भेट पहीली की शेवटची..
भेट पहीली की शेवटची..


निळ्याशार सागरात त्या मदमस्त लहरींचा खेळ सुरू होता. एकापेक्षा एक आणि किती सैलपणे त्या लहरत लहरत किनाऱ्यावर येऊन पुन्हा मागे सरत होत्या. किनाऱ्यावर निपचित ऊन खात पडून असलेली वाळू ओली करून त्या लहरी परतत होत्या. अश्या ओल्या वाळूचा तो स्पर्श दिनेश अन् अवंतिकाच्या पायांना गुदगुल्या करत होता. एकमेकांच्या हातात हात गुंफलेल हे युगल निवांतपणे सरोवरांच्या शितल जलात राजहंसाचा जोडा विहार करावा असच भासत होते.
अवंतिका आणि दिनेश यांची ही अशी पहिलीच भेट होती. या अगोदर त्यांनी एकमेकांस चोर नजरेन कित्येकदा पाहिले होते. पण आज अवंतिकाला असे इतक्या जवळून पाहून दिनेश पूर्ण शुध्द हरवून बसला होता. अवंतिका त्याला बोलत असताना तो त्या शब्दात मंतरला जात होता. तिच्या नाजूक पाकळ्यापरी ओठांतूंन जणू अमृतसर बरसत असावी असेच त्याला वाटतं होते. वाऱ्यावर उडणाऱ्या बटा त्याला काही तरी खूणवत असाव्या अश्याच वाटत होत्या. पण तिच्या त्या सागराहूंन ही खोल डोळ्यांत दिनेश उतरत जात होता. बोलता बोलता अवंतिका खळखळून हसायची तेव्हा तिच्या गालांवर पाडणारी ती खळी पाहून तो भारावून गेला होता.
अवंतिकाने त्याला हळूच प्रश्न केला, "माझी तुझ्या आयुष्यात काय किम्मत आहे ? " अवंतिकाचा हा प्रश्न संपतो न संपतो दिनेश काहीश्या काळजीच्या स्वरात बोलून गेला, "मी एक वाटसरूं आहे तुजविण. पण, तुझं माझ्या आयुष्यात असणं मला जगाचा सम्राट झाल्यासारखं सुखावह आहे आणि या जगाच्या पाठीवर कोणी सम्राटला असा प्रश्न विचारू नये."
दिनेशने हळूच हातात घेतलेला अवंतिकाचा हात अजून घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यांत डोळे टाकून बोलू लागला... "अवंतिके, या निळ्यासागरा अजून एक नाव आहे ते म्हणजे रत्नाकर आणि याच सागराला साक्षीस ठेऊन तुला आश्वस्त करतो की, जोपर्यंत हा देह आहे आणि देहात प्राणवायू आहे तो पर्यंत माझ्या देहातील प्रत्येक कोशिका, पेशी, ऊती या तुझ्यासाठीच असतील गं."
दिनेश आणि अवंतिका एकमेकात असे गुरफटले होते की बोलता बोलता ते त्या किनाऱ्यावरील प्रतिबंधित निर्जन क्षेत्राजवळ कधी पोहचले कळलंच नाही.
आत्तापर्यंत शांत असणाऱ्या लहरींच वागणं अचानक बदलल होत. निळ्याशार समुद्राच्या पृष्ठभागावर भयंकर असे रौद्र रूप धारण करुन वारा घोंगावू लागला होता. आल्हादायक लहरींनी आक्राळ-विक्राळ रूप घेतले आणि विजेच्या वेगाने ती या युगलाच्या दिशेने पुढे सरकत होती. दिनेश अन् अवंतिकाने एकमेकांच्या डोळ्यांत पाहीले. डोळ्यांनी डोळ्यांतील भाव अचूक टिपले. एखाद्या चंदणाच्या गाभ्यास भुजंग लपेटावा तसेच ते एकमेकास आलिंगन देऊ लागले. हा सागरसुध्दा वेगळं करणार नाही अशी घट्ट मिठी त्यांनी एकमेकांस दिली.
गर्द वनराईमध्ये निवांतपणे दोन पाखरे एकमेकांच्या चोचीत चोच टाकून प्रित गीत गात असावे आणि त्याच वेळी एखाद्या पारध्यान नेम साधावा व ते दोन्ही जीव तडपत पडावे असच तेथे झाल. ती भयानक लहर पुन्हा सागरात परतली पण एकटीच नाही. ती दिनेश अन् अवंतिकाला आपल्या सोबतीला घेऊन गेली होती.