मंदाची साहस कथा..
मंदाची साहस कथा..


दिवसभराचा प्रवास समाप्ती करण्यासाठी सूर्यनारायण आता परतीच्या मार्गाने निघाला होता. दिवसभर त्याने केलेली पायपीट आठवून जणू तो शीणल्यागत वाटत होता आणि म्हणून की काय कोण जाणे जाता जाता पुन्हा या जगाच्या पाठीवर तो रागाने लालबुंद होत होता. पण आताच्या रागात तितकी तीव्रता नव्हतीच म्हणून त्याचा तांबुस तपकिरी रंग एक वेगळेपणा त्या मावळतीच्या रंगाची उधळण करत आहे असे वाटत होते.
"अय आक्का, चल की घराकडे", सात वर्षाच्या छोट्या गोविंदाने आपल्या आक्काला लाडाने आणि अंधारांची भीती वाटते म्हणून जरा काळजीच्या स्वरात विनवणी केली.
गोविंद आपल्या मोठ्या बहिणीला आक्का म्हणायचा.
तिचे नाव मंदा होते. मंदाने आता तारुण्याचा अल्लड उंबरठा ओलांडला होता. नुकतीच तिने सोळा वर्षे पार केली आणि तिच्या नाजूक वेलीपरीस शरीराला आता सुबक असा आखिव रेखीव आकार येत होता. दिवसेंदिवस ती कोणी कुशल कारागिराने एखाद्या पाषाणात कोरलेली सौंदर्याची मूर्ती वाटत होती. आतापर्यंत उनाडपणे वाऱ्याच्या वेगाने या बांधावरून त्या बांधावर सैराटपणे धाव घेणारी तिची पावले हल्ली यौवनाच्या भाराने जरा सावकाश पडत होती. उभ्या मोहरीच्या रानात जर ती उभी राहिली तर तिच्याच कांतीचा पिवळापणा पसरला जणू असा भास पाहणाऱ्यास होई.
अशी ही मंदा यौवनाच्या पहिल्याच पायरीवर यौवन सम्राज्ञी म्हणून मिरवून घेत होती. पण तिच्या किंवा गोविंदाच्या कुणाच्या कल्पनेच्या पल्याड असे आजच्या सांजेला तिच्या सोबती घडणार आहे असे त्या दृष्ट नियतिशिवाय कुणालाच कळले नसावे. "जरा थांब रे गोविंद्या, ही इतकी सरपणाची मोळी बांधून घेते मग निघू आपण घराकडे." मंदाने शेजारील फसाटीतूंनि काही लाकडे जमवत जमवत छोट्या गोविंदची मनधरणी केली. इतक्यात बांधावर धुरा
चा मारा करत आणि आपल्या वेगळ्या आवाजात एक फटफटी येऊन थांबली.
फटफटीवर एक तिशीतला आणि दुसरा पस्तीशीतला असे दोन गब्बर तरुण होते. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या प्रसरण पावल्या होत्या. ते कोणत्या तरी ताडीच्या गुत्त्यावर मनसोक्त पहिल्या धारीची ताडी पिऊन किंवा चरस गांजा तरी फुंकून आले असावे याची ती खुण त्या डोळ्यांचा आणि नजरेचा बदल देत होता.
आतापर्यंत मंदाला सोबत करणारी तांबूस तपकिरी सूर्याची सोनेरी किरणे आणि तो सूर्यसुद्धा आता धरतीच्या पदराआड आपले तोंड खुपसत होता. जणू त्यालाही आज मुद्दामच ओवरटाईम करायचा नसावा.
मंदाच्या आयुष्यावर काळोख दाटून येत होता. तो काळ हळूहळू तिच्याकडे सरकत होता जणू.
मंदाने आता मोळी बांधली होती आणि गोविंद तिला ती मोळी उचलायला मदत करत होता. तितक्यात या मद्यपीपैकी एकाने आगेकूच करून मोळी उचलून देण्याच्या बहाण्याने पण एक लंपट हेतू मनात ठेऊन मंदाच्या देहाला स्पर्श केला.
मंदाने त्याचा इरादा जाणला आणि मदतीला नकार दर्शवला पण तो लंपट आता तिच्याशी झोंबाझोबी करू लागला. लहान गोविंदाला काहीच कळेना की नेमकं काय होत आहे.
तितक्यात दुसरा शैतानसुध्दा त्यात सामील झाला आणि दोन लांडग्याच्या तावडीत एक हरिणी सापडावी अशी मंदाची अवस्था झाली होती.
त्यांनी तिला ओढत ओढत शेजारील उंच मोहरीच्या शेतात नेले आणि काही क्षणातच त्या ठिकाणाहून फक्त दोनच किंचाळ्या आल्या आणि एक भयंकर शांतता पसरली गेली.
काही क्षण उलटून गेले असतील तर गोविंदा पाहतो की मंदाच्या पूर्ण अंगावरुन रक्त वाहत आहे. तिचे डोळे जणू आग ओकत होते. तिच्या हातात होता रक्ताने माखलेला कोयता. एक नाजुक हरिणी वाटणाऱ्या मंदाने आज वाघिण बनून दोन लांडग्यांची शिकार केली होती.