Pandit Warade

Romance

4.9  

Pandit Warade

Romance

पहिल्या प्रेमाची ताटातूट

पहिल्या प्रेमाची ताटातूट

5 mins
1.6K


आज सकाळपासून जिकडे तिकडे निसर्ग आनंदाने डोलत होता. सकाळचा गार वारा सुंदर भूपाळी गात होता, सर्व चराचरांना जागे करत होता. सूर सनई, चौघडा इ. मंगलवाद्ये सुस्वरात भूपाळ्या गात होती. सर्व चराचर सृष्टीत आनंद भरून ओसंडत होता. सर्वांच्या आनंद सागराला भरती येण्याचे कारण म्हणजे आज होती दिवाळी.

व्यापारी येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्साहात होते. पिकांचा हंगाम पाहून शेतकरी आनंदात होते. सुगंधी उटणे, अभ्यंग स्नान, रांगोळ्या इ. च्या धावपळीत बहिणी आपल्या भावाला अंघोळी घालत होत्या.

रंगरावांच्या वाड्यात सुद्धा सर्व लहानथोरांना नवे कपडे घातले होते. त्यांची १८ वर्षे वयाची मीनल भावाला सुगंधी उटणे लावून अंघोळ घालत होती. एकदम आनंदी आनंद होता. परंतु रंगरावांच्या आनंदाचे कारण मात्र वेगळेच होते, जे कुणालाच ठाऊक नव्हते.

रंगराव एक बडी असामी. ते गावातील एक बडे, श्रीमंत प्रस्थ. सारा गाव त्यांच्या शब्दाचा आत होता. ते सांगतील तसं करायचं. सर्व शेतकरी शेती पिकवायचे आणि आलेले सर्व पीक कारभाऱ्यांकडे म्हणजे रंगरावांकडे नेऊन जमा करायचे आणि वर्षभर कर्ज म्हणून लागेल तसे आणायचे. पुन्हा पुन्हा तेच चक्र सुरू असायचे.

त्याच गावातील किशन नावाचा शेतकरीसुद्धा इतर शेतकऱ्यांप्रमाणेच सर्व माल भरून कारभाऱ्यांकडे नेऊन घालायचा आणि वर्षभर पुन्हा कर्ज घ्यायचा. मात्र त्याचा मुलगा प्रकाश बारावी झाला तसे त्याला हिशेब कळायला लागला. कारभारी लुबाडतोय हे त्याला समजायला लागले होते. तो शहरात शिकायला गेल्यावर सुद्धा त्याने लहान भावाला हिशेब ठेवायला शिकवले होते. त्यानुसार त्याने हिशेब ठेवलाही होता.

प्रकाश दिवाळीच्या सुटीत घरी आला. शेतात चक्कर मारल्यावर त्याला पीक पाहून आनंद झाला. दोन तीन दिवसात पीक तयार झाले की, प्रकाशने घरी लागेल तेवढे ठेऊन बाकीचा माल शहरात नेऊन विकला आणि त्याचे पैसे वडिलांच्या हातावर ठेवले. संध्याकाळी प्रकाश वडिलांसोबत कारभाऱ्यांकडे कर्जफेड करण्या साठी निघाला.

किशन प्रकाशला बाहेर उभे करून वाड्यात गेला. तसा कारभाऱ्यांचा आवाज कानी पडला...

"किशन! कर्जाची परतफेड कधी करणार?"

"हे काय मालक. हे आपले कर्ज आणि हे त्यावरील व्याज" असं म्हणत त्यानं आपल्या खिशातून नोटांची दोन बंडल बाहेर काढले आणि कारभाऱ्याच्या समोर ठेवले.

"हे काय? मी कर्जाची परतफेड मागतोय, भीक नव्हे." कारभारी गरजले.

"मालक, तुमच्या कर्जाचे हिशेबा प्रमाणे पूर्ण पैसे आणलेले आहेत." किशन उत्तरला.

"हिशेब? माझ्या कर्जाचा हिशेब? माझ्या कर्जाचा हिशेब अद्यापही कुणी केलेला नाही."

"आम्ही केलाय ना. आणि तो बरोबर आहे. चूक वाटत असेल तर तसे सांगा. मात्र मी तो बरोबर केलेला आहे. यापेक्षा एक पैसाही जास्त मिळणार नाही. चला बाबा." प्रकाश आत येऊन म्हणाला.

"उचल ते पैसे आणि चालता हो इथून. मला नकोय तुझे पैसे. माझे कर्ज कसे वसूल करायचे ते माझे मी बघून घेईन." कारभारी रागाने ओरडला.

"हे पैसे ठेऊन घ्या. आम्हाला बुडवायची सवय नाही आम्हाला." असे म्हणत प्रकाशने ते बंडल टेबलवर ठेवले आणि वडिलांना जवळ जवळ ओढतच बाहेर घेऊन गेला.

रंगराव फक्त बघतच राहिले. त्यांचा नोकर संपा जवळच उभा होता. तो म्हणाला.....

"मालक, बघत काय बसलात? द्यायचे एक गोळीत उडवून." संपा बोलला.

"तसं नाही करता येत संपा. त्यानं आपलाच गळा फासात अडकला असता ना. दुसराच काहीतरी विचार करावा लागेल. काही तरी असा मार्ग काढ की हा काटा कायमचा निघाला पाहिजे. आणि हे काम तुलाच करायचं आहे." कारभारी.

"मालक, बिलकुल काळजी करू नका. असा मार्ग काढतो की, बस्स! 'ना रहेगा बांस और ना बजेगी बांसरी'." संपाने हमी भरली.

"अरे पण नेमके करणार काय ते तरी सांगशील की नाही?" गोंधळून कारभारी प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले.

"अहो मालक त्यात काय एवढे मोठं अवघड? अनायसे दिवाळी आलीय. दिवाळीची करून टाकू होळी." संपाने उपाय सुचवला.

"ठीक आहे. कुणालाही काही कळता कामा नये. असं काम करायचं. ही तुझी जबाबदारी." कारभारी.

"बिलकुल बिनधास्त राहा. या कानाचे त्या कानाला कळणार नाही. चिंता करू नका." संपा.

आज तो दिवाळीचा दिवस होता. म्हणूनच कारभारी आनंदात होते.

सकाळपासून संपाला कारभाऱ्यांनी दोन तीन वेळेस बोलावून घेतले आणि त्याला कामगिरी बद्दल विचारले होते. त्यावर संपा उत्तरला होता....

" मालक, एवढी घाई करून कसे चालेल? आज त्यांना आपल्या पूर्वजांना भेटायला जाण्याआधी गोडधोड खाऊन तर घेऊ द्या शेवटचं".

शेवटी न राहवून कारभारी म्हणाले, "आता तर माझ्याच्याने धीर धरवत नाही. केव्हा एकदा दिवाळीची होळी बघायला भेटते असं झालंय मला".

"तरी मालक, घाई करण्यात आपल्यालाच धोका आहे. त्यासाठी सायंकाळ तर होऊ द्या."

"बरं. तुझ्या मनासारखं होऊ दे. पण जपून हं."

"त्याची काळजीच करू नका. आज बघाच या पठ्ठ्या ची कामगिरी". छाती फुगवटा संपा म्हणाला.

कारभाऱ्यांना स्वस्थ बसण्याखेरीज गत्यंतर नव्हते. सावकाराच्या मार्गातील काटा दूर होणार होता म्हणून ते मनातून आनंदी होते.

सायंकाळ झाली. सगळीकडे पणत्या पेटवल्या गेल्या. चहूकडे रोषणाई दिसत होती. किशन व त्याचे कुटुंब चांगल्या प्रकारे आनंद घेत होते. कारण या वर्षी त्यांच्या हातात बऱ्यापैकी पैसे होते खर्चायला. ईश्वर कृपेने यावर्षी पीक चांगले आले होते. 'ही सर्व देवाची देणगी आहे' असे किशनचे मन त्याला सांगत होते. त्या मुळे किशन सर्व लहान थोरांना घेऊन गावाबाहेर अर्ध्या मैलावर असलेल्या देवीच्या दर्शना साठी गेला.

इकडे संपा आणि कारभारी किशनच्या घरा जवळ आले. बाहेर कुणी दिसत नाही असे पाहून त्यांना वाटले आत सर्वजण पूजा करत असतील. हीच योग्य वेळ समजून त्यांनी काडी ओढून खिडकीतून आतील कपड्यांवर फेकून दिली आणि पळून गेले.

हा हा म्हणता दिवाळीच्या आनंदाची होळी पेटली होती. घर जोरात पेटले होते. घरातील फटाक्यांनी पेट घेतला होता. गावभर बातमी पसरली. आजू बाजूचे सर्व लोकं धावले.त्यात कारभारी आणि संपासुद्धा होते. कारभाऱ्यांची मुलगी मीनल हिला ही बातमी समजली तेव्हा ती फारच घाबरली. तिचा प्रियकर 'प्रकाश आत असेल तर?' या विचाराने ती अस्वस्थ झाली. तिचे प्रकाशवर जीवापाड प्रेम होते. त्याच्या जिवाच्या काळजीने तिला घेरले होते. ती धावत तिथे आली, मात्र तिथे तिला तिचा प्रकाश दिसला नाही. तिला वाटले नक्कीच तीचा प्रकाश आत जळून मरतोय की काय. तिने मागचा पुढचा विचार न करता पळत आली. जीवाची, जमावाची पर्वा न करता .....

"प्रकाsssश, मी आलेssss." ओरडत त्या आगीत तिने कारभाऱ्याच्या देखत उडी घेतली. हे अनपेक्षित आणि इतक्या झटपट घडले की कुणालाच काही करता आले नाही. प्रकाशवर अतोनात प्रेम करणारी मीनल सर्वांच्या देखत आगीत भस्मसात झाली होती.

प्रकाश आणि मिनलच्या पहिल्या प्रेमाची अशाप्रकारे ताटातूट झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance