे गावाचा खरंतर कायापालटच होणार, हे नक्की. त्यात हे नविन साहेब, देशमुख साहेबांच्या जागी आलेले साहेब कसे असतील, ह्या असल्या विचारातच ती गडबडली होती, थोडीशी नर्वस.

गाडीचा वेग मंदावला तसा तिच्या डोक्यात चालू असलेले विचार चक्र स्थिरावले आणि तिने सहज बाहेर एक नजर मारली. गाडी नगर शहरात दाखल झाली होती आणि ट्रॅफिक असल्याने गाडी सावकाश जात होती. ती ड्रायव्हरला म्हणाली "अरे, नगर आलं पण! वेळ कसा गेला काही कळले नाही"

"बाई साहेब, तीन तास झाले आपण गाडीतच आहेत, तुम्हाला एकदा चहासाठी विचारलं होत, पण तुम्ही काही तरी विचार करत होता"

"अरे हो, मोठ्या साहेबांना भेटायचं आहे ना. तुम्हाला भूक लागली असेल ना. नाश्ता पण नाही केला आपण. ऑफिसला जाण्यापूर्वी नाश्ता करू. कुठे चांगल्या ठिकाणी थांबा पाहू"

"बरं बाई साहेब"

म्हणून तो शांत झाला. चांगलंस हॉटेल बघून त्याने गाडी थांबवली, आणि झकासपैकी नाश्ता केला. ऑफिसला ते आले तेव्हा साडे-अकरा वाजले होते. ऑफिसचं आवार फुलांच्या आणि शोच्या झाडझुडपांनी सुशोभित केलं होत. बागेतला माळी अगदी प्रेमाने झाडांना पाणी घालत होता. कुसुम ह्या सुंदर देखाव्याने ताजीतवानी झाली.

कुसुमने रिसेप्शनला आल्याचं रिपोर्ट केलं आणि फेर्नांडीस साहेबांची विचारपूस केली. ते बारा पर्यंत येतील हे कळल्यावर कुसुम समोरच्या कोचावर जाऊन बसली आणि बसल्याबसल्या तिने पुन्हा एकदा प्रोजेक्ट प्रेसेंटेशनचं रिविजन केलं. फेर्नांडीस साहेबांनी ऑफिसला पोहचायला चांगला एकच वाजवला. एक म्हणजे काय, लंच ब्रेक. तरी कुसुमनी साहेबांना ती आल्याचं रिसेप्शनला कळवायला सांगितलं आणि दोनची वेळ नक्की केली.

बरोबर दोन वाजता ती साहेबांच्या केबिन समोर होती. तिने सावकाश नॉक केलं, नो रिस्पॉन्स. तिने पुन्हा नॉक केलं, पहिल्यापेक्षा थोडा जोर लावत आणि मग खेकसल्या सुरात "कोण ये, आत या" असा आवाज आला. कुसुम थोडी बिचकली. 'गुड आफ्टरनून' म्हणतच ती आत गेली.

साहेबांचा तास नाही, ते कुठल्याश्या फाईलमध्ये डोकं खुपसुन बसले होते. कुसुम पुन्हा एकदा 'गुड आफ्टरनून सर' म्हणाली. मग त्यांनी फाईलमधून डोकं वर करत तिच्याकडे बघितलं आणि मग ते बघतच राहिले. ते सुंदर लावण्य, सडसडीत बांध्याची, नितळ कांती असलेली कुसुम. चेहऱ्यावर खास तेज, हलकासा मेकअप. कुसुम थोडी बुजली, तिने त्यांच्याकडे बघण्याचं टाळत, ती आता केबिनच्या इतरत्र गोष्टी निहाळत होती. देशमुखसाहेब गेले आणि त्यांच्यावेळी असणारी ढेरसारी पुस्तके, देशविदेशची मॅगझिन्स सर्व काही हद्दपार झाल्याचं तिला जाणवलं. ती बघत होती तो, मागे लटकवलेला येशू. केबिन खूप मोठी आणि आलिशान होतीच. साहेबांची बसण्याची खुर्चीपण नवीन, समारंभाला मोठं टेबल आणि त्या समोर ओळीत ठेवलेल्या खुर्च्या. त्यांच्या समोरच्या भिंतीवर भला मोठी टीव्ही. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात खास सोफा होता आणि या केबिनचा हकदार, फेर्नांडीस साहेब तसे बरेच तरुण होते. पण कुसुमला ते थोडे शिष्ट वाटले. ते अजूनही तिच्याकडे बघत होते, तिचं सौन्दर्य चघळत होते. काळेसे, उंचेपुरे आणि धिप्पाड राक्षसी बांध्याचेच जणू. थोडेसे उग्र आणि उद्धट वाटणारे. अजूनही त्यांनी कुसुमला बसायला सांगितले नव्हते. कुसुमने थोडसं खाकरून केबिनची शांतता आणि त्यांचं निहाळणं विचलित करण्याचा प्रयत्न केला.

पण ते बधले नाही, त्यांनी तिच्याकडे हसत बघत "या बसा, आपणच का कुसुम. छान छान." त्यांनी थोडी सलगी करण्याचा प्रयत्न चालू केला.

कुसुम बऱ्याच वेळापासून उभी होती, ती बसली आणि बॅग मधून फाईल आणि प्रोजेक्टसंबधीचे रिपोर्ट काढून तिने समोर ठेवले.

साहेबांनी तिला विचारले "खूप घाईत दिसताय. कामाच बघू नंतर, काय घेणार तुम्ही चहा, कॉफी की थंड?"

"कॉफी चालेल सर"

"अग तू मला सर म्हणू नको, कुणाल. फक्त कुणाल"

तिला हे अगदीच वाह्यात वाटलं, आवडलं नाही. पण ती काही बोलली नाही. प्रोजेक्ट पास करून घेणं आणि फंड मिळणे महत्वाचं होत. ती फक्त हसली.

त्यांनी फोनवर कॉफी ऑर्डर केली.

" मॅडम! कॉफी घेऊन आपण कामाचं बघू."

मग त्यांनी उगाच इकडंतिकडचे विषय काढत बोलणं चालूच ठेवलं. बोलताना ते तिच्याकडे असे काही बघायचे की तिचा जीव अगदी कासावीस होत होता. पण तिचे हात जे दगडाखाली अडकले होते. फंड अडकला असता तर ड्रीम प्रोजेक्टवर पाणी फेरलं गेलं असत. तिच्या मनात संताप होता पण तिने तो ओठावर येऊ दिला नाही.

कॉफी आली. ती पिऊन झाल्यावर, कुसुमनी प्रोजेक्टसंबंधी शिस्तशीरपणे सगळी माहिती सांगितली. प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनही उत्तम झालं. प्रोजेक्ट स्कोप, त्याला लागणारा रिसोर्स, अंदाजे खर्च, येऊ शकणाऱ्या अडचणी त्याचावर मात करण्यासाठीचा ऍक्शन प्लॅन. प्रोजेक्टमुळे गावाला आणि आजूबाजूच्या गावाला होणारे फायदे, त्यांना मिळणारा कायमचा रोजगार. एकंदरीत होणारा गावाचा शाश्वत विकास. सगळं कसं मुद्देसूद समजावलं होतं कुसुमनी.

फेर्नांडीस साहेबांनीही सगळं शांतपणे ऐकून घेतलं. प्रोजेक्ट छानच होता तसा तो त्यांनाही आवडला. पण त्यांनी प्रोजेक्टमध्ये काही चेंजेस सुचवले आणि उद्या पुन्हा भेटू म्हणून सांगितलं. कुसुम हिरमुसली. तिला वन-शॉटमध्ये प्रोजेक्ट पास होईल असं वाटलं होत. तिने भेटण्याची वेळ दुपारची मागितली, तीन ते चार. कारण सांगितले चेंजसही बरेच होते. त्यावर काम करायला तिला वेळ हवा होता. साहेबांनी साडेतीनला भेटू म्हणून सांगितले आणि मग देशमुख साहेबांचा निरोप समारंभ आहे तो करून तुम्ही निघू शकता हे देखील बोलले.

कुसुमलाही निरोप समारंभासाठी उद्या परत नगरला यायचं होतच. पण जर आज प्रोजेक्ट पास झाला असता तर ती औरंगाबादला घरी जाऊन आली असती, खूप दिवस झाले ती घरच्यांना भेटली नव्हती. आता या सगळ्या प्लांनिंगवर पाणी फेरल्या गेलं होत, तिने ड्राइवरला गाडी काढायला सांगितली आणि जवळच्या चांगल्याश्या हॉटेलमध्ये रूम बुक केली. ड्राइवरची सासुरवाडी नगर असल्याने तो तिकडे जाणार होता.

रूमवर गेल्या गेल्या तिने लागलीच कामाला सुरवात केली. काम बरंच असल्याने, ती रात्रीच्या जेवणालाच काय ते उठली आणि मग खूप उशिरापर्यंत ती काम करत राहिली. सकाळी जाग आली तेव्हा चांगले नऊ वाजले होते. फटाफट चहानाश्ता ऑर्डर करून तिने तिचं आवरून घेतलं, तिने ड्राइवरला फोन लावला आणि एक वाजता हॉटेलला आला तरी चालेल म्हणून सांगितलं आणि उर्वरित काम आणि प्रेझेंटेशनवर एक फायनल फिनिश मारला. सर्व कामे संपवायला साडे बारा वाजले. एक वाजता ड्राइवर आल्यावर त्या दोघांनी जेवण केलं आणि मग ते फेर्नांडीस साहेबांना भेटण्यासाठी निघाले.

साडेतीनची मिटिंग चारला चालू झाली. आज तर साहेब वेगळ्याच मुडमध्ये होते, प्रोजेक्टच अस्तित्वच त्यांनी धोक्यात टाकलं, मुळात हा प्रोजेक्ट तिथल्या गावातील लोकांना हवा आहे का, इथपासून चालू केलं. रात्री जागून केलेल्या मॉडिफिकेशनला एकएक करत त्यांनी कचराकुंडीची जागा दाखवली. मुळात प्रोजेक्ट अगदी परफेक्ट होता पण त्यानी नकार सूर लावला तो मिटिंग संपेपर्यंत बदलला नाही. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू म्हणून मिटिंग संपवली.

त्यानंतर लागलीच देशमुख साहेबांचा निरोप समारंभ झाला. देशमुख साहेब थोडे भावुक झाले होते, ते कंपनीबद्दल, त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल भरपूर बोलले, कुसुमचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कुसुमनेही त्यांच्यासाठी आणलेले खास गिफ्ट त्यांना दिलं आणि लांबचा प्रवास असल्याने ती जेवणाला न थांबता, लागलीच निघाली.

सकाळी कुसुम ऑफिसला आली आणि लगेच आनंदनी उत्साहात तिला अभिनंदन केलं आणि फुकट तिचा रोष ओढावून घेतला. तिच्या बोलण्यावरून आनंदला एवढं समजलं की कालची मिटिंग चांगली झाली नाही. मग तो काही न बोलता तिच्यासमोर शांत उभा राहिला, पंचिंग बॅगसारखा. कुसुमनी कालचा सगळा राग त्या बिचाऱ्या आनंदवर काढला, त्याच्यावर विनाकारण फाडफाड ओरडली.

पुढचे पाच-सहा दिवस मग तिने त्या प्रोजेक्टवर काम केलं. साहेबांनी काढलेल्या पॉईंट्सचा व्यस्थित अभ्यास करून प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्रेझेन्टेशन पुन्हा मॉडिफाय केले. तसं तर प्रोजेक्टमध्ये कुठल्याच त्रुटी नव्हत्या पण साहेबांना हा प्रोजेक्ट का आवडला नाही, खरंच तिलाही कळत नव्हतं. ठरल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात पुन्हा ती नगरला साहेबांना भेटायला गेली आणि ह्याही वेळेस मिटिंग सक्सेसफूल झाली नाही. ह्यावेळी पुन्हा फेर्नांडीस साहेबांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिला रात्री तिथेच लॉजमध्ये थांबण्याची विनंती केली तिथे, छान चर्चा करून प्रोजेक्ट पास करू अशी हमी देखील दिली. नाहीतर पुन्हा पुढल्या आठवड्यात यावे लागेल असं ते म्हणाले. पण ती थांबली नाही.

नंतर तिच्या अश्या नगरला दोन-तीन फेऱ्या झाल्या, पण यश काही हाती येत नव्हतं. प्रत्येक वेळी फेर्नांडीससाहेब उगाच काही त्रूटी काढायचे आणि मग संध्याकाळी भेटू, हॉटेलात जेवायला जाऊ किंवा रात्री चर्चा करू, असं काही तरी फालतू बोलायचे. कुसुमलाही त्यांना काही उलट बोलता येत नव्हतं आणि कंप्लेंट करावी तर हे बाकीच्या ठिकाणी वजन वापरून प्रोजेक्ट पास होणार नाही हे बघतीलच आणि मग तिचा ड्रीम प्रोजेक्ट ड्रीममध्येच विरून जाईल.

ह्या आठवड्यात मात्र ती घरून निघतानाच ठरवून निघाली की या प्रोजेक्टचा आज सोक्षमोक्ष लावायचाच. अगदी कुठल्याही परिस्थितीत. ती फेर्नांडीस साहेबांच्या ऑफिसला पोहचली, तिने रीतसर प्रेझेन्टेशन दिल. नेहमीप्रमाणे त्यांनी पुन्हा काही तरी खुसपट काढलं. तिने त्यांना याचं सोल्युशन विचारलं. त्यांनी नेहेमीप्रमाणे तेच सांगितलं, काहीशी डिमांड करत. ती ठरवूनच आली होती. तिनेही मग होकार दिला आणि संध्याकाळची मीटिंगची वेळ ठरली. ठरल्याप्रमाणे दोघेही भेटले, प्रोजेक्ट संबधी चर्चा झाली, खूपच पॉसिटीव्ह. फायनली प्रोजेक्ट पास झाला आणि मग कराराप्रमाणे तिने त्या फेर्नांडीस साहेबांना जे हवं होत ते दिलं. तिचं सर्वस्व. आहुती, म्हणा हवं तर!

ती सकाळी गावात परत आली. ऑफिसला पोहोचली तेव्हाच ती आनंदाला उदास वाटली. त्याने तिला काहीही विचारले नाही. केबिन मध्ये जातानाच तिने आनंदला बोलवून घेतलं. तो आत आल्यावर तिने त्याचा हातात ते पास झालेलं ड्रीम प्रोजेक्ट प्रोपोजल दिल आणि ती अगदी शांतपणे त्याला म्हणाली "आता काम चालू करायला हरकत नाही, सोमवार पर्यंत पहिला चेक पण येईल"

आनंद जाम खुश झाला. त्याने लगेच ऑफिसबॉयला बोलवून मिठाई आणण्यास सांगतीलं. त्याने कुसुमला अभिनंदन करण्यासाठी हात समोर केला, पण कुसुमने कुठलाच रिस्पॉन्स दिला नाही. ती खूप निरुत्साही वाटली. ड्रीम प्रोजेक्ट पास झाला, ज्या प्रोजेक्टसाठी ती इतके दिवस मरमर करत होती तो आता चालू होणार होता. तरीदेखील ती खुश नव्हती. काय झाले असेल काल. त्याने तिला विचारलं

"बरं नाहीये का कुसुम?"

"नाही रे, मी ठीक आहे"

तिने संथपणे उत्तर दिलं. तिची नेहमीची खुमखुमी हरवल्यासारखं वाटलं. आनंदला हे अपेक्षित नव्हतं, नक्कीच काहीतरी अप्रिय झालं होत नगरला. तो काही बोलला नाही पण योग्य वेळ बघून तो तिला सविस्तर विचारंणार होताच.

नगरहून येऊनही तिला आता चार पाच दिवस झाले असतील पण अजूनही तिचा मूड ठीक झाला नव्हता. आल्यापासून ती बरीच शांतशांत असायची. फारच एकटी एकटी, काही तरी हरवल्यासारखी आणि खूपकाही हरल्यासारखी. हे असं कुसुमच रूप केवळ आनंदाला नव्हे तर रुंभोडी गावातील सगळ्यांनाच नवीन होत. आनंदला तिची अवस्था पाहवत नव्हती. त्याने थोडी हिंमत केली आणि सरळ तिच्या केबिन जात म्हणाला,

"कुसुम, आज संध्याकाळी काय करतेस. मी जेवायला आलो तर चालेल ना!"

"अरे वा, नक्की-नक्की " हे उत्तर आनंदला बिलकुलच अपेक्षित नव्हतं. तो खुशही झाला आणि थोडासा दुःखीपण.

"किती वाजता येऊ?"

"केव्हापण चालेल, लवकर येशील तर स्वयंपाकात थोडी मदत होईल. सात-सव्वासातपर्यंत ये, जमलं तर"

आनंद हवेतच होता "हो! हो!!"

कुसुम बळेबळे खुशीत बोलत होती पण तिची उदासीनता ती आनंद समोर लपवू शकली नाही. आनंद बरोबर सातवाजता कुसुमकडे गेला, जातानाच त्याने गोडासाठी हॉटेलातून बासुंदी घेतलेली होतीच. बाकी बेत साधाच होता, जेवण हा खरं तर मूळ मुद्दाच नव्हता. दोघांनाही खूप बोलायचं होतं. कुसुमला सगळंसगळ सांगून तिचं मन हलकं करायचं होतं आणि आनंदाला तिच्या दुःखात सहभागी व्हायचं होतं. जेवण झाल्यावर कुसुमने स्वतःच त्याला शतपावलीसाठी विचारलं. दोघे मग बाहेर निघाले, गावाच्या बाहेर येईस्तोवर दोघे गप्पगप्पच होते. गाव सारून ते थोडे टेकडी वर चढून चांगल्याश्या जागी बसले. आनंदने तिला विचारलं

"काय ग कुसुम, काय झालं. तू हल्ली फार गप्पगप्प असतेस"

"अरे काहीच तर नाही. सगळं अगदी ठीक आहे "

"अग मी काय तुला आजपासून ओळखतो "

"खरंच आनंद सगळं ओके आहे"

"बघ इतकी तू आत्मविश्वासी, पण हे सांगतानाही तुझा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतोय"

कुसुम थोडी कावरीबावरी झाली. थोडी शांत.

"कुसुम, नगरला नक्कीच काहीतरी झालं जे तू आमच्यापासून लपवते आहेस. तू जरी मला मित्र समजत नसलीस तरी तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. तुलाही माहिती आहे, अगदी कॉलेजपासून. तू नक्कीच माझ्यासमोर तुझं मन हलकं करू शकतेस, अगदी निःसंकोच"

कुसुमच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिला काहीच बोलता आलं नाही. आनंद स्वतः समोर गेला आणि त्याने तिला आधार दिला. काही क्षण तिथे निरव शांतता पसरली. मग कुसुमचा बांध सुटला, इतके दिवस दडवून ठेवलेली घटना आता तिच्या मुखी आली होती.

आनंद आपला ड्रीम प्रोजेक्ट तर पास झाला, पण यासाठी मला माझं सर्वस्व पणाला लावावं लागलं"

"म्हणजे"

"मी माझं पावित्र्य हरवून बसले. तो देशमुख साहेबांच्या जागी जो फेर्नांडीस म्हणून आला तो एक नंबरच नीच आणि फालतू माणूस आहे. त्याला आपल्या प्रोजेक्टसंबंधी कसलीही आपुलकी नाही. प्रोजेक्टमध्ये कुठलीही त्रुटी नसतानाही त्याने विनाकारण मला खूप त्रास दिला. त्याला मुळात माझ्यात इंटरेस्ट होता, त्याने ते मला वेळोवेळी बोलूनही दाखवले"

"मग तू मला बोलली का नाही"

"काय सांगणार आनंद, हा ड्रीम प्रोजेक्ट माझा होता आणि ही लढाई देखील माझीच"

"अग मी तुझ्यासाठी, केवळ तुझ्यासाठीच इथे आलोय. तू मला कधी समजूनच घेतलं नाहीस, कधीच "

"अरे तसं नाहीये"

निश्चितच तू हे मला सांगितलं असतंस तर आपण हा प्रश्न वेगळ्या प्रकारे हाताळला असता. पण आता जे झालं ते झालं. ह्यातून तुला बाहेर यावे लागेल. मुळात तुझ्या मनातील पराजित भावना तू पहिले काढून टाक. पटतंय का बघ, ‘देवघरातील समई पेटते, पूर्ण देवघर उजळवून टाकते. शुद्ध तूप. प्रसन्न भावना, श्रद्धापूर्वक पूजा. खुद्द देवाचं अस्तित्व इतकं सगळं असूनही समईतील पंढरी शुभ्र वात जळताना काळी होतेच. तूही त्या वातीसारखी आहेस, तुझ्या आयुष्यातील ती काळी वेळ सोडली तर बाकी तू ह्या रुंभोडी गावाला, या आसमंताला उजळवून टाकलंस. ह्या ड्रीम प्रोजेक्टने ह्या गावाची खरंच खूप प्रगती होणार आहे. विकास आणि प्रकाश, तुझ्याच ज्योतीचा. मी तुझा पूर्वीही आदर करायचो आणि आजही तेवढाच आदर करतो, किंबहूना थोडं जास्तच. तू हे सगळं विसर आणि पुन्हा जोमाने कामाला लाग. असं समज की ही दिव्याची काजळी आहे जी आपण नक्कीच पुसू शकतो, स्वछ करू शकतो पण तू दिलेला प्रकाश आणि ऊर्जा. चिरंतन ऊर्जा, चिरकाल टिकणारी अक्षय ऊर्जा. तीच आम्हाला हवी आहे, या रुंभोडी गावाला हवी आहे"

कुसुम आनंदकडे बघतच राहिली. ह्याच आनंदचा आपण जागोजागी अपमान करत आलोत. खरच आनंदने आपल्याला समजून घेतलं, ते तर मलाही जमले नाही. ह्याच्या मनात आपल्याबद्दल इतकं प्रेम आणि इतका आदर आहे, तर आपणही आपल्यावर प्रेम करायला, आपला आदर करायला काय हरकत आहे. हे सगळं खरंच विसरता येईल. देव जाणो, प्रयत्न तर नक्कीच करू शकतोच"

रात्र बरीच झाली होती, दोघेही टेकडी उतरत होते आणि रस्त्यात जागोजागी लावलेल्या लाईट्सचा गावात भरपूर प्रकाश होता. टेकडीवरचा काळाकुट्ट अंधार उतरत कुसुमानंद प्रकाशाकडे झेप घेत होते. एक नवीउमेद उराशी बाळगून, संपूर्ण ऊर्जेने.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama