Shobha Wagle

Romance

3  

Shobha Wagle

Romance

निःशब्द मी

निःशब्द मी

3 mins
232


सुनैना माझ्या मित्राची, सुरेशची बहीण, एवढीच तिची आणि माझी ओळख. सुरेश आणि मी एकाच कॉलेजमध्ये सायन्स थर्ड इयरला होतो.

दोघांना इंजिनियरिंग करायचे होते, पण सी.ई.टी.मध्ये मार खाल्ला आणि संधी हुकली. नाईलाजाने बी.एस्सी करावं लागलं होतं. मनाविरुध्द काम करत असल्याने त्यात मन लागत नव्हते. नोकरी धंदा करायचा तर शिक्षण आणि डिग्रीची गरज होती म्हणून नाईलाजाने शिकत होतो. कॉलेज लेक्चर्स संपल्यावर बऱ्याचवेळा मी सुरेशकडे जात होतो. तेथे कधीकधी कॅरम वगैरे खेळायला बसत असू आणि त्यामुळे सुरेशच्या घरचे मला आपलेच वाटायचे.


सुनैनाला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ती माझ्या मनात भरली होती. रंगाने गोरी, लांबलचक केस, नावाप्रमाणे नयन ही सुंदर व पाणीदार. कुणालाही आवडावी अशीच रुप गुणांनी छानच होती. ती दहावीच्या वर्गात शिकत होती. अभ्यासात हुशार होती. पण गणितातल्या काही शंका ती मला विचारायची. माझं गणितही बऱ्यापैकी होते. मी तिच्या शंकानिरसन करताना तिच्याकडेच जास्त आकर्षित होत होतो. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्याही ते लक्षात आलं असावं पण ती निर्विकार होती. शंका समाधान झाले की धन्यवाद देऊन आत पळायची.


सुरेश आणि मी फायनलच्या परिक्षेची जोराने तयारी करत होतो. त्यामुळे मी कधीकधी रात्री त्याच्याकडेच अभ्यासाकरता थांबत होतो. सुनैना जवळपास असताना माझं लक्ष अभ्यासात लागत नव्हते. माझी अवस्था मी कुणाशी बोलू शकत नव्हतो. मी सुनैनावर एकतर्फी प्रेम करत होतो. तिच्या मनी मात्र मी कुठेच नव्हतो. आपल्या दादाचा मित्र ह्याच दृष्टीने ती मला पाहत होती. मी मात्र तिच्यापायी ठार वेडा झालो होतो. पण माझं प्रेम मी व्यक्त करू शकत नव्हतो. ना तिच्यापाशी, ना सुरेशकडे. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. सुरेश डिस्टिंक्शनने पास झाला आणि त्याने पुढे बायोटेक्नॉलॉजी घेतलीे. माझी गाडी सेकंड क्लासवर थांबली व नाइलाजाने शिक्षकी क्षेत्रात जावे लागले. मला शिकवणीची आवड होतीच, त्यामुळे काही अडचण आली नाही. सुनैना आता बारावीला होती. तिचा अभ्यास जोरात चालला होता, आणि मी तिचा ट्यूटर, तिच्या शंका निवारण करण्यास तत्पर होतोच की!


आता सुरेश त्याच्या अभ्यासासाठी बाहेरगावी होता. माझं त्याच्याकडे आता जाणं कमीच झाले होते. तरी मी काहीबाही निमित्त काढून त्याच्या घरी जात होतो. सुनैनाने बारावीला माझ्या शिकवणीचा खूपच फायदा करून घेतला. मी मात्र वेड्या आशेने जिवाचे रान करून तिला शिकवत होतो. शेवटी तिची परीक्षा आली. केंद्रावर तिला ने-आण करायची जबाबदारी तिच्या आईवडिलांनी माझ्यावरच सोपवली होती, कारण तिचा नंबर लांबच्या ठिकाणी आला होता व माझी बाईक होती. मीही ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. मी भावी स्वप्ने पण पाहत होतो ना!


शेवटी तिची परीक्षा संपली. आता मला तिच्याशी माझे प्रेम व्यक्त करायला संधी मिळेल असं वाटलं. एक दिवस सुनैनाच मला म्हणाली, ती तिच्या मैत्रिणीबरोबर पिकनिकला जाणार तेव्हा स्टेशनवर मी तिला पोचवावे. एक लहानशी बॅग घेऊन, आईवडिलांच्या पाया पडून, ती माझ्यामागे बाईकवर बसली. मीही अतिशय आनंदाने तिची वरात घेऊन सुसाट बाईक स्टेशनवर आणली. खाली उतरली तशी सुनैना मला म्हणाली, "विनय, (मला ती नावानेच हाक मारत होती) काय सांगते ते नीट ऐक. मी पिकनिकला जात नाही तर माझ्या आवडत्या परेश नावाच्या मुलाबरोबर लग्न करायला जाते. आईबाबांना चार दिवस पत्ता लागू देऊ नको. चार दिवसांनंतर तू सांग त्यांना. परेश खूप श्रीमंत मुलगा आहे. मी सुखात असेन. पण परजातीय असल्याने आईबाबांना तो आवडणार नाही. पण मला तोच हवा. आईबाबांचा राग शांत झाल्यावर मी येईन, तुला कळवेनच. बाय", असं म्हणून समोरच असलेल्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडून ती आत बसली व माझ्या डोळ्यादेखत ती भरधाव निघुन गेली.


मी निःशब्द वेंधळ्यासारखा पाठमोऱ्या गाडीकडे पाहत कितीतरी वेळ स्तब्ध तेथेच उभा होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance