Pandit Warade

Romance Tragedy

2  

Pandit Warade

Romance Tragedy

मीनल

मीनल

7 mins
83


     "मीनल, पुन्हा कधी भेटायचं? आज तू बोलणार ना तुझ्या आई सोबत? उद्या कॉलेजला आल्यावर सांग मला काय ते. हवं असेल तर मी देखील येईल तुझ्या आईला भेटायला." राजानं मीनलचा हातात घेतलेला हात हळूच सोडवून घेत म्हटलं.

    "राजा, आईजवळ कसं बोलावं हाच मोठा पेच आहे माझ्या समोर. का कुणास ठाऊक पण माझं काळीज धडधड करायला लागलंय. तिला कसं सांगू हे सारं? आजवर आईनं मला कधीच कशाचीच उणीव भासू दिली नाही. मला घरात कधी फारसं काम करू दिलं नाही. बापाचं तोंड मला कधीच पहायला मिळालं नाही. आजवर तिनं एकटीनं घर कसं सांभाळलं हे तिचं तिलाच ठाऊक. ती कुठे जाते? काय काम करते? हे कधी मला कळू दिलं नाही. मात्र माझ्या सुखासाठी ती रात्रंदिवस राबत राहिली,झिजत राहिली. तिला हे ऐकल्या नंतर काय वाटेल? मला तर हिंमतच होत नाहीय तिला बोलायला. तूच ये ना एखादे दिवशी तुझ्या आईला सोबत घेऊन." मीनल विनम्रतेने म्हणाली.

   "मीच आलो असतो गं. पण तुझ्या आईचा घरी असण्याचा वेळ कुठे निश्चित असतो? तिला सुटी कधी असते ते मलाही माहीत नाही अन् तुलाही माहीत नाही. किमान मी घरी कधी यायचं एवढं तरी तिला विचारून घे." राजानं तिला सांगितलं.

  "बरं! बघते विचारून. रात्री ती घरी येई पर्यंत मी झोपले नाही म्हणजे बरं. ठीक आहे. मी करीन प्रयत्न तिला सांगण्याचा. ती काय म्हणते ते उद्या कॉलेजला आल्यावर सांगेन. तोवर बाय बाय." मीनलनं आश्वासन दिलं.

   मीनल आणि राजा दोघेही एकाच कॉलेजमध्ये बी ए च्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. मीनल एका गरीब नर्तकीची मुलगी. एका डान्स बार मध्ये नर्तकी असल्याचं तिला आईनं आजवर कधीच समजू दिल नव्हतं. संपूर्ण कॉलेजमध्ये ती अगदी संस्कारी मुलगी बनूनच वावरत होती. तिसऱ्या वर्षाला असतांना मात्र तिला राजाचा स्वभाव आवडायला लागला होता. गेल्या चार वर्षात तिला एकही मित्र किंवा मैत्रीण जोडता आली नव्हती. आपण भलं अन् आपलं कॉलेज भलं. असं तिचं वागणं होतं.

   राजाही एक हुशार आणि होतकरू मुलगा होता. गरीब घरातील राजा इतर मुलां सारखा उडाणटप्पू नव्हता. त्याचंही वागणं अगदी मीनल सारखंच होतं. आपण भलं अन् आपला अभ्यास भला. कुणाच्या अध्यात नको, मध्यात नको. इतर मुलं मुली, अभ्यास कमी आणि इतर लफडेच जास्त करत असत. पण हा मात्र अशा प्रकारा पासून चार हात लांबच राहिला होता. आणि म्हणूनच कदाचित मीनल आणि त्याचा स्वभाव मिळता जुळता असल्या मुळेच त्यांची मैत्री जमली असावी. परंतु त्या दोघांनीही कधीच मैत्रीची मर्यादा ओलांडली नव्हती. तसं पाहिलं तर रोज संध्याकाळी तिची आई घरी नसायची, त्या वेळेत ती त्याला घरी आणू शकत होती. त्या दोघांत केवळ निख्खळ मैत्री होती. त्या मैत्रीचं रूपांतर विवाहात व्हावं या शुद्ध हेतूनंच त्यानं आज आईला विचारण्या बद्धल सुचवलं होतं.

   दोघेही आपापल्या मार्गाने निघाले होते. तेव्हा दोघांच्याही मनात एकच विचार होता, विवाहाचा. मीनल घरी आली. नेहमी प्रमाणे तिची आई कस्तुरा घरी नव्हती. घरातील आवराआवर करून ती तिच्या ड्युटीवर निघून गेलेली होती. मीनलने दप्तर कपाटात ठेवलं. कपडे बदलले. हातात झाडू घेऊन एकदा संपूर्ण घर स्वच्छ केलं. घर तरी काय एक रूम आणि छोटंसं किचन. पण छोटंसं का होईना पण व्यवस्थित होतं. घर स्वच्छ करून ती बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाली आणि किचन मध्ये आली. स्वतःपुरता एक कप चहा बनवला. चहा घेऊन ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

  स्वयंपाक करून मीनल आई घरी येण्याची वाट बघत बसली. मनात एकच विचार होता, 'आईला कसं सांगावं? तिला काय वाटेल?' ती स्वतःच प्रश्न तयार करत होती आणि त्यांचे उत्तरही स्वतःच देत होती. बऱ्याच उशिरा आई घरी आली. नेहमी प्रमाणं तीअंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली. रात्री कितीही उशीर झाला तरी घरी आल्यावर अंघोळ करण्याचा नित्यक्रम तिने कधीच चुकू दिला नव्हता. बार मध्ये डान्स करत असतांना अनेक प्रकारच्या नजरा तिला झेलाव्या लागत होत्या. त्या वाईट, वासनांध नजरांचा लवलेश सुद्धा या घरात पडू नये या हेतूने ती स्वतः अंघोळ करायची. तिची अंघोळ होईपर्यंत मीनलनं किचन मध्ये भाजी गरम करायला ठेवली. आई अंघोळ करून आल्यावर दोघी जेवायला बसल्या. मीनल रोजच्या सारखं मोकळे पणानं जेवत नव्हती. तिचं जेवणावर लक्षच नव्हतं. डोक्यात विचार सुरू होता, 'आईला कसं सांगावं?' त्या विचारात हातातला घास हातात आणि तोंडातला तोंडात तसाच रहायचा. आईच्या हे लक्षात आलं. काही तरी समस्या आहे, हे तिनं ओळखलं.

   "मीनू, काय झालं? जेवत का नाहीस गं रोजच्या सारखं? तब्येत तर ठीक आहे ना?" तिनं प्रेमानं विचारलं.

    "नाही. तसं काही नाही. फारसी भूक नाही लागली आज. म्हणून.." तिनं सारवासारव करत उत्तर दिलं.

    "असं कसं? जेव पोटभर. भूक लागल्यावर लगेच जेवून घ्यायचं. माझी वाट बघत कशाला बसायचं? भूक मोड झाली असणार. आज मलाही नेहमी पेक्षा जरा जास्तच उशीर झाला." आई म्हणाली तसं मीनलला जरा बरं वाटलं.

  जेवण आटोपल्यानंतर दोघींनी मिळून भांड्यांची आवरा आवर केली. दोघीही अंथरुणावर जाऊन बसल्या. रोज दोघीही एकाच अंथरुणात झोपायच्या. दिवसभराचा अभ्यास, घरातली कामं यावर गप्पा मारत मारत झोपी जायच्या. आजही अंथरुणावर बसल्यावर कस्तुरानं तिला मायेनं जवळ घेतलं. आणि विचारलं,

    "बाळ मीनू, काय प्रॉब्लेम आहे? तू आज जेवली नाहीस नेहमी सारखी. काही दुखतं का?"

     "नाही गं आई, तसं काही नाही. पण..." मीनल बोलू की नको या द्विधा मनस्थितीत अडकली होती.

     "पण? पण काय? अभ्यासात काही अडचण आहे का? की पैशाची अडचण आहे? काय आहे ते सांगितल्या शिवाय कळणार कसं मला?" कस्तुरानं तिला आणखीच जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत विचारलं. 

    "आई, कसं सांगू? रागावणार तर नाहीस ना? मला भीती वाटते. गं." मीनल भीत भीतच म्हणाली. 

   "भीती? कसली भीती? कुणी त्रास देतंय का माझ्या पिलूला?" आईनं काळजीयुक्त स्वरात विचारलं.

    "आई, आता मी एवढी काही लहान राहिले नाही, कुणाचा त्रास सहन करायला. मी आता मोठी झालेय. कॉलेजला शिकत्येय मी आता." मीनल मूळ मुद्याला बगल देत म्हणाली.

    "हं! समजलं. माझं पिलू आता मोठ्ठ झालं हे माझ्या लक्षातच आलं नाही. बरं बरं. ठीक आहे. एवढी तुझी फायनलची परीक्षा होऊ दे. बघते एखादा राजकुमार माझ्या परी साठी." तिने लडिवाळ पणे मस्करीच्या सुरात म्हटलं.

  "हे गं काय आई? मी तुला एवढा त्रास देते का? मला घरातून काढून द्यायला निघालीस ते?" मीनल लटक्या रुसव्या स्वरात म्हणाली.

   "अगं, प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस आई बापाचं घर सोडावंच लागतं. जग रहाटीच आहे ती. आई वडिलांनी मुलगा बघायचा, त्याच्याशी लग्न लावून द्यायचं आणि मुलीनं त्याच्या सोबत निमूट पणे संसार करायचा." कस्तुरा समजावणीच्या सुरात बोलली.

  "आणि एखाद्या मुलीनं बंड केलं तर? स्वतःच मुलगा ठरवला अन् त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं तर?" मीनलनं खाली मान घालत, नजर चुकवत, घाबरतच विचारलं.

    "क्काय? तुला म्हणायचं काय?" जवळ जवळ ओरडतच कस्तुरानं विचारलं.

    "आई, रागावू नकोस. मी एका मुलावर प्रेम करते, तोही माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तो लग्ना साठी विचारत होता. तुला भेटायला यायचं म्हणत होता." मीनलनं एका दमात सारं काही बोलून टाकलं.

    खाडकन एक मुस्काटात एवढी जोरात बसली की, मीनलच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. "कार्टे, एवढ्या साठी कॉलेजला पाठवले का तुला? रात्रीचा दिवस करून, जीवाचा आटापिटा करून तुला कॉलेजमध्ये घातले ते काय हे धंदे करण्यासाठी?" कस्तुरा एवढे जोरात बोलत होती की, तिला धाप लागली आणि अचानक ती हुंदके देत रडायला लागली. मीनल अगोदरच घाबरत होती. या प्रकाराने ती गर्भगळीत झाली. दोघीही हुंदके देत देत रडत होत्या. रात्रभर दोघी झोपू शकल्या नाही.

   'आई आपल्या साठी किती झिजते? किती कष्ट सोसते? केवळ आपल्या साठी, केवळ आपल्या सुखासाठी. तिला आपल्या शिवाय दुसरं आहे कोण? आपण तिला सुखाच्या ऐवजी दुःख दिले. धिक्कार असो! अशा मुलीचा' मीनल असा विचार करत होती. दुसरीकडे तिला राजाचा निरागस चेहरा दिसत होता. तो इतर मुलांसारखा नाही इतर कुणी असता तर आतापर्यंत काहीही करू शकला असता. त्याला काय आणि कसे सांगू? त्याला नकार देणे तिच्या कडून शक्य नव्हते, परंतु आईला दुःखी करून स्वतःचे सुख मिळवणे तिला बरोबर वाटत नव्हते. ती रात्रभर मनाची घुसमट सहन करत मुसमुसत होती.

   'एकुलती एक कन्या मीनू. आजवर कधीच शब्दाच्या बाहेर गेली नाही. तिच्या शिवाय आपल्याला आणि आपल्या शिवाय तिला आहे तरी कोण? तिला आपण तिला मारायला नको पाहिजे होते. तिला अगोदर विश्वासात घेऊन विचारपूस करायला पाहिजे होती.' कस्तुरा तळमळत होती. आज पहिल्यांदा तिनं मीनूवर हात उचलला होता. पण ती तरी काय करणार? तिचा स्वतःचा या बाबतीतला अनुभव अतिशय वाईट होता.

   कस्तुरा एक अतिशय सुंदर मुलगी होती. कॉलेजचे शिक्षण घेत असतांना तिचे एका श्रीमंत मुलावर प्रेम बसले होते. नव्हे त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता ती त्याच्या बरोबर पळून गेली. चार महिने ते या शहरात, त्या शहरात करत फिरत राहिले होते. हिने सोबत आणलेले पैसे संपत आले होते. एका अनोळखी शहरातील एका लॉजवर तिला एकटीला सोडून तो निघून गेला. ती मोठ्या संकटात सापडली होती. कारण त्यावेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती. लॉज मालकाने तिची परिस्थिती ओळखली. त्याने तिला मदतीचा हात दिला होता. तिला आपल्या हॉटेल कम लॉजवर वेटर म्हणून ठेऊन घेतले होते. कमी पगारात ती चांगली सर्विस देत होती. एक दिवस त्या हॉटेलवर एका डान्स बारचा मालक आलेला होता. त्याची चाणाक्ष नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिला आपल्या बारवर नोकरी दिली होती. तिने तिथल्या नर्तकीं बरोबर डान्स शिकून घेतला होता. बघता बघता ती इतर मुलींपेक्षा जास्त पैसे कमवायला लागली होती. दिवस भरत आले तसे तिचा डान्स जरा ढिला व्हायला लागला होता. बार मालकाने तिला दोन महिण्याची सुटी देऊन तिचा दवाखाना केला होता. तिने एका गोंडस कन्येला म्हणजेच मीनलला जन्म दिला.

  कस्तुरा दोन महिन्यानंतर पुन्हा नाचायला लागली होती. तिच्या सुटीच्या काळात कमी चालणारा बार पुन्हा जोरात चालू लागला होता. अशातच तिचा प्रियकर पुन्हा एकदा त्या बार मध्ये गिऱ्हाईक बनून आलेला तिने पाहिला, तिची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने तिला ओळखले, तिच्या जवळ गेला, आणि 'माझे चुकले' म्हणू लागला होता. तो पुन्हा पुन्हा तिथे येऊ लागला होता. त्याचा तिच्या कामावर परिणाम होऊ लागला होता. एक दिवस तिने त्याच्या पासून सुटका करून घेण्यासाठी त्याच्या दारूच्या पेगमध्ये विष दिले होते. तो त्या विषाने वेडा होऊन फिरू लागला होता. त्याची आठवण तिला अजूनही त्रास देत होती. पण मन मारून जगण्या शिवाय गत्यंतर नव्हते. कारण चूक तिने स्वतः केलेली होती, पळून येऊन घराचे दार स्वतः बंद केले होते. मीनल साठी जगणे आवश्यक होते. मीनलला बार मालकाच्या मदतीने तिने या सर्वां पासून दूर ठेवले होते. मीनूला कळायला लागण्याच्या अगोदरच तिने बार पासून बऱ्याच दूर अंतरावर एक घर विकत घेतले होते. जिथे ती तिच्या मीनल सोबत आज रहात होती. या वातावरणा पासून दूर ठेवूनही ती आज आपल्या सारखीच प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली पाहून तिला तिचे स्वतःचे दिवस आठवले होते आणि म्हणूनच तिचा हात मारण्या साठी उठला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance