गुरु माझा प्राणविसावा
गुरु माझा प्राणविसावा
मंजूचं लग्न म्हणजे प्रेम विवाह.सुरुवातीचे तीन वर्ष
एकदम आनंदात गेले.पुढे तीन वर्षानंतर त्यांच्या संसार वेलीवर एक फुल उमलले.त्या फुलाचं म्हणजेच मुलाचं नाव राजू असे ठेवले. या तिघांचा संसार स्वामींच्या आशीर्वादाने एकदम छान सुरू होता.पण म्हणतात ना कधी कधी नियतीची सुद्धा नजर लागतेच.मनीष ला अचानक मित्रांच्या संगतीत दारूच व्यसन लागलं.तो घरात येणारा सगळा पैसा दारू मध्ये उडवायला लागला.
घरात पैशाची वानवा असतानाच मंजुला पुन्हा एक गोड बातमी कळते. पण पैशाची चण चण आणि मनीषच रोज दारू पिऊन येणं,यामुळे ती फक्त येणारे दिवस आणि येणारे महिने ढकलत असते. पण काही दिवसांपासून अचानक मंजुला खूप थकवा जाणवायला लागतो, जेवण जाईनास होतं,सारखं सारखं पोटात दुखत असायचं. पण तिने या सगळ्यांकडे जरा दुर्लक्षच केलं.घरगुती औषध घेऊन ती वेळ मारून न्यायची. कारण घरात पैसा नव्हता. सतत दारू पिऊन येणाऱ्या मनीषला ती काही सांगू शकत नव्हती. त्यामुळे ती फक्त आलेली वेळ मारून न्यायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या तयारीला लागायची. हे सगळं सुरू असताना शेवटी व्हायचं तेच झालं.अचानक मंजुला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या.आता मात्र मंजूच्या डोळ्यापुढे अंधारी आली, कारण तिला स्वतःला काय झालं आहे याचा थोडा अंदाज आला होता. पुढे वाढून ठेवलेल्या आजाराचा खर्च आणि लहान राजू यामुळे ती पूर्ण गडबडून गेली होती.आणि आज तर राजू एकटाच घरात होता रक्ताची उलटी बघून तो घाबरून गेला. शेजारच्याच बिल्डिंगमध्ये त्याचे बाबा काम करत होते त्यांना तो धावत धावत बोलवायला गेला. त्याचे बाबा पण लगेच धावत आले आणि मंजुला दवाखान्यात घेऊन गेले कारण मंजुला आठवा महिना सुरू झाला होता. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या सगळे रिपोर्ट्स मागवले. मनीष पण डॉक्टर काय सांगतात याचीच वाट बघत होता. डॉक्टरांनी मनीष ला केबिनमध्ये बोलवलं आणि म्हणाले, "मनीष मी काय सांगतो आहे याकडे व्यवस्थित लक्ष दे. तुला येणाऱ्या परिस्थितीला धीराने सामोरे जायला हवे". मनीष पण कानात प्राण आणून डॉक्टर काय सांगतात हे ऐकू लागला. डॉक्टर म्हणाले,"हे बघ मनीष मला माहितीये डिलिव्हरी व्हायला अजून एक महिना आहे आणि बाळाची वाढ पण छान आहे पण........."
डॉक्टर बोलता बोलता एकदम थांबले. मनीष म्हणाला, "डॉक्टर पण काय,तुमचा चेहरा चिंतेत का दिसतोय. डॉक्टर म्हणाले," मंजुला कॅन्सर झाला आहे आणि आता तो दुसऱ्या स्टेजपर्यंत पोहोचला आहे". हे ऐकताच मनीष च्या पायाखालची जमीन सरकली डोळ्यापुढे राजू, मंजू आणि अंधार एवढच त्याला दिसत होतं.तो मटकन शेजारच्या खुर्चीवर बसला. त्याच्या डोळ्यातून मंजू आणि नवा जीव यांची काळजी अश्रुंच्या रूपाने पाझरत होती. डॉक्टर मनीष जवळ गेले आणि त्याला धीर देत बोलले,"आपल्याला सिझेरियन करावे लागेल आणि मंजुचं कॅन्सरचं परत एक दुसरं ऑपरेशन करावे लागेल.दोन्ही ऑपरेशन करण्यात थोडी रिस्क आहे पण मनीष धीर सोडू नकोस अजूनही उशीर झालेला नाही, मंजू आणि बाळ दोघेही सुखरूप राहतील माझ्यावर विश्वास ठेव".पण मनीष शून्यात नजर लावून अश्रू ढाळत बसला होता आणि अचानक म्हणाला, " डॉक्टर नवा अंकुर पूर्ण होण्याआधीच दैव त्याला, अहो त्यालाच काय त्याच्या आईला सुद्धा आमच्यापासून हिरावून न्यायला दारात येऊन थांबलय मी कसा धीर धरू. डॉक्टर म्हणाले "मनीष बी पॉझिटिव्ह एवढे ऑपरेशन केले की मंजू आणि बाळ दोघेही सुखरूप तुझ्या घरी येतील. हे ऐकताच मनीष ला एक आशेचा किरण दिसला.डॉक्टर पुन्हा बोलू लागले," मनीष या दोन्ही ऑपरेशनला खर्च खूप आहे ".डॉक्टरांची फीज आणि ऑपरेशनचा खर्च दोन्ही मिळून साधारण 5 लाखाच्या घरात जाईल,कारण या ऑपरेशन साठी येणारे डॉक्टर हे अमेरिकेहून येणार आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर गोडबोले.' मनीष डॉक्टरांना,"करतो काहीतरी सोय" एवढेच सांगून राजूचा हात धरून बाहेर पडतो. चालताना त्याच्या मनात असंख्य विचार रुंजी घालत होते. पैशाची सोय कशी करावी? इथ पासून ते देव आणि दैव या दोघांना शिव्या. हे सगळे एकाच वेळी त्याच्या मनात टाहो फोडत होतं. आणि अचानक त्याच्या मनात एक विचार चमकला तो तरा तरा घरी आला आणि कपाट उघडून कपाटातून एका डबीत मंजुच जे सोन्याचा मंगळसूत्र ठेवलं होतं ते काढलं.कारण हे मंगळसूत्र विकून काहीतरी पैसे आले असते हा त्याचा विचार.पण अचानक त्याचं लक्ष कपाटात ठेवलेल्या स्वामींच्या फोटोकडे गेल. तो स्वामींना वगैरे अजिबात मानत नव्हता.त्याला मंजुने केलेलं पण आवडायचं नाही.त्यांनी रागारागात तो फोटो हातात घेतला आणि त्या फोटोकडे पाहून बोलू लागला," मला माहितीये मला आवडत नाही म्हणून तिने तुम्हाला मुद्दाम कपाटात ठेवलं आणि चोरून लपून ती तुमचा जप करत होती, तुम्हाला बघत होती, तुमची भक्ती करत होती. आता तुम्ही जर खरे असाल आणि मंजूची सेवा जर 10% जरी तुमच्या पर्यंत पोहोचली असेल तर या आजारातून मंजुला आणि तिच्या नवीन जीवाला सुखरूप बाहेर काढा.", कारण तिने माझा विरोध असताना सुद्धा तुम्हाला या घरात आणि स्वतः च्या मनात कायम स्थान दिल. तिनं तुम्हाला वडील मानलं. आता तुमच्या मुलीचं आयुष्य तुमच्या हातात आहे.एवढे बोलल्यावर मनीष फोटो छातीला कवटाळून रडू लागतो.
दोघेही बापलेक रात्री जेवण करतात आणि मंजुचा डबा घेऊन दवाखान्यात जातात खूप दिवसांनी आज पहिल्यांदा मनीषने दारूला स्पर्श केलेला नसतो.
चार वर्षाच्या राजूला एवढच कळतं की आईला बरं करायचं असेल तर ऑपरेशन करावे लागेल आणि त्यासाठी खूप पैसा लागेल. याच विचारामुळे राजू खूप शांत शांत राहू लागला होता. आणि अचानक त्याला रस्त्यावर एक गरीब मुलगी सिग्नलला एक कार साफ करून देत असताना दिसते आणि त्या बदल्यात कार मधील मनुष्य त्या मुलीला पैसे देतो. हे देखील राजूला दिसते. हे बघून राजू खुदकन हसतो कारण त्याला पण पैसा जमवण्याचा नवा मार्ग मिळालेला असतो. तो सुद्धा घरातून एक कापड आणतो आणि सिग्नल वर उभा राहतो त्याच्याजवळ अचानक एक गाडी येऊन थांबते. त्या गाडीत एक म्हातारा सदगृहस्थ बसलेला असतो.राजू त्यांची गाडी पुसून देतो आणि पैसे घ्यायला हात पुढे करतो. तो सद्गृहस्त पण कौतुकाने राजूच्या हातात 50 रु ची नोट देतो. पण राजू लगेच त्याला सांगतो, "आजोबा मला 50 नकोय मला फक्त 5 द्या, कारण माझ्या आईला आणि आमच्या पिल्लूला घरी आणायचं असेल तर डॉक्टर काकांना फक्त 5 लाखच पाहिजेत एवढे 50 नकोत". ते आजोबा गालातच हसतात. त्या मुलाचं नाव विचारतात.आणि त्याला सांगतात "बाळा तू निश्चिंत जा तुझ्या आईचा ऑपरेशन उद्याच होईल आणि तुझी आई आणि तुमचं बाळ सुखरूप तुझ्या घरी येईल "श्री स्वामी समर्थ".राजू पण हातातील पैशाकडे खूप आनंदाने बघत असतो आणि त्या आजोबांना thank you म्हणायला वर बघतो तर तिथे कुठलीही गाडी नसते आणि आजोबा पण नसतात. राजू त्यांना आजूबाजूला शोधतो पण ते कुठेच दिसत नाही.
इकडे मनीष ला रात्री अचानक हॉस्पिटल मधून फोन येतो. तुमची पैशाची व्यवस्था झाली आहे. उद्या ऑपरेशन
आहे.मनीषला आश्चर्य वाटते.रात्री धावतच तो मंजूकडे जातो पण मंजुला सुद्धा यातील काही माहिती नसते.ऑपरेशनचा दिवस उजाडतो. मंजुला ऑपरेशन थेटर मध्ये नेले जाते. तिच्या पाठोपाठ डॉक्टर गोडबोले जात असतात. पण अचानक राजू ओरडतो,"बाबा त्या डॉक्टरांच्या मागे ते आजोबा आहेत ना, बघा आत जातायेत ते,त्यांनीच मला सांगितलं की तुझ्या आईचा ऑपरेशन उद्या होईल ".पण तिथे डॉक्टरांच्या मागे कुणालाच कोणीही दिसत नाही,त्यामुळे राजू लहान आहे असं समजून सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.ऑपरेशन सुरू होते. मनीष कॅश काऊंटरला जाऊन पैसे कोणी दिले याची चौकशी करतो. पण तिथे फक्त 5 लाख जमा झाल्याची नोंद असते आणि सहीची जागा रिकामीच असते. विचार करतच मनीष ऑपरेशन थेटर समोर येऊन बसतो. तब्बल चार तासांनी डॉक्टर बाहेर येतात आणि दोन्ही ऑपरेशन सक्सेसफुल झाल्याचं सांगतात. मनीष धावतच डॉक्टरांच्या मागे केबिनमध्ये जातो.त्या पाठोपाठ राजूही धावत जातो. मनीष पैसे भरल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानतो पण डॉक्टर गोडबोले म्हणतात,"मी काहीच पैसे भरले नाहीत".तेवढ्यात डॉक्टरांच लक्ष शेजारी उभे असलेल्या छोट्या राजू कडे जाते, ते राजूला चॉकलेट देण्यासाठी खिशात हात घालतात आणि चॉकलेट काढता काढता एक फोटो अचानक खाली पडतो. राजू धावत जाऊन तो फोटो उचलतो आणि जोरजोरात ओरडायला लागतो,"बाबा काल याच आजोबांनी मला सांगितलं होतं उद्या आईचा ऑपरेशन छान होईल आणि हेच तर आजोबा डॉक्टर काकांबरोबर आईचं ऑपरेशन करायला आत मध्ये गेले होते". मनीष हे सगळं एकून रडायला लागतो,कारण त्याला मंजूच्या कपाटातील स्वामींच्या फोटो बरोबर झालेलं बोलणं आठवतं.त्याची सहज नजर डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर पण पाणावलेल्या डोळ्यांनी स्वामींचा फोटो हातात घेऊन उभे असतात.मनीष धावतच मंजूच्या रूममध्ये जातो पण तिथे कोणीच त्याला दिसत नाही. मंजू शांत झोपलेली असते आणि त्यांचं बाळ तिथे शेजारच्या एनआयसीयू मध्ये काही दिवसांसाठी काचेच्या पेटीत ठेवलेलं असत.तो मंजू जवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तेव्हा त्याला मंजूच्या उशीजवळ एक स्वामींचा फोटो दिसतो आणि मंजूच्या कपाळाला विभूती लावलेली दिसते. तो पाणावलेल्या डोळ्यांनीच फोटो हातात घेतो आणि कपाळाला लावतो,कारण आज या स्वामीमाऊलीने खरंच तिच्या मुलीचे प्राण वाचवले असतात.
नकळत मनीषच्या तोंडून बाहेर पडते.....
//श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ //
//श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ//.
धन्यवाद
शब्दगंध शरयू
