Manish Vasekar

Tragedy Others

2.1  

Manish Vasekar

Tragedy Others

उत्सव

उत्सव

14 mins
841बऱ्याच दिवसानंतर पार्टी चा योग आला होता. भावसार बुआच्या घरी पार्टी होती. पार्टी ओली कि सुकी ह्यासाठी ट्रेन च्या व्हाट्स अँप ग्रुपवर गहन चर्चा रंगात येत होती. मुख्य मुद्याची कळी अजून डोके वर काढत नव्हती. कारण काही अस्सल व्हेजिटेरिन बहुदा इंटरनेट बंद करून ऑफिसच्या कामात गुडूप झाले होते. चाललेलं डिस्कशन खरं तर ऑफिस मधल्या रिकामटेकड्यांचेच चालू होत.

एवढ्यात लंबूनी व्हाट्सअँपींग चालू केलं [अरे यार पण पार्टी कशा साठी आहे?]

शेंडे हि जागा होऊन लागलीच [होणं बाप्पा, पार्टी खायला निघलो, पण ती भावसार बुआ काह्यले देऊ राहिले हे पुसलं च नही ना, काय कार्यकर्ते] 

मोडक नी व्हाट्सअँपींग केलं [भावसारच्या मुलाची नौकरी पक्की झाली, म्हणून जंगी पार्टी ठेवली आहे. कुटकेवाडी, कल्याण - राहत्या घरी. घरचे सगळे देवदर्शनाला गेलेत आणि घर रिकाम आहे.] मोडकांनी आपल वेगळे पण पुन्हा एकदा सिद्ध केलं.

 वखवखलेल्या देशपांडेनी जोमात दोन चार थम्स अप आणि तितकीच लाईक ग्रुप वर पाठवून दिली. चाणाक्ष देशपांडेनी पार्टी चा ढंग कसा असेल हे फक्त ह्या मेसेजेनी सांगून टाकाला. देशपांडे हि व्यक्तीच अशी, रंगानी गोरा, पाचच फूट उंची आणि त्याला न शोभणारी त्याची जाडी. आणि हे कमी म्हणून कि काय जोडीला हिटलरछाप मिशी आणि कानात पिढीजात पेशवेकालीन बिगबाळी. कमी बोलणं पण जेव्हा बोलेल तेव्हा सगळ्याना कहर. थोडासा पिसारी आणि जमेल तेव्हा दारू ढोसायला सदैव तत्पर.

जिकडे प्रवाह तिकडे वाहणारा गावठी वळणाचा शेंडे पण ह्या ओल्या पार्टी ला तयार होताच. सो कॉल्ड सज्जन चर्चेत सध्या सहभागी नाहीत हे पाहून शेंडेने वोटिंग चा घाट घालावा असं जाहीर करणारा व्हाट्सअँपींग सोडून टाकला

 [मतदान लावा बाबा, कंची पार्टी करायची?]

देशपांडेनी पुन्हा [दोन थम्स अप, अन दोन बॉटल]

लंबूनी पण एक लाईक सोडून दिला. मोडक आणि इतर असे चार कार्यकर्त्यांची पॉझेटिव्ह मत आणखी गोळा झाली ‘ओल्या पार्टीला’.

तितक्यात भावेश पचकला [पार्टी ओली चालेल पण ओन्ली व्हेज ठेवा!]

ह्या अश्या एक दोन मतांनी शेंडे धजावणार नव्हता पण तो असल्या अडकाठीला अपशकुन समजायचा. ह्या अश्या आडकाठी ने बरेच बेत रद्द झाल्याचा त्याचा अनुभव होता. म्हणून शेंडेंनी “पार्टी ओली, व्हेज हॉटेलातन आणि नॉन व्हेज भावसर बुआच्या घरला बनवू” हे जाहीर करून, पार्टीची तारीख मुक्रर केली. आणि ग्रुप चे तत्वतः नाव बदलून ते जाहीर केलं. बुआला रीतसर फोन करून हे सगळं कळवलं कारण तो अँड्रॉइड फोन वापरात नसे.

पार्टीला नाही म्हणलं तरी वीस एक जण नक्की येणार होते. ह्यांची सगळी व्यवस्था एकटा बुआ करणार ह्याच रमेशला खरं कोतुक वाटलं. कारण त्यानी त्याच्या घरी एकदा चक्कर टाकली होती, हो तस त्याला घरी जाऊन हि आता चार वर्ष झाली असतीलच. हो पण रमेशला त्याच घर स्पष्ट आठवत होत आणि त्याला कारण हि तसच होत.

 

चार वर्षापूर्वीचा एका रविवारचा किस्सा आहे तो, बुआनी सांगितलेल्या मेन रोडच्या पॉईंट वर रमेश आला होता आणि तिथून डाव्या अंगाला वळायचं होत हे तो समजला कारण उजव्या साईडला भव्य-दिव्य मॉल होता. पण आल्या पॉइंटवरन डाव्या अंगाला वळणारा ना कुठला रोड होता ना कुठली पाऊलवाट. डाव्या अंगाला दिसत होती फक्त भिन्न-भिन्न रंगाची शटरवली छोटी छोटी दुकानं आणि माळरानावर वसलेल्या गावासारख्या भासिवण्याऱ्या कुटकेवाडी वरून येणाऱ्या फेसाळ काळपट रंगाचे मोठं मोठाले गटर.

गोंधळून गेलेल्या रमेशने गाडी साईडला पार्क केली आणि आता फोन केल्या शिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून त्याने फोन घेतला आणि बुआ ना फोन केला "हं बुआ, मी इथे आलोय, मॉलसमोर उभा आहे. मला काय कळत नाही कुठून टर्न मारायचा?"

बुआ पहिले छान हसले आणि मग बोलले "वाह, मग बरोबर पॉईंट वर आहेत तुम्ही. काय गाडी आणली का?"

रमेशने लागलीच विचारल "हो, काय गाडी येत नाही का घरापर्यंत?"

"येईल, पण तुम्ही गाडी तिथेच पार्क करा. आणि एक पिवळ्या रंगाचं शटर दिसेलं, मॉलकडे पाठ करून उभा राहील कि उजव्या हातला. त्याच्या बाजूनी एक गटर आहे त्याच्या कड कड ने या, गटर सोडायचं नाय, काही झालं तरी. मी घराबाहेर येऊन थांबलेलोच आहे,दिसेलच."

रमेशनी छानशी जागा बघून गाडी व्यवस्थित पार्क केली. सोबत आणलेला स्वीट चा डब्बा घेऊन त्या पिवळ्या शटरकडे तो निघाला. सगळी दुकाने रोड ला लागून असलेल्या खोल मोठया नाल्याच्या पल्याड होती. तो वाहता नाला एवढा खोल होता कि चुकून जर कोणी त्यात पडला असता तर नक्कीच वाहून गेला असता. आणि अशा हा जीवघेणा नाला ओलांडण्यासाठी दुकाना-दुकाना समोर लोखंडी प्लेट चे सेतू टाकले होते.

रमेशनी सावकाश सेतू चा आधार घेत नदीरूपी मुख्य नाला क्रॉस केला. आणि बुआनी सांगितलेली मार्गिका शोधून, त्यांनी मार्गक्रमण चालू केले. त्याच्या डाव्या हाताला अडीच-तीन फुटी गटर तुडुंब वाहत होता. सकाळची वेळ असेल म्हणून फ्लो बहुधा जास्त असावा. भिन्न विभिन्न अंगाच्या आणि कापडाच्या सुगंधी साबणांचे फेसाळ वाहत पाणी कुबट मिश्र दुर्गंधी मारत होत. आणि उजव्या हातची ती छोटी-छोटी घरे आधीच त्रोटक असलेल्या त्या वाटेवर अतिक्रमण करू पाहत होती. रमेशला हे नाविन्य कुतूहल पात्र होत. रमेशने एक नजर नाल्यावर मारून आपला मोर्चा उजवीकडे वळवत ती छोटी छोटी घरे निहाळत निघाला होता. कुठल्याश्या घरात  दोन तीन किरीटी पोरं चहा-दूध साठी कोकलत होती. तशीच कुठल्या घरी चहा सोबत पोळीची न्याहरी करत होती. हे सगळं चालू असताना तो राहून राहून डाव्या बाजूच्या गटरचं अस्तित्व पारखत होता. कारण बुआ नि त्याला निक्षून सांगितलं होत "काही झालं तरी गटर सोडायचं नाय"

बाया घरासमोर धुनी-भांडी करत बसल्या होत्या. रमेश थोड अवघडून चालत होता, त्याला राहून राहून असं वाटत होत कि आपण त्यांच्या घरावर पाळत ठेवतोय म्हणून कुणी आपल्या अंगावर खेकसेल. प्रत्येक घर अलग अलग होते पण सगळी घरे उघडी बोडकीच दिसत होती. ह्या अश्या वातावरणात नवी जोडपी आपले स्वत्रंत पणे आयुष्य कसे जगत होते हे तेच जाणो. इतक्यात ‘घुरर.... घुरर…..’ असा आवाज त्यांनी ऐकला, क्षणाचाही विलंब न करता ते काळे आडदांड कुत्र रमेशच्या अंगावर धावून आलं. आणि पुढच्या क्षणी रमेशचा एक पाय बाजूच्या गटारात आणि बाकी त्याच धड आणि स्वीट चा डब्बा बाहेर, अशी अवघडलेली स्थिती बघून कुत्रा हि मागे फिरला आणि असुरी आनंदाने तिथून त्यांनी काढता पाय घेतला. समोरच्या एक पोरानी रमेशला बाहेर काढलं आणि वर "कहा कहा से आ जाते हे साले...!" हा टोमणा सोडून निघून गेला. रमेशला खूप राग आला त्या गटारचा, कुत्र्याचा, त्या मदत करून टोमणा मारण्याऱ्या पोराचा, आणि हो बुआ चा पण. पण आता मागे फिरणे शक्य नव्हते कारण तो बेंदाडानी  बराच भरला होता. ह्या अश्या अवतारात आता बुआ कडेच जाणे योग्य म्हणून तो तिथून चालू लागला.

 

बुआ वाटेतच उभे होते आणि नशीब रमेशचा चेहेरा साबूत होता म्हणून बुआनी लगेच रमेशला ओळखलं आणि दुरूनच आरोळी टाकली "रमेश काय झालं, हा अवतार कसा झाला"

रमेशनी तुसडेपणाने उत्तर दिलं "बुआ, पायी चालायचा कंटाळा आला होता म्हणून ह्या तुमच्या नाईल नदित मी पोहूनच तुमचं घर गाठलं बघा!"

बुआ ओशाळून फक्त हसले आणि त्यांनी त्याच्या मुलाला बकेट भरून पाणी आणायला सांगिंतले. रमेशनी पाण्यानी सगळ अंग धुवून काढला अन तश्या ओल्या जीन्स वर तो घरात घुसला. बुआच छोटेखानी घर मस्तच होत. एका कोपऱ्यात शोकेस टेबलवर ठेवलेला टीव्ही त्याचा दोन्ही बाजूनी लादीवर ठेवलेल्या दोन सुंदर फुलदाण्या, एक पिवळ्या आणि दुसरी हिरव्या रंगाची. फिकट पिवळा रंगाच्या भिंती, त्यावर टांगलेली महात्मा गांधी आणि बाबासाहेब च्या तसबिरी. त्याच्या बरोबर समोरच्या भिंतीवर एक चंदनाचा हार घातलेली तसबीर, ती बहुदा बुआ च्या वडिलांची असावी. हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यात धान्य साठवणीचा लोखंडी कोठी, त्यावर गाद्या, उश्या, आणि चादरीच्या ढीग होता. डोक्यावर फिरणारा फॅन एका विशिष्ट् वेळे नंतर खाड खाड असा आवाज करायचं. हॉल अगदी टाप टीप आणि स्वछ प्रसन्न होता. त्याला बाहेरच्या गटार आणि घाणी चा मागमूस हि नव्हता.

रमेशला राहवलं नाही आणि रमेशनी विचारला "बुआ, बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्या तसबिरी घरात?"

त्यावर बुआ पहिले झाक हसले, हसले कि त्यांची बत्तीशी बाहेर येऊन पार किडलेल्या हिरड्या पण दर्शन देऊन मोकळ्या व्हायच्या. बुआ तंबाखू चघळत. मग ते बोलले" काही नाही, ऑफिस मध्ये साहेबानी काही नेत्यांच्या तसबिरी मागितल्या, त्यातल्या बाबा आणि गांधींच्या तसबिरी फॉल्टी निगल्या. मग त्या परत मागवून मी त्या फॉल्टी तसबिरी या इथे टांगल्या " आणि बुआ पुन्हा निर्मळ हसले.

हॉल च्या मागे स्वयंपाक घर असावे, कारण दरवाज्यातून कुणीतरी म्हातारीबाई जेवत असल्याचे दिसत होत, आणि त्या खोलीतून पोह्याचा वास रमेशला खुश करून टाकत होता. रमेश उभा टाकून हे निहाळत निहाळत हळूच "छान आहे"असे मोघम बोलून गेला. 

बुआला एकदम ध्यानात आले आणि त्यांनी लगबगीत "अहो तुम्ही उभे का, बसा ना" असे सांगून घडीची लोखंडी खुर्ची उघडून रमेशला दिली.

बुआनी प्रश्न टाकला"गाडी बरोबर पार्क केलीय ना?"

रमेशनी घाबरून विचारलं" हो, काही चोरी बिरी होत नाही ना?"

बुआनी समजुती नि सांगितले "नाही नाही, अहो रोडला असेल तर उगा ट्रॅफिक होईल म्हणून बोललो"

रमेशनी सोबत आणलेली स्वीट बुआच्या सुपूर्त केली. बुआनी ती हातात घेत घेत "ह्याची काहीच गरज नव्हती" म्हणून तो डब्बा मध्ये पाठवण्यासाठी "अजित, अरे अजित!" अशी लडिवाळी हाक मारली.

अजित हबकत आला आणि तो स्वीटचा डब्बा घेऊन तो परत मागच्या रूम मध्ये जात होता तेवढ्यात बुआनी त्याला थांबण्यास सांगितले.

किडक्या अंगकाठीचा अजित ठेंगणा असून हि उंच भासत होता. त्याच्या एका हातात स्वीट चा डब्बा आणि दुसऱ्या हातात मोबाइल होता. तो एखादीन वधू परीक्षेला जस उभा टाकावं तसा उभा टाकला होता. अजित दिसायला बरा दिसत होता, बहुधा आईवर गेला असेल, रंगानी गोरा, कुरळ्या केसांचा अजितमध्ये नवतारूण्याची लक्षणे ठासून दिसत होती. त्याची गालफाडे चांगलीच बसून गेलेली होती, जवानीची मुरुमाची फोड दोन्ही गालावर अगदीच स्पष्ट दिसत होती. ओठाच्या आणि नाकाच्या मधल्या भागात अंधुक काळपट रंग लागावा असं जाणवत होत.

बुआ बोलले "हा माझा मुलगा, अजित. दहावीला ९१% मिळालेत त्याला. आता सायन्स घेणार बोलतोय"

रमेशला अजितची टक्केवारी वगैरे हे सर्व माहित होत, फक्त हा तो आणि अजित आहे हे तो आज बघत होता.

रमेशनी त्याला उठून शेक-हॅन्ड करून अजितला अभिनंदन केल आणि बसायला सांगितलं. तो घाबरतच घडीच्या खुर्चीवर बसला. अकरावीचे ऍडमिशन ऑनलाईन आहेत हे जाणत असूनही रमेशनी त्याला विचारले "सध्या ऍडमिशन ऑनलाईन आहे ना?"

"हो, पहिली लिस्ट लागली आहे. कालच"

"अरे वाह. काय मग, कुठे लागला नंबर?"

अजित काही न बोलता बुआ कडे बघत होता. बुआनी एक दीर्घ श्वास घेतला आणि तो सोडत सोडत च "वाय टी के कॉलेजला मिळालाय" हे नाराजी सुरात जाहीर केले.

रमेश विस्मयीतपणे दोघां कडे बघत होता कारण नामाकिंत वाय टी के कॉलेजला ऍडमिशन मिळणे तस अवघडच. रमेश आनंदात अजितकडे बघत बोललो "ग्रेट, हि तर गुड न्युज आहे. हो कि नाही बुआ?"

बुआ लगेच बोलले "जशी प्रत्येक पॉझेटिव्ह प्रेगा चेक, गुड न्युज नसते तसेच आहे हे!"

रमेशला हे काही उमजल नाही, त्यांनी ओठाचा चंबू करत बुआ कडे बघून इशाऱ्यानीच काय म्हणून विचारले.

बुआ नी भडा भडा बोलायला चालू केलं "रमेशराव, तुम्ही येताना जे काय बघत बघत आलात, त्यावरून आमची परिस्थिती काय आहे हे तुमच्या ध्यानात आले असेलच. अहो त्या कॉलेजची वर्षाची फी ऐन्शी हजार आहे. माझ्या पगाराच्या दहा पट, ते आम्हाला कसं झेपलं. एवढी फी जोर मारून जरी भरली तरी मग आम्ही खायच काय आणि घर कसं चालवायचं. शिक्षणाचा धंदा झाला आहे, धंदा! आता अजितला हि हे सगळं पटलंय,’ समजूतदार आहे छोकरा’. तो हि म्हणतोय साधारण कॉलेज ला ऍडमिशन घेऊ, तिथे फीस हि कमी असेल. बघू या. उजडलं तस उजडू द्या"

रमेशला काय बोलावं हे खरंच कळत नव्हतं पण त्याला काहीतरी बोलणे गरजेचं होत. त्यांनी एक नजर अजितकडे पाहिलं, अजित शांत होता. रमेशने थोडं अडखळत विचारला "काही लोन वगैरे मिळणार नाही का? ऑफिस नाहीतर बँकेतून"

बुआ नि उत्तर दिले "रमेश, अहो अगदरच कर्ज बाजारी आहे मी. आता लोन मिळणे शक्य नाही"

हे ऐकल्यावर रमेशकडे उत्तर नव्हतं. वातावरण बदली गरजेचं होत म्हणून रमेशनी फुटकळ प्रश्न विचारणं चालू केलं.

"अजित, शाळा इथून किती दूर होती तुझी?"

"जवळच होती, मॉल च्या मागे. पायीपायी फार तर दहा मिनटे"

"बरं, कॉलेज पण मग जवळच बघ. फार वेळ जाणार नाही जाण्या येण्यात."

"हो आहे इथे जवळ एक कॉलेज. बरं आहे ते पण. सायन्स मागच्या वर्षीच चालू झालाय. बहुधा तिथेच घेईल ऍडमिशन"

"छान आहे! बाकी सेल्फ स्टडी केली कि झालं. अभ्यास करून डॉक्टर- इंजिनियर हो. बापाचं पारणं फेड अजित."

तितक्यात मधल्या रूम मधून आवाज आला "अहो, पोहे झालेत. आणू का?"

हो म्हणून बुआ नि स्टूल हॉलच्या मधोमध आणून ठेवला. आणि ते स्वयंपाक घरात गेले. अजित रमेशच्या समोर उभा होता, रमेश पोह्यासाठी नाटकी आढेवेढे कसे घावे या साठी वाक्य जुळवणी करत होता. पण खर तर तो पोह्याचा सुगंध घरभर पसरला होता आणि तो त्या पोह्यासाठी मुळात डोळे लावून होता. बुआनी पोह्याच्या तीन प्लेट ठेवलेला ट्रे घेऊन आणला आणि अजित ला पाणी आणायला सांगितलं.

आता रमेश सुरु झाले "आहो बुआ पोहे कशाला, मी नास्ता करून आलोय. मी वाटल्यास चहा घेईल. मला जास्त पोहे खाल्यानी मळमळत"

बुआनी एवढ्यावर फक्त "काही हं रमेश!" बोलून पोह्याची प्लेट समोर केली. रमेशनी ती "कशाला उगीच त्रास"म्हणत हात मध्ये धरली आणि वरून "लिंबू मिळेल का बुआ" म्हणून टाकणं टाकलं.

पोहे खूपच छान झाले होते. तिघेजण पोह्याचा आस्वाद घेत स्वतःला तृप्त करत होते. पोहे खाऊन अजितला चांगलीच हुशारी आली असावी तो आता मनमोकळे पणाने बोलत होता "दादा, तुम्ही इंजिनियर आहेत ना. मला पण इंजिनियर बनायचं. आमची सध्या आबाळ आहे पण पुढच्या पाच सहा वर्षात बुआला कामावर जायची पण गरज पडणार नाही. नंतर आम्ही कुठे तरी चांगल्या ठिकाणी रूम घेऊ अन हि भिकार वस्ती सोडून देऊ".

अजित आत्मविश्वासानी बोलता होता, रमेश आणि बुआ दोघांना त्याचे बोलणे फार छान वाटत होत. पोह्याचा फडशा पडल्यावर चहा आला. चहा चे गुटके घेत घेत आळी पाळी ने रमेश आणि बुआ अजितची स्तुती करत होते. हॉलच वातावरण एकदम आशावादी लहरीने भरून गेलं होत. सर्व येतेच्छ पार पडल्यावर रमेश निघाला. जाताना रमेश ने पुन्हा अजितला शुभेच्छा दिल्या आणि दोंघाचा निरोप घेतला.

 

मधल्या काळात रमेशला प्रमोशन मिळाले आणि तो मुंबई सोडून अहमदाबाद ला गेला. पण रमेश अजितच्या संपर्कात होता. त्यांनी अजितला एंट्रन्ससाठी म्हणून काही पुस्तकेही अहमदाबादहून पाठवली होती. काळ हा खरं तर एखाद्या द्रुतगती मार्गासारखा असतो. जेव्हा आयुष्यात सुखाचा प्रकाश असतो तेव्हा मार्ग लगेच आणि सहज कटतो. पण तेच जेव्हा आपण अंधाऱ्या दुःखाच्या ट्रॅफिक मध्ये असतो तेव्हा तो काळ इंच इंच पार करायला बराच अवधी लागतो. रमेशच उत्तम चालू होत, त्याच आयुष्य सुखाच्या प्रकाशाने उजळत होत. बघता बघता ५ वर्ष कसे गेले हे रमेशला जाणवलं पण नाही. रमेश हुशार आणि कर्तृत्वान होताच, पुन्हा बढती मिळवून तो परत मुंबई ऑफिसला जॉईन झाला. पहिल्या दिवसापासून त्यांनी पुन्हा त्याचा रेगुलर ट्रेन ग्रुपही जॉईन केला.

 

रमेशला मुंबईत येऊन चार महिने झाले होते, दिवस अगदी छान कटत होते. नियमित ट्रेन, तोच ग्रुप, काही नवीन मेंबर जॉईन झाले होते पण रमेशच स्थान कायम होत, अटळ म्हणा ना.

मुक्रर केलेली तारीख आणि वेळ मोडक नि व्हाट्सअँपींग केली. लगोलगो व्हाट्सअँप ग्रुप च्या नावात तारखेसमोर वेळेची नोंद केली. पार्टीचा वार शुक्रवार होता, जुम्मा. बुआ च्या घरच्या पार्टीसाठी नियोजक म्हणून देशपांडे, मोडक आणि शेंडे निवडले गेले. शेंडेला मोडक ऑफिस मधूनच उचलणार होता. बियर, स्कॉच, प्लास्टिकचे ग्लास, चकणा सगळं घेऊन यायचं होत.

भावेश आणि लंबू नि व्हेज बनविण्यासाठी खटपटी केल्या पण कोण करणार-काय काय करणार या भानगडीत घरी बनविण्याचा बेत बरगळला आणि मग वेजिटेरिअन लोकांसाठी काही व्हेज पंजाबी भाज्या अंडा करी, रोट्या, अंडा बिर्याणी आणि हैद्राबादी बिर्याणी ऑर्डर करायचं ठरल. नॉन-व्हेजवाल्यांचे आयटम खास होते, त्याची हि एक लिस्ट बनली. शेवटी सगळा खर्च बुआ च्या बोकांडी पडणार हे जाहीरच होत. बऱ्यापैकी सगळेच बुआ च्या घरी काही ना काही निमित्तानी गेले होते. एक-दोन नवीन कार्यकर्ते पहिल्यांदाच तिथे येत होते. ग्रुपचा हक्काचा मनोरंजक दिनेश पण येणार होता.

पूर्वनियोजित सहाच्या टाईमला फक्त लंबू, वखवक्या देशपांडे, कोरे तात्या आणि यजमान दस्तूर खुद्द बुआ हजर होते, हॉल छोटा असला तरी मोकळा होता म्हणून मोठी चटई टाकून बैठकीची सोय उत्तम केली गेली. रमेश सोबत भावेश, दिनेश, संजय, मन्सूर, राज पाटील, संत्या आणि काही नवीन कार्यकर्ते गटार लेन नि घराकडे येत होते. रमेशला या लेन चा दांडगा अनुभव होता. मोडक आणि शेंडे व्हेज - नॉन व्हेज चकणा आणि बाटल्या घेऊन पंधरा मिनटात पोहचणारच होते, इकडे तात्यानी कांदा कापणे चालू केले होते. देशपांडेनी ग्लास धुवून ठेवले होतेच आणि तो आता आईस क्यूब ची खटपट करण्यात मग्न झाला.

म्हणता म्हणता सातच्या ठोक्याला सगळी मंडळी बुआच्या घरी जमली. बाटल्या, सोडा आणि खाण्याचे ढेर सारे आयटम सेंटरला राखून सगळे गोलाकार बसले. अशा पार्ट्याना नेहमी काही उत्साही स्वयंसेवक निश्चित लाभतात. तसे इथेही लंबू आणि भावेश सरसावून आले. ग्लासात हवी ती पेग भरत त्यांनी कामाला सुरवात केली. चुटकुले आणि किस्से सांगण्यात पटाईत असणाऱ्यांनी राज आणि दिनेश नी आपलं तोंड चालू ठेवल. पार्टी रंगात येण्यासाठी अश्या उमेदवारांची खरी निकड असतेच. काहीजण कोल्ड्रिंक तर काही दारूचे ग्लास घेऊन जोरदार चियर्स चियर्स अश्या जय घोषात पार्टी चालू झाल्याची सूचना करत होते. लगोलग चकण्यावर ही ताव मारला गेला. आणि "जय हो बुआ" चा जयजय कार झाला. ग्लास, बाटल्याच्या आवाजात, सात माजली हसण्यात, खिदळण्यात आणि गप्पा गोष्टीत बुआच घर दुमदुमून उठल. पार्टी चांगलीच रंगात आली होती. वारकरी बुआ, कोरे तात्या आणि राज सोडलेतर बाकी सगळेजण दोन फूट हवेत तरंगतच होते. राज पाटील ह्या जिंदा-दिल माणसाला खरं तर दारूची गरज काय. तो कायम एक वेगळ्याच विश्वात आणि नेहमीच नशेत असतो.

इतक्यात मोडकनी विचारलं "बुआ, मुलाला जॉब कुठे मिळालाय?"

बुआ अगदी जोमात बोलले "जॅक्सन मध्ये, कंपनी भायखळ्याला आहे"

सर्व जण डोळे विस्फारून बघत होते. जॅक्सन सारख्या नामांकित कंपनीत बुआचा मुलगा कामाला लागला बोलल्यावर काही बघायलाच नको. देशपांड्यानी पुन्हा एकदा बुआ आणि त्यांच्या मुलाचं मनापासून अभिनंदन केलं.

रमेशनी आपुलकीने विचारल "बुआ, अजित ग्रॅज्युएट झाला न!"

बुआ थोडे आडखळले, मग ते ओझरते बोलले "चालूये, चालूये. करतोय"

रमेश शंकितपणे बोलला "बुआ, काय म्हणून घेतल आहे अजित ला जॅक्सन मध्ये"

आता जरा बुआ च्या कपाळाला आठ्या पडल्या, त्यांना या प्रश्नांची अपेक्षा नव्हती. बुआचे तोडे वीरमले, त्यांची नाखुषी लपत नव्हती. सगळे आपल्या धुंदीत होते, कुणी पेग भरत होत, कुणी पेग मारत होत. काही जण चकणा आणि चिकन वर ताव मारत होत.

रमेशनी न राहून पुन्हा विचारल "प्रोफाइल काय आहे अजितचा?"

आता मात्र बुआला बोलणं भाग होत. त्यांच्या पोटात खोल खड्डा पडला. रमेश काही सोडणार नव्हता. बुआ अनिच्छेने बोलले "ऑफर लेटर मध्ये ऑफिस-बॉय दिलंय पण काम क्लरिकल आहे. आणि पगार हि चांगला आहे, बारा हजार!!"

हे ऐकताच रमेशच मन सुन्न झालं. त्याच्या हातात बियर चा ग्लास होता तो त्यांनी गच्च आवळून पकडला. पिलेली कडुझर बियर त्याला आता जास्तच कडू वाटत होती. आधीच जड झालेले डोकं आता चांगलंच ठणकायला लागलं होत. तश्याच कोमजल्या सुरात रमेशनी पुन्हा विचारलं "काय?". बुआनी नजर चुकवतच त्याला "हुं" म्हणून संमती दिली.

रमेश थंडगार पडला, त्यांनी एक दीर्घ श्वास घेऊन सुस्कारा सोडला. रमेश अचंबित पणे विचारात पडला 'दहावीला ज्या मुलाला ९१% मार्क मिळालेत, जो एक समंजस आणि सतसतविवेकबुद्धी असलेला ध्येयवादी मुलगा आहे, तो हे असं हलक काम करतोय. (वर वर म्हणणारे खूप भेटतात "कुठलच काम हलकं नसत", पण जेव्हा त्यांच्यावर त्याच कामाची वेळ येत तेव्हा त्यांना ते काम जड नव्हे अवजड होत). पुन्हा एकदा एका गुणवंत मुलाचा या हलाखीच्या गरिबीने आणि गलिच्छ वस्तीने घोट घेतला. अजित आता या फुटकळ जॉबच्या दुष्टचक्री भोवऱ्यात पुरता अडकला होता. अजितच या गलिच्छ वस्तीतून बाहेर घर घेण्याचं स्वप्न आता धुळीला मिळाला. तो आता या दलदलीत चांगला कंबरेपरेंत फसणार होता. असल्याचं विचारात मग्न असलेल्या रमेशला स्वतःची लाज वाटली. किळसवाण्या स्वरात तो स्वतःशीच बोलता होता. कसला आहे हा सोहळा, उत्सव कि हारौत्सव, बुआ च्या आनंदाचा कि तेरवीच्या गोड जेवणाचा. रमेशने आजू-बाजूला नजर फिरवली, सर्वजण मस्त बेधुंद होते. छान मस्ती चालू होती. रमेशला कळत नव्हतं हे सर्वजण कुठला उत्सव साजरा करत आहेत "अजितचा जिकंण्याचं कि हारण्याचा!” कारण पुन्हा एकदा या फडतूस गरिबीने चिडका डाव खेळून अजित ला धोबीपछाड केल होत. या गरिबीने आणि गलिच्छ वस्तीने त्याचा हकनाक बळी घेतला होता. रमेशला एकदम शिसारी आली आणि तो घराबाहेर पडला. बाहेर येऊन तो सर्व निहाळत होता ते गटार, ते खोपटा सारखी उघडी-बोडकी घरं, ती अंगावर धावून येणारी गरिबी, गलिच्छ वस्ती. आणि वर हेच सगळजण कैक मुलांचे असं जगणं उध्वस्त करून रमेशला वाकुल्या दाखवत, खिदळत होते.
Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy