प्रेम
प्रेम
सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रही जणु आज कुठेतरी ढगांच्या पल्ल्याड धास्तावुन बसला होता. लुकलुकणाऱ्या चांदण्या देखील निस्तेज होऊन हिरमुसल्या होत्या. आजुबाजुला झाडांची गर्दिच गर्दी होती. मध्येच कुठेतरी कोल्यांचा विव्हळण्याचा आवाज त्या भयानक काळोखात अजुनच काळोखी भरत होता. मध्येच एखादा साप समोरून सळसळत जात होता. तर कधी वटवाघुळ डोळ्यांसमोरून कर्कश आवाज करत जात होती. पण ह्या सगळ्यांचा आज माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ना जगण्याची आशा होती ना मृत्युचे भय. डोळ्यांत तळपत होते ते फक्त ज्वालामुखीचे अंगारे. आणि त्यात जिवनाच्या कितीतरी आशा, निराशा आणि स्वप्न जळून राख होत होते. अनवानी पायांनी तसेच त्या जंगलातून वाट मिळेल तिकडे चालत होतो. नाही काट्यांकडे लक्ष होते ना सळसळणाऱ्या सापांकडे, नाही रस्त्यात जागोजागी विखुरलेल्या काचेच्या तुकड्यांकडे. रस्यात येईल त्यावर धपाधप पाऊले टाकत मी पुढे चालत होतो. कधीतरी खपकन एखादा काटा पायात आरपार रुतत होता, तर कधी धारधार चाकुने बटाट्याची साल सोलावी तसे काचेल्या तुकड्यांनी तळपायाची कातडे सोलून निघत होती. परंतु मी ह्या सर्वांची पर्वा न करता तसाच पुढे चालत होतो. कारण माझ्या काळजात खोलवर जो त्रास होत होता त्यापुढे हा शारिरीक त्रास तिळमात्रही नव्हता. बराच वेळ चालल्यावर एका उंच टेकडीवर पोहचलो होतो. पाय रक्तबंबाळ झाले होते परंतु तरीही थांबण्याचे नाव घेत नव्हते. कारण आज त्यांना अखेरचं चालायच होतं. जिवणाची शेवटची स्पर्धा त्यांना जिंकायची होती. आता तर ती टेकडी देखील संपली होती. फक्त एक पाऊल पुढे आणि जिवनप्रवास कायमचा संपणार होता. माझ्या रक्ताळलेला हृदयाला आणि पायांना कायमचा आराम मिळणार होता. समोर खोल भयानक दरी होती. मी शेवटचे पाऊल उचलले आणि पुढे टाकणार तेवढ्यात कुणीतरी माझा हात पकडून मला मागे ओढले.
मी त्या व्यक्तीकडे न बघताच हाताला जोरजोरात झटके मारुन हात सोडविण्याचा प्रयत्न करत होतो. मि त्याला रागातच ओरडून म्हणालो,
" सोडा मला. आज साक्षात देवही इथे आला तरी मला जिवनप्रवास संपविण्यावाचुन कुणी थांबवु शकणार नाही. मला थांबविण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका."
"ठिक आहे बाळा नाही थांबविणारा तुला. परंतु जिवन संपिवण्याच्या आधी तुझ्या आयुष्यातील पाच मिनिटे तर बोलशील माझ्याशी".
त्या शांत आणि प्रेमळ स्वरांना नाही म्हणायची हिम्मत मला झाली नाही. मी त्याला समती दर्शवून म्हणालो,
" जेही काही बोलायचे असेल ते फक्त पाच मिनिट मध्ये बोला. त्यापेक्षा जास्त वेळ मी नाही थांबु शकत."
माझा हात हळुवारपणे सोडून देत तो व्यक्ती म्हणाला,
" माझ्या अंगात एवढा तकवा नाही की मी तुझ्याशी उभे राहून बोलु शकेल. त्या तिथे दगडावरती बसुया का आपण?"
मी इथेही होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या पाठोपाठ दगडावर जावुन बसलो. साधारणता सत्तर पंचाहत्तर पार केलेला वार्ध्यक्याने अर्धा गिळंकृत केलेला तो व्यक्ती असेल. अंग जरी त्याच थकलेल वाटत होते तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेचं तेज होतं. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि स्मित करून म्हणाला,
"देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलेलं असतांना तु तुझे आयुष्य का संपवतोय?"
" मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील आहे का? तुम्ही तुमचे काय ते बोला. मला काही विचारू नका." मी जरा रागातचं म्हणालो.
"बाळा, पाच मिनिटेच आहेस तु माझ्या सोबत. तरी माझ्यावर रागावणार आहे का? मी तुझ्याशी बोलण्याकरताच थोडासा वेळ मागितला होता आणि तु होदेखील म्हंटला होतास."
"अहो आजोबा मी जिच्यावर जिवापेक्षाही जास्त प्रेम करत होतो, तिनेचं माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडुन टाकलेत. आणि तिच्यावाचुन जगणे म्हणजे श्वासावाचुन जीवन आणि पाण्यावाचुन माशाचे तडफडने आहे माझ्यासाठी. त्यामुळे तिच नाही तर मला हे आयुष्य देखील नकोय. हा माझा शेवटचा निर्णय आहे."
" बाळा प्रेम हे पवित्र नातं आहे. जीवन संपविण्यासारखी अपवित्र गोष्ट प्रेमाला शोभेल का?"
" आजोबा प्रेम हे खरोखरच पवित्र बंधन आहे. पण एकदा एखादी व्यक्ती मनापासुन आवडली ना मग ती एक व्यक्तीच नसुन श्वास बनते. आणि तुम्हाला माहिती आहे श्वास संपला म्हणजे जीवन संपणे निश्चित."
आजोबा पुढे बोलणार तेवढ्यात शेजारील झाडावरील खोप्यातुन एक पक्षाचं पिल्लु आजोबांच्या मांडीवर पडले. ते भितीने थरथर कापत होते. ते तेथुन उडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु नुकतेच पडल्यामुळे त्याला उडणे देखील शक्य नव्हते. आजोबांनी हळुवारपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तसे हळु हळू त्याने आपले पंख जवळ घेतले आणि शांतपणे आजोबांच्या मांडीवर बसले. आता आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे बंद केले होते. तरी ते शांतपणे आजोबांच्या मांडीवर बसुन होते.
" हाच श्वास संपण्यामागचं कारण मी जाणून घेऊ शकतो का?"
मुद्याकडे लक्ष वेधत आजोबांनी मला विचारले.
" आजोबा. आयुष्यात प्रेम काय असतं? हे मला मुळीच माहिती नव्हतं. किंबहुना प्रेम करावं हा विचार देखील माझ्या मनात केव्हा येत नव्हता. परंतु अचानक एकदा मी तिला भेटलो. तिच्या बोलण्याने मी तिच्या स्वभावाकडे आपोआप आकर्षित झालो. एखाद्या पाणावर पाण्याचा एक थेंब पडावा आणि हवेच्या हलक्या झोताने तो संपूर्ण पानावर पसरावा. तसे तीचे शब्द माझ्या मनावर दवबिंदू बनून चौफेर पसरू लागले. आणि माझ्या मनात प्रेमाचे बिंजाकुर तग धरून कधी उभे राहिले? मला देखील कळाले नाही. तिच्या बोलण्यात एक वेगळीच आपुलकी आणि विश्वास होता. मी आपोआप तिचा होवुन गेलो. हळुहळू आमच्यातील संभाषण देखील वाढत गेले, तसे आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या सम्मतीने करू लागलो. जिवापाड प्रेम असल्याने मी तिची खुप काळजी करू लागलो. तिला काहीच त्रास होवू नये असे मला मनोमन वाटु लागले. म्हणून मी तिला अनेक गोष्टी करण्यापासून थांबवु लागलो. सांयकाळच्या वेळेस बाहेर न जाणे, अनोळखी व्यक्ती सोबत न बोलणे, कुणी काही बोलल्यास त्याचा प्रतिकार करणे अशा अनेक गोष्टी मी तिला सांगु लागलो. कारण तिला किंचितही झालेला त्रास मला असह्य वेदना देवून जायचा. तिला त्रास देणारी एकही गोष्ट ह्या जगात ठेवु नये असे मला वाटु लागले. परंतु आजोबा, तिच मला एकदा म्हणाली की मला जगाचा नाही तुझाच त्रास होतोय. माझ्या आयुष्यातुन निघुन जा मी वैतागली आहे तुला. हे शब्द नसुन माझ्यासाठी धारदार शस्त्राने काळजावर ओढलेले चिरखाडे होते. त्याच्या वेदना मेंदूपर्यंत जात होत्या. मी अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने तिचे हात कानावर घट्ट पकडून ठेवलेले होते. आता तिला माझा आवाज देखील नकोसा झालायं. आता ति माझ्या आयुष्यात नाहीये तर माझ्या जिवंत असण्याला देखील काहीच अर्थ नाहीये. माझ्या आयुष्यातील आनंदाचे सारेच क्षण संपलेले आहेत. तु नकोय असे जेव्हा ती म्हणाली तेव्हाच माझा जीव गेला होता. आता हे फक्त शरिर राहिलेय मागे. त्यामुळे ते पण आज मी संपवुन टाकणार आहे. सांगा आजोबा काय चुक होती माझी? काळजी करणे, जिवापाड जपणे गुन्हा आहे का? प्रेमासारखं पवित्र बंधन क्षणात तोडनं सोपे असते का?
आजोबा माझा शब्द न शब्द शांतपणे ऐकत होते. त्यांनी मांडीवरील पिलाच्या डोक्यावरून हात फिरवणे चालू केले. त्याला दोन्ही हातांनी कुरवाळू लागले. आता ते पिल्लु मांडिवरून उडुन खाली दगडावर बसले. आजोबांनी तिथेही त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे चालूच ठेवले. थोड्यावेळाने ते पिल्लू तिथून भुरर्कन उडून समोरच्या काळोखात गडप झाले. आजोबा क्षणभर त्या काळोखाकडे बघत राहिले आणि त्यांनी माझ्याकडे बघुन एक स्मित हास्य केले व बोलू लागले,
" बाळा, प्रेम हे पवित्र आहे. परंतु पवित्र बंधन मात्र मुळीच नाही."
" आजोबा, कसे काय प्रेम पवित्र बंधन नाही, असे वेड्यागत काय बोलताय?"
" माझे बोलणे निट समजून घे बाळा. निसंकोचपणे प्रेम हे पवित्र आणि चांगले आहे. परंतु प्रेम हे पवित्र बंधन मुळीच नाही. तु बघितलेस काही वेळेपुर्वी माझ्या मांडीवर एक पिल्लु पडले. किती घाबरलेले होते ते? भितीने अगदी थरकाप होत होता त्याचा. परंतु मी जेव्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा ते थोड्यावेळाने शांत झाले. त्याची भिती दुर झाली आणि अगदी निवांत ते माझ्या मांडीवर बसुन राहिले. माझ्या हाताचा त्याला किती मोठा आधार मिळाला. त्याला खात्री पटली की हा हात आपल्याला हानी पोहचविणारा नसुन आपली काळजी करणारा आहे. थोड्यावेळाने मी तोच हात पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यावरून फिरवू लागलो. त्याला गोंजारू लागलो. आता मात्र ते तिथुन उठून माझ्या दुसऱ्या मांडीवर बसले. कारण माझ्या काळजी करण्याचा आणि कुर वळण्याचा त्याला आता थोडासा त्रास होऊ लागला होता. मी तरीही हात फिरवणे थांबवले नाही. तेव्हा ते माझ्या मांडीवरून उडून
खाली दगडावर बसले. तरी मी अजुनही चांगलाच आहे अशी त्याला खात्री होती. परंतु ते खाली बसलेले असताना मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिलो. आता मात्र ते उडुन दुर निघुन गेले. ते दुर उडून का गेले असावे असे तुला वाटते?"
" त्यात काय एवढे? तो पक्षी आहे आजोबा. एकेठिकाणी जास्त वेळ थांबुच शकत नाही. कधी ना कधी तो उडणारच होता." मी पटकन उत्तर दिले.
आजोबा माझ्याकडे बघुन शांत पणे म्हणाले,
" तु समजतोस तसे मुळीच नाहीये बाळा. मी चांगला आहे, त्याची काळजी घेतो, त्याला प्रेमाने कुरवाळतो हे त्याला माहिती होते. परंतु मी पुन्हा पुन्हा त्याच्या वरून हात फिरवल्यामुळे त्याच्यावर उडण्याचं बंधन आले होते. त्याला माझ्या हातामुळे हवे तिकडे उडुन जाता आले नसते. हवे तसे वागता आले नसते. आपण जेव्हा बंधनात अडकलोय हे त्याला कळाले तेव्हा ते माझ्यापासुन दुर उडून गेले. त्याला माझं निस्वार्थी प्रेम करणे, काळजी करणे, जीव लावणे, हे सगळं हवेसं होते. परंतु त्याला नको होते ते फक्त बंधन. खोप्यातुन माझ्या मांडीवर पडलेलं पिल्लू काही काळ माझ्या मांडीवर बसुन खोप्यात न जाता दुर निघुन गेलं. आणि त्या गर्द अंधारात देखील झाडाच्या फांदीवर मनसोक्त होवून बसले. म्हणजे त्याला खोप्यातील आई वडिलांच प्रेम, माया, उब हे सगळे हवे होते परंतु त्यांच बंधन नको होते. म्हणून ते कसेबसे खोप्यातुन बाहेर निसटले होते ते बंधनमुक्त होवून ह्या निसर्गात स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी. कारण ते चुकुन जर खोप्यातुन पडले असते तर माझ्यापासुन उडुन ते पुन्हा खोप्यात गेले असते. बाळा, माणसाचही देखील तसेच असते. मनसोक्त फिरावं, मनसोक्त बोलावं, वाटेल तिकडे जावं, वाटेल ते करावं, स्वच्छंदवणे रहावं असे प्रत्येकालाच वाटत असते. तिचे आई बाबा देखील त्या व्यक्तीवर प्रेम करत असतात. परंतू अनेक गोष्टींवर काहीना काही बंधने आणत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे मन आई बाबांच्या बंधनात राहून कंटाळत. आणि अशाच वेळेस आपली त्या व्यक्तिची कुठेतरी भेट होते. आपण सुरवातीला कुठलेच बंधन ठेवत नाही. त्या व्यक्तीला वाटेल ते मनातील बोलू देतो, वाटेल ते करू देतो निस्वार्थ प्रेम करतो. जेव्हा त्या व्यक्तीला वाटते की इथे काहीच बंधन नाही तेव्हा त्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम होते. आपण खरचं ह्या जगातील सर्व बंधनातून मुक्त झालोय. ह्याचा त्या व्यक्तीला खुप आनंद होत असतो. आपल्यासोबत आता काहीही भिती नाही मनसोक्त जगता येईल, आपल्या आईवडिलांपेक्षाही ह्या जगात आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी आहे ह्या विचारांनी ति व्यक्ति आपल्याशी हृदयात खोलवर जोडली जाते. त्याचमुळे बघ आईवडिल खुप प्रेम करत असताना देखील आपल्या मनात प्रेमाची जागा काही वेगळीच असते. म्हणूनच आई वडिलांचा देहांत झाल्यामुळे किंवा आई वडिलांनी सोडून दिल्यामुळे ह्या जगात कुणी फाशी घेतल्याचं किंवा स्वताला संपविल्याच एकही उदाहरण नाही. परंतु प्रेमासाठी कित्येक लोकांनी स्वताला संपविल्याचे लाखो उदाहरण आहेत. हळू हळु आपण त्या व्यक्तिची गरजेपेक्षा जास्त काळजी करू लागतो. हे करू नकोस, ते करू नकोस, इकडे जावु नकोस तिकडे जावु नकोस हे सांगु लागतो. तेव्हा त्या व्यक्तिला आपण बंधनात अडकल्यासारखे वाटु लागते. आणि एक दिवस ह्या पिल्लासारखे ति व्यक्ति देखील आपल्या बंधनातून मुक्त होवून दुर निघुन जाते.
त्यामुळे प्रेम हे पवित्र बंधन नसुन प्रेम हे पवित्र नातं आहे. मनमुरादपणे केलेला मनसोक्त विहार आहे. जिथे बंधन असते तिथे फक्त नातं असतं प्रेम नसतं. आणि जिथे प्रेम असतं तिथे बंधन कधीच नसतं.
त्यामुळे अनोळखी व्यक्ती सोबत केलेल्या लग्नाला ' विवाह बंधन' म्हणतात. आणि ज्याच्याशी प्रेम असते त्यासोबत लग्न करण्यास ' प्रेम विवाह' म्हणतात. त्यात बंधन शब्द येतचं नाही."
मी भारावून गेल्यासारखे ते शब्दांमृत माझ्या कर्ण ओंजळीने घटाघट प्राशन करत होतो. मला माझी नकळत झालेली चुक लक्षात आली होती. प्रेमाचा खरा अर्थ मला उमगला होता.
" आजोबा, तुम्ही अगदी छानपैकी मला खर प्रेम काय असते ते सांगितले. परंतु मी जिच्यावर प्रेम करतो ती तर माझ्या सोबत नाहीये. त्यामुळे असेही तिच्यावाचुन मी जगु शकत नाही."
" बाळा, प्रेम हे माणसाला मरायचं कधीच शिकवत नाही. मरतानाही हसत कसे जगायचं हे प्रेम शिकवत असतं. जे प्रेम शरिरावर होवून शरिर सौंदर्य असे पर्यंत टिकतं ते प्रेम नसतं. जे प्रेम मनापासुन सुरु होवुन अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देतं ते खरं प्रेम असतं. आणि खऱ्या प्रेमाला दुर करण्याची ताकद हे जग निर्माण करणाऱ्या परमेश्वरात देखील नसते बाळा. फक्त बंधनमुक्त आणि निस्वार्थ प्रेम असावं."
" आजोबा, प्रेमात अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे?"
" बाळा, अपेक्षा विरहीत प्रेमालाच निस्वार्थी प्रेम म्हणतात. अपेक्षा वाढल्या आणि त्यांची पूर्तता झाली नाही की मग माणसाला राग येतो. राग आला की त्याचे स्वतावरील नियंत्रण सुटते.आणि त्या रागाचे भांडणात रूपांतर होते."
" परंतु आजोबा, प्रेमात भांडण तर होतातच ना? आई बाबांचे देखील भांडणे होतात. परंतु ते कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत."
" बाळा, मला सांग आपण तहान लागल्यास पाणी कुणाकडे मागतो?"
" ज्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे त्याकडे."
" अगदी बरोबर. आपण पैसे कुणाकडे मागतो?"
" आजोबा ज्यांकडे पैसे आहेत त्यांकडेच."
" आगदी बरोबर सांगितले. ज्याच्याकडे पाणीच नाही, त्याकडे आपण पाणी मागतच नाही. आणि मागितले तरी तो देवु शकत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याकडे आपण ते मागतच नाही. आणि विनवणी करून मागितले तरी तो देवु शकत नाही. कारण देण्यासाठी आधी त्याकडे ती गोष्ट मुबलक प्रमाणात हवी असते. तसेच प्रेमाचे पण असते. आपण प्रेमाची अपेक्षा पण त्याकडूनच ठेवतो ज्याकडे खुप सारं प्रेम असेल. हळवं हृदय हे प्रेमाने ओसंडून भरलेले असते. परंतु हळवे हृदय लवकर छोट्या छोट्या गोष्टींनी कोलमडून पडणारे असते. दोन्ही पण व्यक्तिचे हृदय हळवे असतील तर अपेक्षाभंग झाल्यास ते कोलमडून पडतात. विस्कटून जातात. आणि विस्कटलेले हळवे,घायाळ झालेले हृदय हे प्रेमाने भरलेले असून देखील त्या परिस्थितीत दुसऱ्या हृदयावर प्रेम करू शकत नाही. त्यामुळे आपल्या हळव्या हृदयावर सय्यमाच अभेद्य कवच असावं लागतं. मग ते कवच कुठल्याही परिस्थितीत आपल्या हळव्या हृदयाला विस्कटु देत नाही. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तिवर भांडण झालेले असतांना देखील खुप प्रेम करू शकतो. त्यामुळे जिथे प्रेमाचा अथांग सागर वाहत असतो तिथे कितीही संकटे आले तरी प्रेमाची नाव बुडत नाही. त्यामुळे बाळा, हे विस्कटलेलं हृदय घेवून ह्या खोलदरीत आयुष्य संपविण्यापेक्षा त्याच हृदयाला सय्यमाच, शांततेचं आणि आनंदाच अभेद्य कवच लाव. जेणेकरून ते कुठल्याही परिस्थितीत पुन्हा विस्कटले जाणार नाही.
लक्षात ठेव ऱ्हास म्हणजे प्रेम नव्हे, नवनिर्मिती म्हणजे प्रेम. शेवट म्हणजे प्रेम नव्हे, नव्याने सुरुवात करणे म्हणजे प्रेम. "
मी त्या सुंदर मधाळ शब्दांकडे किती आकर्षित झालो होतो. एक ना एक शब्द अनमोल रत्नासारखा माझ्या मनात साठवून ठेवत होतो. त्या तेजस्वी चेहऱ्याकडे आणि ओघस्वी वाणीकडे एकटक बघत होतो. तितक्यात एक मायेचा उबदार हात पाठिवरून फिरतांना मला जाणवले. कुणाचा हात आहे हे बघण्यासाठी मी क्षणभर मागे ओळून बघितले. परंतु मागे कुठीच नव्हते. कदाचित भास झाला असेल असे समजून मी पुढे बघितले. तर आजोबा समोर नव्हते. एका क्षणात कुठे गायब झाले आजोबा? आता तर इथेच होते. ते बसलेले होते त्या दगडावर मोराच्या सुंदर पिसारा पडलेला होता. तो मी हातात घेतला आणि आजोबा आजोबा आवज देवु लागलो. दुर अंधारातून मला सुंदर बासरीचा मनमोहून टाकणारा आवाज ऐकु आला. मी त्या आवाजाच्या दिशेने चालते झालो. दुर अंधारात मला सफेद काहीतरी दिसले. थोडेसे समोर जावून बघितले तर आजोबांची पाठमोरी प्रकाशमान आकृती पुढे जाताना दिसली. मी आवाज देत होतो परंतु आजोबा थांबण्यास तयार नव्हते. आजोबांच्या पुढ्यातच एक खोल दरी होती. आजोबा पुढे रस्ता संपलाय. पुढे जावु नका, असे म्हणताच आजोबांचा पाय दगडावरून घसरला आणि आजोबा त्या खोलदरीत कोसळले. तसे दोन्ही हात कानाला लावुन आजोबा असे जोरात किंचाळून खाडकन झोपेतून जागे झालो. हृदयाची धडधड वाढलेली होती. अंगावर शहारे आले होते. हातातील मोराचा पिस बघत होतो परंतु तो देखिल नव्हता.
थोड्यावेळाने स्वप्नातून पुर्णपणे बाहेर आलो होतो. आणि आतापर्यंत जेही बघितले ते एक स्वप्न होते याची जाणीव झाली होती. परंतु प्रेमाची खरी ओळख करून देणारा आजोबांचा तो हसरा चेहरा मला जगण्याची नवी उम्मीद देवून गेला होता.
𝕯𝕾