माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्र
माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्र


माझा बारावी झालेला भाऊ सुटीला मुंबईला आला होता यजमानांना सुटी नव्हती म्हणून मी माझी छोटी दोन मुले नि चार बहिणीतला एकुलता एक भाऊ कोयना एक्सप्रेसने कराडला गावी जायला निघालो. सुटीचे दिवसा असल्याने कोयना एक्सप्रेस तुडुंब भरली होती. छोटी मुले सोबत असल्याने मी खाऊ पाण्याच्या दोन मोठ्या बाटल्या सोबत आणल्या होत्या पण उन्हामुळे तहान भागत नव्हती. आणलेले पाणी संपले नि लहान मुलगा पाण्यासाठी काकुळतीला आला. लगेच स्टेशनही नव्हते .मी त्याला कसेबसे समजवत होते .
इतक्यात एका छोट्या स्टेशनवर रेल्वे थांबली .डोळ्याचे पाते लवते न लवते इतक्यात माझा भाऊ पाण्याची रिकामी बाटली घेऊन प्लॅटफॉर्मवरून पळताना दिसला .काळजात धस्स झाले .प्लॅटफॉर्मच्या नळाला पाणी नव्हते म्हणून तो तीन प्लॅटफॉर्म तीन ढेंगेत पार करून रस्त्याकडेच्या हॉटेलमध्ये पोहोचला. आता मी मारलेल्या हाकाही त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या .इतक्यात गार्डने सिग्नल दिला नि रेल्वे चालू झाली एकीकडे दोन्ही लहान मुले दुसरीकडे अठरा वर्षाचा भाऊ. काय करावे काही सुचत नव्हते .डोळ्यापुढे दिवसा तारे चमकू लागले .
सहप्रवासीही क्षणभर धास्तावले .पण कोणी काहीच करू शकत नव्हते .मी रडून गोंधळ करू लागले .मला रडताना पाहून दोन्ही मुलेही रडू लागली पण माझ्या रक्षाबंधनाची पुण्याई म्हणू की भावाचे नशीब पण तो खूप धावत येऊन त्याने रेल्वेत पाऊल टाकले. मला रडणे आवरत नव्हते .आज काय होऊन बसले असते .खिशात पैसे नाहीत असा मुलगा कसा घरी आला असता किंवा काही बरेवाईट झाले असते तर मी आईवडिलांना तोंड कसे दाखवले असते .मी त्याला मिठी मारून रडत होते सहप्रवासी बायकांनीही डोळ्याला आपले पदर लावले होते.
आमच्या भावाबहिणीच्या प्रेमाने सगळे सद्गदित झाले होते .पुरुष सहप्रवाशांनी मात्र भावावर चांगलेच तोंडसुख घेतले नि पुन्हा असे धाडस करू नकोस म्हणून सुनावले .आजही हा प्रसंग आठवला कि अंगावर काटा येतो.