पहिले प्रेम
पहिले प्रेम




आज valentine डे प्रेमिकांचा दिवस, हा दिवस म्हटल्यावर मला माझ्या प्रेमाचा तो दिवस आठवला.....
त्या दिवशी सकाळी उठायलाच थोडा उशीर झाला होता.
रोज मी आईला स्वयंपाकात थोडी मदत करत असे पण आज आईनेच सगळी घरातली कामे केली होती. चहापाणी स्वयंपाक करून तिने माझा डबा ही भरून ठेवला होता. तो घेऊन मी घाई घाईने निघाले. पण व्हायचा तो उशीर झाला व माझी नेहमीची बस चुकलीच. आता रिक्षाने जाणेच भाग होते. अशा अडचणीच्यावेळी रिक्षा मिळेल तर खरी!
माझ्यासारखे बरेच जण रिक्षाकरता थांबले होते. माझा जीव वरखाली होत होता. आता बॉसची बोलणी खावी लागणार व लेट मार्कही लागणार याची धास्ती वाटू लागली. जरा थोडं मागे जाऊन रिक्षा पकडू म्हणून मी गेले आणि खरोखरच एक रिकामी रिक्षा आली मी हात करताच ती थांबली तशी मी घाई आईने त्यात बसले. एवढ्यात दुसऱ्या बाजूने एक हॅण्डसम माणूस येऊन रिक्षात बसला. मी चक्रावले रिक्षा सोडावी तर ऑफिसला कसे पोहोचणार? रिक्षात बसलेल्या माणसाची स्थिती माझ्यासारखीच झाली असावी. ते बघून रिक्षावाल्यानेच विचारले कुठे जायचं आहे तुम्हाला? एकाच दिशेने जात असाल व तुम्हा दोघांची संमती असेल तर मी घेऊन जातो.
"अडला हरि, गाढवाची पाय धरी" अशी आमची स्थिती होती म्हणून त्याला 'चल बाबा, लवकर चल.' म्हटले.
रिक्षात बसलो तेव्हा आम्ही दोघं शांत राहिलो एक सुद्धा अक्षर बोललो नाही. माझ्या ऑफिसची इमारत दिसताच दोघांच्या तोंडून शब्द फुटले 'अहो थांबवा थांबवा' रिक्षावाल्यासकट आम्ही तिघेही चकीत झालो व तिघांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. मी रिक्षावाल्याला मला नेहमी माहीत असल्याने त्याचे भाडे देऊ केले तेवढ्यात रिक्षावालाच हसून बोलला 'चला पळा उशीर होतोय ना आज माझ्या मुलांना सोडलय मी' असे म्हणून त्याने रिक्षा सुरू केलीच तेवढ्यात माझ्या बरोबरच्या माणसाने त्याच्या खिशात पैसे कोंबले व मला बघून एक गोड स्माइल दिली. मी त्यांना अर्धे पेसे देत होते तेव्हा तेच बोलले 'असू द्या हो माझं ऋण तुमच्यावर येथेच तर आपलं ऑफिस भेट होईलच की' असे म्हणून ते इमारतीच्या दुसऱ्या बाजूच्या लिफ्टला गेले. मी ही मनात म्हटलं देऊन टाकू कधीतरी भेटतीलच.
मी ही कामात मग्न झाले. रिक्षा पैसे मी सगळे विसरून गेले. त्या माणसाला मात्र विसरले नाही. पण पुन्हा तो कधी मला दिसलाच नाही.
अशी माणसे आयुष्यात बरीच भेटतात. एक दोन दिवसानंतर आपण विसरून ही जातो. पण तो
हॅण्डसम माणूस काही माझ्या मनातून जात नव्हता. रोज सकाळी व संध्याकाळी घरी जाते वेळी माझी भिरभिरती नजर त्या माणसाला शोधायची पण पुन्हा तो मला दिसलाच नाही. पुन्हा तो दिसावा भेटावा असे मात्र वाटत होते. रिक्षा स्टॅण्डवरही एकदा मुद्दाम जाऊन बघितले. पण नाहीत च दिसले महाशय. वाटलं इमारतीच्या त्याच्या लिफ्टने जावू दिसतील. एकदा तर वर खाली जाऊन ही आले. पण हट्ट, सगळं उलथ्या घड्यावर पाणी. नाव गाव काही माहीत नाही तरी मनाची चलबिचल त्याला शोधायची थांबत नव्हती.
आणि एके दिवशी सकाळी मी बस करता थांबले होते तेव्हा महाशय समोर हजर झाले. "चल आज जायचं ना रिक्षाने?” माझ्या तोंडातून शब्दच फुटला नाही. मी अवाक् होऊन त्याच्याकडे बघत राहिले. एवढ्यात रिक्षा आली व आम्ही त्यात स्थानपन्न झालो. मला खूप छान वाटले. आपली बरीच ओळख असल्यासारखी आमची बोलणी सुरू झाली. ऑफिस सुटल्यावर बरोबरच जाऊ असे त्याने सांगितल्यावर तर मी अतिशय खुश झाले.
माझ्या मनात एकसारखे त्यांचेच विचार येत होते. मला असं काय होतय मला कळेचना. मला सगळं छान छानच वाटत होते. माझ्या बोलण्यात वागण्यात खूपच फरक पडला होता. आणि माझा हा फरक आईच्या लक्षात आलाच. आणि त्यामुळे तिने मला विचारले ही. मी काही नाही बोलले पण ती माझी आई होती तिने विचारल्यालर माझ्या चेहऱ्यावरचे भाव तिने ओळखले होते. तिने मला सरळच विचारले. आणि मी ही सगळं आईला सांगीतले. तेव्हा आईनच विचारले, "म्हणजे तू त्याच्या प्रेमात पडलीय म्हण ना!" यालाच प्रेम म्हणायचे? तो कोण, कुठला. कुठे राहतो काही काही मला माहीत नाही तरी मी त्याच्या प्रेमात पडले? प्रेम म्हणजे काय असतं ते मला तेव्हा कळले. माझे मन मयुराप्रमाणे फुलून मन मोर नाचू लागला. मग मनात शंका
आली.
"अग वेडा बाई तू प्रेम म्हणते तुझं असेल पण त्याचं काय? नको बाबा जास्त फंदात पडायला. त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल काय?" असा मी रात्रभर विचार करत बसले. शेवटी मनात निश्चय केला उद्या रमेशला विचारायचं आणि देवालाही विनवले की, देवा त्यालाही माझ्यासारखे माझ्याबद्दल वाटू दे.
दुसऱ्या दिवशी मी मुद्दामच रमेशला विचारायचे म्हणून लवकर गेले. पाहते तो काय रमेश ही माझी वाट पाहत होता. मी दिसताच त्याने रिक्षा केली. आणि नवल म्हणजे तोच पहिली भेट घडवलेलाच रिक्षावाला. आमच्या दोघांच्या बोलण्यावरून त्याने बरोबर ताणले. आणि उतरते वेळी त्यांने तोंडभरून आशीर्वाद दिले. मी माझे प्रेम रमेशकडे व्यक्त करायच्या अगोदर रमेशच बोलला,
"नयना मला तुझा हात देशील?"
“म्हणजे तुलाही माझ्याबद्दल असंच वाटतं!"
रिक्षातले बोलणे रिक्षावाल्याने ऐकलेले होतेव व त्याचमुळे उतरताना त्याने आशीर्वाद दिलेले.
आम्ही एकमेकांना जाणायच्या अगोदरच "love at first side" असे रिक्षातल्या भेटीने घडवले. खरंच प्रेम आंधळे असते म्हणतात ते खरंच यावर माझा विश्वास बसला.
हळुहळु आमचं येणं जाणं वाढले. आमच्या दोघांच्या घरी ही आवडले. आणि पुढच्या दोन महिन्यात आमचे लग्नही उरकले.
संसार खरंच दृष्ट लागण्यासारखा चाललाय. दोन मुले झाली. सगळ्या सूखसोई आहेत. आमचं दोघांचं प्रेमही तसंच निरंतर आहे.
चौदा फेब्रुवारीला सगळ्यांचा valentine डे असतो पण रमेशचा व माझा आज चौदा वर्षे झाली तरी रोजचाच valentine डे असतो. हेच आमच्या प्रेमाचे वैशिष्ट्य माझं पहिलं वहिलं अप्रतिम प्रेम!!