Savita Tupe

Classics

3  

Savita Tupe

Classics

निष्पाप !

निष्पाप !

5 mins
363


   आज पुन्हा समीरचा फोन आला . मनात भीती दाटून आली . फोन उचलत नाही म्हणून मग फोन बंद झाल्यावर मेसेजची टोन वाजली . मेघाने फोन हातात घेवून मेसेज पाहिला .पुन्हा तेच ...

" फोन का नाही घेत मेघा ? प्लीज एकदा बोल माझ्यासोबत ! मी काही चुकीचे करायला नाही सांगत , दोघेही एकाच नावेचे प्रवासी आहोत . समदुःखी आहोत . काय हरकत आहे आपण आपलाच विचार केला तर ? शांतपणे विचार करून मला फोन कर .मी वाट पाहतो ."

  मेघा मेसेज पाहून घामाने डबडबली . योग्य अयोग्यच्या चक्रात अडकली होती . तिच्या नजरेसमोर भूतकाळ उभा राहिला .

   नवरा असून सुध्दा विधवेचे जिणे तिच्या नशिबी आले होते .दोन वर्षा पूर्वी लग्न झाले , पण नवऱ्याने कधी जवळ केले नाही. त्यांचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध होते. ते घरच्यांना मान्य नव्हते , म्हणून हिच्यासोबत बळजबरीने लग्न बंधनात अडकला . शहरात नोकरीनिमित्ताने राहायला जायचे नाटक करून मेघाला घेवून नगरवरून पुण्याला आला. रूम घेवून मेघाला एकटीला ठेवून तो पसार झाला ते कायमचाच .

  मेघा न माहेरी जावू शकली ना सासरी . थोडे दिवस वाट पाहून तिने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी एका शाळेत सहायकेची नोकरी पकडली . 

  खचून जाणं तिच्या स्वभावात नव्हतं . आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायला ती समर्थ होती . शाळेसोबतच दोन घरी पोळ्या लाटायाचे काम सुरू केले .सोबत बाकीचे छोटे मोठे कोर्स पण करत राहिली . एका वर्षात तिने तिचे छान प्रकारे बस्तान बसवले .

  महिन्याला घरभाडे आणि इतर खर्च भागवून ती थोडेफार शिलकीत पण राखून ठेवत होती.

    गावाकडून अधून मधून आई वडील , सासू सासरे येत असत आणि नवरा परत येईल ही खोटी आशा दाखवून तिला मात्र त्याच बंधनात अडकवून ठेवत होते .

  सुरवातीला होणारा त्रास हळूहळू जाणवेनासा झाला होता . एकटीच्या जगात ती स्वतः मध्ये खुश होती . आणि आता हे समीर प्रकरण तिचे मानसिक स्थैर्य हलवून टाकत होते .

   मेघा ज्या शाळेत जात होती , तिथे समीर शिक्षक म्हणून नुकताच रुजू झाला होता . तो अविवाहित होता .त्याला पहिल्याच भेटीत मेघा आवडली होती . हळूहळू ओळख झाली आणि मेघाचा भूतकाळ समजल्यावर मेघाबद्दल त्याला अजूनच आदरयुक्त आसक्ती निर्माण झाली . 

   मेघाबद्दल वाटणाऱ्या भावना त्याने दोनच दिवसापूर्वी तिला बोलून दाखवल्या आणि मेघा मनातून पूर्ण हादरली . दोन दिवसांपासून तिने स्वतः ला घरात कोंडून घेतले होते .ती बाहेरच पडली नाही .

   मेघाने कधीच हा विचार केला नव्हता की तिच्या आयुष्यात पुन्हा सुखाचा बहर बहरेल . स्वतःचं एकलकोंडी आयुष्य तिने स्वीकारलं होतं .  

  तिला फक्त जगणं माहित होतं , जगण्याचीही काही स्वप्न असतात याची तिला जाणीव नव्हती .  

    माहेरी गरिबी त्यामुळे सुखाची स्वप्न कधी पडलीच नाही . सासरी सगळं ठीक होतं पण नवऱ्याने स्वप्नांची दुनिया कधी दाखवलीच नाही . 

  जगण्यासाठी पोट भरायचे आणि पोटासाठी काम करायचे एवढेच तिला माहीत .

  समीरने मात्र तिला , त्याच्या भावना बोलून दाखवून , आयुष्यात अजून काहीतरी महत्वाचे असते याची तिला जाणीव करून दिली होती .  

   उज्वल आयुष्याचे स्वप्न बघायला प्रवृत्त केले होते आणि ह्या सगळ्याची काहीच अपेक्षा नसल्याने मेघा मात्र हबकून गेली होती .जे आहे ते चुकीचेच आहे असेच तिला वाटत होते .

   मेघाला काय करू कळत नव्हते. दिवसभर अंगावर पांघरून घेवून ती नुसतीच पडून होती .जेवण बनवले नाही की अंघोळीला सुध्दा उठली नाही . 

 तेवढ्यात परत फोनची रिंग वाजली . समीरचा फोन असेल म्हणून तिने घेतलाच नाही . रिंग वाजायची बंद झाली , पुन्हा एकदा परत फोन वाजू लागला .समीर एकदा नाही फोन उचलला तर परत करणारा नव्हता म्हणून मग तिने फोन पाहिला तर तिच्या वडिलांचा फोन होता . तिने पटकन फोन उचलला .

" का ग ? का उशीर केलास फोन घ्यायला ? आम्ही रिकामे नाही तुला सारखा सारखा फोन करायला ? थांब तूझ्या आई सोबत बोल ."

बाबांनी रागातच बोलून आईला फोन दिला .

"हा आई बोल ." ती जरा मलूल होत बोलली .

" काय ग ? असा का आवाज येतो आहे तुझा ? तब्येत तर ठिक आहे ना ? " आई काळजीने विचारत होती .

" काही नाही ग ? पडले होते जरावेळ ? तू बोल , का फोन केला ? " विषय जास्त न वाढवता तिने आईलाच सरळ प्रश्न विचारला .

 " अग आम्ही येणार आहे उद्या . तू घरी नसतेस ना , म्हणून म्हणलं तुला सांगावं ." आई म्हणाली .

" बरं , किती वाजता येणार आहे ? " मेघाने तिला विचारले .

 " अकरा वाजेर्यंत येतो . स्वयंपाक मी करेन आल्यावर . तू नको तक तक करत बसू .दुपारी सोबत जेवण करू मग तू आल्यावर .बर ठेवते आता . काळजी घे ." 

  मेघाला काही बोलू न देता आईने बोलून फोन ठेवला सुद्धा .

 मेघाला जरा हायसे वाटले .आईसोबत बोलता येईल या विषयावर म्हणून तिला जरा बरं वाटलं .

    दुसऱ्या दिवशी आई बाबा आल्यावर मग तिने आईला समीर प्रकरण सांगितले . आई जुन्या वळणाची . असं कसं होवू शकतं ? नवरा असताना बाईने पर पुरुषाचा विचार करणं सुध्दा पाप आहे .असेच बरच काही बोलत राहिली आई . मेघा शांत बसून ऐकत होती . बाबांनी पण ऐकलं सगळं पण ते मात्र शांत बसून कसल्यातरी विचारात गढून गेले होते . 

   मेघा तिथून उठून आत निघून गेली . बेड वर पडल्या पडल्या तिला मानसिक थकवा आल्याने पटकन झोप लागून गेली .

   मेघा जागी झाली तेव्हा साडे सहा झाले होते . पटकन उठून बाहेर आली . बाहेर आल्यावर तिने समीर आणि आई बाबांना बोलत बसलेले पाहिले तसे तिला आश्चर्याचा धक्काच बसला .ती जागेवरच स्तब्ध झाली. तिची चाहूल लागताच बाबांची नजर तिच्यावर पडली . ते तिला म्हणाले , 

" झोप छान झालेली दिसतेय . ये अशी समोर . कोण आले आहे बघ ."

   मेघाला कळेना समीर कसा काय आला इथे ?

 ती थोडी बिचकत बिचकत समीरकडे तिरप्या नजरेने बघत बाहेर आली .बाबा म्हणाले , 

" घाबरु नको , सांगतो सगळं , समीर ने आम्हाला फोन करून सगळं सांगितलं , आम्ही तूझ्या सासू सासऱ्यांना पण बोलावले आहे .येतील आजच ते सुध्दा ."

    " आम्ही सगळा विचार केला आहे .आमची काही हरकत नाही. आता प्रश्न आहे तो तूझ्या सासरच्यांचा .बघू आता ते काय म्हणताहेत ."

 बाबांचे शब्द तिच्या कानात घोळत राहिले .हे काय चाललय तिला काही कळेना . आईसोबत झालेले बोलणे आठवून तिचा अजूनच गोंधळ उडाला . आईने का नाही सांगितले समीर बद्दल ? ती आईकडे बघू लागली तशी आई म्हणाली ," अग मला पण हे आत्ताच कळते आहे , यातलं मलाही काहीच माहीत नव्हतं .

मला म्हणाले तुझ्याकडे जायचं आहे बस ! अजून काही सांगितलच नाही ." आई माझा संभ्रम बघून म्हणाली . 

    त्यांचे बोलणे होत आहे तोवर मेघाचे सासू सासरे पण आले . मेघा, तिची सासू आणि आई स्वयंपाकाला लागल्या . बाहेर पुरुष मंडळी बोलत बसले .

   बायकांना फक्त निर्णय ऐकायचा हक्क होता , सहभागी होण्याची परवानगी नव्हती .

   बरेच खलबत पार पडल्यावर सगळ्यांकडून समीरच्या प्रस्तावाला होकार मिळाला .

   सासर आणि माहेरच्या लोकांच्या संमत्तीने रीतसर घटस्फोट घेवून त्या दोघांच्या लग्नाला हिरवा सिग्नल मिळाला .

   स्वप्न म्हणजे काय ? हेच माहित नसलेल्या मेघा सारख्या एका निष्पाप जीव स्वप्नांच्या दुनियेची सैर घडवून आणायला समीर मनापासुन तयार झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics