मी केलेला प्रवास, आठवणी
मी केलेला प्रवास, आठवणी
आयुष्य जगण्याची खरी मजा म्हणजे प्रवास...
आयुष्य असावे एखाद्या पक्षासारखे मस्त उडत आपल्या आवडत्या ठिकाणी पोहोचता यावे असे... निसर्गाच्या सानिध्यात.... सुखाच्या कुशीत... एक मस्त प्रवासात....
जीवनाच्या प्रवासात प्रत्येक वाटेवर नवीन-नवीन व्यक्ती आपल्याला भेटत जातात. तसेच काही प्रवास मनात कोरले जातात, काही जगण्याचा अर्थ स्पष्ट करतात,तर काही धडा शिकवतात, प्रवास करायचे म्हटले तर तिथे काहीतरी रहस्य असतेस फक्त त्या क्षणाला जगता आले पाहिजे....
आठवणी असतात सुगंधापरी हृदयात जपण्यासाठी , सुख दुःखाच्या, कडू-गोड आठवणीच्या रिमझिम पावसात कधी भिजण्यासाठी...
आज प्रवासाचे ते क्षण आठवले , वरील विषयाच्या निमीत्ताने निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा मला घेऊन गेले... 😊
जीवन हे धावणाऱ्या एका क्षितिज्याच्या मृगजळाप्रमाणे प्रत्येकाचं अगदी अनमोल आहे, त्यामध्ये प्रवासाचा बहर हा असलाच पाहिजे. ज्याप्रमाणे चंद्र पुनवेची, कोकिळा आपले मधुर गाणे गाण्यासाठी श्रावण महिन्याची, तशी आम्ही सगळे वाट बघायचो सुट्ट्या लागल्या की बाहेरगावी फिरायला जाण्याची... मग काय? बाबांनी सांगितले कुठेतरी फिरायला जायचे आहे, वेध लागायचे फिरायचे, मग बॅग वगैरे भरून रवाना व्हायचे...🎒
खरंच गतकाळातील आठवणी आपल्याला जगण्याची उमेद देतात.. असाच एक प्रसंग,
मी लहान असतानांचा, आमच्या गावावरून 'मुक्तागिरी' जवळ असल्यामुळे आम्ही नेहमी सहकुटुंब 'मुक्तागिरी' ला जायचो.. मुक्तागिरी सुंदर म्हणण्यापेक्षा मनमोही अशी, आजूबाजूला दाट झाडेझुडपे , सुंदर वाहणारा धबधबा, निसर्गरम्य वातावरण प्रत्येक मंदिरातील भगवंताची प्रतिमा मनाला अद्भुत शांतता देऊन जाते, शीतलता देऊन जाते...
खुळ्या सावळ्या नभाला कळेना,
कुठुनि साज रंगला,
ही वर जाण्याची लगबग पुढे, हळू केशरा सोबतीने धरतीवर कोणी शिंपले चांदवरखी सडे ...
(तेथे पहाटे पडलेला चंदनाचा सडा)
सर्व भगवंताच्या मूर्तीचे दर्शन घ्यायचे आणि मग मस्त मजा करत, उडया मारत, पायरया चढ उतार करत, कोणी भजन तर कोणी स्वाध्याय करायचे.... मजाच वेगळी होती... असो, मी धबधबा जवळून जात असताना काही मुलं तिथे साचलेल्या पाण्यात एकमेकांशी पाणी खेळत होती, एका मुलीने मला पाहताच माझ्या अंगावर थोडे पाणी उडवले आणि मला थोडे भिजवले, आवडता ड्रेस घातला असल्यामुळे , मला थोडा रागच आला मी मोठ्याने तिला 'पागल आहे का ग ? 'तिच्यावर चिडून, आईने आवाज देतात तिथून निघून गेले... तिथे जाण्याचा आनंद तर होताच पण हा अनुभव थोडा कडू होता, कारण भिजलेला ड्रेस हा नवीन होता...😌
दुसरा प्रसंग असा की, माझे ताईच्या कुटुंबासोबत शिखरजी ला जायचे ठरले, आमचे जेव्हापासून जायचे ठरले अगदी तेव्हापासून हा दिवस कधी येतोय याचीच आतुरतेने वाट बघत होते मी.. आणि... मग तो दिवस आला...मग काय संपूर्ण तयारीनी मी आणि ताईचा सर्व परिवार ..तयार झालो आणि निघालो... रेल्वे चा प्रवास चालू झाला, बघता बघता कसा वेळ गेला कळलेच नाही
रेल्वेत इकडे तिकडे फिरण्यात एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जाण्याची वेगळीच मज्जा? प्रवास खूप छान वाटत होता, बाहेर भरपूर हिरवीगार शेती ,उंच उंच झाड सर्वत्र निसर्गसंपन्नता होती..खाण्यापिण्याची मजा होती, सगळ्या गडबडीत रेल्वेचे ते सुखद धक्केही आनंद जाणवत होते.. सकाळी सकाळी आम्ही तेथे पोहोचलो... पोचलो तेव्हा तिथे रिमझिम पाऊस पडलेला होता, सर्वीकडे धुके पसरले होते, अंगावर स्वेटर्स चढवले आणि आराम करायला निघालो..
पहाटे वंदना करायसाठी निघालो पायरयाच्या दिशेने, पहिल्याच पायरीला वंदन केले आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली, वाटेत दिसणाऱ्या झाडाझुडपाचा आनंद लुटत आम्ही झप झप पायऱ्या चढू लागलो, जसजसे पार्श्वनाथा भगवान चे टोक,जवळ येत होते तसतसा भगवंताची प्रतिमा डोळ्यात भरायला जीव आतुरला होता, मंदिराच्या टोकाचा माथा कधी धुक्यात हरवत होता ,तर कधी दुरूनच दिसत होता, हिरवीगार चादर अंगावर ओढलेला निसर्ग मनात भरत होता ....
जवळ आलो मंदीराचे टोक नटून दिसत होते ,समोर पोहोचताच पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती पाहून जो काही हर्ष मनात झाला त्याच वर्णन मी शब्दात करू शकत नाही.. तरीपण, आज नयन माझे सुखावले तुझं मंदिर बघून शीश झुकले चरणाशी तुझ्या भगवंता तुझे तेज पाहून... कसा स्वर्ग नटलेला हा डोंगर-दऱ्या शी...तुझे नामस्मरण राहो देवा सदैव या ओठाशी ..
मंदिरामध्ये जाऊन सरळ दर्शन घेतले डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि मस्तक झुकवून आराधना केली भगवंताच्या मूर्तीला डोळेभरुन पाहत... पाहत बसले... असा सुखद अनुभव तेथे आला, आता वेळ आली होती परतीची आणि जड पावलांनी आम्ही आता निरोप घ्यायचा ठरवला.. सगळं कसं अगदी व्यवस्थित रित्या पार पडलं... तेथून परत यायचं.. मन काही मानत नव्हतं... आणि मग आम्ही निरोप घेतला, तो पुन्हा येईल असे ठरवूनच...
अफाट आकाश, हिरवी धरती
पूनवेची रात्र सागर भरती ,
पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी,
प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी,
अखंड नूतन मला ही धरती,
आनंदयात्री मी, आनंदयात्री...
पहाटेच्या गवतावरती नकळत दवबिंदूचे बसणे तसेच,
जीवनात महत्वाचे असते कडू-गोड आठवणी सोबत प्रवास करणे ...
