लाईफ इज लाईफ
लाईफ इज लाईफ


लाईफ इज लाईफ
महादेव एप्रिलच्या कडक मराठवाडी उन्हात जोर काढीत होता, शक्य असेल तिथून घामाच्या धारा वाहत होत्या. कुदळीचा वापर तो एखाद्या धुरंदर शूरवीर तलवारबाजासारखा करीत, केबल टाकण्यासाठी आखलेल्या चरी खोदून काढीत होता. कुदळीच्या प्रत्येक फटक्याला 'हुं... हुं ...' असा नाका तोंडातून आवाज करत तो त्याच्या पिळदार अंगाला अजून पिळदार बनवीत होता.
रुक्मिणी, महादेवाची बायको, (हो, या एकविसाव्या शतकात सगळ्याच महादेवाला - पार्वती, विठ्ठलाला - रुक्मिणी, रामाला - सीता आणि प्रियकराला त्याची प्रेयसी बायको मिळणं जरा कठीणच) रुक्मिणी जमेल तेवढ्या वेगाने हात चालवत, त्याच्या मागून खोऱ्याने दगड-माती चरी बाहेर काढीत होती.
सावळ्या रंगाची ठेंगणी रुक्मिणी अगदी काटक होती. घरच सगळं रांधून महादेवासोबत रोजानी काम करण्यात तिने कधी कुचराई केली नव्हती. तरी महादेव तिच्यावर नेहमी धुसफ़ुस करायचा. महादेव खेकसला "रूकमे, बिगी बिगी हात चालव, कधी आटपणार तुपल"
रुक्मिणीन छेडछाडी सुरात पण हसत चिमटा काढीत बोलली "अत्ता ग बैया, तुम्ही टिकास मारल्या बगर म्या कशी माती ओढणार. तुम्ही जोर मारा जरा. आण तुम्हासनी सांगितलं व्हतं न, हे तुटक फावडं पहिलं दुरुस्थ करा म्हणून, अत्ता हे काम बळे बळे म्या ओढायले, तेच नशिब"
महादेव लगेच चुकल्यासारखे तिच्याकडे बघून नरमीत बोलला "बरं, बरं. अगं, हे दिलेलं चर संपल्या बगर ठेकेदार दुसरी चर देणार नाही. आपल्यास्नी बकळ पैका नगं का? अन मग त्याला डब्बल काम नगं का ? हि चर खतम करून पुढली चर घेणार बग आपुन, आवर आवर... जादा काम जादा पैका"
कुणीस म्हंटल आहे "लाईफ इज गेम" हेच खरं करत महादेव हा कामाचा खेळ खेळत होता. दिलेली चर संपवून आगाऊ चरीचे शंभर-शंभर रुपय जास्त देणार होता ठेकेदार. दहा फूट लांब आणि एक फूट रुंदीचे आखून दिलेले चर, दोन दोन फूट खोल खोदायचे काम प्रत्येक जोडीला वाटून दिलं होत. ठेकेदारांची हि चलाखी सर्व मान्य आहे, हे लोक असेच काम ओढून भरपूर माया कमवत असतात. त्यांचा तो धंदाच म्हणा ना.
सगळ्या जोड्यां मध्ये "लाईफ इज गेम" चा खेळ चालू होता.
समोरच बबन्या आणि त्याची बायडी त्यांना दिलेली चर संपवण्याच्या मार्गावर होते. बबन्या हा खरतर महादेवचा शेजारी, पण महादेव त्याच्यावर कायम खार खाऊन होता. बबन्याच्या नुसत्या नावानी महादेवचा जळफळाट व्हयचा. वर्षभरापूर्वी बबन्या त्याच्या बायको ला घेऊन शंकर नगर ला आला होता. मोजून सहा महिने त्यांनी रेल्वे पटरी (ट्रॅक) ला लागून असलेल्या खोपटामध्ये काढले असतील. कोण जाणे त्याला कोणची लॉटरी लागली, तो नंतर बरोबर महादेवच्या शेजारी असलेल्या पार्टीशन मध्ये राहायला आला. इथून खरं महादेव ला बबन्याचा हेवा कमी पण व्देष जास्त वाटायला लागला. तशी बबन्याची जोडी महादेव च्या जोडी पेक्षा बरीच जवान होती पण तरी महादेव सर्व बाबतीत त्यांची बेरीबेरी करायचा.
आज हि महादेव तेच करत होता. महादेवच्या ह्या बबन्यासोबतच्या हेव्या-दाव्या पायी बिचाऱ्या रुक्मिणी ची मात्र हाकणाक दमछाक होत होती . हि स्पर्धा म्हणजे आता "लाईफ इज रेस" सारखी भासत होती. बबन्या आपल्या वयोमानानुसार शक्ती प्रदर्शन करत आगाऊ चरी गटकत होता. महादेव मात्र आगाऊ चरी च्या फंदात पडून जीवाचं आटा पिटा करत खिंड लढत होता. ह्या सगळ्यात एक मात्र झकास होत होत, ठेकेदारच तीन हप्त्याचा काम आता एका हप्त्यात खतम होणार होत. म्हणून ठेकेदार जाम खुशीत होता.
बघता बघता हप्ता संपून पगारीचा दिवस उजाडला. बबन्या, महादेव, दिगंबर अण्णा सगळे आपल्या पगारी घायला ठेकेदार कडे गेले.
ठेकेदारनी प्रश्न टाकला "काय बे, आज इतवार हाये हे विसरले का काय?"
महादेव लागलीच छान हसून "नाही साहेब, आज इतवार है म्हणूनशानी आम्ही समदे इथे आलोत" ठेकेदार उगीच नाटक करत होता " काय बे, म्या काय समजलो नाय. नीट सांग कि बे म्हाद्या?, बबन्या काय रे काय म्हणायला हा" बबन्या लगेच फुलला "साहेब ते, .. आज पगारीचा दिस नव्ह का ! पगार घायला आलो आम्ही समदे" महादेवला हे ठेकेदार ने बबन्या ला टोळीतला नेता घोषित करणं बिलकुल पटलं नव्हतं. बबन्या ची मात्र छाती फुगल्यासारखी वाटत होती. ठेकेदार बोललं "आबे बबन्या, ह्या सगळ्यास्नी सांग कि इंजिनीयिरसाहेबानी काई बिल पास केलं नाय, तव्हा पगार पुढच्या आठवड्यात मिळालं, चला पळा आता, आले मोठे पगार मागायला"
महादेव ला राग आला, कारण ते सगळे जण काही भीक मागत नव्हते. सगळा त्यांचा घामाचा पैसा होता, आणि ठेकेदारांनी तो त्यांना देणे भाग होते. महादेव समोर येऊन मोठ्याने घुरला " साहेब पैका आजच टाका. बिल फील ची भानगड आम्हास्नी नाय सांगायची. ते तुपल तुम्ही बघून घ्या. आम्हाला पगार आणि आगाऊ चरी चे आगाऊ पैस पाहिजेल...."
ठेकेदार लगेच महादेववर उखडला "का बे भाडखाऊ, एकदा सांगितलं, ऐक्याला येत नाय का. चला पुढल्या इतवारी या तव्हा बघू. बबन्या या लोकांस्नी घेऊन जा बे"
महादेव आज ऐकणार नव्हता, तो बोलला " पगार नाय तर नाय, आमचा आगाऊ चरीचा हिसाब तर करा. त्या बगर मी हलणार नाय" ठेकेदाराला हि आफत कट्वायची म्हणून त्यांनी बरं म्हणून डायरी खिशातून बाहेर काढली आणि काही तरी अगम्य पुट्पुट करत राहिला. आणि मग थोड्या खुमखुमीत बोलला "प्रत्येक जोडीचं ९०० रुपडं अन आगाऊ चरिच.........बबन्या- हजार, दिगंबर पाचशे, रामेश्वर चे आठशे अन महाद्या तुपले बे बाराशे, काय बाराशे !!"
महादेव नि खुशीत टूनकुन उडी मारली, अगदी लहान पोरागत. त्याला खरा आनंद बबन्या सोबत " लाईफ इज रेस " चा खेळ जिंकण्यात झाला होता. तो बाराशे ! बाराशे !! चा जप करतच घराकडे निघाला.
घरी येऊन रुक्मिणीशी लडिवाळ चाळे करायला लागला. रुक्मिणीने विचारला "पगार भेटला का?"
महादेव खुशीत बोलला "आग ते कुठं पळून जाणार नाय, आग आपल्या आगाऊ चारीचे बाराशे रुपय झालत,बाराशे . अन त्या बबन्याचे फकस्त हजार"
महादेव आणि रुक्मिणी दोघे हि खुश झाले. पण मागच्या हप्त्याच्या आगाऊ चरीच्या नादात दोघांच अंग चांगलंच ठणकत होत. रुक्मिणीला तर बुखार आल्यागत वाटू लागलं.
केबलिंगच काम थांबल्या मुळे ठेकेदाराला ही आता कामगारांची निकड भासत नव्हती. ठेकेदार आज उद्या करत, पगार पुढं ढकलू लागला. महादेव च्या फुकट खेपा होत होत्या.
इकडं रुक्मिणी चांगली फणफणली होती, तिचा बुखार कमी होण्याच नाव घेत नव्हता.
आजच्या रविवारी तर कहर झाला, ठेकेदारांनी महादेवला घाण घाण शिव्या घालून साईट च्या बाहेर काढलं होत.
महादेव घुश्यात घरी आला. त्याच अंग रागाने झट झट करत होत. डोळे लालबुंद झाले होते. रुक्मीणी खोलीच्या एका कोपऱ्यात कण्हत पडली होती. तिला धड झोप हि येत नव्हती अन न उठण्याचा अवसान राहील होत. तिने तसल्याच खोल गेलेल्या आवाजात विचारल" काय जी, भेटल का पैका? काय बोलला ठेकेदार ?"
महादेव ठेकेदाराला दोन चार जातिवंत शिव्या घालून गरजला " आता तू गेलास बघ. ठेकेदार असला म्हणुन काय देव झाला का! तुझा नरडीचा घोट घेतल्या बगर आता मी घरला येणार नाही रक्मे.." हे बोलून त्यांनी घर सोडलं. रुक्मिणी जमेल तेवढ्या आवेशाने ओरडत होती. " धनी, थांबा जरा. ऐका ना जी. धनी .... धनी ....."
घुश्याने महादेव चा पारा चढत च होता. रागाच्या भरात तो घरापासून बरच अंतर कापून दूर आला होता. महादेव मनात विचार घोळत होता "साला आपलाच पैका भीक मागावी तस मागणं लागायल, आता तुला जित्ता सोडत नाही. पैका दे आगर नग दे, तुला तर मी जित्ता गाढतो. आमच्या कडणं मरणाचं काम करून घेतलं आणि पैसा मागायला गेलो कि 'काय भूण भूण लावलीय' म्हणतो का बे. थांब आलोच मी तिकडं." हे बोलून त्यांनी धोंडिबाच घर गाठलं आणि त्याच्या कडून कुर्हाड आणि गुप्ती ची सोय करवून घेतली.
सगळ्या चिजांची खातर जमा करून तो तडक साईट वर निघाला. ठेकेदार तिथे दारू पिऊन ढाराढूर पडला असेल हे त्याला माहित होत. काम थांबल्यामुळे साईट अस्त्याव्यस्त्य झाली होती. रात्र ही बरीच झाली असल्यानी दोन चार कुत्री आणि महादेव बगर कुणी हि जागी नव्हतं. कुत्री विव्हळत होती. त्यांचं ते विव्हळण अगदीच अंगावर येत वातावरण भयाण भासत होत. वारा 'घूं ..घूं..' असा आवाज करत वाहत होत . केबल साठी केलेल्या चर ओलांडून त्यांनी ठेकेदाराला साईट ऑफिस मध्ये गाठलं आणि काम फत्ते करून तडक घर गाठलं आणि तो रुक्मिणीच्या बाजूला निवांत निपचित पहुडला.
सकाळी सकाळी साईट वर नुसता गोंगाट चालू होता. ठेकेदाराच्या नावानी इंजिनियर नुसत्या बोंबा मारत होता. सगळ्या चरी दगड धोंड्यानी कुणी तरी भरून टाकल्या होत्या. ठेकेदार हि विंचू चावल्यागत बोंबलू बोंबलू सगळ्या चरी बघत हिंडत होता आणि कुण्या हरमखोरानी हे केलय त्या भाड्याला शिव्या हासडत होता. इंजिनियर साहेबाना माफी मागत होता आणि थोडा वेळ द्या म्हणून विनवणी करत होता.
हो, ठेकेदार जित्ता होता. महादेवनी त्याला त्याची जान बक्ष दिली होती. रात्री जेव्हा वारा 'घूं ..घूं..' असा आवाज करत वाहत होता . तेव्हाच साईट ऑफिसबाहेर येऊन महादेवनी केबल साठी खोदलेल्या सगळ्या चरी दगड धोंड्यानी भरून टाकल्या होता. ह्या कामाला त्याला दोन तीन घंटे खर्ची पडले होते. शक्य असेल तिथून घामाच्या धारा वाहत होत्या. फावड्याने दगड-धोंडे-माती चरी मध्ये ओढताना महादेवला एक विलक्षण सुखाची अनुभूती मिळत होती. त्यांनी आता ठेकेदाराला जीवे मारण्याचा विचार पुरता पुसून टाकला होता. कारण तो जिंदगी च महत्व जाणत होता आणि त्याला हे पण माहित होत कशेवटी लाईफ इज लाईफ"