चैत्रगौर
चैत्रगौर
आज सकाळी चार चा गजर लावला आणि गजर झाल्याबरोबर ती उठली देखील कारण आज चैत्रागौरीला डाळ पण आणि पुरणाचा नैवेद्य करण्याचा सासूबाईंचा आदेश होता. पिल्लू च्या अंगावर सादर घालून ती कामाला लागली. सगळ उरकता उरकता साडेआठ कधी वाजले कळलेच नाही आज वेळेत गेले नाही तर संध्याकाळच्या हळदीकुंकवाला तिला एक तास अगोदर सुट्टी देखील मिळणार नव्हती. चहा करण्यासाठी भांड घेतल पण घड्याळ पुढे पळत होतं तसच भांड तिने पुन्हा जागेवर ठेवल आणि आवरावर करायला गेली. दहा मिनिटात सगळे आवरून घरातून निघावे असा विचार ती करत असतानाच पिल्लू उठल्याची चाहूल तिला लागली. त्या मागोमाग सासूबाईंचा आवाजही आला, " आता ही उठलीच आहे तर तिच आवर आणि मगच ऑफिसला जा, कारण माझं काही ती ऐकत नाही". झालं, वेणी न घालताच नुसतं रबर लावलं, साडी वर खोचली आणि पिल्लूला घेऊन बाथरूम मध्ये केली. खरंतर पिल्लूला आज आईबरोबर पाणी खेळायचं होतं पण कादंबरीचा नाईलाज होता. संडेला बागेत जाऊ या बोलीवर पिल्लू ने पण पटपट आवरलं. रोज पिल्लूला असं सोडून जाताना तिच्या डोळ्यात पाणी येत असे. पण आज जरा जास्तच वाईट वाटत होतं, कारण कुणालला आज तिची धावपळ होणारे माहीत असून सुद्धा त्याने तोंडावरून पांघरून देखील काढलं नव्हतं, तिच्याकडे बघितलं सुद्धा नव्हतं. ती भरल्या डोळ्यांनीच घराच्या बाहेर पडली. नऊची बस तर केव्हाच निघून गेली होती आता रिक्षा करण्यापलीकडे तिला पर्याय नव्हता. ती रिक्षाला हात करणार तोच कुणाल ची आत्ये बहिण स्मिता तिच्यासमोर गाडी घेऊन थांबली. कादंबरीला जरा आश्चर्यच वाटलं पण थोडा त्रागापण झाला कारण आता हिच्याशी बोलण्यात दहा मिनिट तरी जाणार होते. आणि आता तिला बॉसचा चेहरा सुद्धा दिसू लागला होता,पण स्मिताने थेट तिच्यासमोर गाडीच दारच उघडलं ही पण विचार न करता पटकन गाडीत बसली. पण आत बसल्यावर तिला जरा ओशाळ्याल्या सारखं झालं. तशी स्मिता एकदम मन मिळावू होती. कादंबरी बरोबर अगदी मैत्रिणीसारखी रहात होती. दोघींच्या छान गप्पा सुरू झाल्या आणि अचानक स्मिताने तिच्या समोर टिफिन उघडला कादंबरीला जरा आश्चर्य वाटलं, " तिला कसं माहित माझा उपास आहे ते". पण रात्री घाई गडबड ती साबुदाणा भिजवायला विसरली होती आणि पुरणाचा साग्र-संगीत स्वयंपाक करता करता तिला भगर करायला काय, साधं दूध प्यायला सुद्धा वेळ नव्हता, त्यामुळे जास्त विचार न करता तिने स्मिताच्या डब्यातील थोडी खिचडी खाल्ली पण तिच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळायला सुरुवात झाली होती आणि अचानक ती म्हणाली, "बघ ना स्मिता आज मी चैत्रगौरीचा सगळा नैवेद्य बनवून आले पण काही खाल्लं की नाही मला साधं कोणी विचारलं सुद्धा नाही". स्मिता फक्त थोडी गालात हसली.
बोलता बोलता स्मिताने तिला वेळेत ऑफिसला पोहोचवलं होतं. स्मिताचे आभार मानून तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली. जागेवर जाताच कामाची लिस्ट तिच्यापर्यंत पोहोचली होती आणि ही काम संध्याकाळी सहा पर्यंत संपतील अशी आशा सुद्धा नव्हती. ती मनातून खूप नाराज झाली कारण बॉसने पाच वाजता मीटिंग पण ठेवली होती. काम उरकता उरकता दोन कधी वाजले कळलेच नाही आता पोटात पण भुकेची चाहूल लागायला लागली, पण सकाळच्या घाईत हिने डब्याकडे पार दुर्लक्ष केलं होतं ती तशीच उपाशी पुन्हा कामाला लागली. अचानक शिपाई दादा हातात एक दोन पुडी डबा घेऊन आले आणि सांगितलं,"वाटाणे मॅडमनी आज सगळ्यांना खिचडी आणि काकडीची कोशिंबिरीची पार्टी दिली आहे ".कादंबरीने पण काम आणि भूक या दोन्ही गोष्टी काकूळतीला आल्याने पटकन खायला सुरुवात केली. खाताना खिचडीची चव मात्र जरा ओळखीची वाटली पण इतक्यात तिचं लक्ष घड्याळाकडे गेल. घड्याळ्यात चार वाजले होते कादंबरीने फोन हातात घेतला कारण तिला सासूबाईंना सांगायचे होते आज उशीर होणार आहे फोनच्या स्क्रीनवर असलेला कुणाल आणि पिल्लू चा फोटो बघून हिला पुन्हा भरून आलं. आज त्याने साधे तिला खाल्लं का असं विचारलं सुद्धा नव्हतं किंवा साधा दिवसभरात त्याचा फोन पण आला नव्हता. आणि अचानक मीटिंग कॅन्सल झाल्याचा बॉसचा मेसेज तिला दिसला.आणि केबिनच्या बाहेर जातात तिला कळालं की आज सगळ्यांनाच लवकर सोडल आहे, कारण बॉसला सुद्धा बाहेर जायचं होतं. हिच्या खुशीला तर आता पारावार राहिला नव्हता,कारण आज तिला तिच्या पिल्लू बरोबर वेळ घालवता येणार होता. याच विचारात ती बसमध्ये चढली आणि आता तिला घराची काम दिसू लागली, कारण थोडं फार तरी फराळाचं करायचं होतं. सासूबाईंना बाहेरचे पदार्थ नैवेद्याला आवडत नाहीत हे तिला चांगलं माहिती होतं. त्याबरोबर डाळ पन्ह करायचं होतं,पुन्हा गौर सजवायची होती,कामाची यादी काही संपेना आता तिला खूप टेन्शन आलं बस मधून उतरून ती घाईतच चालू लागली. लिफ्टची वाट न बघता जिन्यांनीच धावत वर चढू लागली. घाईतच दार वाजवलं कुणालने दार उघडलं हिला कुणालला घरात बघून जरा आश्चर्यच वाटलं पण सासूबाईंना टीव्ही बघताना बघून मात्र थोडं वाईट वाटलं. कारण तिला एकटीने सगळी काम करायची होती. ती फ्रेश होऊन किचनमध्ये गेली आणि पाहते तर काय सासूबाईंनी गरम गरम चहाचा कप तिच्या हातात दिला, आणि कुणाल लाडू वळत बसला होता. तिथेच एका ताटामध्ये चकली, शेव तयार होते. कैरीची डाळ-पन्ह सगळं तयार होतं. कादंबरी सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली कारण आज या गौरीला खऱ्या अर्थाने तिची माणसं कळाली होती. तिला रडताना बघून स्मिता पण बेडरूम मधून बाहेर आली आणि तिला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. कारण ही घरातून बाहेर पडण्यापूर्वीच कुणालने स्मिताला फोन केला होता,आणि सासूबाईंनी सुद्धा स्वतः बनवलेल्या खिचडीचा डबा तयार ठेवला होता. आज कादंबरी खऱ्या अर्थाने तिच्या माणसांना भेटत होती. आणि अचानक आठवलं वाटणे बाईंचा डबा घाई घाईत तिने पर्समध्येच ठेवला होता. तिने तो डबा काढला आणि अचानक त्या डब्यावरच कोरलेलं नाव तिने वाचलं, "कुणाल दिलीप कुलकर्णी "आणि तिला डब्यातील सासूबाईंच्या हातच्या खिचडीची चव आठवली आज घरची चैत्रगौर मनापासून सुखावली होती.
------शरयू निंबाळकर
