Smita Bhoskar Chidrawar

Comedy Inspirational

2  

Smita Bhoskar Chidrawar

Comedy Inspirational

ऑप्शन्स ....की कन्फ्युजन ...

ऑप्शन्स ....की कन्फ्युजन ...

4 mins
132


"खूपच धावपळ होतेय गं तुझी गेले काही दिवस ... आज किचनला सुट्टी मस्त दे..मस्त काहीतरी ऑर्डर करूया आणि छान एखादी मूव्ही बघूया !! " हे ऐकून सगळ्या स्त्रियांच्या हृदयात जसे टीन टिन होते आणि सारे जग अचानक सुंदर वाटते. आपला नवरा म्हणजे लाखात एक अशी ग्वाही आपले मन नक्कीच देते ... हो ना .. तसेच माझेही झाले . मग सगळ्या रेस्टॉरंट्सचे मेनू बघणं सुरू झालं , एक तास झाला तरी कुठून काय ऑर्डर कराययं हे काही ठरत नव्हतं ... कारण होत... एकच ... खूप सारे पर्याय ... म्हणजेच खूपच ऑप्शन्स असल्यामुळे ही पंचाईत झाली एकाच पदार्थाचे अनेक ठिकाणी असलेले पर्याय , वेगवेगळ्या किमती आणि मुख्य म्हणजे .रिव्ह्यू ( हल्ली प्रत्येक गोष्ट रिव्ह्यू म्हणजेच दुसऱ्यांचा त्या गोष्टीबद्दल असलेला अनुभव बघण्याची पद्धत आलीय ना ... हा अनुभव इंटरनेटवर उपलब्ध असतो ... अगदी प्रत्येक गोष्टीचा रिव्ह्यू असतो बरं का ... म्हणजेच पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपली फसगत होत नाही ) आता रिव्ह्यू आणि अनेक ऑप्शन्स यामुळे पुढचे दोन तास कसे गेले ते कळलं नाही आणि आमची ऑर्डर काही देताच आली नाही . सगळ्यांची भुकेली केविलवाणी तोंड बघून मी शेवटी जड पावलांनी किचनकडे मोर्चा वळवला !


आमच्या लहानपणी बरं होतं , हॉटेलिंग म्हणजे उडपी हॉटेलात मसाला डोसा आणि आइस्क्रीम ! बास ... आम्ही त्यातच खुश ! नंतर नंतर मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन कधीतरी भेळ , पाणीपुरी किंवा ज्यूस . किती आनंद देणाऱ्या होत्या या गोष्टी ! आणि आता बघा ... साधं काय आणि कुठे खायचं यासाठी दोन तास गेले आणि शेवटी माझ्या आनंदाचा पार विचका झाला तो वेगळाच . उगीचच वाटायला लागलं की , आपला नवरा इतका हुशार का आहे आणि मुलं ? ती तर विचारूच नका ... काय काय माहिती असतं त्यांना ! पण काय करणार शेवटी स्वयंपाक हा मला करावाच लागला . मग मात्र , 'माझा स्वयंपाक होईपर्यंत कुठला मूव्ही बघायचा ते तरी ठरवा 'असा मी दमच दिला ! पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही . इतके चॅनल्स , त्यावर इतके मुव्हीज आणि परत आहेतच आपले गुगलबाबा ऑप्शन्स द्यायला तयारच ! शेवटी सगळेजण वैतागून गेले . 


मी विचार करायला लागले , खरंच परिस्थिती इतकी बदलली ? साध्या साध्या गोष्टींना इतके पर्याय उपलब्ध झालेत हे चांगलं की वाईट ? ही गोष्ट फक्त इथेच थांबत नाही तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला या पर्यायी गोष्टींमुळे निर्णय घ्यायला खूपच अवघड जातंय . शिक्षणपद्धतीत तर विचारूच नका इतके वेगवेगळे विषय आणि कोर्सेस उपलब्ध आहेत की नेहमी आपला निर्णय योग्य आहे की नाही ही चिंता भेडसावत राहते . काही वर्षांपूर्वी बर होतं आर्ट्स , कॉमर्स आणि सायन्स हे तीनच पर्याय आणि त्यातही हुशार मुल सायन्स घेणार , त्यापेक्षा थोडी कमी हुशार कॉमर्स आणि अगदी कमी हुशार मुलं आर्टस् असा क्लिअर फंडा होता . याउलट सध्या अशी परिस्थिती आहे की एकाचवेळी अनेक विषय शिकण्याची मुभा असते . त्यामुळे मुलांना आपल्या आवडीचे विषय शिकता येतात हे जरी खरं असलं तरी आपली निर्णय क्षमता आणि त्याबद्दलचा रिसर्च यावर बरच काही अवलंबून असतं . अमेरिकेत तर इतके शैक्षणिक विषयांचे पर्याय आहेत की वाटलं वाह किती छान ! आपला मुलगा एकाच वेळी इतके वेगळे विषय शिकू शकतो ... पण ते विषय निवडताना झालेली त्रेधातिरपीट आठवून अजूनही अंगावर काटा येतो आणि शेवटी एकच वर्षात इतके पर्याय म्हणजे एक ना धड , भाराभर चिंध्या हे ओघानेच आलं ... आणि इतकं मिळवल्यावरही तेच आपल्या क्षेत्रात सगळेच काम करतील असं आजकाल काहीच नसतं बरं का ? इंजिनिअर सुद्धा बँकेत नोकरी करतो आणि डॉक्टर्ससुद्धा आयटी क्षेत्रात काम करतात ..... अशा अनेक चांगल्या वाईट गोष्टी सध्या या ऑप्शन्स मुळे घडत आहेत .


अनेक पर्यायांमुळे आयुष्य जसं सुखकर झालं आहे , तसंच आपली निर्णयक्षमता खूपच बदलली आहे . यामुळे विचारशक्ती खूपच वाढली आहे , तर कधी कधी अती विचारामुळे चुकीचे निर्णय आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांचा अनुभवाचा पगडा आपल्यावर खूपच पडतो आहे .आपण काय खावे , कुठे खावे , फिरायला कुठे जावे यासारख्या साध्या गोष्टी सुद्धा आपण सहजतेने करणे जड जाते आहे .प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो त्यामुळे ' नक्की काय करावे ' या विचाराने अनेकदा महत्त्वाच्या गोष्टीत त्रेधातिरपीट उडते हे जरी खरं असलं तरी अनेक तऱ्हेने फायदाही होतो . त्यामुळे या ऑप्शन्सच्या रिअँक्शन्स खूपच वेगळ्या वेगळ्या आहेत .त्यामुळे सावध राहा आणि योग्य ऑप्शन निवडा ! चूक झाली तरी काही बिघडत नाही पुढेही एखादा ऑप्शन नक्कीच असेल !!


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy