STORYMIRROR

Sharayu Nimbalkar

Classics

4.7  

Sharayu Nimbalkar

Classics

नात्यांची वीण

नात्यांची वीण

5 mins
45

              दिनकर राव आता थकले होते. रिटायर झाल्यापासून ते पूर्ण वेळ घरातच असत. त्यांची सून रमा शाळेत शिक्षिका होती तर मुलगा रमेश एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला होता.आणि छोटी चिऊ तिसरीला होती.सकाळी सहा ते सात मॉर्निंग वॉक झाल्यावर चहा,पूजा, नाश्ता,पेपर वाचन असं त्यांच सकाळच रुटीन होतं. रमा सगळा स्वयंपाक करून नऊ वाजता शाळेत जायची.तिच्या पाठोपाठ रमेश आणि चिऊ सुद्धा घराबाहेर पडायचे.दिवसभर दिनकरराव एकटेच घरी असायचे .थोडा वेळ टीव्ही बघणे, थोडा पेपर वाचणे,आणि दुपारची झोप यामध्ये त्यांचा दिवस निघून जायचा. रजनीताईंना जाऊन तीन वर्षे उलटून गेली होती. सुरुवातीला दिनकर रावांना रजनी ताईंची कमी खूप जाणवत होती, कारण सगळीकडे म्हणजे अगदी लग्न कार्य, बाजारहाट,अगदी काहीही खरेदी असेल किंवा कुणाकडे जायचं असेल तर रजनीताई आणि दिनकरराव अगदी एकमेकांच्या सोबत असत. एकमेकांच्या सोबतीची त्यांना खूप सवय झाली होती. त्यामुळे आता रजनी ताई गेल्यानंतर त्यांना खूप एकटे एकटे वाटू लागले होते.रमा आणि रमेश नि पण दिनकर रावांना सावरायला थोडा वेळ दिला.पण आता त्यांचा एकटेपणा अधिकच वाढू लागला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रमा आणि रमेश यांनीच दिनकर रावांचं दिवसाच रुटीन सेट करून दिलं होतं. त्यामुळेच, मॉर्निंग वॉकला जायला लागल्यापासून दिनकर रावांचा आणि त्यांच्या मित्रांचा एक छान ग्रुप तयार झाला होता.त्यामुळे ते थोडे आता मनमोकळे राहायला लागले होते. तसा त्यांना त्रास काहीच नव्हता पण वयोमानानुसार शुगर आणि बीपीचा त्रास मधूनच डोकं वर काढत होता. पण सून आणि मुलगा त्यांची अगदी मन लावून काळजी घेत असत. थोडक्यात काय आहे त्या रुटीनमध्ये घरातले सगळे अगदी कृत्रिम रित्या सेट झालेले होते.
               प्रत्येकाचे असे सेट झालेले दिवस हळूहळू पुढे पुढे सरकत होते. आणि अशातच रमेशच्या ऑफिस मधील सहकार्यांनी मिळून वन डे पिकनिक आणि ट्रेकिंग असा प्लॅन केला.अर्थात जायला अजून पंधरा दिवस अवकाश होता.दिनकर रावांना अपेक्षा होती की फॅमिली पिकनिक म्हणजे ते पण त्यांच्याबरोबर जाणार.पण रमेशने सांगितलं होतं पाऊस आणि दगदग या सगळ्यांचा बाबांना खूप त्रास होईल त्यामुळे त्यांनी घरीच थांबावे. आणि इथूनच दिनकर रावांच्या मनात परकेपणाचं दु:श्चित्र तयार व्हायला सुरुवात झाली.हळूहळू ते स्वतः स्वतःचा चहा करणे, कपड्यांना इस्त्री करणे असे प्रकार करू लागले.आता तर ते चिऊ शिवाय घरात जास्त कुणाशी बोलत पण नसत.रमाला ही गोष्ट लक्षात आली पण अजून दोन दिवस वाट बघून तिने ही गोष्ट रमेशच्या कानावर घातली . रमेश जे समजायचे ते समजला आणि फक्त गालात हसला.
                 बघता बघता पिकनिकचा दिवस उगवला. दिनकरराव त्या दिवशी जरा सकाळपासूनच नाराज होते.पण ते तसं कोणाला दाखवत नव्हते. रमा आणि चिऊ दिनकर रावांचा निरोप घ्यायला आल्या तेव्हा ते फक्त रामाकडे बघून हसले आणि म्हणाले, "सांभाळून जा बरं का ". आणि चिऊला तर अगदी पोटाशी धरले आणि एकटी फिरू नको,जास्त पावसात भिजू नको, जास्त मस्ती करू नको असे तिला समजून सांगू लागले आणि त्याबरोबरच निघताना तिचा गोड गोड पापा घेतला. पण रमेश बाय करायला आला तेव्हा फक्त त्यांनी ठीक आहे एवढेच म्हटलं. आणि आता रमेश पुन्हा एकदा गालात हसला आणि रमा व चिऊला घेऊन गाडीत बसला.दिनकर रावांनी सुद्धा घराच दार लावलं आणि रजनी ताईच्या फोटो जवळ आले आणि म्हणाले,"रमेश लहान असताना त्याला असा एकटं ठेवून आपण कुठेही फिरायला गेलो नाही, कुठेही जाताना आपल्या आधी त्याची तयारी आपण करायचो, तो हट्ट करेल तिथे आपण त्याला न्यायचो". एवढे बोलून दहा ते पंधरा मिनिटे दिनकर राव तिथेच फोटो जवळ बसून होते.आज त्यांना रजनी ताईंची प्रकर्षाने खूप आठवण येत होती.दिनकर रावांनी एक सुस्कारा सोडला आणि अंघोळीला गेले. अंघोळ झाल्यावर देवपूजेसाठी लागणार सगळं साहित्य काढून घेतलं आणि आता देव ताम्हणात काढतच होते, तोच रमाचा फोन आला,"हॅलो बाबा आम्ही पोहोचलो बर का, चिऊ तर नुसती धमाल करतीये आणि रमेश पण मित्रांमध्ये मस्त रमला आहे."तिथली सगळी मजा ती खूप उत्साहात सांगत होती.ती जवळजवळ दहा मिनिटे बोलत होती.सगळं इकडचं तिकडचं सांगून झालं आणि तिने फोन ठेवला.दिनकर रावांना खूप वाईट वाटलं, कारण बाबा तुम्ही कसे आहात? किंवा तुम्ही काही खाल्लं का?तुम्ही काय करताय?अशी साधी तिने चौकशी केली नव्हती. इतक्यात दारावरची बेल वाजली, "आता कोण आलं आहे?" असं थोडं चिडूनच ते बोलले आणि दार उघडायला गेले.कि होल मधून पाहिल्यावर त्यांना झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय दिसला. दिनकर रावांना जरा आश्चर्य वाटले.त्यांनी दार उघडले आणि बघतात तर काय,त्याच्या हातात एक खूप मोठे खाण्याचे पार्सल होते. अगदी सात-आठ जणांना पुरेल एवढ जेवणाचं पार्सल होतं . हे सगळं बघून दिनकर राव जरा वैतागलेच आणि म्हणाले , "मी काय दिवसभर खातच बसणार आहे का?" आणि रमेश ला जाब विचारण्यासाठी म्हणून त्यांनी फोन हातात घेतला ,पण तेवढ्यात त्यांच्या मॉर्निंग वॉकच्या मित्रांची सगळी गॅंग अचानक घरात घुसली.ते पण अगदी चित्र विचित्र कपड्यांमध्ये. दिनकरराव दोन मिनिटं अगदी शॉक झाले मित्रांकडे , कपड्यांकडे आणि त्या जेवणाकडे बघतच बसले. आणि तेवढ्यात रमेशचाच फोन आला. काय बाबा कसं वाटलं सरप्राईस? आज आम्ही तिथे नाही पण तुम्ही सगळे मित्र मिळून छान धमाल करा. तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं जेवण मागवला आहे. टीव्हीवर दोन-चार जुन्या मूव्हीज पण डाऊनलोड करून ठेवलेल्या आहेत आणि हो तुमच्यासाठी पण अगदी तुमच्या मित्रांसारखाच एक विचित्र असा ड्रेस तुमच्या कपाटात ठेवला आहे. दिनकर रावांना धक्क्यांवर धक्के बसत होते. नकळत त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.अचानक पुन्हा रमेशच्याच आवाजाने ते भानावर आले, "बाबा तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, ते म्हणजे जेवण झाल्यावर खाण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं गार गार आईसक्रीम. आणि हो तुमचा टपरीवाला चार वाजता येऊन तुम्हाला तुमच्या सर्वांचा स्पेशल असा जिंजर टी पण देणार आहे. रमेश जेवढे खुश होऊन सांगत होता तेवढेच खुश होऊन लहान मुलासारखा दिनकरराव ऐकत होते. हे सगळं रमाला माहिती होतं पण रमेश आणि रमानेच दिनकर रावांना हे सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. अचानक दिनकरराव रमेश ला म्हणाले, "रमेश सॉरी आणि थँक्यू बर का बाळा ".दिनकर रावांच्या या वाक्याचा अर्थ दिनकरराव आणि रमेश दोघांनाही उमगला होता.फोन ठेवताच दिनकरराव तेवढ्यात आनंदात बेडरूम मध्ये गेले,हो अगदी धावतच गेले आणि छान मित्रांसारखे चित्र विचित्र कपडे घालून तयार झाले.आज पुन्हा त्यांच्यातलं एक लहान मूल रमेश मुळे खूप खुश झालं होतं. दिनकर रावांनी सगळा दिवस मित्रांमध्ये खूप धमाल केली. मुव्हीज बघितल्या,आईस्क्रीमची, चहाची पार्टी केली आणि एवढेच काय तर अगदी गाणी लावून मनसोक्त सगळे नाचले सुद्धा. हे सगळं करत असताना आज दिनकर रावांनी मनसोक्त भरपूर फोटो सुद्धा काढले.आणि हे सगळे फोटो रमा आणि रमेश यांना तर पाठवलेच पण त्यांच्या सगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर सुद्धा पाठवले. आणि खाली कॅप्शन दिले, "माझ्या रमेशने माझ्यासाठी प्लॅन केलेली आणि कायम आठवणीत राहणारी वन डे पिकनिक ". खरं सांगू का जस आपण सणवार आले, की देव उजळवतो आणि मग ते अधिक तेज:पुंज आणि लख्ख दिसू लागतात,तसंच आपल्या नात्यांच सुद्धा असतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपलं नातं आपण उजळवलं तर या नात्यांची वीण सुद्धा अधिक घट्ट होते आणि कायम नव्यासारखी चकाकत रहाते.

 --शरयू निंबाळकर


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics