Shobha Wagle

Drama

2.3  

Shobha Wagle

Drama

माई

माई

7 mins
877


संध्याकाळचे पाच वाजले होते. बाहेर कोवळे ऊन पडले होते. थोड्या वेळापूर्वी एक जोरदार पावसाची सर येऊन गेली होती. त्यामुळे जमीन ओली होती व जिथे जिथे खाच- खळगे होते, तिथे तिथे पाणी साचले होते. बाहेरचे वातावरण प्रसन्न वाटत होते.


आज गुरुवार होता व माईंचा मठात जायचा नियम होता. चला पटकन जाऊन येऊ म्हणून माई लगबगीने उठल्या. तयार होऊन फुलांची परडी घेऊन घराबाहेर पडल्या. माई आता थकल्या होत्या. भरभर चालणे त्यांना आता जमत नव्हते, पण सावकाश चालत जाऊन यावे म्हणून त्या निघाल्या.


मठाचा रस्ता जरा अरुंदच होता. त्या सावकाश स्वतःला सांभाळून चालल्या होत्या, पण मध्येच खड्डा आला म्हणून त्या रस्त्याच्या बाजूला वळल्या. तेवढ्यात करकचून ब्रेक लाऊन एक आलिशान मोटार पार माईच्या जवळ थांबली. माई भांबावल्या, थोड्या घाबरल्या.


तेवढ्यात गाडीतला माणूस ओरडला, "ए म्हातारे, मरायचंय का? माझीच गाडी सापडली का तुला मारायला?" माई काही बोलायच्या आतच गाडीतला माणूस दार उघडून बाहेर आला. माई धास्तावल्या. त्या काही बोलणार तेवढ्यात तो माणूस त्यांचे पाय स्पर्शून म्हणाला, "मॅडम सॉरी, तुम्ही का? कुठे निघालात? तुम्हाला लागलं असतं ना?"


माई त्याच्याकडे बघतच राहिल्या. तेव्हा तो म्हणाला, "मॅडम मी तुमचा विद्यार्थी 'आनंद प्रधान' ९५-९६ सालच्या बॅचचा विद्यार्थी." तेव्हा माईंना आठवलं. पहिला नंबर काढणारा त्यांचा विद्यार्थी. "अरे आनंद, तू होय!" त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचे भाव उमटले. दोघांनी एकमेकांना ख्याली-खुशाली विचारून झाल्या.


आनंद शाळेतल्या एक एक आठवणी सांगू लागला व माईही त्या आठवायचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात आनंद बोलला, "चला मॅडम, मी तुम्हाला सोडतो. कुठं जायचंय तुम्हाला?"


“अरे इथेच मठात तर जायचे आहे. जा तू आता. मी जाईन." माईंनी कितीही नको म्हटले तरीही आनंदने त्यांना आपल्या जवळ पुढच्या सीटवर बसवले. वाटेत तो भरभर बोलत होता. त्याच्या आनंदाला उधाण आले होते. शाळेचे दिवस आठवून त्याला भरून आले होते.


"मॅडम तुम्ही भेटलात आणि माझ्या बालपणीचे शाळेचे चलचित्र डोळ्यासमोरून सरकून गेले." त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. त्याने माईंना मठात नेले, स्वतःही स्वामींचे दर्शन घेतले व माईंचे सगळे आटपून झाल्यावर पुन्हा माईंना त्याने घरी अाणून सोडले.


"मॅडम, पुन्हा भेटायला येईन मी," असे आश्वासन देऊन तो नमस्कार करून निघाला. विद्यार्थी भेटल्याने माईंना खूप आनंद झाला. त्याच्या मागच्या आठवणी ताज्या झाल्या.

माई सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. जवळ जवळ चाळीस एक वर्षे त्यांनी विद्यादानाचे कार्य केले. आदर्श शिक्षिकेचा बहुमान काही सरकारकडून त्यांना मिळाला नाही, पण मुलांच्या मात्र त्या आवडत्या होत्या. त्यांचे शिकवणे मुलांना आवडायचे. मुले त्यांच्या तासाची वाट पाहत असायची. पुस्तका व्यतिरिक्त त्या त्यांना बाहेरच्या जगाच्या चालू घडामोडीवर त्या त्या संदर्भात चर्चा करायला लावायच्या. वर्तमानपत्रातील कात्रणे संग्रह करायला लावायच्या व आठवड्याच्या शेवटी त्यावर चर्चा व्हायची. सर्व मुले उत्साहाने त्यात भाग घ्यायची. अशामुळे मुलांमध्ये वर्तमानपत्र वाचण्याची व समाजाला जाणून घेण्याची सवय निर्माण झाली.


त्याचप्रमाणे प्रत्येक मुलाने परोपकार किंवा दुसऱ्याला अडी- अडचणीत मदत करावी, असा माईंचा आग्रह होता व आठवड्याच्या शेवटच्या तासाला प्रत्येकाने आपण केलेल्या कामाची माहिती पुरवायची पद्धत सुरू केली. त्यामुळे मुलांच्या मनात समाज सेवेची गोडी निर्माण झाली व यामुळे माईंचे बरेचसे विद्यार्थी देशसेवेत व समाजसेवेत रुजू झाले.


माईंचे कुटुंबही सुखी व आनंदी होते. आई, वडील, दोन लहान बहिणी व एक लहान भाऊ. भावंडे तिला माई म्हणायची व तिचे आई-वडीलसुद्धा तिला माईच म्हणायचे. तल्लख बुद्धी, जिज्ञासू वृत्ती, जिद्द व चिकाटी अंगी असल्याने माईंनी लहान वयातच आपले शिक्षण पुरे केले व लगेच शिक्षिकेची नोकरी मिळवून वडिलांचा आर्थिक भारही ती उचलू लागली. सगळं कसं छान सुरळीत चाललं होतं. तिचे आई-वडील तिच्या लग्नाच्या तयारीला लागले होते. चांगली चांगली स्थळे तिच्यासाठी शोधत होते. तिची भावंडे सुद्धा "माई होणार आता नवरी" असे म्हणून तिची थट्टा-मस्करी करत होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते.....


एका कार दुर्घटनेत तिचे आई-वडील दगावले. माईवर आकाश कोसळले. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे सगळेच हळहळले. सुरुवातीला शेजारी-पाजारी, सग्या-सोयऱ्यांनी येऊन आधार दिला, सहानुभूती व आपुलकी दाखवली. पण जसे दिवस जाऊ लागले तसे हळूहळू सगळे पांगले. आपल्या आई-वडिलांच्या संसाराचा डोंगर माईंनाच पेलावा लागला. तिच्या दोन बहिणी कॉलेजच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाला होत्या. तर भाऊ नववीत होता. या तिघांची जबाबदारी माईंनाच उचलावी लागली. माईने जीवाचे रान करून तिन्ही भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. तिचे नातेवाईक तिच्यासाठी स्थळे आणत होते. पण माईंनी स्वतःचा विचार केला नाही. आपमतलबाचा विचार नाकारून आपल्या बहिणींचा विचार केला व त्यांना चांगली स्थळे मिळवून त्यांची लग्ने करून दिली. तिच्या दोन्ही बहिणी परदेशी स्थायिक झाल्या. तसेच छोट्या भावाला 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' केले. तो ही कंपनीमार्फत परदेशात नोकरी करू लागला आणि दोन-चार वर्षातच त्याने तिथल्या एका मॅडमशी लग्न जुळवले व तो ही परदेशात स्थायिक झाला. माई एकट्या पडल्या. बहिणी व भावाने त्यांना खूप आग्रह केला त्यांच्याकडे येऊन राहण्याचा, पण माई ते सगळं नाकारून आपली शाळा व आपली मुले यातच रमून गेल्या.


पण माई आता रिटायर झाल्यात. आता वेळ कसा घालवावा हा त्यांना प्रश्न पडला. सुरुवातीला त्यांनी मुलांच्या शिकवणी घेतल्या. पण नंतर मुलांची संख्या कमी होत गेली. आजकाल भरमसाठ फी व ऐसपैस 'एअर कंडिशन वर्ग' सुरू झाल्याने घरगुती व कमी पैशाच्या शिकवणीत मुलांना गोडी वाटेनाशी झाली.


एखादा अभ्यासू मुलगा माईकडे शिकवणीला यायचा. पण नंतर माईंनीच 'आता तो व्याप नको' म्हणून शिकवणी बंद केल्या. आता माई वाचन, लेखन, पूजा-अर्चा यातच वेळ घालवू लागल्या.


कधी कधी माईच्या मनात विचार यायचे, 'खरंच आपण मनोहरशी लग्न केलं असतं तर!'

मनोहर माईंच्याच शाळेत मुख्याध्यापक होता. खूप वर्षांपूर्वी त्यांनी माईंना सरळच लग्नाबद्दल विचारले होते. माईंनाही तो आवडत होता. पण तो मराठा होता. आपल्या आई - बाबांना तो चालेल की नाही ही शंका तिच्या मनात होती.


आपल्या लग्नाबद्दल घरी बोलणी सुरू आहेत, तेव्हा एक दिवस चांगली संधी बघून आपण मनोहरचा विषय काढावा याची ती वाट बघत होती, पण तेवढ्यात आई-वडिलांच्या अपघाती निधनामुळे ते सर्वच राहून गेले. वडिलांच्या संसाराची जबाबदारी तिच्या खांद्यावर पडल्याने तिने स्वतःचा विचारच केला नाही.


अशा कठीण परिस्थितीतसुद्धा मनोहरने पुन्हा एकदा विचारले होते. तिच्या भावंडांची जबाबदारी घ्यायला तो तयार होता. पण माईंनी आपल्या आई-बाबांचे कर्तव्य आपल्यालाच नीट पार पडायचे ठरवून मनोहरला सरळच "आता माझा विचार तू सोडून दे" असे सांगितले. मनोहरही शेवटी कंटाळला व त्याच्या आई -वडिलांनी ठरवलेल्या एका गावच्या मुलीशी त्याने लग्न उरकून घेतले. माईही त्याच्या लग्नाला गेल्या होत्या. त्या नवरी पेक्षा माई कितीतरी पट उजव्या दिसत होत्या. लग्न मंडपातसुद्धा माई तिच्या जागी स्वतःला पाहत होत्या, पण....


दिवसामागून दिवस व वर्षा मागून वर्षे सरू लागली. मनोहर ही रिटायर होऊन गावी राहायला गेला. माईंना त्यांची पत्रे यायची पण हळूहळू माईंनीच ती बंद केली. त्याच्या सुखी संसाराला आपल्यामुळे तणाव नको म्हणून माईंनी पत्रव्यवहार थांबवला.


माईच्या बाकीच्या मैत्रिणीसुद्धा हळूहळू दुरावल्या. कुणी आपल्या लेकाकडे अमेरिकेला तर कुणी आपल्या लेकीकडे राहायला गेल्या. अधून मधून फोन येत पण जास्त ना बोलता जुजबी विचारपूस करत. फोन आला की माईंना तेवढाच विरंगुळा वाटत असे.


एक दिवस सकाळी दारावरची घंटी वाजली. माई हडबडून उठल्या. स्वतःला सावरत त्यांनी दार उघडले. बघावं तर दारात मनोहर आपल्या दोन मुलांसाहित उभा. त्या चकित झाल्या. 'आ'वासून त्याच्याकडे बघतच राहिल्या.


"अगं, दार उघड, मी मनोहर." माई भानावर आल्या. त्यांनी दरवाजा उघडून त्यांना आत घेतले. "असा कसा काहीही न कळवताच अचानक आलास? आणि बायको कुठे आहे? तिला का नाही आणली सोबत?" असं विचारताच मुलांचे व मनोहरचे डोळे पाणावले. "यांची आई देवाघरी गेली. तिला कॅन्सर झाला होता. आम्हाला फार उशिरा कळले. सगळे उपाय केले पण काही उपयोग झाला नाही."


"अरे! मग मला काहीच कसे कळवले नाही?"


"नाही गं. सगळे भांबावून गेलो. काही सुचले नाही. आता जवळ जवळ वर्ष होणार या गोष्टीला. गेल्या आठवड्यात आम्ही जुने फोटो पाहत होतो. त्यात तुझाही फोटो होता. तुझ्याबद्दल मी मुलांना सांगितलं. मुलांनाही तुझ्याबद्दल कुतूहल वाटलं म्हणून तुला भेटण्यासाठी आलो. मुलांनीच आग्रह धरला म्हणून अचानक काहीही न कळवता आलो.”


चहापाणी सगळं झाल्यावर मनोहरचा मोठा मुलगा विवेक म्हणाला, "माई, बाबांनी आम्हाला तुमच्याबद्दल सगळं सांगितलं. तुमच्याबद्दल आदर व अभिमानही वाटला. पूर्वी कितीतरी वेळा लग्नाची गळ घातली, पण तुम्ही ती कधीच मान्य केली नाही. माई, तुम्ही आता तुमच्या वडिलांच्या कर्तव्यातून मुक्त झालात. तुमची भावंडे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. बाबांचाही संसार झाला. आता त्यांच्या उतारवयात आमच्या आईची त्यांना साथ नाही. आज ना उद्या आमचे लग्न होणार. आम्हीही आमच्या संसारात रमणार. पण बाबा मात्र एकटे पडतील! पूर्वीपासून तुम्ही बाबांना अवडायचात व आताही आवडता. आम्हाला माहीत आहे तुमचंही बाबांवर तेवढंच प्रेम होतं. माई, लहान तोंडी मोठा घास घेतो व आग्रहाची विनंती करतो की तुम्ही आता बाबांशी लग्न करावे. माई, आता एकटेपणा बस झाला, तुम्हाला आमचे ऐकावेच लागेल."


"अरे, आता म्हातारवयात काय लग्न," माई लाजून बोलल्या.


विवेक म्हणाला, "माई, तुम्ही शिक्षिका होत्या ना?  नवरा- बायकोची खरी सोबत कधी लागते, या उतारवयात ना? आपल्या समाजात एक पुरुष व एक स्त्री एकत्र राहू शकत नाहीत, मग ती कोणत्याही वयोगटातील असोत. समाजात मानाने राहण्याकरिता लग्न हा एकमेव पर्याय आहे, आणि तोच तुम्ही निवडावा असे आम्हाला वाटते.” असे म्हणून विवेकने त्याच्या बाबांकडे पाहिले. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांबद्दलचा अभिमान ओसंडून वाहत होता. त्यांच्या प्रेमाने काठोकाठ भरलेल्या डोळ्यांकडे पाहत विवेक म्हणाला, "बाबा सॉरी, तुम्हाला आम्ही काहीही कल्पना दिली नव्हती. पण बाबा आमचं म्हणणं पटतं ना तुम्हाला? तुमची परवानगी आहे ना?"


मनोहरने हसून माईकडे पाहिले आणि म्हणाले, “काय गं रमा, आता तरी करते ना माझ्याशी लग्न?" माईंनी डोके वर केले. त्यांचेही डोळे पाण्याने भरले होते. 'ईश्श' म्हणत त्या एक नावयुवती सारख्या लाजल्या.


विवेकला हायसे वाटले. तो एकदम आनंदित झाला व म्हणाला, "चला तर आई-बाबा, आजच आपण मॅरेज कोर्टात जाऊन रजिस्टर लग्नाची नोटीस देऊ." असे म्हणून त्याने माई व बाबांना वाकून नमस्कार केला व माईंना म्हणाला, "माई, आजपासून मी तुम्हाला आई म्हणेन हां!"


धाकट्या सुबोधनेही त्याचे अनुकरण केले. माईंनी दोघांनाही जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. नंतर माई व मनोहरची वरात मॅरेज कोर्टाकडे निघाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama