STORYMIRROR

Sharayu Nimbalkar

Inspirational

4.5  

Sharayu Nimbalkar

Inspirational

आकाशी झेप घे रे पाखरा...

आकाशी झेप घे रे पाखरा...

7 mins
30

आकाशी झेप घे रे पाखरा....

        सकाळी लवकर उठून रमाने पिंकी आणि जय ची शाळेची सगळी तयारी करून दिली.त्यांचा डबा,बॉटल,नाष्टा अगदी सगळं आवरून दिल. गाडीची चावी घेता घेताच रवीला आवाज दिला, " अरे रवी उठ बरं! 7.30 वाजले. मग उशीर होईल आणि माझ्या मागे घाई करशील. तुझा चहा काढून ठेवला आहे आणि पाणी पण तापवून ठेवलं आहे. "एवढे बोलून रमाने गाडीला किक मारली आणि सुसाट निघाली मुलांना शाळेत सोडायला. गाडी चालवताना हात-पाय दोन्ही गाडीवर केंद्रित होते पण मनात मात्र पुढचं विचार चक्र सुरू झालं होतं."आता रवी गेला की त्याच्या पाठोपाठ निघते आणि पहिले बँकेचे काम बँकेचे काम करते, त्यानंतर किराणा सामानाची यादी देऊन येते कारण गणपती आता याच महिन्यात आहेत त्यामुळे जास्तीचे सामान भरावं लागणार आहे आणि हो अण्णांची अपॉइंटमेंट पण याच आठवड्यात घ्यावी लागेल." असे एक ना अनेक विचार रमाच्या डोक्यात सुरू होते . याच विचाराच्या तंद्रीत पिलांना गोड गोड पापा देऊन त्यांना गेटमध्ये सोडलं आणि निघाली. तेवढ्यात जेणे आवाज दिला, "आई! मी घरी आल्यावर कुठे जायचय लक्षात आहे ना? यावर रमा,"अरे हो रे सोन्या ".एवढेच म्हणाली. खरंतर ती पूर्णपणे विसरली होती की आज जय ला क्रिकेटचा क्लास लावायचा आहे आणि त्यासाठी चौकशीला जायचं होतं. आता तो बोलल्यावर तिला त्याची आठवण झाली होती. घड्याळ बघून तिने गाडीचा स्पीड वाढवला आणि घरी पोहोचली.
          इकडे रवीने ऑफिसची तयारी केली होती आणि रामाची नाश्त्यासाठी वाट बघत बसला होता.रमाचे सासरे म्हणजे अण्णा त्याला म्हणाले देखील," अरे नाश्ता तिने बनवून ठेवलाय तेवढा ताटात घे वाढून. " यावर रवी म्हणाला, " नको देईल ती आल्यावर, मी गेलो की काय काम असतं तिला. "रमाने चप्पल काढताना त्या दोघांचा हा संवाद ऐकला.तिला खूप वाईट वाटलं. तिने रवीला नाश्ता वाढून दिला, चहा दिला,अण्णांना चहा दिला आणि स्वतःचा चहाचा कप घेऊन ती डायनिंग टेबलवर येऊन बसली. चहाचा एक गोड घेत नाही, तेवढ्यात रवी म्हणाला," अग माझा रुमाल, माझा पाकीट कुठे आहे?दे बर काढून. यावर रमा म्हणाली, " एवढा चहा संपवते आणि लगेच देते. " 
          पण तेवढ्यात रवी म्हणाला, "अग मी गेल्यावर काय काम असतं, घरीच तर असते ,मग घे निवांत बसून चहा." रमाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.अण्णांना सुद्धा हे बोलणं खटकलं.पण रवीला बोलून दाखवण्यापेक्षा यावर कायमचा उपाय शोधावा असं त्यांनी ठरवलं.
        रवी गेल्यावर रमाने घरातील सगळी कामे उरकली, बँकेची कामे,वाणसामानाची यादी,जयच्या क्लासमध्ये सुद्धा चौकशी करून आली.एवढी कामे होईपर्यंत तिला घरी यायला दोन वाजले होते.अण्णा जेवण करून त्यांच्या रूम मध्ये आराम करत होते. रमाने कसंतरी ताट वाढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. तेवढ्यात तिला रवीचं सकाळचं बोलणं आठवलं आणि तिने ताट तसंच झाकून ठेवलं व ती बेडरूम मध्ये गेली. तिथे तिची नजर त्यांच्या दोघांच्या लग्नातल्या फोटोवर पडली.किती हौशीने रवीने हा फोटो फ्रेम करून घेतला होता! तो म्हणायचा, "हा फोटो सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा म्हणजे आपलं प्रेम पण या हास्यासारखं सतत ताजं राहील."
          रमा विचार करू लागली "काय झालंय असं,की ज्यामुळे रवी बदलला आहे आणि आपल्याला पण असं सगळं निरस वाटायला लागलं आहे." विचार करता करता ती स्वतःला आरशात बघू लागली. 
     " काम करताना मध्ये मध्ये येतात म्हणून वर बांधलेले केस, अंगातला गाऊन,चेहऱ्यावर तर चाळीशी उतरलीच होती पण केसांवर पण चाळीशीची पांढरी छटा डोकं काढत होती. "
      स्वतःला निरखून पाहताना तिला परवाचं पिंकी च वाक्य आठवलं, " आई त्या पूजाची आई, परवा इतकी छान दिसत होती ना!छान लिपस्टिक,छान जीन्स आम्ही सगळ्या मैत्रिणी तिच्या आईलाच बघत होतो. आई तू पण का नाही घालत अशी जीन्स? तू का नाही लावत लिपस्टिक?मग माझ्या सगळ्या मैत्रिणी तुझ्याकडे पण अशाच बघत राहतील ".
      पिंकीच्या या वाक्यावर," ए बाई मला नाही वेळ हे सगळं करायला ".एवढंच ती बोलली होती आणि पिंकीला गप्प केलं होतं."
       या विचारांच्या तंद्रितच रमाने कपाट उघडलं आणि न वापरणाऱ्या कपड्यांमध्ये ठेवलेली जीन्स तिने बाहेर काढली.त्यावर छान मॅचिंग असा टॉप काढला.सासरे दुरून तिची गंमत बघत होते आणि अचानक तिला मागून आवाज आला. 
        "सुनबाई निर्णय चांगला आहे.तू पुन्हा पहिल्यासारखी राहायला लाग.मला मान्य आहे 'ही' गेल्यानंतर तुझ्या एकटीवर घराची जबाबदारी पडली,पण यावर माझ्याकडे एक उपाय आहे."
           उपाय म्हटल्यावर रमाने अण्णांकडे एकदम चमकून पाहिलं.रमाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य आणि आनंद मिश्रित भाव अण्णांनी अचूक टिपले. अण्णा तिला म्हणाले, " आपल्या वॉचमन ची बहिण आहे ना आशा. ती गावाकडून येथे शहरात आली आहे. तिला कामाची खूप गरज आहे,गरीब आहे बिचारी,हे बघ रमा आपण आशाला मदतनीस म्हणून आपल्याकडे कामाला बोलवू. तुला तेवढेच कामात मदत होईल आणि तिलाही चार पैसे मिळतील. "
           रमाला खूप आनंद झाला. तिला आता तिच्या स्वतःसाठी पण वेळ मिळणार होता.लग्न,मुलं,संसार या जबाबदारीमध्ये तिच्या आवडी-निवडी,छंद, कलागुण यांना तिने मनाच्या एका कोपऱ्यात कुलपात बंदिस्त करून ठेवले होते.आता ती आनंदाने हे कुलूप उघडणार होती.आणि अचानक अण्णांनी तिच्या हातात एक बॉक्स दिला. तिला हा आश्चर्याचा दुसरा धक्का होता. तिने कुतुहालाने विचारलं, " अण्णा काय आहे हे? "यावर अण्णा एवढेच म्हणाले," तुझ्या मनाच्या कुलपाची चावी. हे बघ रमा मला मुलगी नाही पण तुला मी माझ्या मुली सारखंच मानतो मला मुलगी असती तर तिला पण मी अशीच एक चावी हातात दिली असती. " 
         रमाने घाईघाईने तो बॉक्स उघडला तर त्यामध्ये पेंटिंगचं सगळं सामान होतं. रमा खूप हौसेने ते सगळं बघत होती. तेवढ्यात अण्णांनी तिच्या पुढे एक वर्तमानपत्र आणून ठेवलं.
" हे काय अण्णा ?"...रमा 
"अग बघ तरी! मी ज्या दोन ओळी मार्क करून ठेवल्या आहेत ना त्या वाच." 
    रमा घाईघाईत ती सगळी माहिती वाचते आणि खूप आनंदाने अन आपुलकीने अण्णांकडे बघत असते. तेवढ्यात अण्णा म्हणतात, "चित्रकला स्पर्धेसाठी मी तुझं नाव या ठिकाणी नोंदवलेलं आहे', सुनबाई ! आता कसलाच विचार करू नको.ब्रश हातात घे, आणि जोमाने तयारीला लाग."
            रमाला तर खूप आनंद झाला.तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू रूपाने पाझरत होता.
            सकाळी मुलं आणि रवी घराबाहेर पडले की रमा चटचट सगळी काम उरकत होती आणि हो,आता आशा होतीच तिच्या मदतीला,त्यामुळे ती स्वतःची आवड आणि अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पदर खोचून कामाला लागली होती.या सगळ्यांमुळे रमाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. तिच्या वागण्यात,बोलण्यात आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. रमातील हा बदल अण्णांना तर खूप सुखावून जात होता पण रवीला देखील ही बदललेली रमा नव्याने आवडायला लागली होती. 
        आणि अखेर तो दिवस आला,ज्या दिवसाची रमा आणि अण्णा दोघेही आतुरतेने वाट बघत होते.
       हो,रमाच्या चित्राला २१००० रुपयांचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. संध्याकाळी सहा वाजता रमा,दोन्ही मुलं आणि अण्णा या समारंभासाठी जाणार होते.
           सकाळी अचानक रवीला अण्णांनी त्याच्या खोलीत बोलवलं आणि संध्याकाळी सहा वाजता गणेश क्रीडा मंचावर यायला सांगितलं.यावर रवी म्हणाला, " काय कार्यक्रम आहे? आणि जर माझं काम नसेल ना तर रमा, मुलं आणि तुम्ही जाऊन या.कारण माझी मिटींग आहे. " यावर अण्णा म्हणाले, " अरे खरं काम तर तुझच आहे. तू ये म्हणजे तुला सगळं समजेल,पण हो,आठवणीने ये बर का! तुझ्यासाठी एक गोड सरप्राईज आहे तिथे.आणि मग रवी पण आता सरप्राईज बघण्यासाठी आतुर झाला होता आणि काय सरप्राईज असेल या विचारातचं असतो बाहेर पडला. 
                संध्याकाळी सहा वाजता सगळे आपापल्या खुर्च्यांवर बसले.रमाला मात्र सगळ्यात पुढच्या रांगेत बसवलं होतं आणि कार्यक्रम सुरू झाला. जसा जसा कार्यक्रम पुढे सरकत होता,तसा रवीला कार्यक्रमाबद्दल थोडा अंदाज आला पण त्याची नजर रमाला शोधत होती. अखेर त्यानी अण्णांनाच विचारलं, "अहो अण्णा कार्यक्रम सुरू होऊन किती वेळ झालाय,पण रमा कुठे दिसत नाहीये कुठे आहे ती?"आता मात्र अण्णांनी न राहून रवीला सगळं सांगितलं. पण रवी मात्र एकदम शांत चेहऱ्यावर कसलाही भाव न आणता ऐकत होता.
 आणि एकदम स्टेज वरून आवाज आला," या स्पर्धेच्या पहिल्या पारितोषिकाच्या मानकरी आहेत,' रमा रविकांत देशमुख'.रमा शांततेने एक एक पाऊल टाकत स्टेज कडे जात होती जणू ती तिच्या ध्येयाकडे, स्वप्नांकडे आणि तिच्या अस्तित्वाकडे एक एक पाऊल टाकत होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिला प्रशस्तीपत्र आणि चेक देणार,तेवढ्यात रवी अचानक उठला आणि बोलला, " "थांबा" रमाला आता खूप भीती वाटायला लागली होती कारण, तिने हे सगळं रवीपासून लपवलं होतं आणि अण्णांना पण भीती वाटत होती कारण त्यांनी हे सगळं रवीला आधीच सांगितलं होतं. हे दोघेही विचार करेपर्यंत रवी स्टेजवर पोहोचला देखील आणि त्याने लगेच माईकचा ताबा घेतला.त्यांनी बोलायला सुरुवात केली,
 " रमा सगळ्यात पहिले तर मला माफ कर,कारण मी तुला सगळ्या बाबतीत गृहीत धरले. मीच तुझे पंख बांधले आणि मीच परत रुसलो,का? तर तू उडू शकत नाहीस म्हणून. मला तुझी कला माहीत असून पण मी तुला पाठिंबा दिला नाही.आज अण्णांनी तुला पाठिंबा दिला. ते तुझ्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच तुला पुन्हा तुझे पंख मिळाले. सतत घर,संसार,मुलं यांच्यामध्ये तू स्वतःला गुरफटून घेतलं होतं,सगळ्यांसाठी तू जगत होतीस पण स्वतःसाठी जगणं तू विसरली होतीस. पण अण्णांनी तुला तुझ्या कामासाठी प्रोत्साहन दिलं आणि तुझ्या सोन्याच्या पिंजऱ्याच्या कुलपाची चावी सुद्धा तुला दिली. आज तू त्यामुळेच ही उंच झेप घेऊ शकली. "
     हे सगळं ऐकताना रमाच्या आणि अण्णांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.रवीने पुढे जाऊन रमाचे अश्रू पुसले व म्हणाला, "रमा 'I am sorry.' खरंच मला माफ कर. मग प्रमुख पाहुण्यांना त्यानी विनंती केली, "साहेब जर तुमची काही हरकत नसेल तर मी माझ्या हाताने माझ्या रमाला हे पारितोषिक देऊ इच्छितो." प्रमुख पाहुण्यानी देखील हसून यावर मुक-संमती दर्शवली.आज रवीच्या हातून पारितोषिक स्वीकारताना रमाला आकाश ठेवणं झालं होतं.
     आज रवीने रमाच्या पंखांना उडण्यासाठी स्वतःच्या पंखांचा आधार दिला होता. रमा देखील आजपासून घर,संसार आणि संसाराच्या जबाबदाऱ्या कवेत घेऊन उंच आकाशात झेप घेणार होती कारण आज तिच्या पंखांना बळ देणारा साथीदार
तिच्यासोबत होता .अण्णा पण स्वतःच्या मुलीची उत्तुंग भरारी बघून आनंदाने तिला शुभाशीर्वाद देत होते.
       आणि अचानक कुठून तरी गाण्याचे सूर ऐकायला आले, "आकाशी झेप घे रे पाखरा,
   सोडी सोन्याचा पिंजरा."

© 2025 #शब्दगंध शरयू
 या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.
लेखकाच्या परवानगीशिवाय पुनर्प्रकाशन, सादरीकरण किंवा रूपांतर करता येणार नाही


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational