Nagesh S Shewalkar

Inspirational

5.0  

Nagesh S Shewalkar

Inspirational

** मी परीक्षक होतो *

** मी परीक्षक होतो *

10 mins
1.4K


|| || मी परीक्षक होतो...|| ||

रविवारची सुट्टी होती. दिवाळीचा सण तोंडावर होता. दसऱ्याचा आनंद अजूनही मनात घर करून होता. दिवाळी अंकासाठी पाठविलेल्या अंकांची यादी, साहित्य 'साभार' परत आल्याची गणना, स्वीकृती तसेच अस्वीकृती न कळविणारांची छाननी, अंक नियमित पाठविणारांची मोजणी, अंक न पाठविणाऱ्या संपादक महोदयांचा लेखाजोखा, मानधन देणाऱ्या अंकाची नावे, प्राप्त झालेले आणि येणारे मानधन यासोबतच दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्यासाठी झालेला झेरॉक्स, पोस्टेज, कुरिअर यासाठी झालेल्या खर्चाचा हिशोब करीत असताना अचानक सौभाग्यवतीचा आवाज आला,

"अहो....अहो..."

"काय झाले ग?" हिशेबातून लक्ष ना काढताच मी विचारले.

"ही 'वॉक इन इंटरव्ह्यूची' बातमी वाचली का?"

"वेडी का खुळी ग तू? मला नोकरी लागून पंचवीस वर्षे झाली आहेत. आपल्या एकुलत्या एक मुलालाही नोकरी लागली आहे. लवकरच त्याचे हात पिवळे केले की आपण नातवंडं खेळवा..."

"बाई, बाई, काय हे ध्यान! पूर्ण ऐकायचे नाही की काही नाही. शब्द तोंडातून निघतो न निघतो...."

"बातमी कोणती आलेय ते सांगणार आहेस का?"

"ऐका. सायं दैनिक गोदाकाठने आयोजित केलेल्या कथास्पर्धेसाठी त्यांना परीक्षक हवे आहेत. त्यासाठी त्यांनी मुलाखती ठेवल्या आहेत?"

"काय? स्पर्धेच्या परीक्षक पदासाठी मुलाखती? बघू दे....." असे म्हणत मी तिच्या हातातून गोदाकाठचा अंक हिसकावून घेतला. त्यातील बातमी वाचली. गोदाकाठ या दैनिकाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे दिवाळीचे औचित्य साधून कथा स्पर्धेचे आयोजन केले होते. मी या स्पर्धेसाठी सात-आठ वर्षांपूर्वी सलग तीन वर्षे कथा पाठवल्या होत्या. विशेष म्हणजे दोनवेळा मला बक्षीसही प्राप्त झाले होते. गोदाकाठने आयोजित केलेला मुलाखतीचा कार्यक्रम त्याचदिवशी दुपारी दोन ते पाच या वेळेत ठेवला होता. सोबत स्वतःचा संपूर्ण साहित्यिक डाटा आणायला सांगितला होता. मी घड्याळाकडे बघितले. दुपारचा एक वाजत होता. मी पटकन उठलो. तयार झालो.नेहमीच्या सवयीप्रमाणे देवघरात जाऊन परमेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो. सौभाग्यवतीने दिवा लावून सुपारी काढून ठेवली होती. ती सुपारी देवापुढे ठेवून मी पुन्हा हात जोडले. बाहेर येत, "येतो ग" असे सौभाग्यवतीला सांगून निघालो.

बरोबर दोन वाजता मी सायं दैनिक गोदाकाठच्या कार्यालयात पोहोचलो. तिथे पन्नास-साठ व्यक्ती हातात पंजिका घेऊन बसलेल्या होत्या. त्या दैनिकाच्या'अक्षरशिका' या रविवारीय पुरवणीत मी नेहमीच लिहित असल्यामुळे अक्षरशिका पुरवणीचे सर्वेसर्वा कृष्णा जागे यांच्याकडे गेलो. माझ्या अभिवादनाचा स्वीकार करून जागे म्हणाले,

"शेवाळे, मुलाखतीसाठी आलात का? मग नाव नोंदवा आणि बाहेर बसा. रीतसर सर्वांची मुलाखत घेतली जाईल."

मी बाहेर आलो. स्वागतिकेकडे अगतिकतेने नाव नोंदवून बसलो. आजूबाजूला पाहिले. उमेदवारांमध्ये तरुणाई अधिक होती. ज्येष्ठ म्हणावेत अशा आठ-दहा व्यक्ती होत्या. माझ्या शेजारी बसलेल्या युवकाला मी विचारले,

"मुलाखतीसाठी आलात?" माझ्या त्या प्रश्नावर त्या तरुणाने एखाद्या प्रस्थापित साहित्यिकाप्रमाणे मान हलवली. माझ्या डाव्या हाताशी बसलेल्या माणसाला मी विचारले,

"आपण काय करता?"

"मी जीवनविमा कंपनीत आहे."

"साहित्यिक आहात?"

"नाही. वाचक आहे. एखाद्या लेखकाने परीक्षक होण्यापेक्षा माझ्यासारख्या वाचकाला ही संधी मिळाली तर चांगल्या कथांची निवड होईल. नाही का?"

"हो.हो. अगदी बरोबर आहे. आपण कुणा-कुणाचे साहित्य वाचले आहे?"

"अं...अं...ते..ते.. आपले आडवाणी, गिडवाणी, गिरवाणी, भिडवाणी, मिडवाणी, निहारी, तिहारी, जिव्हारी झालेच तर लेन-सेन-मेन-वेन....इत्यादी अनेक! एवढे साहित्य वाचलेय ना की नावे आठवत नाहीत हो."

"तुम्ही अत्रे, खांडेकर, शिरवाडकर, मंत्री यांचे साहित्य वाचता?"

"नाही बुवा. ही नावे तर कधी ऐकली नाहीत. काय झाले सांगू का, आज काल ना लिहिणारांचा एवढा सुळसुळाट झालाय ना की, कोण कोण म्हणून लक्षात ठेवावीत? आता तुम्ही म्हणताय म्हणून ही मंडळी वाचतो, तसे मी सहसा नवोदितांचे साहित्य वाचत नाही."

काही क्षणातच मुलाखती सुरू झाल्या. स्वागतिका एक-एक नाव पुकारत होती. जाणारा आत जात होता. तीन -चार मिनिटात कुणी संभ्रमात, कुणी नाराज होत तर काही जण तणतणत बाहेर पडत होते.

"शेवाळे सर...." त्या स्वागतिकेच्या सुंदर मुखातून मंगल स्वर बाहेर पडले. मी दुसऱ्याच क्षणी मुलाखत घेणाऱ्या एकमेव सदस्यापुढे म्हणजे कृष्णा जागे यांच्यासमोर जाऊन बसलो.

"बसा. नियमावली ऐका. परीक्षक म्हणून निवड झाल्यास कोणतेही मानधन मिळणार नाही. अंक हवा असल्यास विकत घ्यावा लागेल. ऐकून घ्या. शंका. कुशंका. लघुशंका नंतर. निवड झाल्यास उद्या दिवसभरात केव्हाही फोन येईल. फोन नाही आल्यास निवड झाली नाही असे समजावे. त्यासाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. तुम्हालाही करता येणार नाही. दोन परीक्षकांची निवड होईल. निवडीचे हक्क निवड समितीकडे राखीव आहेत. त्यावर वाद, संवाद, सुसंवाद चालणार नाही. उद्या फोन आल्याबरोबर अर्ध्या तासात संपर्क करावा लागेल. त्यानंतर आल्यास निवड आपोआप रद्द होऊन प्रतिक्षा यादीतील व्यक्तीला पाचारण करण्यात येईल. साधारण पाचशे कथा स्पर्धेसाठी आल्या आहेत. उद्या दोन परीक्षकांना अर्ध्या अर्ध्या कथा दिल्या जातील. प्रत्येक कथेस सात पैकी गुण द्यावयाचे आहेत. पहिला गठ्ठा वाचून, गुणांच्या यादीसह परवा दुपारी घेऊन यावा आणि दुसरा गठ्ठा घेऊन जावा. त्यावर तशीच प्रक्रिया करून तेरवा परत घेऊन यावा. येताना सोबत तुमचा नजिकच्या काळातील फोटो, परिचय आणि एक हजार एकशे एक शब्दातले मनोगत घेऊन यावे. आपण येऊ शकता." असे म्हणत टेप बंद केल्याप्रमाणे जागे थांबले.

एका वेगळ्याच संभ्रमात मी घरी पोहोचलो. मला पाहताच बायको म्हणाली,

"झाली का हो मुलाखत? झाली का तुमची निवड? मानधन किती मिळणार आहे? चांगले रगडून घ्या हो मानधन. नाही तर नेहमीप्रमाणे 'खाया पिया कुछ नही, गिलास फुटा पाँच रुपिया।' अशी स्थिती होऊ नये. तुमची निवड व्हावी म्हणून मी 'अष्टविनायक यात्रेचा नवस'बोललेय बरे."

"अग पण...."

"असू द्या हो. असे प्रसंग का नेहमी येतात? त्यालाही नशीब लागते. देवाच्या कृपेने एवढा मोठा सन्मान होत आहे तर दर्शनासाठी जायलाच पाहिजे." पत्नी म्हणाली. तिच्या आनंदावर पाणी कशाला फेरावे म्हणून मी शांत राहिलो.

दुसऱ्या दिवशी मी नित्यनेमाने उठलो. प्रातःविधी,दैनिक कामे आटोपली. सायं दैनिक असले तरी सकाळी येणारा गोदाकाठ उचलला. बातम्यांवर नजर फिरवत असताना ती बातमी समोर आली.

'सायं दैनिक गोदाकाठ दिवाळी अंक कथास्पर्धेसाठी परीक्षकांची निवड.' या मथळ्याखाली दोन परीक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी एक नाव माझे होते. दुसरे कुणी तरी भणभणी नावाचे गृहस्थ होते.

"अग, ऐकतेस काय? तुझी अष्टविनायक यात्रा होणार असे दिसतेय. बघ. बातमी."

"तर मग? गणपतीला निक्षून सांगितले होते, ही निवड, हा सन्मान मिळालाच पाहिजे. जा. पळा. अकरा रुपयांचे पेढे घेऊन या." असे बजावत तिने माझा भ्रमणध्वनी घेतला. त्यावर दिसेल त्या क्रमांकावर कॉल करून बातमी द्यायला सुरुवात केली. मी लगेच निघालो. दहा-पंधरा मिनिटात पेढे घेऊन परतलो. पाहतो तर बायकोचे फोनायण चालूच होते. तिचा फोन चालू असताना कुणाचा तरी कॉल आला म्हणून तिने भ्रमणध्वनी माझ्याकडे दिला. मी हातात घेऊन नाव पाहिले. फोन जागेंचा होता. मी फोन उचलताच जागे म्हणाले,

"बातमी वाचलीच असेल. अभिनंदन! मी अर्ध्या तासात कार्यालयात पोहोचतो. तुम्ही पण या." म्हणत त्यांनी फोन कटही केला.

मी वीस-पंचवीस मिनिटात दैनिक गोदाकाठच्या कार्यालयात पोहोचलो. जागेही पोहोचले होते. मला पाहताच म्हणाले,

"या. अभिनंदन! हा गठ्ठा तुमची वाट पाहतोय. दीर्घ कथांचा विनयभंग करु नका. अहो, म्हणजे मोठ्या कथा वाचू नका. अवाचनीय अक्षरे असलेली कथा एखाद्या स्त्रीची असली तरीही तिच्या प्रेमात पडू नका. म्हणजे... अहो, त्या कथेच्या प्रेमात पडू नका. सुरुवात आवडली तरच शेवटाकडे जा, नाही तर मध्येच घटस्फोट घ्या. कथांवर काहीही खाणाखुणा करू नका. उद्या आणून द्या..." जागे सांगत असताना माझा भ्रमणध्वनी खणाणला. एका स्थानिक, प्रख्यात कवीचा फोन होता.

"नमस्कार सर! बोला. धन्यवाद! आभारी आहे. हो. हो. आठवतेय. कसा विसरेन? गोदाकाठच्या मी दोन्ही स्पर्धा जिंकल्या त्यावेळी तुम्ही परीक्षक होता. हो.हो. नक्की लक्षात ठेवतो. नाही. नाही. काळजी करु नका..." असे म्हणून मी फोन बंद केला.

"अरे, वा! शेवाळे, तुमच्याकडे शिफारशीसुद्धा येऊ लागल्या की. आपली स्पर्धा बरीच रंगतेय की. मी हा धोका ओळखून संपादकांना म्हणालो होतो की, परीक्षकांना वैयक्तिक कळवू या. वर्तमानपत्रात नावे जाहीर करायला नको. पण माझे ऐकले नाही. शेवाळे, सांगितल्यानुसार परीक्षण करा. कुणाच्याही शिफारशीला ,दबावाला बळी पडू नका. या आता. उद्याचा दिवस टाळू नका."

"नाही. नाही. तसे होणार नाही. आजची रजा टाकली आहे...." असे म्हणत तो गठ्ठा सांभाळत मी बाहेर आलो. बाहेर एक तरुण माझीच वाट बघत होता. त्याला कुठेतरी पाहिले आहे, असे मला वाटू लागले. मला बघताच जवळ येऊन तो म्हणाला,

"सर, नमस्कार. अभिनंदन! काल मी पण मुलाखतीसाठी आलो होतो. तुमची निवड झाली. आनंद झाला. सर, एक विचारु का?"

"विचारा ना..."मी असमंजसपणे म्हणालो.

"सर, किती खर्च आला हे परीक्षक पद मिळविण्यासाठी? रागावू नका. पण काल तशी चर्चा येथे सुरू होती म्हणून विचारले. एक विनंती होती."

"बोला." मी अनिच्छेने म्हणालो.

"या गठ्ठ्यात कदाचित माझी कथा असेल."

"तुमची कथा? तुम्ही काल मुलाखतीसाठी आला होता ना? मग स्पर्धेत भाग कसा घेतला?"

"सर, स्पर्धकाला परीक्षक होता येणार नाही, अशी अट थोडीच होती. तुम्हाला म्हणून सांगतो, मी काय केले, गतवर्षी वाचनालयातून आणलेल्या दिवाळी अंकातून प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध लेखकांच्या दहा-बारा कथांचे उतारे फाडून घेतले. ते सारे सुवाच्य अक्षरात एकत्र लिहिले आणि तयार झालेली नवीन रिमिक्स कथा या स्पर्धेसाठी पाठवून दिली. कोण पाहणार? कोण वाचणार? वाचक, परीक्षक,संपादक आणि इतर साहित्यिक कुणी कुणी वाचत नाही. ही माझी अफलातून प्रयोग केलेली कथा वाचली आणि त्यातले काही कळणार नाही म्हणजे हमखास पारितोषिक मिळणार...."

"वा! वा! बहोतखुब! पण काल मुलाखत ....."

"अहो, त्यात असे अवघड काय आहे? रिमिक्स कथेवर टाकले टोपणनाव आणि मुलाखत दिली मूळ नावाने. पण निवड झाली नाही. ठीक आहे. तुमची तर झाली ना, मग मला बक्षीस नक्कीच मिळणार. चला. चहा घेऊ...." तो म्हणाला. त्या स्पर्धक-परीक्षकामधील गुण मला माझ्या आगामी कथेसाठी चांगले वाटले म्हणून मी त्याचा आग्रह मोडला नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने चहा-फराळाची ऑर्डर दिली. बोलता बोलता चहा-फराळ आटोपल्यावर पोऱ्याने बील आणून दिले. ते बील हातात घेऊन खिशात हात घातला. मागचा, पुढचा, शर्टचा असे सारे खिसे तो चाचपत होता. मी त्याच्या हालचाली प्रश्नार्थक नजरेने न्याहाळत असततो म्हणाला,

"सॉरी! सर, मी गडबडीत माझे पॉकेट आणायचे विसरलो. सर, प्लीज बील पे करा ना. आता तुम्ही माझ्या कथेला बक्षीस देणारच आहात तर पुरस्कार जाहीर होताच मी तुम्हाला इच्छाभोजन देईल. त्यावेळी मी तुमची ही रक्कम परत करील...." म्हणत तो हॉटेलमधून बाहेर पडला. दात-ओठ खात बील देऊन मी बाहेर आलो. पाहतो तर त्याच्या हातात पन्नास रुपयाची नोट होती. तो 'सितार' घेत होता. मला पाहताच म्हणाला,

"सर, तुम्हाला इथले काही जमतच नसेल. ठीक आहे. या सर. पण माझ्या कामाचे विसरू नका."

मी चरफडत लगेच मोटारसायकलला किक् मारली. गठ्ठा घेऊन मी घरी पोहोचलो. फ्रेश झालो. ते बाढ सोडले. जागेंनी सांगितल्याप्रमाणे अगोदर निकषाप्रमाणे कथांची विभागणी केली. मला लुबाडणाऱ्या त्या स्पर्धक-परीक्षक या डबलगेमरची कथा शोधली आणि चक्क टराटरा फाडली.

एक-एक करीत कथा वाचत गेलो. अनेक चित्र विचित्र अनुभव आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शहरी-ग्रामीण लेखकांनी सहभाग नोंदवला होता. एका कथाकाराने कथेची मूळ प्रत न पाठवता चक्क कार्बनप्रत पाठवली होती. संगणक-झेरॉक्स युगात कार्बनप्रत पाहून मला आश्चर्य वाटले. एकाने त्याची पूर्वी प्रकाशित झालेल्या कथेची झेरॉक्स कॉपी पाठवली होती. त्या कथेच्या शेवटी मासिकाचे नावही स्पष्टपणे दिसत होते. एका लेखकाने भूतकाळात दोन-तीन पारितोषिके मिळालेली कथा पाठवून सोबत पुरस्कार प्राप्त प्रमाणपत्रांची झेरॉक्सही जोडली होती. मी कथा वाचायला सुरुवात केली. कथाकारांनी नानाविध विषय हाताळले होते, पूर्ण ताकदीने लिहिण्याचा प्रयत्न केला होता. मी परीक्षक असलो तरी स्वतःला प्रथितयश, प्रस्थापित वगैरे मानत नाही. त्या कथा वाचताना एक गोष्ट जाणवत होती की, आगामी काळात अनेक चांगले कथाकार पुढे येत असल्याची ग्वाही त्या कथा देत होत्या. मात्र एका कथेचा शेवट वाचताना मी चक्रावून गेलो. त्या कथालेखकाने असे सुचवले होते की, या कथेचा शेवट परीक्षक,संपादक किंवा वाचकांनीच करावा. तितक्यात माझा भ्रमणध्वनी वाजला. मी उचलला. दुसऱ्या बाजूने आवाज आला,

"शेवाळे का?"

"बोलतोय. आपण?"

"मी ब्लॅक डायमंडचा मालक बोलतोय."

"बोला."

"तुम्ही गोदाकाठच्या कथेस्पर्धेचे परीक्षक आहात. असे समजले. एक सांगतो, गेले वर्षीप्रमाणे निकाल लावू नका."

"म्हणजे?" मी असमंसपणे विचारले.

"गत वर्षी कुणी तरी फडतूस परीक्षक होता. त्याने निवडलेली कथा दारुबंदीला प्रोत्साहन देणारी होती. यावर्षी तुम्ही असे काही करू नका. दारुबंदीवरील कथा बाजूला काढून ठेवा.त्याचं काय आहे,

मी या व्यवसायात असलो तरी मी बियर प्रेमी नसून साहित्य रसिक आहे. अहो, मी एम. ए. (मराठी) सुवर्णपदक प्राप्त आहे. आमच्या दोन नंबर धंदेवाल्यांच्या जाहिरातीमुळेच वर्तमानपत्र आणि दिवाळी अंक तग धरून आहेत. तेव्हा माझ्या सुचनेचा विचार करा." म्हणत त्याने फोन बंद केला.

दुपारचे जेवण झाले. कथा वाचताना सायंकाळ, रात्र केव्हा झाली ते कळालेच नाही. रात्री उशिरा झोपल्याने साहजिकच सकाळी उशिरा उठलो. सकाळची कामे आटोपून कार्यालयात रजा कळवून कथेचा बाढ घेऊन बसलो. तितक्यात दूरध्वनी वाजला. मी उचलताच आवाज आला,

"हाय, मी भणभणीकर बोलतोय. आपण दोघे गोदाकाठचे परीक्षक आहोत. अहो, एवढ्या कथा कधी वाचाव्यात? तेव्हा असे करा, कथांची पाने, अक्षर, कथेची सुरुवात यावर धावती नजर टाकून अंदाजे चार-सहा गुण द्या टाकून. मी तसेच करतोय. कसे आहे, परीक्षणाचे ना मानधन ना सत्कार! तेव्हा आपण फुकट डोळ्याला ताण का द्यायचा? दुपारी तीन वाजता गोदाकाठमध्ये येत आहे. तुम्हीही या. भेट होईल....." असे म्हणत मला बोलण्याची संधी न देता. त्यांनी फोन बंद केला. मी गठ्ठा बघितला. माझ्याजवळ तीन-चार तास होते. एवढ्या कथा वाचणे शक्यच नव्हते. मग मी भणभणीकरांचा मार्ग अनुसरला. एक तासात तो गठ्ठा हातावेगळा केला. जेवण केले. मस्तपैकी आराम केला आणि दैनिक गोदाकाठच्या कार्यालयात गेलो. जागे आणि भणभणीकर माझीच वाट

पाहात होते. गठ्ठ्यांची अदलाबदल करून घरी परतलो. त्या गठ्ठ्याचीही भणभणीकर ट्रेडमार्क प्रमाणे वासलात लावली आणि झोपायची तयारी करत असताना पुन्हा माझ्यावेळी समीक्षक असलेल्या कविचा फोन आला. त्यांच्या नातीची कथा स्पर्धेसाठी पाठवली असल्याची त्यांनी आठवण करून दिली.

दुसऱ्या दिवशी तो गठ्ठा, गुणांकन यादी, माझा फोटो, अकराशे एक शब्दात मनोगत, आणि माझा परिचय जागेंच्या हवाली करून परतलो. दिवाळीच्या कामात व्यस्त झालो. माझ्या कथा समाविष्ट असलेले दिवाळी अंक यायला सुरुवात झाली. दिवाळीच्या दिवशी मी जागेंना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी अंकाची विचारणा केली. परीक्षक असलो तरीही स्पर्धकांप्रमाणे मलाही उत्सुकता होती.

"सध्या दिवाळी असल्यामुळे प्रेसला सुट्टी आहे. तेव्हा अजून आठ दिवस लागतील" असे म्हणत जागेंंनी फोन बंद केला.

"अहो, ऐकलत का? तुम्हाला किती सुट्ट्या आहेत हो?" बायकोने प्रश्न केला.

"का ग?" मी विचारले.

"अहो, असे काय विचारता? अष्टविनायक यात्रा करायची आहे ना? असे करु या का, आज रात्री निघून दोन दिवसात परत येऊ? कसे?" माझा होकार गृहीत धरून बायको तयारीला लागली....

दोन दिवसात अष्टविनायक यात्रा संपवून घरी परतलो. घरी सहा-सात दिवाळी अंक येऊन पडले होते. मला गोदाकाठची आठवण झाली. ताजातवाना होऊन मी जागेंना फोन केला. ते म्हणाले,

"झाली का यात्रा? परंतु गोदाकाठच्या दिवाळी अंकाची परिक्रमा चालूच आहे. दिवाळीसाठी गेलेले छपाई कामगार अजून आलेच नाहीत. त्याला स्वाइन फ्लू झाला आहे. अजून आठ दिवस तरी लागतील."

आलेले दिवाळी अंक, कार्यालयीन आणि इतर कामात पंधरवडा उलटून गेला. त्यादिवशी रविवार असल्यामुळे मी सकाळी जरासा उशिराच उठलो. आळसावलेल्या शरीराने चहा घेत गोदाकाठ उचलला. पहिल्या पानावरील बातमीने लक्ष वेधले....

'काही तांत्रिक कारणांमुळे या वर्षी दिवाळी अंक निघणार नाही. आयोजित केलेली कथास्पर्धा रद्द करण्यात येत आहे.... क्षमस्व!......संपादक....' ही बातमी वाचून मी कपाळाकडे हात नेला....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational