प्रेम हे! - शेवटचा भाग
प्रेम हे! - शेवटचा भाग
आज शामी ने ठरविलेले होत की श्याम ला प्रेमाची कबुली द्यायची. ती खूप खुश होती. आणि त्यात अंजली सुद्धा, श्याम तिच्या कसा प्रेमात आहे, ती त्याला कशी आवडते हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवीत असते.त्यामुळे शामिला सुद्धा वाटायला लागते की , खरच श्याम देखील तिच्या प्रेमात आहे आणि श्याम सुद्धा तिला अनु व त्याच्या मैत्री बद्दल सगळच सांगत असतोच. पण त्याने अनुला लग्नासाठी मागणी घातली हे मात्र तो तिच्यापासून लपवून ठेवतो कारण त्याला तिला सरप्राइज द्यायचे असते.
शामी मात्र आपल्या प्रेमाची बाग फुलवण्यातच मग्न असते. तिच्या स्वप्नांच्या दुनियेत तिच्या प्रेमाचा महाल कधीच बांधून झाला होता.तिला वाट होती ती फक्त श्यामच्या उत्तराची. शामी बुटिक मध्ये असतानाच श्याम व अनु सायंकाळी तेथे पोहचतात.
श्याम : ए..... शामी ... बघ कोण आलय ???
शामी : ए.. वाव.... !! तू अनु आहेस ना??
अनु : हो... पण तू कस ओळखलं???
शामी : अरे, माझ्या बेस्टीची फ्रेन्ड आहेस तू.. मग मी कस नाही ओळखणार.!! आणि काय रे श्याम? तुम्ही येणार ते आधी सांगायला काय होत रे तुला ??
श्याम : अग ... !! आधी कुठे ठरलेलं ? आज काम लवकर झाल , तर अनुने तुला भेटण्याची इच्छा दर्शविली आणि लगेच घेऊन आलो तिला .. तुझ्या भेटीला..!
शामी : ए.. पण खूप छान झाल. मला देखील अनुला भेटण्याची खूप इच्छा होती.
अनु : हो... आणि मला सुद्धा. श्याम नेहमीच फक्त तुझ्या विषयी बोलत असतो, सांगत असतो. त्यामुळे तर खूपच एक्साईट होते मी तुला भेटण्यासाठी!!
हे ऐकुन शामी परत विचारात गुंग होते.' श्याम नेहमी माझ्याविषयी बोलतो, सांगतो म्हणजे नक्कीच त्याला मी आवडते. आणि माझ्यासारखाच तो ही विचार करत असणार की हिला कस सांगावं??? '
श्याम : शामी.... कुठे हरवलीस ???
शामी : कुठेच नाही.. बोल तू..
श्याम : ए शामी ....!! ऐक ना... ! तुला काही तरी सांगायचं आहे.
शामी : अरे, बोल ना. वाट कुणाची बघतोय मग??
श्याम अनु चा हात हातात घेतो आणि सांगतो, " अनु आणि मी लग्न करायचं ठरवलंय . आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. "
मात्र हे सगळं ऐकून शामिला जणू धक्काच बसतो. एका क्षणात तिच्या स्वप्नांचा महल कोलमडून पडतो. तिच्या मनात फुललेली प्रेमाची वेल एका क्षणात सुकून जाते. रखरखते ऊन असुनही, तिच्या मनात मात्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळायला लागतात आणि नकळत तिच्या डोळ्यातून तिच्या भावना वाहू लागतात.
श्याम : काय झालं शामी?? तुझ्या डोळ्यात पाणी का ??
शामी : अरे वेड्या... हे तर आनंदाश्रू आहेत. आज मी किती हॅपी आहे म्हणून सांगू तुला .... ???
शामी श्यामला मिठी मारत अभिनंदन करते आणि मग अनुला सुद्धा शुभेच्छा देते त्यांच्या नव्या आयुष्यासाठी. मात्र, अनुला शामीच्या डोळ्यातून वाहणार श्यामच प्रेम दिसत. तिला मनात कुठेतरी अपराधी वाटायला लागतं. दुसऱ्या दिवशी अनु शामला भेटायला त्याच्या घरी येते. श्याम तिला त्याची रूम दाखवायला घेऊन जातो. श्याम च्या रूम मध्ये श्याम व शामीच्या बालपणापासूनच्या आठवणी भिंतींवर अनुला दिसतात. अनु प्रत्येक फोटो खूप काळजीपूर्वक बघत असते.
अनु: श्याम... एक विचारू???
श्याम : काय गं???
अनु : तू कधी शामीच्या प्रेमात नाही पडला का रे....??? म्हणजे ती पण किती सुंदर आहे . आणि तुम्ही दोघे तर मेड फॉर इच अदर पण वाटता..!!
श्याम : वेडी आहेस का अनु तू ??? आम्ही खूप छान मित्र आहोत. हे खरे आहे की, आमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सोबतच होतो. पण, तरीही कधी तिच्याबद्दल असा विचार आला नाही ग . आमची मैत्री गंगेच्या पाण्याइतकी निर्मळ आणि आकाशाएवढी विशाल आहे. आमच्यात सगळे सामावू शकतात, मात्र आम्हाला वेगळ करू शकत नाही.
अनु : मग काल शामीच्या डोळ्यात पाणी का होतं..?? तिचं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर...
श्याम : अगं तसं काही नाही. ती जेव्हाही खूप खुश असते तेव्हा लगेच तिचे डोळे भरून येतात, लहानपणापासून.
अनु : आणि... दुःखात..???
श्याम : हा ... म्हणजे तेव्हाही...! पण, ये तू सोड ना ग ते. मी तर आज खूप खुश आहो. आई बाबा उद्या तुझ्या घरी येणार आहेत, लग्नाची बोलणी करायला.. (आणि श्याम तिला घट्ट मिठी मारतो.)
मात्र अनु च्या डोक्यात अजूनही शामी चेच विचार सुरू असतात.
अनु : श्याम , मला तू बुटीक मध्ये सोडशील का रे...??
श्याम : का ग ...काय झालं..???
अनु : काही नाही ...सहजच ... जरा ड्रेसचे डिझाईन्स बघायचे होते.
श्याम : ओके.!! मग तुला शामि शिवाय बेस्ट ऑप्शन कुठेही मिळणार नाही. चल , सोडतो तुला.
श्याम अनुला शमीच्या बुटीक मध्ये ड्रॉप करतो आणि काही कामाकरिता बाहेर निघून जातो.
शामी : अरे , अनु तू इथे .. !! ये बस ना. बरं झालं तू आलीस ते. मी आज तुला फोन करणारच होते.
अनु : मला..!! का ग काय झालं..??
शामी : अगं काही नाही..., मी तुझ्यासाठी काही डिझाईन्स सिलेक्ट केलेत. बघ तुला आवडतात का ते. तुमच्या लग्नाचे सर्व ड्रेसेस मीच डिझाईन करणार आहे सगळ्यात सुंदर आणि वेगळे. सगळी लोक बघत राहील असे..
अनु खूप आश्चर्याने सगळं ऐकत होती. शामी इतकी शांत कशी काय असू शकते??? तिचं प्रेम कायमचं तिच्यापासून दुरावणार, तरीही ती इतकी स्टेबल कशी काय?? या प्रश्नांची उत्तरे अनुला सापडतच नव्हती. शेवटी न राहवून ती शामीला विचारते....
अनु : शामी .. तू इतकी शांत कशी राहू शकतेस??
शामी : म्हणजे.. मला कळलं नाही.
अनु : कळलं नाही.. की , कळवूनच घ्यायचं नाही. त्यादिवशी श्यामचं प्रेम तुझ्या डोळ्यातून वाहताना पाहिले मी. मला माहित आहे, तुझे श्यामवर खूप प्रेम आहे. मला खूप अपराधी वाटत आहे. मी तुमच्या दोघांच्या मध्ये आले.
शामी : नाही अनु ...असे काही नाही. श्यामच तुझ्यावर प्रेम आहे. तो फक्त तुझा आहे.
अनु : नाही शामी... तुझा अधिकार पहिला . श्याम तुझा आहे. मी परत निघून जाईल लंडनला.
शामी : अनु... तू वेडी आहेस का!! प्रेम म्हणजे फक्त मिळणं नसत ग..! हो.. हे खरे आहे की, माझं प्रेम आहे श्याम वर. मात्र याची त्याला कल्पना नसताना मी त्याला नेहमी मी गृहीत धरलं की त्याचाही माझ्यावर प्रेम असावे. पण.... पण त्याने नेहमी माझ्यावर प्रेम केलंय ते एक मैत्रीण म्हणून ,प्रियसी म्हणून नाही.
अनु : अगं ....पण त्याला कुठे माहीत होतं हे ... ??चल.. आपण त्याला सांगू या सगळं..!!
शामी : नाही अनु .…!! माझा खूप मोठा गैरसमज झाला होता. मी खूप मोठी चूक करणार होते. आमची इतकी सुंदर मैत्री.., जी जगा वेगळी आहे , त्या मैत्रीला मी प्रेमाचं नाव देण्याची चूक करीत होते. आमच्या नात्याला कुठल्याही नावात बांधण्याची चूक मी कशी काय करू शकते ग...?
आणि हो अनु, तुही हे सगळं विसरून जा. आणि मला एक वचन दे की , तू हे कधीही शामला सांगणार नाहीस.
अनु : ठीक आहे शामी... मी तुला वचन देते . आणि हो आज मी तुला आणखी एक वचन देते की, तुझी आणि शामची मैत्री जन्मभर कायम अशीच राहणार. मी श्यामच्या आयुष्यात येण्याने तुमच्या नात्यांमध्ये कुठलाही बदल होणार नाही .आणि मी तो कधीच होऊ सुद्धा देणार नाही.
शामी : (अनुला मिठी मारत ) अनु.. तुझ्यासारखी लाईफ पार्टनर माझ्या श्यामच्या आयुष्यात येणार, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल ग माझ्यासाठी?? थँक यु सो मच..!!!
आता शाम व अनु लग्नबद्ध झालेत. त्यांच्या सुंदर संसाराची सुरुवात सुद्धा झाली. आणि आजही शामी व श्याम यांचे नाते अजूनही तसेच आहे जसे पूर्वी होते. तेवढेच सुंदर , तेवढेच निर्मळ, आणि तेवढेच पवित्रसुद्धा. तर मित्रांनो प्रेम म्हणजे, फक्त घेणेच नसतं.. तर देताही यायला हवे. प्रेम म्हणजे पूजा असते , प्रेम म्हणजे त्याग असतो , मात्र प्रत्येकालाच हे जमेलच असेही नाही. आणि ज्याला हे जमलं त्यानेच प्रेमाचा खरा अर्थ जाणलं असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हो...ना!!!

