मनीच्या कानी भाग - १
मनीच्या कानी भाग - १
काय आहे ना , तू मराठी वाचत नाहीस आणि माझे इंग्लिश पल्लेदार नाही . म्हणून तुला ऑडीओ पाठवतेय. कानगोष्टी म्हणतात मराठीत.
तू इंग्लंड ला गेल्यापासून मनातलं लगेच कोणाशी बोलायचं असा प्रश्न पडायला लागला. किती बोलायचो ना आपण. अजूनही बोलतो म्हणा पण स्काईप वर त्या त्या वेळी मेलं आठवतच नाही पटकन . तुला नुसतं बघतच रहावसे वाटत . वाणी आणि डोळे एकत्र काम करायला नकार देतात . कधी सेंटी झाले तर तू disturb होशील असं वाटत . म्हणून हा लेखश्राव्य (दृक्श्राव्य चा चुलतभाऊ ) प्रपंच.
१.
हाय मनी ,
या क्षणाची रंगीत तालीम केलेली होती . एक दिवस तू परदेशी जाणार हे ठरलेलेच होत . पण एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडते ना तेव्हाच ती खरी वाटायला लागते. तुला सोडून परत निघताना धाय धाय रडले. आपले आतड, आपला जीव इथेच ठेवून परत जातेय की काय असं वाटलं. इतका विचारपूर्वक घेतलेला निर्णय चुकतोय असं वाटायला लागल . मी जगातली दुष्ट आई आहे किवा मूर्ख आई आहे असं पण वाटून गेलं. खर तर खात्री होती तुझ्या निर्णयाची , तुझ्यातल्या आत्मविश्वासाची . पण त्या क्षणी मी फक्त एक वेडी, स्वार्थी आई होते. जिला तिच्या बाळाच्या विरहा शिवाय दुसरी जाणीवच शिल्लक उरली नव्हती. परतीचा प्रवास फारच वाईट झाला दोघांचाही. एक सेकंद डोळ्याला डोळा लागला नाही .माझं काहीतरी हरवलं होत. माझी मनी माझ्यापासून दूर नेली होती कुणी. तुझ्याशिवाय जगायचं आहे हे माहित होते पण मन आता मात्र असहकार पुकारत होत.
आपलं नातंच मुळी मजेशीर . कधी मी अगदी खरीखुरी आई, शिस्तप्रिय , कठोर, घारीसारखी लांबून तीक्ष्ण नजर ठेवणारी , तर कधी आपण दोघी शॉपिंग पासून खिदळण्यापर्यंत घट्ट मैत्रिणी. तुझ्या मैत्रिणीना पण नवल वाटत ना आपल्या नात्याचं? नाती कशी असतात ना मनू, फुल्लीगोळ्यासारखी आपणच ती खेळत जातो. किती घरे बनवायची आपल्याच हातात असतात. कधी सरळ रेषेत बनतात घरे तर कधी नाही. पण नाही बनली मनासारखी तर परत परत खेळता आल पाहिजे. मग लागतं जमायला.कोणीसे म्हटलंय की आई मुलाचं नाळेच नाते असते. खरय ते. एक अनुबंध असतोच पण ते नाते सुद्धा नंतर फुलत जात, सहवासाने, जबाबदारीने, प्रेमाच्या देवाण घेवाणीने. उलट सुलट टाके विणले जातात,ताण बसतो, कधी पोत बिघडतो, कधी रंग मनासारखे उतरत नाहीत पण तेव्हाच ते चुकलेले टाके उसवून परत वीण तपासली ना तर छान कापड विणल जात. मनासारखं. कदाचित या सगळ्या गोष्टीनी मनात फेर धरला होता. तुझा सहवास असणार नाही म्हणून तू मला आता दुरावशील वगैरे मनात यायला लागलं. त्यात भौगोलिक अंतर, सांस्कृतिक तफावत, काळजी असं सगळ मिश्रण झालं . आणि पूर येईपर्यंत रडले. पण हळू हळू सावरले. रोज तुला प्रत्यक्ष भेटून आणि बोलून तर मधलं अंतरच उरलं नाही. आणि शाळेत असताना, निरनिराळे सिद्धांत मांडून आम्हाला छळणाऱ्या तमाम शास्त्रज्ञ जमातीला मी साष्टांग दंडवत घातलं . नाहीतर इतक्या दुरून कशी ऐकू आणि पाहू शकले असते मी तुला?
नीट रहा. थंडी पासून सांभाळ. उशीर करू नकोस परत यायला. खा व्यवस्थित. अशा एकशे साठ सूचना .. नाही देत आहे. घाबरलीस ना? कसं फसवलं? सी यू . बाय .
लव .
ममा