Manish Vasekar

Inspirational Others

3.3  

Manish Vasekar

Inspirational Others

असंख्य मुंग्या

असंख्य मुंग्या

3 mins
11.8K


परभणी शहरातील एक सुज्ञ मुलगा तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करण्याची मनिषा बाळगतो. समुद्रकिनारा किंवा नदीचा काठ मिळणे अशक्य असल्याने, तो कॅनॉलचा आधार घेत बैठक मारतो. पूर्वीच्या काळी संदेशवाहक यंत्रणा फार क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्याने तपश्चर्या करणे फार खडतर भासे, पण सध्याचा काळ हा म्हणजे इंटरनेट युग, इमेलद्वारे या मुलाच्या तपश्चर्येची बातमी फटाफट देवाजवळ इनबॉक्समधे ब्लिंक झाली. आणि त्याच दिवशी ईओडी, देव त्या मूलासमोर प्रकट होतो.

अगदी आठ तासाच्या तपश्चर्येने देव प्रसन्न झाल्याने मुलगा जाम खुश होतो. कडक उन्हाळ्याची संध्याकाळ असून, वातावरण आल्हाददायक बनून जात. प्रसन्न मुद्रेने देव त्याला बोलतात-


"बोल वत्सा, मी प्रसन्न झालोय, तुला जे वरदान हवं असेल ते मागून घे, अगदी निःसंकोच माग..."


"मला जे पाहिजेल ते तुम्ही मला देणार?"


"आधी, मागून तर बघ..."


मुलगा तयारीत नसतोच. म्हणून तो विचार करू लागतो. इतक्या सहज आणि लगेच कुठली गोष्ट मिळण्याची त्याला सवयच नसते.


मग देव स्वतः त्याला विचारतात, "बोल तुला व्याधीमुक्त करू, अगदी व्याधीशून्य!"


मुलगा तत्परतेने नकार देत बोलतो, "नको नको देवा, व्याधीमुक्त झालो तर मला कसरतीचे, निरोगी शरीराचे महत्व राहणार नाही शिवाय इतर जणांना ताप, सर्दी, मधुमेह, कर्करोग होणारच आणि मुळात मला त्यांच्या वेदना मग कशा समजणार आणि मग या माझ्या कमावलेल्या निरोगी शरीराची लज्जत राहणार नाही. तेव्हा मला व्याधिमुक्तता नकोच मुळी..."


देवांना आश्चर्य वाटते, ते त्याला विचारता, "मग तुझी गरिबी हटवू का, तुला श्रीमंतीच वरदान देऊन टाकतो..."


यावरही मुलगा नकार घंटा वाजवत, "श्रीमंती, नको रे बाबा, एकतर अचानक आलेल्या श्रीमंतीने आयकर विभागाची धाड पडेल. शिवाय वर्गणी-खंडणीसाठीचे फोन चालू होतील. आणि मुळात मी श्रीमंतीत वाढलो आणि मला पुढे माझ्या मुलासमोर गरिबीची बढाई, तो दिव्याखाली बसून केलेला अभ्यास, ते पोटाला चिमटा मारून केलेलं पालनपोषण याच्या टिमक्या तर मारताच येणार नाहीत ना! तेव्हा तुझी श्रीमंती तुला लखलाभ..."


देव मंद हसतात, "छान, मग तुला चिरकाल सुख बहाल करतो, अगदी दुःखमुक्त!!"


"दुःखमुक्त, अरे देवा 'कार्बनडाय-ऑक्साइड सोडून मगच ऑक्सिजन आत घ्यायचा' नियम तर तूच ठरवलास ना. मग दुःखाशिवाय सुखाला काय किंमत. दुःख येणारच नाही म्हटल्यावर सुख अनुभवाची आणि त्याचा आनंद लुटायची, पार्टी करायची काही मज्जा नाही. तेव्हा तोंडी लावायला तरी थोडस दुःख असूच दे...."


"मग तू अमर हो, तुझा मृत्यू मी पुसून टाकतो. तू मनसोक्त जग,भरपूर!"


यावरही तो मुलगा नाहीच म्हणतो, "पूर्वी जुने लोक ‘शतायुषी हो’ अशा आशीर्वाद देत. आम्ही सध्या कुणाला

अशा आशीर्वाद देतच नाही, फार-फार तर मरेपर्यंत जग इतकं म्हणतो. आणि हो मी जेव्हा लोकांचे मृत्यू बघतो. तेव्हा खरंच मला त्या मरणाऱ्याचा हेवाच वाटतो. ते इतरांचं त्याच्यासाठीच रडणं, तो आक्रोश, दुखवटा यांनी मी उल्हसित होतो. आणि माझ्या मृत्यूपश्चात घडणाऱ्या गोष्टीची अनुभूती घेतो. जर हा अनुभवच नसेल तर जगण्याला काय अर्थ आहे. आम्ही जगतो मुळात मरणासाठी. मृत्यू अंतिम सत्य नसून ते प्रथम सत्य आहे असं मला वाटतं..."


आता मात्र देव नाराजीनेच पण शांततेत विचारतो, "वत्सा मगतुला हवे तरी काय?"


"असं कर देवा मला तू माणूस बनव..."


"अरे तू तर जन्मापासूनच आहेस ना तो!"


"जन्मापासून मी मनुष्यप्राणी आहेच देवा, पण मला माणूस बनायचं आह. लोक ज्याचा विशेष उल्लेख करतात, तो माणूस, ज्यात म्हणे माणुसकी उरली आहे तो माणूस. बनवशील मला देवा माणूस..."


देव मिश्किल हसतो आणि त्या मुलाला म्हणतो, "असं तर. एकवेळ तू मला देव बनव म्हणाला असता, तरी चाललं असतं. लगेच तुला देव बनवून इंद्र-दरबारी धाडून दिलं असतं. पण तुला माणूस बनवणं खरंच अवघड आहे. मुळात तुला माणूस बनायचं असेल, तर तुला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. मीही माणूस बनण्यासाठी कैक वेळा मनुष्यअवतार घेतलाच. पण माणूस बनणं तेवढं सोपं नाही. या तुझ्या जगात दोन-तीन चांगल्या माणुसकीच्या गोष्टी केल्या की एक तर इतर जनता त्याला ताबडतोब देव बनवून टाकते किंवा तो स्वतःच स्वतःला देव समजून घेतो...”


मुलगा निराश होतो. भक्ताची निराशा देवाच्या नजरेतून चुकत नाही. देव म्हणतो, "मी असं करतो, तुला तशी अधूनमधून उचकी (हीचकी) येत असेल ना, तशी माणुसकी दाखवून माणूस बनण्याची अधून-मधून संधी देत जातो..."


मुलगा ‘फुल न फुलाची पाकळी’ मिळो या उद्देशाने देवासमोर वाकून वंदन करतो.


तथास्तु!


मुलगा जेव्हा देवाला वंदून डोळे उघडतो, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त मुंग्या असतात. टीव्ही बिघडल्यावर दिसतात तशा असंख्य मुंग्या दिसतात ना, तशा काळ्या-पांढऱ्या मुंग्या, फक्त माणुसकीच्या, असंख्य मुंग्या!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational