प्र प्रेरणेचा- नशीब
प्र प्रेरणेचा- नशीब
अर्जुन आणि सुनयना खूप सुखी जोडपं. छान संसार चालला होता दोघांचा. गरिबीतही दोघे विनातक्रार संसार करत होते. छोटी मीना नि दिनेशला प्रेमाने सांभाळत होते. अर्जुन इमारतीच्या बांधकामावर जात असे. तो रोज सकाळी सात वाजता घर सोडायचा ते थेट रात्री सातलाच घरी यायचा. सुनयना देखील दोन चार घरची धुणी-भांडीउरकत होती. मुलांना खूप शिकवायचे, जीवनात त्यांना सुखी पहायचे असे या दाम्पत्याचे स्वप्न होते. त्यामुळे सगळा खर्च भागवण्यासाठी दोघांना काम करावेच लागे. महिन्याला मिळणाऱ्या पगारातून दोघेही थोडी-थोडी शिल्लक बँकेत टाकत असत. परंतु या महागाईच्या जमान्यात फार कमी शिल्लक पडायची. तरीही दोघे हसत-खेळत संसारगाडा रेटत होते. लेकरांना गरिबीची झळ लागू देत नव्हते.सणासुदीला गोडधोड पक्वान्न शिजविण्यासाठी सुनयना जादा काम करायची. त्याचवेळी मुलांना नवे कपडे घेण्यासाठी अर्जूनही मुकादम सांगेल ते काम करायचा. दोघे आपापल्या क्षेत्रात खूप मन लावून काम करत असल्याने सर्वांच्या मर्जीत बसले होते
रोज लेकरे झोपल्यावर दोघे आपसात कुजबुजत. अर्जुन म्हणे,"सुनयना, तू माझ्या संसारात सुखी आहेस का? खूप काम करावे लागते तुला, पण हेही दिवस जातील. आपण आपल्या लेकरांना शिकून-सवरून खूप मोठे करू मग आपले दारिद्र्य संपेल आणि आपण सुखात राहू". सुनयनाही मग हसून बोले," नाही हो धनी, मी ही तुमच्याशी संसार करताना खूप सुखात आहे. तुमच्या प्रेमाने माझे पोट भरते. आत्ता आपण कष्ट करणार नाही तर केव्हा? आपल्या लेकरांना शिकवले तर ते आपल्याला सुखात ठेवणार आहेत". असे एकमेकांचे लाड करत त्यांचे दिवस पालटत होते. परिस्थिती मुंगीच्या पावलाने सुधारत होती आणि खर्च हत्तीच्या पावलाएवढा. हातातोंडाशी गाठ घालणं दिवसेंदिवस कठीण होत होते, परंतु दोघांच्या चेहऱ्यावर तसूभरही दुःखाचा लवलेश नव्हता. जणु काही दोघांनी सुखी माणसाचा सदरा घातला होता.
आता दिनेश पाचवीत होता आणि मीना चौथीत. दोन्ही मुले परिस्थितीची जाण ठेवून खूप अभ्यास करत, वर्गातला पहिला नंबर सोडत नसत. मुले कोणत्याही गोष्टीसाठी आई बाबांकडे कधीही काही हट्ट करत नसत. दोघे एकमेकांची समजूत घालत. मीना दिनेशपेक्षा छोटी होती परंतु तिला आई-बाबांच्या कष्टाची जास्त जाणीव होती. ती दिनेशला समजवायची," दादा आपण गरीब आहोत. आपले आई-बाबा आपल्यासाठी खूप मेहनत करतात नि आपणास काही कमी पडू देत नाहीत. आपणही ते दुःखी होतील असे वागायला नको. जणू काही परिस्थितीने दोघांना पोक्त केले होते. दिनेश मीनाला बोले," बाबांचे कष्ट मला कळंत का नाहीत? पण माझे मित्र मला चिडवतात. ते बोलतात तू छोट्याशा घरात राहतोस. तुझे आई-बाबा मजुरी करतात. त्यांना नवीन कपडे ही नसतात .मग मला खूप वाईट वाटते. मित्रांचा रागही येतो. कधी कधी देवाचाही राग येतो". मीना समजवायची," दादा परिस्थिती गरीब असली म्हणून काय झाले? आपल्या आई-बाबांचे मन किती मोठे आहे. परवा आपल्या शेजारच्या काकू पायरीवरून घसरून पडल्या. त्यांच्या घरात कोणीच नव्हते. बाबांकडे रिक्षासाठी पैसे नव्हते तर बाबांनी आपली सायकल गहाण ठेवून पैसे आणले उधारीवर आणि काकूंना दवाखान्यात नेले. हेच संस्कार ते आपल्यावरही करतात. एवढ्याशा मीनाला व्यवहारातले इतके ज्ञान पाहून दिनेशही गप्प बसे. आपली छोटी बहिण इतकी समजूतदार असल्याचे पाहून त्यांचे मन भरून येई. त्यालाही आईवडिलांविषयी प्रेम वाटायचे पण बाहेरच्या मुलांमुळे तो कधी कधी बिथरायचा. त्याला वाटे आपली छोटी बहिणही आपल्याला शिकवण देते. तिला एवढे समजते मग आपल्याला का कळू नये ? मग तो मित्रांच्यात जास्त मिसळत नसे. घरात बसून चित्रे काढी किंवा अभ्यास करीत असे. त्यामुळे त्याची चित्रकलाही खूप सुधारली.
त्याची चित्रे इतकी सुंदर वाटत की पाहणारा थक्क होऊन जाई. चित्रातील पक्षी, प्राणी तंतोतंत वाटत असत.असे वाटे की जणू ते जिवंत होऊन आता चित्रातून बाहेर येतील. त्याच्या बोटात जादू होती. दिनेशला हल्ली चित्रे काढण्याचा छंदच लागला होता. आता तो चित्रकलेच्या वापरलेल्या वह्यांतील जुनी चित्रे खोडून त्यावर दुसरी चित्रे रेखाटी. तरीही चित्रातील सारे काही हुबेहूब वाटे. शाळेतील गुरुजीही त्याच्या चित्रकारीची प्रशंसा करत. ते म्हणत," दिनेश तू ही कला जोपास. तुला भविष्यात त्याचा नक्की फायदा होईल. गुरुजींना त्याची परिस्थिती माहीत होती. ते त्याला पैसेही देऊ करत, परंतु आपल्या आई-वडिलांना अशी भीक घेतली तर वाईट वाटेल असे सांगून तो ते पैसे स्वीकारत नसे. गुरुजींना त्याच्या बालबुद्धीचे नि स्वाभिमानाचे खूप कौतुक वाटे. ते म्हणत," अरे दिनेश, मी तुला हे पैसे फुकट देत नाही, कर्ज समजून घे. तू मोठा झालास की व्याजासकट माझे पैसे परत कर". दिनेशला मग नाही म्हणवत नसे. परंतु तो सारे हिशोबाच्या वहीत लिहून ठेवत असे. आता दोन वर्षात गुरुजी निवृत्त होणार होते त्यामुळे दिनेशला त्यांचे पैसे घेतले तर कधी नि कसे परत करायचे हे समजत नसे. तरीही त्याने गुरुजींचा पत्ता माहीत करून घेतला होता. आता दिनेश खूपच मन लावून चित्रे काढू लागला. तो निसर्ग नि वनराईत भटकत असे. तिथल्या पशुपक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करीत असे. त्याला वाटे निसर्ग किती सुंदर कलाकार आहे. सकाळचा सूर्य, दुपारचा आणि सायंकाळचा सूर्य किती वेगळा आहे. आपले भविष्यही असेच व्हायला हवे. आत्ताची आपली ही परिस्थिती पालटून आपणही या सूर्याप्रमाणे तळपावे म्हणजे आपल्या आई-बाबांना ,बहिणीला आपण सुखात ठेवावे . दिवसेंदिवस या बहीण-भावाची प्रगती होत होती. मीना आता दहावीत गेली होती आणि दिनेश अकरावीत. दोघांनाही दरवर्षी उत्तम गुण मिळून शाळेतर्फे शिष्यवृत्ती मिळत होती. त्यामुळे त्यांच्या आई-बाबांना त्यांच्या शिक्षणाचा तितकासा खर्च नव्हता आणि मुले इतकी सद्गुणी असताना कोणाला खर्च करावासा वाटणार नाही? आता दोघेही मोठी झाली होती. मीना घरचे सगळे उरकून शाळेत जात होती. सुनयनाने आता आठ दहा घरची कामे पकडली होती. त्यामुळे घरखर्चाला तितकीशी तंगी होत नव्हती. दिनेशही दोन चार मुलांची शिकवणी घेऊन चार पैसे कमवत होता. स्वत:च्या शिक्षणाचा खर्च स्वत:च भागवत होता. आता त्यांचे दिवस पाल
टत होते आणि भविष्य सुखी असणार याची त्याच्या आई-बाबांना खात्रीच पटली होती. दिवसेंदिवस ते जास्तच कष्ट करत होते आणि मुलांची प्रगती कशी होईल ते पहात होते. एकदा दिनेश असेच चित्र काढत होता. त्याचे चित्र रेखाटन जंगलात,वनराईत बसूनच चालायचे. चित्र काढताना त्याची तंद्री लागली होती. वृक्षांवर विविध प्रकारचा पक्षांचा किलबिलाट चालू होता. मध्येच एखादा तितर पक्षी कर्कश आवाज करत आकाशात झेपावत होता.सारी वनराई फुलापानांनी बहरली होती. जणू देवाजीने तिथे बसूनच सुंदर अशी ही सृष्टी बनवली होती. दिनेश चित्र काढण्यात मग्न होता. इतक्यात पाठीमागून एक पदरव ऐकायला आला म्हणून त्याने मागे वळुन पाहिले तर कोणीच दिसेना. आपणास भास झाला असेल अशी मनाची समजूत काढून त्याने पुन्हा चित्र रेखाटायला सुरुवात केली. पुन्हा पैंजणाचा छुमछूम आवाज त्याच्या कानी गुंजला. आता हा भास नसुन
नक्कीच पाठीमागे कोणीतरी आहे याची त्याला
जाणीव झाली. त्याने हातातील कागद ,पेन्सिल खाली ठेवली नि चार पावले पुढे जाऊन पाहिले. पाहतो तर त्याला कोणीच दिसेना. मनातून तो थोडा चरकलाही. भुताटकी तरी नसेल ना! असा विचारही मनात येऊन गेला. आता त्याने कागद पेन्सिल हातात घेऊन पुन्हा चित्र काढायला प्रारंभ केला, परंतु त्याचे लक्ष आता चित्रात नव्हते तर कोणी पाठलागावर आहे का इकडे होते. त्याला जाणून घ्यायचे होते की कोण त्याच्याशी अशी गंमत करत आहे. त्यामुळे चित्र काढण्याचे ढोंग करत त्याने कानोसा घेतला आणि एक सुंदर मुलगी त्याच्या मागावर असल्याचे त्याच्या लक्षात आले. तिच्या आवाजाने त्याने झटकन वळून पाहिले. तिला लपायलाही संधी मिळाली नाही. त्याने पळत जाऊन तिचा हात पकडला आणि तिला विचारले, "काय ग, कोण आहेस तू? माझी अशी मस्करी का करीत आहेस"? प्रथम ती मुलगी घाबरली पण धीर एकवटून म्हणाली," अरे मी इथे जवळच राहते. माझे खूप मोठे फार्महाऊस आहे .त्याच्यासमोर सुंदर बाग आहे. तू चल तिथे नि हवी तेवढी चित्रे काढ .तुझी चित्रे खूप छान येतील". दिनेशलाही ते पटले पण ही कोण अनोळखी मुलगी आणि ती काय सांगते यावर विश्वास ठेवायला तो तयार नव्हता.तो लगेच तिला म्हणाला," मी येईन तिकडे पण मला कोणी ओरडणार तर नाही ना"? तशी ती मुलगी म्हणाली, "अरे कोणी नाही ओरडणार. मी माझ्या मॉम डॅडला सांगते सारे समजावून.तू चल तर खरं. ते उलट तुला, तुझ्या कलेला प्रोत्साहनच देतील. दिनेश निमूटपणे त्या मुलीच्या पाठोपाठ गेला. थोड्याच अंतरावर सुंदर असे ते फार्महाऊस होते. त्याच्या समोरच अतिशय शास्त्रीय पद्धतीने जोपासलेली बाग त्याच्यासमोर होती.
दिनेश थोडा बिचकला ,पण त्या मुलीने गेटचे दार उघडून म्हटले," अरे येना आत.माझे मॉम डॅड बागेतच बसलेत. तुझी ओळख करुन देते". तिने त्याचा हात पकडला नि ओढून गेटच्या आत नेले. पाहतो तो समोरच टेबल-खुर्च्या टाकलेल्या त्याला दिसल्या. त्या खुर्च्यांवर तिचे मॉम डॅड चहा पीत गप्पा मारत बसलेले दिसले.दिनेश आता मात्र चांगलाच गांगरला. आपली ओळखदेख नसताना आपण या मुलीच्या पाठोपाठ आल्याचा त्याला आता पश्चाताप होऊ लागला. तशी ती मुलगी तेथे आली नि त्याच्या हाताला धरून खेचतच त्याला आईवडिलांजवळ घेऊन गेली.परंतू त्या दोघांच्या कपाळावर अनोळखी आठी दिसताच त्याने पाठी मागे पळायचा पवित्रा घेतला.आता त्या मुलीच्या ध्यानात सारेकाही आले. ती आईवडिलांकडे वळून म्हणाली," हा मुलगा समोरच्या वनराईत खुप दंग होऊन चित्र काढत होता. त्याच्या बोटात जादू आहे. मी त्याला आपल्या बागेत चित्र काढण्यासाठी घेऊन आले. तशी तिची मॉम म्हणाली," अगं स्नेहा पण कोण हा मुलगा? त्याला तू कशी ओळखतेस? काही सांगशील की नाही!" आता दिनेशला तिचे नाव स्नेहा असल्याचे कळाले. स्नेहा म्हणाली," मी या मुलाला ओळखत नाही, परंतु त्याची चित्र काढण्यातली तल्लीनता पाहून त्याला मी इकडे घेऊन आले. तुम्ही त्याने काढलेली चित्रे पहा मग तुम्हाला त्याच्या किमयागार बोटातील किमया कळून येईल. आता प्रथमच डॅडनी आपले तोंड उघडले,"त्यांनी गोड आवाजात दिनेशला विचारले, "कोण रे बाळा? तू कुठे राहतोस? तुझे नाव काय? तू काय करतोस? पाहू तुझी चित्रे.आमच्या स्नेहाला इतकी आवडलीत तर पाहायलाच हवीत. तशी दिनेशने आज्ञाधारकपणे चित्रं रेखाटलेले ते सारे कागद टेबलावर ठेवले आणि बाजूला जाऊन उभा राहिला.साहेबांच्या प्रतिक्रियेकडे शांतपणे तो पाहू लागला. आता अजून थोडा तो स्थिरावला. तो म्हणाला," काका माझे नाव दिनेश आहे. मी इथून जवळच एका छोट्याशा घरात राहतो. माझे आई-बाबा मजुरी करतात. आम्हाला शाळा शिकवण्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात .मी आणि माझी बहीण त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिष्यवृत्ती मिळवत आहोत. मला चित्रकलेचा नाद असल्याने मी कधीकधी इथल्या वनराईत येवून चित्र रेखाटतो. तुमची ही स्नेहा तिथे आली होती. माझी चित्रे पाहून ती मला ओढून इथे घेऊन आली. माफ करा मला. मी निघतो".
दिनेशच्या या मधाळ बोलण्याने स्नेहाचे मॉम डॅड प्रसन्न झालेले दिसले.ते उत्तरले," थांब बेटा, तुझी थोडक्यात ओळख झाली आहेच परंतु मला तुझ्या वृत्तीतून तुझी जिद्द नि प्रामाणिकपणा दिसला. मला तुझा अभिमान वाटतो आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून कष्ट करणारी किंवा अभ्यास करणारी मुले तुम्ही आहात अशी पिढी आता दूर्मिळ दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे तू स्वतःची गरिबी न लपवता स्पष्टपणे सारेकाही सांगितलेस.तू खरेच सद्गुणी मुलगा आहेस. मी उद्या सकाळी तुझ्या घरी येतो. तुझी ही चित्रे तुला वरच्या श्रेणीवर घेऊन जातील. तुझ्या आई- बाबांशीही बोलतो". आता दिनेशला जरासे हायसे वाटले आणि गरिबांना हाडतूड करता सर्व ऐकून घेणारे हे साहेब देवदूत असल्याचाच भास झाला. आपले नशीब थोर म्हणून आजच साहेबांची नि आपली मुलाखत झाली. वाऱ्यावर स्वार होऊनच दिनेश त्याच्या घरी आला. आल्याआल्या त्याने काय घडले त्याचा सर्व वृत्तांत आपल्या आई-बाबांना सांगितला. त्या दोघांनाही आपल्या लेकरांचा अभिमान वाटला.आपण लहानपणापासुन दिलेल्या संस्कारांचे चीज झाल्याने समाधानही वाटले. आता उद्या सकाळी त्या साहेबांशी काय आणि कसे बोलायचे हे ठरवत ते दांपत्य मोठ्या आनंदात झोपी गेले.