Manish Vasekar

Others

3  

Manish Vasekar

Others

भूगोल

भूगोल

5 mins
1.9K


शाळा सुटायची ही रोजचीच वेळ. दीडची. शाळेतल्या प्रत्येकालाच ह्या वेळेची उत्सुकता. हो अगदी सर्वाना, मुलामुलींन पासून ते सर्व शिक्षकांना, स्कुलबस ड्राइव्हरांना, बेल देणाऱ्या शिपायाला, गेट वरील गेटकिपरला, गेट बाहेर बडबडत उभ्या असणाऱ्या पालकांना, खरमूरे गोळ्या बिस्कीट विकणाऱ्या गाडीवाल्याना, स्टेशनरी दुकानदाराला. अगदी सगळ्यांना दीड वाजता वाजणाऱ्या बेलची उत्सुकता. उत्सुकता नव्हती ती फक्त सातवीत शिकणाऱ्या स्तुतीला. हा निरुत्साह पूर्वापारचा नव्हता, मागच्या सहा महिन्यापासून शाळा दीडला न सुटता थेट संध्याकाळी सहालाच सुटावी असं वाटे तिला.

वर्षभरापूर्वीच स्तुतीचे बाबा हार्टफेलनी गेले. त्या नंतर खूप खटपटी करून स्तुतीच्या आईने त्यांच्या ऑफिसमध्ये जॉब मिळवला. मागच्या सहा महिन्यापासून त्या ऑफिसला जात होत्या. सकाळी एकाच वेळी स्तुती आणि तिची आई घर सोडत. स्तुतीची शाळा दीडला सुटून, ती दोन पर्यंत घरी यायची. सुरवातीचे काही दिवस तिला ते एकटेपण फार गोड वाटलं. कुरकुर करायला आई घरी नसायची. मनाला वाटेल तसं तिला करता येऊ लागलं. आईने जेवण बनवलेलं असायचं, ते खाऊन झालं कि मस्त लोळालोळ करत टिव्हि बघायचा नाहीतर झोप काढायची. आडकाठी करायला कोणीच नसे. आई यायच्या अगोदर थोडी आवराआवर केली कि झालं.

काही दिवसात मग ती मोठी झाल्याचं सिद्ध झालं, तो चार दिवसाचा अनोखा घाबरवून टाकणारा काळ (पिरियड) चालू झाला. त्यावेळीही आईने तीच कौतुक केल होत. आत्यानी आणि मामीने नवीन ड्रेस घेऊन दिला होता. पुढच्या काही दिवसात तीच शरीर चांगलच सुडोल बनलं. छातीचा भाग चांगलच उठावदार झाला. अगदी डोळ्यात भरण्याजोगा. हे तीच बहारदार भरलेलं शरीर जेव्हा ती स्वतः आरश्यात बघायची तेव्हा लाजून बुजून जायची, गालातल्यागालात हसायची.

ह्या असल्या देखणेपणाकडे बघूनच तो नाक्यावरचा पिंट्या आणि त्याची ती भिकार टीम मागच्या काही दिवसापासून स्तुतीला छेडायचे. तिचा पाठलाग करायचे. पाठलाग करत करत 'आरची!आरची !!' म्हणून आवाज टाकायचे. काही-बाही कॉमेंट मारून मग खिदळयाचे. रस्ता दुपारचा तसा निर्मनुष्य असायचा त्याचा तो पिंट्या चांगलाच गैरफायदा घ्यायचा. दिवसागणिक पिंट्या थोडी थोडी हिंमत करत छेडायचे नवनवीन प्रकार करायचा. हळूहळू आता ते स्तुतीचा पाठलाग करत सोसायटीपर्यंत येऊ लागला.

परवा मात्र पिंट्या ने कहरच केला. वाचमनला मॅनेज करून तो थेट सोसायटीमध्ये घुसला. कस काय कोण जाणे, तो बरोबर स्तुतीच्या बिल्डिंग मध्ये घुसून तडक तिच्याच फ्लॅटची बेल दाबत होता. हरामखोराला स्तुतीची पूर्ण माहिती कोण देत, माहित नव्हतं, पण ती यावेळी घरी एकटीच असल्याचं हि त्याला चांगलंच माहित होत.

स्तुती दाराच्या भिंगातून पिंट्याला बघत होती. कड्ड घातलेल्या उजव्या हाताने भांगपट्टी ठीक करत केसातून सारखा हात फिरवणारा तो डाव्या हाताने दारावरची बेल सारखी दाबत होता. अस्वस्थपणे लॉबीत मागे-पुढे करत होता. भेदरलेल्या डोळ्याने लिफ्टकडे जाऊन, परत येत होता. पुन्हा बेल दाबून दरवाजा उघडण्याची वाट बघत होता.

स्तुती फारच घाबरली होती. तिने काही झालं तरी दरवाजा उघडायचं नाही हे पक्क मनाशी ठरवलं होत. खूपच धिंगाणा झाला, तर मग फोन करताच आला असता. पिंट्याची हि तडफड दहा मिनटे चालली असेल, मग तो चरफडत शिव्या देत निघून गेला. तो निघून गेल्याची खातरजमा झाल्यावरच स्तुतीने दरवाजा उघडून पाहिलं आणि मग हूश करत सुटकेचा सुस्कारा सोडला होता. तिचा चांगलाच थरकाप उडाला, अंगाने डबडबलेला चेहरा नॅपकिनने खसखसून तिने तो पुसून काढला. मग दोन ग्लास थंड पाणी गटागटा करत रिचवल. रडत-रडत तिने हा आजच प्रकार आईला सांगून टाकायच हे ठरवून टाकलं. तिला त्याची पोलिस केस देखील करावी वाटली. असल्या विचारातच तिला झोप लागली. आई जेव्हा घरी आली तेव्हा हि ती झोपलेलीच होती. उशीर खूप झाल्याने आईनं तिला उठवलं नाही. आणि ती हि कपभर दूध पिऊन झोपी गेली.

सकाळी स्तुतीला जेव्हा जाग आली, तेव्हा तिच्या आई ने पहाटेच घर सोडल्याच तिला लिहलेल्या निरोपावरून समजलं होत. घरची आवराआवर आई ने केलेली होती, डब्बा पण तयार होताच. बजेटचे काम असल्याने आईला आज हि रात्री उशीर होणार होता.

दीड वाजून शाळा सुटल्याची बेल वाजण्याची स्तुतीला बिलकुल घाई नव्हती. रसायन शास्त्राचे प्रॅक्टिकल चालू होत. देशमुख सर रसायन, रासायनिक अभिक्रिया, प्रयोग असं बरच काही समजून सांगत होते. काही तिच्या डोक्यात घुसत होत आणि काही तिच्या डोक्यावरून थेट खिडकी वाटे बाहेर उडून जात होत. स्तुतीला विज्ञान मुळीच आवडत नव्हत, तिला आवडायचा भूगोल. खास करून वेगवेगळे देश-प्रदेश, खंड, त्यांची माहिती, भोगोलिक माहिती, ऋतुचक्र, वेगवेगळ्या देशातील सण, त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयी. अश्या भौगोलिक विचारांच्या प्रवाहात संथ पणे तरंगत असतानाच अचानक खोल धबधब्यात पडावं तसा देशमुख सरांच्या कर्कश आवाजातला ओरडा तिच्या कानी पडला.

“रम्या, गधड्या! हात जाळून घेतोस की काय? नीट ओत ते ऍसिड. सावकाश. हळुवार.सलफ्युरिक ऍसिड आहे ते. H2SO4. बघ बघ, टेबलावर सांडलंस तू तर तिथून धूर निघतोय. अंगावर पडलं तर जाळून जाशिल. गधड्या."

मग पूर्ण बॅच त्या टेबलावरच्या फसफसणाऱ्या ऍसिडकड आणि तिथून निघणाऱ्या धुरा कडे बघू लागले. मागे उभी असलेली मुलं टाचा वर करून तो प्रकार बघण्याचा प्रयत्न करू लागले. बघताबघताच 'अरे बापरे' म्हणत आश्चर्य व्यक्त करू लागले. विज्ञानाच्या अभ्यास करताना जादुई दुनियेतील अचम्बून टाकणारे ऍसिड हे रासायनिक प्रकरण हाताळत होते.

रम्या म्हणजेच रमाकांत जाम घाबरला होता, बाल-बाल बचावल्या बद्दल देवाचं आभार मानू लागला होता. घाबरल्याने असलं बहुधा त्याच पातळ नाजूक ओठ थरथरल्यासारखे कपात होते. स्तुती त्यालाच बघत होती. सावळाच पण किती देखणं होता तो. अभ्यासात हुशार. विज्ञान आणि गणितात तर खूपच तरबेज. मदतीती साठी कायम तयार. स्तुतीला असाच मित्र हवा होता.

अश्या विचारांच्या साखळीत गुडूप होत स्तुती विज्ञानाच अभ्यास आभासत होती. मुलांची चुळबुळ चालू झाली होती. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. दीड वाजले होते. दीडची बेल, वाजली आणि शाळा सुटली तस अनंत आवाज एकत्र होऊन एक अस्पष्ट असा कल्ला सर्वत्र पसरला. मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुटल, शिक्षकांनी सुटकेचा श्वास सोडला. स्तुती मात्र उदास वाटत होती, भीतीने तीच मन काळवंडून आलं होत. चेहरा फिक्का पडला होता.

पण आता शाळा सुटली होती. घरी जण तिला भाग होत. शाळेच्या कोपऱ्यावर ती थोडी घुटमळली, पण नंतर तिने घरचा रस्ता धरला. समोरच्या नाक्यावर ते मावली गुंड तिची वाटच बघत होते. तो पिंट्या आणि त्याचे आवारा चेले. कुणालाही न जुमानणारे. त्या पिंट्याची तर म्हणे पोलिसातही ओळख आहे.

जवानीत फुलणं जस एक पाप आहे. चालतचालताच तिच्या डोक्यावर कुणीतरी टपली मारली. ती कमालीची घाबरली. अपेक्षेप्रमाणे तोच होता पिंट्या, तिच्या अगदी बाजूला.

"काय जानेमन, आज उशीर केला. इकडं मी सैराट झालो की!"

आणि मग सगळे खो-खो हसायला लागले, रावणासारखे.

"ए तुझं स्तुती नाव मी बदलणार, आपल लग्न झाल्यावर. आर्ची ठेवणार, आर्ची."

स्तुती रडायला लागली, रडतरडतच ती पळायला लागली, धडपडत. पिंट्या मागून ओरडत होता.

"आर्ची, ए आर्ची. आवरून ठेव. मी आलोच. मी घरी येणार. थेट आत. खूप खूप आत. तयारी करून ठेव...."

थोड्या वेळाने परवा सारखाच तो स्तुतीच्या घरसमोर आला. बेल वाजवत तो आता दाराची कडीही वाजवत होता, अधीरपणे. स्तुती दाराच्या भिंगातून हे सारं बघत होती. ती खूप घाबरली होती अन तिला त्या पिंट्याचा खूप राग हि येत होता. रागानं तीच सार अंग झटझट करत होत. पिंट्याने दोनतीन वेळा बेल वाजवली असेल. आज तो माघारी जाणार नव्हताच. तिने मन घट्ट केलं आणि धीटपणे दरवाजा उघडला, आणि समोर उभ्या असणाऱ्या पिंट्याच्या अंगातोंडावर ऍसिडची बाटली रीती केली. तिने शाळा सुटल्यावर प्रोयोगशाळेतून ढापलेली ऍसिडची बाटली त्याच्या अंगावर भिरकावली होती. पिंट्या मोठमोठ्यानं बोंबा मारत होता, वेदनेने तळमळत होता. ऍसिड या रसायनाने स्तुतीने त्याचा चेहऱ्याचा भूगोल बदलला होता. ज्वालामुखीच्या लाव्हासारखा त्याचा चेहरा फसफस करत होता. पिंट्याचं थोबाड जळत होत आणि सगळीकडून धूर निघत होता. रावण जाळल्याचा आनंद स्तुतीला होत होता. पण ती खूप घाबरली होती, तिने धाडधिशी दरवाजा लावून घेतला. पिंट्या आपसूकच जळक्या तोंडाने, वेदनेने बोंबा मारत माघारी पळत सुटला.


Rate this content
Log in