माझी पाककला
माझी पाककला
माझी पाककला....
एकदा नवऱ्याचं आणि माझं जरा वाजलंच. जरा वाजलं म्हणजे आवाज शेजारच्या घरातील नवऱ्याच्या मित्राला ऐकायला गेला इतक्या जोरात वाजलं. काही नाही हो! विषय खूपच थुकरट होता. काय तर म्हणे, "रोज रोज त्याच त्याच भाज्या करत असते. शेजारी डोकावून बघ जरा, माझ्या मित्राची बायको किती छान स्वयंपाक करते, ताट भरून वाढते."
आता मला सांगा, कोणत्याही साध्या, बिचाऱ्या, भोळ्या बायकोला स्वाभिमान वगैरे काही आहे की नाही? म्हणून मग माझ्या मनात दडलेली इच्छा पूर्ण करण्याचं मी पक्क ठरवलं. खूप दिवस झाले डोकं, तोंड, आणि घर सगळं कसं शांत शांत होतं. आणि या आमच्या शांत-सुखी कुटुंबाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मग मी आपला थोडा आवाज चढवला. माझ्या या भांडणात स्वतःचा कुठलाही स्वार्थ नव्हता. मी फक्त एवढेच म्हटलं, "जा शेजारी, रोज तिकडेच जा जेवायला."
मग आता यात पण मी आपला एवढाच विचार केला की जेवता जेवता दोन्ही मित्रांच्या तेवढ्याच गप्पा होतील, नाही का! पण आमचे 'हे' असले भडकले या वाक्यावर, काय सांगू तुम्हाला! मग काही विचारू नका. त्यांनी वरुणास्त्र सोडलं की मी अग्निबाण मारून ते पाडायचे. आणि मी वाकस्त्र सोडलं की ते नयनास्त्राने मला गप्प करायचे. पण आज मी शांत बसणार नव्हते कारण मी पण रामायण-महाभारत कोळूनच प्यायली होती.
तेवढ्यात मित्रत्वाचं नातं जपायला त्यांचा मित्र दारात हजर झाला. आणि तो तर सरळ म्हणाला, "अहो वहिनी, जरा शांत व्हा." अरे हे काय! पण तो शेवटी मित्राचीच बाजू घेणार, मलाच शांत राहायला सांगणार ना. पण त्याच्या पाठोपाठ त्याची बायको, म्हणजेच माझी जीवश्च-कंठश्च मैत्रीण, माझी बाजू घ्यायला लगेच धावत आली. तिने तर कंबरच कसली होती. म्हणाली, "आज तू शांत बसायचं नाही बरं का! या पुरुषांचा अहंकार आपण ठेचून टाकायचा."
मग काय, वाघा बॉर्डरवर आमचं तुंबळ युद्ध सुरू झालं. पण तुमच्या कानात एक गोष्ट सांगू का? कुणाला सांगू नका बरं का! माझी मैत्रीण पण माझ्या निमित्ताने स्वतःच्या नवऱ्यावर चांगलाच हात धुवून घेत होती. अर्धा तास भांडण सुरू होतं. माझी तर विचारशक्ती आणि शब्दसंपदा हार मानायला लागली होती.
पण देवाने ज्याच्यासोबत 'भांडण्यासाठी' नाही हो 'नांदण्यासाठी' गाठ बांधली होती ना, त्याला तर शेजारची आल्याबरोबर चांगलाचं चेव चढला होता. अहो! माझा घसा तर फार सुकून गेला होता. सुकलेल्या घशाला जरा ओला करावा म्हणून फक्त दोन घोट घ्यायला जरा बसले — आहो, पाण्याचा घोट! तुम्हाला काय वाटलं? तशी मी नाही बरं का!
हा तर फक्त दोन मिनिटं शांत बसले, तर माझी मैत्रीण पचकलीच, "उद्यापासून भाऊजींच्या नाकावर टिचून चांगला साग्रसंगीत स्वयंपाक कर आणि दाखवून दे तुझ्या अंगातली कला."
झालं! याच एका कलेच्या तर मी कले-कलेने घेत होते. पण आता झाला की नाही प्रॉब्लेम! आणि आता माझी दीड-शहाणी मैत्रीण अजून काही बोलायच्या आत, मी तिच्या हातात चहाचा कप टेकवला. शेवटी चहा घेऊनच दोघेही — नवरा बायको — घराच्या बाहेर पडले. पण जाताना माझी मैत्रीण बोललीच, "काय ग, दूध कमी होतं का? चहा अगदीच पांचट केला आहेस." मी तिच्याकडे जरा रागीट कटाक्ष टाकला, तेव्हा कुठे ती पटापट घराच्या बाहेर गेली.
ती गेल्यानंतर नवरोबा काही झालंच नाही या अविर्भावात टीव्ही बघत बसले. आणि मी बिचारी संध्याकाळच्या माझ्या पाककलेच्या तयारीला लागले.
पोळ्या तर झाल्या कशाबशा. खरं सांगू का? माझ्या पोळ्या एकदम हॉटेलसारख्या असतात — छान पक्क्या, शेकलेल्या. अगदी हॉटेलच्या रोटी सारख्या पोळ्या होतात माझ्या. हो, त्या फक्त गरम गरम खाव्या लागतात, इतकंच. अहो! दुसऱ्याला गरम-गरम मिळावं म्हणून हा माझा सगळा खटाटोप, बाकी काही नाही.
आता स्वयंपाक करायला फ्रीज उघडला तर भरीताची सुरकुतलेली दोन वांगी माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली, "आम्ही पूर्ण सुकण्याच्या आत, कर बाई आमचं काहीतरी." मग त्यांना पहिले मी हातात उचलून घेतलं. तर ती वांगी पण बाकीच्या भाज्यांना अंगठा दाखवत टुकटुक करत चिडवत होती. मुळ्याने तर मानच टाकली होती. म्हटलं, बापरे! हा तर मरणासन्न अवस्थेत आहे. हा वर जाण्याच्या आत याला आपणच मुक्त करूया. म्हणून त्याला कोशिंबिरीसाठी पहिले बाहेर काढले.
थोडं वाकून फ्रीजमध्ये पाहिलं, तर हळूच सोललेल्या मटारचा एक डबा माझ्याकडे आशेने डोकावून बघत होता. त्यालाही घेतलं आणि म्हटलं, चला आता याचा मस्त मटारचा गरम गरम भात करावा.
आणि अरेच्चा! मला एकदम आठवलं — मागच्या आठवड्यात वड्यांसाठी अळू आणला होता. लहानपणी आईला एकदा वड्या करताना पाहिलं होतं, तेच मला आठवलं. त्या आठवणीच्या जोरावरच मी अळू विकत घेतला आणि अळूवडी करण्याचं ठरवलं.
खरं सांगू का? माझा माझ्या स्मरणशक्तीवर पूर्ण विश्वास आहे. YouTube च्या रेसिपींचं काही खरं नसतं. आपल्या मनाला पटेल ना तेच आपण करावं. आपल्याला विचारस्वातंत्र्य तर आहेच आहे, पण ते अमलात आणण्याचं पण स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्यामुळे मी सगळ्या रेसिपी माझ्या मनाने, मला वाटेल तशा बनवत असते. या सगळ्या रेसिपीज मी माझ्या स्वतःच्या स्वतः इन्व्हेंट केलेल्या असतात.
आणि खरं सांगू का? माझ्या नवऱ्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे ना, कोणताही पदार्थ तो एकदा ताटात वाढला की परत मागत नाही. अहो, आवडतो त्याला! पण मला खायला मिळावं एवढाच त्याचा सुज्ञ विचार त्यामागे असतो.
तर आजच्या मेनूचं रफ वर्क माझ्या डोक्यात पूर्ण तयार झालं होतं — अळूवडी, भरीत, मुळ्याची कोशिंबीर, मटार भात आणि पोळ्या. आणि हो, काहीतरी गोड म्हणून सुधारस करावा असं माझ्या डोक्यात आलं. आता तुम्हाला म्हणून सांगते — "सुधारस" म्हणजे परवा जे गुलाबजाम आणले होते ना, त्याचाच पाक राहिला होता. त्यातच मी थोडंसं लिंबू पिळणार आहे. आता लगेच नवऱ्याच्या कानात सांगायला जाऊ नका.
पाच वाजता स्वयंपाकाला लागले आणि नवऱ्याला ताकीद दिली — आवाज दिल्याशिवाय स्वयंपाकघरात फिरकायचं नाही. तो पण आपला खुश होऊन, बायको काय करते याकडे त्याचे डोळे, मन आणि पोट लावून बसला होता.
आणि अखेर तो अनमोल क्षण आला! सगळ्या पदार्थांनी भरलेलं ताट मी वाढलं आणि नवऱ्याला आवाज दिला, "चला जेवायला." तर म्हणतो कसा, "तू पण बस माझ्याबरोबर." पण मी स्पष्ट शब्दात सांगितलं, "आधी आज तूच जेवायचं." बायको लाडात आलीये म्हटल्यावर तो पण लगेच पाटावर जेवायला जाऊन बसला.
पहिला भाताचा घास त्यांनी ताटाच्या बाजूला जमिनीला अर्पण केला. तेव्हा का कोण जाणे, ती जमीन माझ्याकडे रागात बघत असल्याचा भास मला झाला. हो, पण जाऊ द्या! माझा माझ्या पाककलेवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे निश्चिंत होऊन मी आग्रह करायला नवऱ्याच्या बाजूला जाऊन बसले. नवऱ्याला विचारलं, "कसं झालंय सगळं?" तर म्हणाला, "तू आपली पोळी-भाजीच कर." मग मी जरा रागात पाहिल्यावर म्हणतो कसा, "नाही ग! तुला खूपच कष्ट पडतात. आता पुन्हा तू हे असले कष्ट घेऊच नकोस. मला बटाट्याची भाजी-पोळी केली तरी चालेल. पण एवढा साग्र-संगीत स्वयंपाक आता पुन्हा बाई, मला तू करून खाऊ घालू नको."
किती प्रेमळ आहे ना माझा नवरा! उगाच मी दुपारी भांडले त्याच्याशी. पण अहो, त्याने फक्त सुधारस — म्हणजे पाक-पोळीच खाल्ली. कारण विचारलं तर म्हणतो कसा, "तोंड आलं आहे म्हणून भरीत तिखट लागते आहे, पोट दुखतंय म्हणून मुळा नको, आणि पोट सुटते आहे म्हणून भात नको."
आता अळूवडीचं म्हणाल, तर मी त्याला चार वाढल्या होत्या. चार अळूवड्या वाढून मी पाणी आणायला आत गेले, तर येईपर्यंत चारही वड्या संपल्या पण होत्या. आता या वड्या त्यांनी इतक्या पटकन कशा संपवल्या, हे तर कोडंच आहे!
अशा पद्धतीने माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यापेक्षा पण माझा नवरा खूप चांगला, हे सिद्ध झालं. आता उद्यापासून पुन्हा मी त्याच्या आवडीची बटाट्याची भाजी आणि पोळीच करणार. हो... तोच म्हणाला होता ना की, "तू काही माझ्यासाठी कष्ट घेऊ नको. फक्त भाजी-पोळीच कर." किती काळजी आहे ना त्याला माझी! आता मी पण त्याचं मन जपलं पाहिजे ना.
जर तो म्हणतो आहे एवढ्या आग्रहाने — बटाट्याची भाजी पोळी कर — तर मग मी पण त्याचं ऐकलं पाहिजे ना.
आणि अशा पद्धतीने माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण मिटलं.
"या कथेचा माझ्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. जर तुम्हाला तो वाटला, तर हा निव्वळ योगायोग समजावा."
😄😄🤪🤪
— शरयू निंबाळकर
