माझे "ते" मंतरलेले दिवस
माझे "ते" मंतरलेले दिवस
पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात सर्वत्र गारठा पसरला होता... सकाळ होऊन बराच वेळ झाला होता तरी सूर्यनारायणाचा पत्ताच लागत नव्हता.. मनातील विचारांचे भाव सातत्य खंडित झाल्यासारखे वाटत होते आज माझे लग्न जे पक्के होणार होते.. थोड्याच वेळात गाडी चा आवाज आला, पाहुणे आले पाहुणे आले सर्व घरात आरडाओरडा झाला... काय होतंय मला कळत नव्हतं. सर्वजण घरात आले तो पण आला, समोर येताच मी, थोडा गालात हसला..☺️
त्याच्या ओठांवरचे हास्य मनाची अधीरता, अंतर्मनातून होणारी हुरहूर अधिक वाढवत होते... काही गप्पा रंगल्या व सर्वांच्या सहमतीने लग्नाचा मुहूर्त ठरला, लग्न जमले म्हणून आम्ही दोघे सर्वांच्या म्हणण्यानुसार माडीवरती बोलायला गेलो, त्याची -माझी झालेली ती पहिली भेट... पावसामुळे हिरवं झालेलं रान मनातही हिरवापण फुलून गेलं.. अचानक रिमझिम पाऊस सुरू झाला व दोघांना थोडं भिजून गेला... सृष्टीत वसंत ऋतु येतो आणि फुलवून जातो तसाच तो माझ्या आयुष्यात बहर घेऊन आला... तेव्हा असं वाटलं मृगनक्षत्राच्या सरीन ओला झालेला मातीचा पापुद्रा फुलावा अन क्षणात आसुसलेलं ते रान कस्तुरीचा सुगंधान भरून जावं असं त्याचं माझ्या आयुष्यात येणं झालं...आणि आमचं लग्न पक्क झालं...
थोड्याच दिवसात फोनवर बोलणं सुरू झालं.. जसे चंद्र उगवला रातराणीला लागली चाहूल तसे त्याच्या आयुष्यात पहिले टाकले मी पाऊल...
🌹🌷फुललेल्या फुलांचा सुगंध मनाला प्रसन्न करीत होता.. आकाशान कवेत घेतलेला इंद्रधनुष्य नुकताच फुलावा असा आयुष्याचा हा भाग अगदी मोहक दिसत होता...🌈
जीवनात प्रेमाला सर्वोच्च स्थान आहे प्रेम असेल तर अंधारलेलं जीवन प्रकाशमय होतं, तशीच प्रेमळ,सालस घरातील प्रेमाची आपुलकीची माणसं मला मिळाली... माळरानावरती नंदनवन फुलावं अशी सारी होती... प्रीतीचा स्नेहबंध हृदयात रुजवून असाच सुखी संसार आपण करावा.. अतूट नाती कशी जपता येईल याची धडपड ही चालू होती.. कारण श्रावणाच्या सरी सारखं बहरून आयुष्याची बाग मला फुलवायची होती.. हा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण रोमांचक असा काळ ठरत होता.. अनमोल या जीवनात आमच्या प्रेमाचा बहर आता फुलत होता..
जीवनाच्या वाटेवर त्याने माझ्याशी असेच सुसंवाद साधले त्याच्या सुमधूर संवादाने संगीत निर्माण झाले.. रेशमी धाग्याने विणलेली ही नाजूक ब्रह्म गाठ विश्वासाच्या पायावर आता ठामपणे उभी आहे असे जणू भासत होते. सप्तरंगी इंद्रधनुचे रंग जसे पडावे तसे वचनांची देवाणघेवाण, विचारांचे आदान-प्रदान करत व भविष्याची स्वप्ने रंगवत मी त्याच्या रंगाचे प्रतिबिंब त्याच्या हसऱ्या चेहऱ्यात न्याहाळण्याचा प्रयत्न करायचे ठरवत होते...
लग्नाला अजून तीन महिने वेळ होता तर आम्ही अधूनमधून भेटायचो, हातात हात घेऊन दूरवर फिरायचो कधी खूप हसायचो, कधी एकमेकांवर रूसायचो कधी अलगत भांडायचो.. कधी प्रेमळ रागवायचो.. आयुष्यातले ते गुलाबी क्षण मग मनसोक्त जगायचो पावसाच्या सरींनी मातीला गंध द्यावा तसा प्रीतीचा सुहास सोबत राहून दोघे अनुभवायचो... तासन तास गप्पा करत बसायचो.. काही कारणांनी फोन किंवा मेसेज आला नाही की मन खिन्न ह्वायच आणि दुसऱ्या क्षणासाठी मन आतुर असायचं.. त्याच्या आठवणीत रमताना खूप छान वाटायचं असंच आम्ही भेटायचो..
श्वासावर आयुष्य मग तरंगत जातं, कुणासाठी टाकलेल्या विश्वासावर आयुष्य रंगत जातं.. जेव्हा कोणीतरी आपल्याला जीव लावत, सर्वस्व मानत आपल्यासाठी झुरतं हे तेव्हा कळत जेव्हा आपल्या आयुष्यात कोणीतरी येतं... तोही असाच आला माझ्या आयुष्यात....😊
भारावलेल्या नजरेने पुन्हा ते क्षण बघावेसे वाटतात ओठांवर अलगद हसू आणावसं वाटतं... शब्द सुमनांनी पुन्हा त्या क्षणाचा स्वागत करावं वाटतं... आयुष्यभर असं त्याच्या सहवासात रहावस वाटतं.. जगातील सार सुख एकवटून त्याला द्यावं वाटतं...
मंतरलेल्या क्षणांच्या पापणीतून थेंबणारे सुखाचे मोती पापणीच्या धाग्यात वोवून घेताना नक्षत्राचं देणं हे आपल्याला लाभलेल असतं... आयुष्याकडून काही घेणं आता उरलेलं नसतं...
आज आठवण आली त्या अविस्मरणीय क्षणांची... लग्न पक्के झाल्यापासून तर लग्न होईपर्यंतच्या काळाची..☺️

