"पंखांच्या सायकली बरोबर"(p.11)
"पंखांच्या सायकली बरोबर"(p.11)


सकाळी बाहेरगावी असलेल्या मामेभावाचा फोन आला होता. तो सांगत होता त्यांच्या गावात चालु असलेल्या जत्रे विषयी आणि म्हणत होता तु पण ये ना इकडे खुप मज्जा येईल. त्यावेळेस मी बोलुन गेले “माझ्या कड़े काय पंख असलेली सायकल आहे का? की कधीही उठेन आणि उडत उडत कुठेही पोहोचून जाईन!”
त्याचा फोन ठेवला आणि मना मध्ये विचारचक्र सुरु झाले, खरंच माझ्याकड़े पंख असलेली सायकल जर असती तर? मी काय केले असते?
सगळ्यांत पहिल्यांदा म्हणजे कुठेही जाण्यासाठी जे आई-बाबांवर अवलंबुन रहावे लागते ते नाहीसे होईल. कधीही, कुठेही जावेसे वाटले तरी ते सहज शक्य आहे नाही का? सायकलींचे पंख पसरले, आकाशी भरारी घेतली आणि झाले हवेच्या लाटेवर स्वार. रस्त्यावरील वाहतुकीचा, गर्दीचा त्रास नाही, वाहनाची किंवा वाहनचालवण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही.
रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे पादचाऱ्यांसाठी, हवेत उडणाऱ्याला त्याची काय पर्वा? आकाशातुन ही धरणी सुंदर, हिरवीगारच भासते. जमीनीवर भासणाऱ्या उत्तंग इमारती आकाशातुन किती छोट्या वाटतील? कधी या झाडांवर तर कधी त्या झाडांवर. ना राज्यांची बंधन ना देश्याच्या सिमा. मनात आलं तर कधी एका देशात तर कधी दुसऱ्या. कित्ती मज्जा!! शब्दशः सांगायचे झाले तर “वसुधैव कुटुंबकम”, हे संपूर्ण विश्वच माझे घर असे! नाही का?
पंखांमध्ये बळ सामावून, एक उंच भरारी घेता येईल. ऊंच.. अजुन ऊंच, त्या निळ्या आकाश्याच्या दिशेने, ढगांच्या मध्ये. धुंद होऊन त्या निळाईमध्ये तरंगत राहीन नाहीतर मावळत्या दिनकराच्या त्या तांबड्या गोळ्याने सोनेरी झालेल्या आसमंतामध्ये गिरक्या घेत राहीन.
वेळे अभावी, अधिक अंतरामुळे जे अनेक जिवाभावाचे मित्र, नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही अश्या सगळ्यांना भेटु शकेन. दिवसभर मोकळ्या आकाश्यात झेपावल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरट्यामध्ये परतुन सायकलीचे पंखांचेच उबदार पांघरुण करीन आणि त्यात निजुन जाईन.
तेवढ्यात आईने झोपेतून जागं केलं! अरेच्चा स्वप्न होतं होय!
बघा.. नुसत्या झोपेत असताना पण विचारांना पंख फुटले तर पंखांच्या सायकलीबरोबर कुठे-कुठे हिंडून आले, मग खरंच पंख फुटले तर!!