बळी
बळी
नवरा गणेश एका किराणामालाच्या दुकानात कामाला होता. सकाळी दुकान उघडण्यापासून ते रात्री साहेबांना घरी सोडेपर्यंत तो सतत साहेबांबरोबर असायचा. साहेबांचा पण त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, कारण ते त्याचे कष्ट, मेहनत आणि प्रामाणिकपणा जवळून बघत होते. गणेश ची बायको शारदा पण चार घरची धुणी भांडी करून संसाराला हातभार लावत होती. त्यांना एक मुलगी होती पूजा.जी नववीत होती आणि एक मुलगा होता दीपक जो पाचवीत होता. त्यांची दोन्ही मुलं अभ्यासात खूप हुशार होती. गणेश आणि शारदाची संसाराची गाडी कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर चांगलीच गती घेत होती. थोडे थोडे पैसे जमा करून गणेशने वस्तीतच पण स्वतःच घर देखील घेतलं होतं. सुखात दोघांचा संसार चालला होता. पण म्हणतात ना, प्रत्येक सुखाच्या चित्राला एक दुःखाची किनार असतेच. सगळं सुरळीत सुरू असताना गणेशचा चुलत भाऊ समीर नोकरी शोधण्यासाठी गणेशकडे राहायला आला. आता खाणारं एक तोंड वाढलं, त्यामुळे पुन्हा पैशाची चणचण भासायला सुरुवात झाली. कितीही कष्ट केले तरी पगार पुरत नव्हता. अशातच दैवाचा फेरा सुद्धा वाकडा पडला. शारदाच्या घराजवळ एक नवीन जोडपं राहायला आलं, चंदू आणि राणी. चंदू गवंडी काम करायचा तर राणी सोशल मीडियावर वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडिओ बनवून टाकायची आणि चंदूच्या दुप्पट पैसा कमवायची. आता पैसा घरात येतो म्हटल्यावर चंदूने आपली बायको कोणत्या गाण्यावर थिरकते, काय कपडे घालते याकडे फारसं लक्ष दिलं नाही. उलट तो तिच्या पैशावर खुश असायचा. तर अशा राणी बरोबर शारदाची काही दिवसातच छान घट्ट मैत्री झाली आणि शारदेला सुद्धा हळूहळू मोबाईल, रील, व्हिडिओ नाच गाणे याचे वेड लागले. मग हळूहळू तिने राणी कडून शूटिंग एडिटिंग सगळे शिकून घेतले. आता तिला पैशाचा शॉर्टकट दिसायला लागला. कमी कष्टात जास्त पैसे आणि शिवाय प्रसिद्धी हे चित्र तिच्या डोळ्यासमोर उभे राहू लागले .वेडेवाकडे हावभाव आणि चित्र विचित्र कपडे घातले की लोक कमेंट करतात आणि वाईट कंमेंट असल्या तरीसुद्धा त्याचे पैसे भरपूर मिळतात. हे शारदेच्या डोक्यात आता पक्क बसले होते. त्यामुळे मुले शाळेत गेल्यानंतर आता ती सुद्धा, साडीतच का होईना पण वेड्यावाकड्या नाचाचे शूटिंग करून त्याचे रील बनवू लागली. मदतीला तिचा दीर समीर होताच. एकदा असंच शारदा रील शूट करत असताना अचानक राणी तिथे आली.आणि राणीने शारदा जवळ जाऊन," तिची साडी थोडी खाली केली आणि पदर थोडा वर सरकवला "आणि म्हणाली, " बघ शारदे आता कसे तुझे व्ह्यूज वाढतात आणि बघ मग कसा बक्कळ पैसा मिळतोय ते." आणि काय आश्चर्य दोन दिवसातच शारदाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला.आता तर शारदा दिराच्या समिरच्या मदतीने असेच, आणि काही वेळा यापेक्षा पण कमी कपड्यात विचित्र हावभावात व्हिडिओ शूट करू लागली.कारण शारदाला आता यशाचं नवीन सूत्र सापडलं होतं. ही गोष्ट जेव्हा गणेशला कळली तेव्हा तो खूप चिडला, पण शारदा आणि समीरने गणेशला, मिळणाऱ्या पैशाची लालूच दाखवून गप्प केले. हे सगळं होत असताना समीर मात्र एकीकडे शारदेकडे खेचला जात होता.शारदेचे हावभाव, तिचे ठुमके, तिचे कपडे हे सगळे बघून समीर पूर्ण वेडा झाला होता. एक दोनदा तर त्याने शारदाशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न देखील केला.पण शारदाने त्याला ठाम नकार दिला.आणि पुन्हा असं केलं तर गणेशला सांगून तुझी रवानगी पुन्हा गावाकडे करीन अशी धमकी दिली. कारण काहिही झालं तरी शेवटी शारदा नवऱ्याशी आणि मुलांशी एकनिष्ठ होती. कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळत होते म्हणून ती या मार्गाला लागली होती पण त्या मार्गातले धोके तिला अजून ठाऊक नव्हते. ती विसरली होती की, तिच्या घरामध्ये एक तरुण दीर आहे.कोवळ्या वयात येणारी तिची मुलगी सुद्धा आहे. दिवसा मागून दिवस जात होते. समीरने सुद्धा सुधरण्याचं नाटक सुरू केलं. पण शारदा नाचत असताना मेकअप करत असताना मात्र आतल्या आत तो तडफडत होता. आणि.... आणि अशातच समीरला एक आयती संधी चालून आली. त्या दिवशी शारदा राणी बरोबर मेकअपचं काही सामान आणि कपडे घेण्यासाठी शहरात गेली होती. पूजा आणि दीपकची शाळा शनिवार असल्याने लवकर सुटली होती.आणि दीपक त्याच्या मित्रांच्या घरी खेळायला गेला होता. पूजा मात्र घरात अभ्यास करत बसली होती. आणि... अचानक समीर तिथे आला. अर्थात तो मुद्दाम दुपारी आला कारण त्याला माहिती होतं आज शारदा घरी नाहीये. तो घरात आला पण त्याचं मन आणि शरीर त्याला वेगळ्याच गोष्टीसाठी खुणावत होतं. त्याने पूजासाठी एक वेगळाच फास तयार करून ठेवला होता. रोज रोज पूजाच्या आईला शारदाला तोकड्या कपड्यांमध्ये नाचतांना बघून पूर्णपणे वेडा झाला होता.त्यामुळे आता शारदा नाही मिळाली तरी शारदाच्या मुलीकडून पूजाकडून स्वतःची इच्छा पूर्ण करून तो घेणार होता. कारण दोन महिन्यापासून त्यांनी स्वतःच्या मनाची आणि शरीराची तडफड थांबवून ठेवली होती. त्यामुळे स्वतःच्या शरीराला आणि मनाला आज शांत करायचं असं त्यांनी पक्क ठरवलं होतं. शिवाय पूजा सुद्धा आता तेरा वर्षाची होती त्यामुळे आता शारदा पेक्षा त्याला कोवळी पूजाच हवीहवीशी वाटायला लागली होती. तो हळूच पूजाच्या जवळ गेला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला म्हणाला, "पूजा बेटा उद्या तुझा वाढदिवस आहे ना. चल! आपण तुझ्यासाठी फ्रॉक घेऊन येऊ." पूजाला हे काही नवीन नव्हतं कारण तो तिचा काका होता. त्यामुळे तिला त्याच्यात काही विचित्र वाटलं नाही. ती सुद्धा त्याला म्हणाली, "नाही रे काका,कशाला? आत्ताच दिवाळीला आईने दोन फ्रॉक घेतलेले आहेत." पण तिचा समीर काका वेगळ्याच धुंदीत होता. तिला घराबाहेर न्यायचं म्हणजे न्यायचं हे त्यांनी पक्क ठरवलं होतं. तो परत तिच्याजवळ गेला तिला स्वतःच्या जवळ बसवलं आणि म्हणाला, " पूजा बाळा तुझ्या समीर काकाकडून नाही घेणार का तू ? मी तुझा काका आहे ना. " एवढे बोलल्यावर पूजा त्याच्याबरोबर जायला तयार झाली. तिला बिचारीला काय माहिती तिचा समीर काका रावणापेक्षा सुद्धा खालच्या पातळीचा कलियुगातला दानव आहे. समीर तिला,' माझ्या मित्राच्या दुकानात जाऊ'. असे सांगून गावाच्या बाहेर असलेल्या त्याच्या मित्राच्या खोलीवर घेऊन गेला.आत गेल्याबरोबर समीर व त्याच्या मित्राने लगेच दार लावून घेतले. आता पूजा घाबरली म्हणाली, "काका दार का लावलंस? आपल्याला तर दुकानात जायचं होतं ना." पण तेवढ्यात तिच्या लाडक्या समीर काकाची पाच बोटं पूजाच्या गालावर उमटली व त्याच्या मित्राने लगेच पूजाला खाली पाडले. समीर बोलू लागला, "तुझ्या आईला लय माज आलाय. माझ्याकडून तिने तिच्या घाणेरड्या गाण्यांचे, ठुमक्यांचे शूटिंग करून घेतलं. आता रोज रोज तिला असं पाहिल्यावर कोणत्याही सध्या, सज्जन माणसासारखी मागणी मी केली." पण.... तेवढ्यात त्याचा मित्र म्हणाला, "जाऊ दे यार, त्या बाई पेक्षा ही पोरगी भारी आहे." आता पूजा घाबरली. पण तिला न जुमानता, तिच्या समीर काकाने आणि त्याच्या मित्राने पूजावर पशुला पण लाज वाटेल इतके भयंकर अत्याचार केले. तो कोवळा जीव तडफडत होता. जोर जोरात किंचाळत होता.पण त्या बंद खोलीच्या बाहेर तिचा आवाज ऐकणारं आजूबाजूच्या झाडा-झुडपांशिवाय कोणीही नव्हतं. ती किंचाळत राहिली, तडफडत राहिली,ओरडत राहिली.पण तिचा समीर काका आणि काकाचा मित्र हे तिला काही केल्या सोडत नव्हते.या कोवळ्या जीवाला कुसकरल्यानंतर मात्र ते घाबरले. ही जर कुठे बोलली तर.... या भीतीने त्यांना काय करावे सुचत नव्हते. समीरचा मित्र म्हणाला, " सम्या आता काय करायचे हिनी जर कुठे तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाही. " तेवढ्यात समीरने शेजारी पडलेली कुऱ्हाड उचलली आणि म्हणाला, "ती कधीही तोंड उघडणार नाही. " त्या दोघांनी मिळून अतिशय क्रूरपणे तिला मारून टाकले व दूर एका गटारात फेकून दिले. मैत्रिणींनो, पुढच्या तपासात पोलीस समीरला आणि त्याच्या मित्राला पकडतीलंच आणि त्यांना शिक्षा सुद्धा होईल. पण तो कोवळा जीव परत येऊ शकणार नाही. ही कथा फक्त एका पूजाची नाहीये अशा अनेक पूजा आज या सोशल मीडियाच्या बळी ठरत आहेत. प्रसिद्धी आणि पैसे एकाला मिळतात पण त्याचा बळी मात्र दुसराच ठरतो.ज्या व्यक्तीला प्रसिद्धी आणि पैसे मिळतात ती व्यक्ती नशेत असते पण त्याची शिक्षा मात्र अशा पद्धतीने या कोवळ्या जीवांना भोगावी लागते. आज मोबाईल उघडला की कॉलेजच्या मुलींपेक्षा संसारी बायकाच गाण्यांवर,कमी कपड्यांमध्ये थिरकताना दिसतात.पैसा आणि प्रसिद्धीच्या नादाला लागलेल्या या बायका सुद्धा कोणाच्या तरी आई असतील, कोणाची बहीण, कोणाची काकू, कोणाची आत्या अशा अनेक नात्यांनी बांधलेल्या असतील. पण एकदा का प्रसिद्धीची आणि पैशाची नशा चढली की त्यामध्ये आपल्याला त्याचे धोके सुद्धा दिसत नाहीत. आणि मग या नशेच्या बळी पूजा सारख्या कोवळ्या पोरी होतात. निदान तुमच्या आमच्या या कोवळ्या लेकींसाठी तरी हे थांबायला हवं. नाहीतर याच लेकी पुढे म्हणतील, "आई असं मरण येण्यापेक्षा मला गर्भातच मारून टाक..... आई,मला गर्भातच मरून टाक. 😔😔😔
