STORYMIRROR

Sharayu Nimbalkar

Classics

4.5  

Sharayu Nimbalkar

Classics

आजोबा (मनाचा एक हळवा कोपरा)

आजोबा (मनाचा एक हळवा कोपरा)

9 mins
50

               खूप दिवस झाले विनयाची खूप चिडचिड होत होती.नवरा विजय,मुलगा अथर्व, यांच्यावर ती सारखी चिडचिड करायची. "हे असंच का ठेवलं ते तसंच का ठेवलं". वास्तविक पाहता तिची चिडचिड होण्यामागे एकमेव कारण होतं,'ते म्हणजे तिचे सासरे '. हो तिचे सासरे म्हणजेच सदाशिवराव गेल्या सहा महिन्यांपासून शहरात यांच्याकडे रहायला आले होते. कारण त्यांचा मुलगा विजयचा आग्रह होता,"म्हणायचा बाबा आता तुमचं वय झालं आहे,असे गावी एकटे राहू नका, आमच्याजवळ शहरात या,इथे आपण सगळे एकत्र, एकाच घरात राहू आणि अथर्व पण तुमची खूप आठवण काढत असतो. विजयाच्या आग्रहा खातर सदाशिवराव शहरात आले. सुरुवातीचे काही दिवस अगदी छान आनंदात गेले. पण हळूहळू विनयाला त्यांचं घरात असणं बंधनासारखं वाटू लागलं. विनया सकाळी नऊ वाजता ऑफिसला जायची. त्यामुळे सगळी काम 9च्या आत उरकावी लागायची. आता तिला काम उरकताना त्यात आणखी एका माणसाची भर पडली होती. सदाशिवरावांना सकाळी सहा वाजता चहा लागायचा.दोन-तीन दिवस विनयाने चहा करून दिला देखील पण एक दिवस विनया सदाशिवरावांना चहा देत असताना अथर्व कडे बघून बोलली," अथर्व तू तुझं दूध का गरम करून घेत नाहीस, कारण मला एकटीला सगळ्यांच्या वेळा सांभाळणं आता शक्य नाही. " अथर्व आईकडे नुसतं बघत राहिला.पण सदाशिवरावांना सुनेच्या बोलण्याचा रोख समजला. त्यांना खूप वाईट वाटले. पण त्यांनी मनाशी विचार केला, "गावी असताना तर मी माझा चहा करायचो, आता इथेही करेन.सुनबाईची खरच धावपळ होते. त्यांनी त्यांच्या मनाची समजूत घातली.दुसऱ्या दिवशीपासून सदाशिवराव स्वतःचा चहा तर करायचेच पण त्याबरोबर अथर्वला दूध आणि विजय, विनयाची कॉफी सुद्धा करायचे. सदाशिवराव रोज सकाळी उठून सगळ्यांची कॉफी, दूध, चहा सगळं आवडीने करू लागले तरीसुद्धा विनयाची या न त्या कारणाने चिडचिड सुरूच होती. पण अथर्व मात्र आजोबा आल्यापासून खूप खुश होता.त्याचा अभ्यास घेणे,गोष्टी सांगणे, संध्याकाळी त्याला रामरक्षा शिकवणे हे सगळं आजोबा खूप मनापासून करायचे आणि अथर्व आजोबांची सोबत खूप एन्जॉय करत होता.विनया ऑफिसला गेली की, दुपारी अथर्व शाळेतून आल्यापासून आजोबांबरोबरच असायचा.त्यामुळे त्याला आजोबांचा आणि आजोबांना त्याचा खूप लळा लागला होता.अथर्व सतत आजोबांच्या मागे मागे असायचा. आता तर अथर्वच्या शाळेचा अभ्यास देखील वेळेत पूर्ण व्हायचा. आणि कधी नव्हे ते शाळेच्या पहिल्या unit test मध्ये त्याला छान मार्क्स मिळाले होते. त्यामुळे अथर्वच्या बाईंनी सुद्धा अथर्वचे खूप कौतुक केले होते. अथर्व खूप आनंदात होता. एक दिवस सकाळी सदाशिवरावांचा चहा पिऊन झाल्यावर ते पेपर वाचत बसले होते तेवढ्यात विजय जरा चिडूनच त्यांना बोलला, "बाबा तुम्ही दिवसभर घरीच बसलेले असतात आणि तुम्हाला काही कामही नसतं तेव्हा तुम्ही दुपारी पेपर वाचत जा." यावर सदाशिवरावांनी काही न बोलता हातातील पेपर बाजूला ठेवला आणि खोलीत जायला निघाले.तोच विजय पुन्हा बोलला, " आणि एक सांगू का बाबा तुम्हाला,रोज सकाळी चहा झाल्यावर तुम्ही जे टॉयलेट आणि बाथरूम अडवून ठेवतात ना त्यामुळे मला ऑफिसला जायला उशीर होतो. तुम्ही घरीच असतात ना मग तुम्ही तुमचं नंतर आवरत जा. "यावर सदाशिवराव पाण्यावलेल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या आवाजानी "ठीक आहे " एवढेच बोलले आणि खोलीत निघून गेले. हे सगळं विनया ऐकत होती आणि मनातून ती खूप खुश झाली,कारण आता तिच्या मनातील एक दुष्ट विचार पूर्ण होणार होता. एक दिवस विनया शेजारीच राहणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीकडे गेली. तिथे 'तिची मैत्रीण रेखा, तिची मुलगी मिनू आणि रेखाचा नवरा रमेश 'असे एवढेच राहत होते.घर एकदम स्वच्छ,आवरलेल,सुटसुटीत होतं विनयाला तर तिच्या घरात खूप छान वाटलं.विनयाने तिला डायरेक्ट म्हंटलच, " किती छान वाटते ग तुझ्या घरात! तुम्ही फक्त तिघंच कुणाचं बंधन नाही, कुणाचा धाक नाही.सगळं कसं मोकळं मोकळं छान वाटतं. तेवढ्यात रेखा म्हणाली, " नाही गं विनया, सासऱ्यांना जाऊन वर्ष झाले पण आम्हाला त्यांची एवढी सवय झाली होती ना.आता हे रिकामं घर अगदी खायला उठते. " यावर विनया कुच्चीतपणे म्हणाली, "खायला काय उठते,उलट आता स्वातंत्र्य उपभोगायचे दिवस आहेत तुझे, नाहीतर आमच्याकडे बघ." या बोलण्यावर रेखाला,विनया तिची मैत्रीण असून सुद्धा तिचा खूप राग आला आणि म्हणून तिने बोलणे आवरते घेतले. मिनू अथर्वची बेस्ट फ्रेंड आणि शेजारीच राहत असल्यामुळे सदाशिवराव कधीकधी मिनूच्या घरी सुद्धा यायचे म्हणजे रेखाला कुठे बाहेर जायचं असेल तर किंवा कधी कधी अथर्व बरोबर मेनूला सुद्धा शाळेतून ते आणायचे.एवढेच काय अथर्व सोबत मिनू चा देखील ते अभ्यास घ्यायचे.या सगळ्यांमुळे रेखा हे पूर्ण जाणून होती की खोट सदाशिवरांमध्ये नाही तर विनयाच्या स्वभावात आहे. आज तर विनयाने कहरच केला रात्री अथर्व झोपला आहे पाहून ती विजयला म्हणाली, " दोन-तीन दिवसांपूर्वी मी रेखाकडे गेले होते. किती छान वाटत होतं तिच्याकडे,सगळं कसं सुटसुटीत. अगदी तिघांचा सुखी कुटुंब म्हणावं ना तसं. विजय ऐकत होता कारण विनयाप्रमाणेच त्याला सुद्धा आता स्वतःच्याच वडिलांची अडचण व्हायला लागली होती. आणि विनयाने थेट विषयालाच हात घातला, " मी काय म्हणते विजय, दोन चौक सोडून जे वृद्धाश्रम आहे ना तिथे आपण बाबांना ठेवायचं का?,कारण आपण दिवसभर घरी नसतो त्यामुळे त्यांना घरात कंटाळा येतो आणि तिथे त्यांना सोबत करायला त्यांच्याच वयाचे भरपूर म्हातारे..... सॉरी म्हणजेच वयोवृद्ध लोक आहेत. त्यामुळे बाबांनाही तिथे छान करमेल आणि आपण त्यांना पैसे पाठवत जाऊच...... जमेल तसे.आणि तसेही अथर्वला बाबांचा खूपच लळा लागला आहे.पुढे त्याचा अभ्यास,त्याचं कॉलेज, त्याची प्रायव्हसी हे सगळं आपणच पाहिलं पाहिजे ना. विनयाने गोड गोड बोलून विजयला पटवलंच अर्थात विजयला पण हेच हवं होतं फक्त तो बोलून दाखवत नव्हता. पण हे सगळं डोळे मिटून अथर्व ऐकत होता.त्याला खूप रडायला येत होतं,पण आई-बाबांना दिसेल म्हणून तो शांत पडून राहिला.दुसऱ्या दिवशी शाळेत त्यांनी सगळं मिनूला सांगितलं. मिनुनी पण त्याला पाठच्या बहिणीसारखा समजवलं, "अथर्व आपण आपल्या आजोबांना कुठेच जाऊ द्यायचं नाही आपण काहीतरी करू". एवढे बोलून दोन्ही निरागस पोरं प्लॅनिंगला लागली. इकडे सकाळपासून सगळे चित्रचं बदललं.विनयाने सदाशिवराव उठायच्या त्यांचा चहा तयार ठेवला. विजयने त्यांच्या हातात पेपर आणून दिला आणि विनयाने चक्क त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला. सदाशिवरावांना सकाळपासून आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. कारण सून आणि मुलगा मधाहून गोड बोलायला लागले होते. पण विनया कालच रेखाकडे गेली हे त्यांना माहिती होते.आणि रेखाचा प्रेमळ, लाघवी स्वभाव ते जाणून होते. 'सदाशिवराव रेखाकडे गेले की बाबा-बाबा करून रेखा त्यांच्या मागे पुढे असायची आणि रमेश सुद्धा त्यांना वाचण्यासाठी निरनिराळे मासिक आणून द्यायचा. दोघांची पण वडिलांची कमतरता जणू सदाशिवराव भरून काढत होते. त्यामुळे सदाशिवरांचा असा समज झाला, की रेखा आणि रमेशनेच विनया ला समजवले असेल किंवा विनयाला स्वतःलाच काहीतरी जाणवले असेल आणि मग त्यांनी मनाशी विचार केला,"जे झालं ते चांगलं झालं ".याच आनंदात सदाशिवरावांचे आठ दिवस खूप छान गेले. आणि 5 ऑक्टोबर चा दिवस उगवला.हो याच दिवशी सदाशिवरांचा वाढदिवस असतो. विजयने त्यांच्यासाठी नवे कपडे आणले. विनयाने घरात गोड- धोड बनवले. सदाशिवरावांना औक्षण केले.आणि अचानक विनयाने विजयला डोळ्यांनी खुणावले.मग विजयने पण लगेच अथर्वला मिनू कडे खेळायला पाठवले. अथर्वला शंका आलीच पण पुढे काय करायचं हे त्याचं आणि मिनूच पक्क ठरलेलं होतं त्यामुळे तो गुपचूप मेनू कडे निघून गेला. विजय अचानक बाबांजवळ जाऊन बसला,त्यांचा हात हातात घेतला आणि अचानक त्यांना म्हणाला, "बाबा! तुम्हाला दिवसभर घरात कंटाळा येतो, करमत नाही. आणि खरं पाहिलं तर आपलं घर पण खूप छोटं आहे.त्यामुळे मी आणि विनयाने असं ठरवलं आहे की, आपल्या अगदी घराजवळच एक वृद्धाश्रम आहे तिथे तुम्हाला ठेवावे. एवढं ऐकताच सदाशिवरावांनी विजयच्या हातातील आपला हात काढून घेतला. पण तेवढ्यात विजय म्हणाला, "बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका.आपल्या घराजवळच असल्याने आम्ही तुम्हाला आठवड्याला भेटायला येऊ आणि पैसे देखील पाठवू. सदाशिवरावांच्या तर जणू पायाखालची जमीनच सरकली. ते विजयला मध्येच थांबवत म्हणाले, "विजय जास्त स्पष्टीकरण देऊ नकोस. आणि कंटाळा म्हणशील तर आपल्या घरात कसला आलाय रे कंटाळा. मी या घराला स्वतःचा घर समजत होतो. कारण मला आधीच कळले की,आपलं गावाकडचं घर तू सहा महिन्यांपूर्वीच माझ्या परवानगीशिवाय विकलेलं आहेस पण आपलाच मुलगा आहे असं समजून मी गप्प बसलो. पण विजय, एक सांगू,"तुझं घर छोटं म्हणण्यापेक्षा तुझं मन हे तुझ्या घरापेक्षाही छोटं आहे" आणि तूच म्हणालास ना, वृद्धाश्रम घराजवळ आहे,तेव्हा मला सोडायला येऊ नकोस, मी माझा जाईन.आणि हो भेटायला येण्याचे कष्ट देखील तू घेऊ नकोस ".एवढे बोलून सदाशिवरावांनी स्वतःचे कपडे घेतले,पायात चप्पल घातली आणि जाता जाता विजयला म्हणाले, " विजय देवाला एकच मागणं मागतो,'अथर्वच मन आणि अथर्व च घर हे दोन्ही सतत मोठं ठेव म्हणजे माझ्यावर आज जी वेळ आली, ती तुझ्यावर कधीच येणार नाही ".आणि ते चालायला लागले. विजयला वाईट वाटलं पण काही क्षणापुरतच विनया तर खूप खुश झाली होती आज रात्री ती शांत झोपणार होती . झोपण्यासाठी म्हणून ती अथर्वला शोधायला गेली.पण अथर्व तिच्या खोलीत नव्हता.तिने त्याला सगळीकडे शोधलं तर तो आजोबांच्या खोलीमध्ये त्यांच्या पलंगावर झोपला होता.तिने त्याला समजावलं की "आजोबांना आपल्याकडे इकडे शहरांमध्ये करमत नाही म्हणून ते कायमचे गावी निघून गेले आहेत". अथर्व खूप रडायला लागला.आजोबा त्याच्याजवळ नाहीत म्हणून नाही,तर आज आई त्याच्याशी खोटं बोलली होती म्हणून. दुसऱ्या दिवशीपासून अथर्व सतत मिनू कडे जायला लागला. अभ्यास,जेवण सगळे मेनू कडे करायचा. विनयाला जरा त्याच वागणं खटकायला लागलं म्हणून तिने रेखाला फोन केला तर यावर रेखा म्हणाली, "दोघे एकाच वयाचे आहेत ना त्यामुळे ते एकत्र अभ्यास करतात. त्याचा अभ्यास झाला की मी त्याला पाठवते. अथर्व पण आता खूप आनंदी असायचा मेनू कडे,पण घरात आलं की तो आई-बाबांशी खूप कमी बोलायचा. "आजोबा नसल्यामुळे अथर्व शांत शांत असेल होईल थोडे दिवसात सगळं ठीक" असा विचार विजय आणि विनयाने केला आणि ते शांत बसले. एक दिवस रात्री दहा वाजले तरी अथर्व घरी आला नाही.म्हणून विजय आणि विनया रेखाच्या घरी गेले आणि पाहतात तो काय! सदाशिवराव रेखाच्या घरी होते आणि ते अथर्व आणि मिनूला गोष्ट सांगत होते हे बघून विनया खूप भडकली, " बाबा तुम्ही इथे कसे काय?तुम्ही काय करताय इथे? तुमचे वृद्धाश्रमात आम्ही किती पैसे भरले आणि तुम्ही इकडे निघून आलात. " पण अचानक ती भानावर आली आणि म्हणाली, "नाही म्हणजे आपल्या घरी यायचं ना तुम्ही ". तिला मध्येच थांबवत रेखा म्हणाली," विनया वाईट अर्थ काढू नको पण आम्हाला घरात बाबांची आणि मिनूला आजोबांची गरज होती. गरज म्हणण्यापेक्षा आमचे बाबा गेल्यानंतर आमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती.पण अथर्वचे आजोबा आले आणि आम्हाला वाटायला लागलं की आमचे बाबाच परत आलेत आणि मिनू तर त्यांना एक मिनिटही सोडत नाही आणि अथर्वला पण आजोबांचं प्रेम मिळतंय " हे ऐकल्यावर विनया अथर्वला ओरडायला लागली, " आम्हाला का सांगितलं नाहीस,आमच्याशी तू खोटं बोललास, वगैरे वगैरे. पण मध्येच रमेश तिला बोलला, "वहिनी खरंतर अथर्व मुळेच आज आम्हाला नव्याने आमचे बाबा भेटले. अथर्वच आणि मिनूचचं हे सगळं प्लॅनिंग होतं. आणि तुम्ही वृद्धाश्रमात भरलेल्या पैशांचंच म्हणाल ना,तर ते अजूनही तिथेच डिपॉझिट आहेत. कारण अथर्व नऊवीत आहे, तो मोठा झालाय.त्याला सगळं समजते. त्याने 'विजय 'तुझ्यासाठीच ते पैसे तिथे ठेवायला सांगितले. म्हणजे आज तु जे पैसे भरले आहेत ते तुझे पैसे पुढे जाऊन तुझ्याच कामात येणार आहेत हो की नाही." एव्हाना विजय आणि विनयाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता. शरमेने दोघेही खाली मान घालून उभे होते.दोघांच्याही डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू येत होते. त्यांनी सदाशिवरावांची माफी मागितली आणि पुन्हा घरी येण्यासाठी विनंती केली. पण सदाशिवराव म्हणाले, " माझं आता कोणतही घर नाही.जे माझं घर होतं ते गावी होतं. आणि ते तू विकलस.आता मी निराधार आहे. बेघर आहे.या भल्या माणसांना आज माझी गरज आहे, मला घर नसताना यांनी आधार दिला.आता मी हे घर आणि ही माणसं सोडून कुठेही येणार नाही.हे ऐकून विजय आणि विनया बाबांच्या पायावर डोकं ठेवतात त्यांची खूप माफी मागतात आणि खरंच दोघांनाही खूप पश्चात्ताप झालेला असतो. तेवढ्यात रेखा मध्ये बोलते, "बाबा आमच्या नशिबात वडिलांचं जेवढं प्रेम होतं,तेवढं आमच्या बाबांकडून आणि आता तुमच्याकडून भरपूर मिळालं,आणि आता खरंच तुमच्या प्रेमाचे,तुमचा मुलगा आणि सून अधिकारी आहेत. हे घर तुमचच आहे, तुमच्या मुलीचं घर आहे. तुम्ही आपल्या घरी केव्हा पण, कधी पण, येऊ शकता पण आता खरोखर तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला मनापासून घरी न्यायला आले आहेत. सदाशिवराव रेखा जवळ गेले तिचे डोळे पुसले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला.तेवढ्यात रमेश म्हणाला,"बाबा आज स्वतः च्या आजोबांना आणि वडिलांना एकत्र आणण्याचं सगळ्यात मोठं काम हे अथर्वने म्हणजेच तुमच्या नातवाने केलं आहे. त्यामुळे आज तुमचा नातूच तुमच्या दोन पिढींमधील अंतर आणि गैरसमज दूर करणारा एक सगळ्यात मोठा धागा ठरलेला आहे." विजयने धावत जाऊन अथर्वला मिठीत घेतले आणि सदाशिवरावांनी विजयला. विनया,रमेश,रेखा हे सगळं दुरून बघत होते.सगळे मनापासून आनंदी झाले होते. कारण आज या तीन पिढ्या एकमेकांना खऱ्या अर्थाने भेटत होत्या.

 @---शरयू निंबाळकर


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics