निसर्गाचे मानवास पत्र
निसर्गाचे मानवास पत्र
निसर्गाचे मानवास पत्र
प्रेषक,
निसर्गराजा,
वसुंधरा नगर
दि. २६.०३.२०१९
प्रिय लेकरा मनुजा,
अनेक आशीर्वाद. विनंती विशेष
पत्रास कारण की, खूप दिवस झाले तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत.
खूप दिवसापासून वाटत होते, न सांगता तुला सर्व काही समजेल, तू थोडा तरी सुधारशील, पण नाही तुझे सुधारण्याचे काही चिन्ह दिसेना म्हणून हा पत्र प्रपंच.
तू मानव आहेस. विचार करण्याची शक्ती तुला भगवंताने दिली आहे. तू विचार केला पाहिजे, मला या भगवंताने काय काय दिले. का? कशासाठी ? हे सर्व दिले? न मागता दिले? सुखात जीवन जगावे म्हणूनच ना?
या निसर्गातून तुला काय नाही मिळत? ही रंगीबेरंगी फुले तुला प्रसन्न करण्यासाठीच ना? त्यातून मिळणारा सुगंध तो तुला खुश करू
न जातो. धष्टपुष्ट बनण्यासाठी तो फळे देतो. वेगवेगळ्या ऋतूत शरीराला मानवणारी फळे मीच देतो. वृक्षांपासून तुला सावली मिळते. नदीतून पाणी मिळते, ज्यामुळे तुझी शेती फुलते. पृथ्वी मधून खनिजे, रत्न मिळतात. वायू मधून प्राणवायू मिळतो. सूर्यापासून तेज मिळते, उष्मा मिळतो. आकाशापासून विशालता कळते.
परंतु मानवा, तू अतिशय कृतघ्न निघालास. निसर्गाच्या उपकाराला विसरलास. झाडे तोडून माझा समतोल बिघडून टाकतोस. आजच्या फायद्यासाठी उद्याचा विचार करायचे विसरलास. वृक्षवेली मुळे सुंदर दिसणारी सृष्टी कुरूप करतोयस. प्लास्टिकचा वापर करून पर्यावरणाचे चक्र बदलतोस.
मानवा, केवळ आणि केवळ तुझ्याच सुखासाठी हा निसर्ग सदैव तत्पर आहे. माझ्या चक्रात हस्तक्षेप करणे थांबवं. त्यातच तुझे सुख आहे.
तू सदैव सुखी रहावास, हीच प्रभूकडे प्रार्थना.
तुझाच हितेच्छुक
निसर्ग राजा
प्रति,
मानव
इहलोक
**********