Jyoti gosavi

Horror

4.5  

Jyoti gosavi

Horror

लग्नाची वरातभुताच्या दारात

लग्नाची वरातभुताच्या दारात

6 mins
1.2K


"वाजंत्री बहु गलबला न करणे "

असं भटजीने म्हटलं आणि आंतरपाट बाजुला झाला, नवरा नवरीनी एकमेकाच्या गळ्यात हार घातले. हातात होत्या नव्हत्या त्या सगळ्या अक्षदा नवरा नवरीवर आणि समोरच्या वर फेकून, मंडळी जेवणाचा नंबर पकडण्यासाठी धावायला लागली. लग्न गोरज मुहूर्तावर लागलं. त्यातून ऑक्टोबर-नोव्हेंबर चे दिवस अंधार लवकर पडायच्याआत बिगीबिगी जेवण आटपून जो तो आपल्या घरला जायच्या मागं होता. मांडवाच्या खाली पंगती मांडल्या, जो तो आपल्याला घावल ती जागा पकडून बसला. पाहुण्यांसमोर पत्रावळ्या ठेवल्या ,द्रोण दिले, तो काळ काही, कार्यालयात लग्न करण्याचा किंवा बुफेचा काळ नव्हता. साधारणपणे लग्ने मुलीच्या गावी व्हायची. पोरीच्या दारासमोर मांडव टाकला जायचा आणि सगळे पाहुणेरावळे मदतीसाठी म्हणून आठ दिवस आधी लग्न घरी उतरायचे. प्रत्येकजण येताना आपल्याबरोबर तहान लाडू, भूक लाडू घेऊनच यायचे. कोणी कानवल्याच्या दुरड्या, कोणी आनारसे, कोणी लाडू घेऊनच येत असत. रोज सकाळच्या नाश्त्यासाठी एकाच पराती मध्ये दहा-बारा बुंदीचे लाडू आणि घमेलभर चिवडा पाठवला की झालं. कच्छी बच्ची नाश्ता करून मांडवात धुडगूस घालत असायची. पुरुष मंडळी मांडवाखाली विड्या काड्या तंबाखू याची देवाणघेवाण करायची.

मोठे मोठे चुलाण पेटवून त्याच्यामध्ये एकात भात एकात आमटी हे काम पुरूष मंडळी बघायची, वांग बटाट्याची भाजी पण पुरुष मंडळी करायची.

फक्त दोन तीनशे चपात्या नाहीतर शंभर-दीडशे भाकऱ्या बायका मंडळी घरात करायची. सगळ्यांची एकत्र जेवणखाण व्हायची, सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या, त्यात लग्नात लग्न ठरायची, माझ्या भावाची पोरगी तुझ्या मावशीचा पोरगा त्यातच हेरून ठेवले जायचे आणि पुढचं लग्न ठरायचं. लग्नाच्या दिवशी मात्र सगळ्याच मंडळींची आपापल्या गावाकडे पळण्याची घाई. फक्त मोजकीच मंडळी मागच्या  आवराआवरी साठी आणि काही कमी-जास्त पैसाअडका लागला तर मदतीसाठी  थांबत. बाकीचे सगळे कवा एकदाच जेवण करतोय आणि आपल्या गावाला पळतोय त्याचीच वाट बघत असायचे. वाढणारे देखील आपले नातेवाईकच असत. मंडळी जेवणाचा नंबर पकडून बसली, पहिला भात वाढणारा आला दणादणा सगळ्या पत्रावळीवर भाताचे ढिग टाकत गेला. मग प्रत्येकाने एका साईडला आपले द्रोण भातांमध्ये व्यवस्थित लावून घेतले. आमटी वाटणारा तर कुठलातरी जन्माचा सूड उगवल्या सारखा अशी गरमागरम आमटी प्रत्येक द्रोणात ओतत अक्षरशः पळत होता. त्याचे जळजळीत शिंतोडे कोणाच्या ना कोणाच्या अंगावर उडत होते. त्यानंतर मिट्ट गोड गरमागरम शिरा, आणि अर्धा उकडलेला बाजेवर टाकलेला भात. आणि बुंदीचे लाडू , वऱ्हाडी मंडळींनी जेवणावर आडवा हात मारला आणि शांतपणे परतीसाठी येणाऱ्या वाहनांची वाट बघू लागले.

वऱ्हाड नेण्या-आणण्यासाठी त्यावेळी ट्रक वापरले जात. सकाळी वऱ्हाडाचा ट्रक त्यांना लग्न गावी सोडून गेला होता संध्याकाळी लग्नाच्या मुहूर्ताला आणि पहिल्या पंगतीला जेवायला येतो असं सांगून जो गेला, तो वाजंत्र्याची पंगत झाली तरी त्याचा पत्ता नव्हता. मंडळी मांडवातच हळूहळू आपापल्या बॅगांना टेकून कलंडू लागली. नवरा नवरी पण दिवसभराच्या दगदगीने थकलेले होते. उगाच आपलं "बळ बळ" तोंडावर हसू आणून जमलेल्या लोकांशी बोलत होते. रात्रीचे नऊ वाजून गेले तरी ट्रकचा पत्ता नव्हता. 

तेव्हा काही मोबाईल नसल्यामुळे लगेच कॉन्टॅक्ट करता येत नव्हते.

पोरीच्या बापाने पुन्हा एकदा वर्‍हाडी मंडळी साठी कढी भाताचा मेनू केला. सर्वांना रात्रीचे जेवण दिले. एवढी वर्‍हाडी मंडळी परत पाठवायची तर त्या खेडेगावात कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. वाट बघण्याशिवाय  गत्यंतर नव्हते .रात्रीचे जेवण खाऊन मंडळीची एक एक डुलकी झाली. नवरा-नवरीच्या कडेची गर्दी आता ओसरली, लोकांचे कुतुहल संपले. दोघंच एकमेकाच तोंड बघत बसले. नवरी पण आत जाऊन आपल्या घरात झोपली .नवरदेव तिथेच बाजेवर झोपला. जी जबाबदार माणसे होती ती येणाऱ्या ट्रकची वाट पाहत बसून राहिली. सामानाचे सारे नग, रुखवताचे सामान, नवरीला दिलेल्या वस्तु सारे काहि पॅकिंग करून झाले होते. अकरा साडे अकरा च्या दरम्यान ट्रक आला, आणि सगळी मंडळी ड्रायव्हर वरती तुटून पडली.

ही काय वेळ आहे येण्याची?

"एक तर लग्नाच वऱ्हाड जायचंय ! रात्री-अपरात्री घाटातून जावे लागेल असं कधी असतं का? पाहुणे तुम्हाला काही समजतं की नाही?

ट्रक ड्रायव्हर ने सारे शांतपणे ऐकून घेतले आणि एकच वाक्य सांगितले, माझी गाडी घाटात पंक्चर झाली होती.

तो दुपारी तीन वाजल्यापासून घाटात अडकून पडला, शिवाय त्या रस्त्याने एवढी वर्दळ नसल्याने त्याने एकट्याने टायर काढून पंक्चर काढून आणण्यासाठी नेला. दुसऱ्या वाहनाची वाट बघत बसला जेव्हा दुसरा ट्रक आला तेव्हा त्याने जवळच्या शहरात जाऊन पंक्चर काढून आणले , पुन्हा जोडले आणि तो आता गाडी घेऊन आला. तो दुपारपासून उपाशी आहे म्हटल्यावर पहिला त्याला कढी भाताच जेवण खाऊ घातलं. रुखवतात बांधलेले दोन लाडू काढून त्याच्या ताटात वाढले. शेवटी ड्रायव्हरला जपायला पाहिजे त्याने गाडी बरोबर नेली तर सर्व मंडळी नीट पोहोचतील. एकदाची वर्‍हाडी मंडळी मार्गाला लागली मुलींच्या घरच्यांनी सगळं सामान ट्रक मध्ये चढवून दिलं . 

आता निरोप घेताना रडायला देखील वेळ नव्हता, कारण एवढा वेळ कधी एकदा हीची पाठवणे करतो असंच घरच्यांना झालं होतं. आणि आता जाते म्हणल्यावर थोडीशी रडारड झाली. सर्वांना टाटा, बाय -बाय करून एकदाचा ट्रक मार्गाला लागला.

तर साडे अकरा बारा वाजता वऱ्हाडी मंडळी निघाली .पुढे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये नवरा नवरी नवरदेवा कडची करवली आणि नवरीची करवली आणि वरबाप एवढी माणसे बसवली. ट्रकच्या पाठीमागच्या भागात प्रथम बच्चेकंपनीला कोंबलं, कोणाची झोपलेली ,कोणाची पेंगलेली, मधल्या भागात बायका मंडळी, आणि ट्रक च्या शेवटी तोंडापाशी हवा खायला सगळी पुरुष मंडळी. कोणी बाहेरून लटकत होते तर कोणी आतल्या बाजूने ऐसपैस उभे होते.

सगळी मंडळी आपापसात काही ना काही बडबड करत होती.

जसा घाटाचा रस्ता लागला तसं सगळे एकमेकाल "ये घाट लागला गप्पबसा! घाट लागला गप्प बसा असे दटावून सांगत राहिले.

दाट किर्र अंधार, झाडांच्या वेड्यावाकड्या सावल्या, आणि या गावाकडच्या मंडळींना असं रात्री बारा वाजता वगैरे बाहेर पडणं कधीच माहीत नव्हतं आता रस्त्याने वाहने देखील नव्हती यांचा एकुलता एक ट्रक रोरो आवाज करीत रस्त्याने चालला होता आता ट्रकमध्ये एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होता.

एवढ्यात ड्रायव्हरने घाटामध्ये ट्रक एका बाजूला लावला. का रे! बाबा गाडी बाजूला लावली? नवरदेवाच्या बापाने विचारले

"अहो दाजी! समोरून ट्रॅक्टर येतोय मागं ट्रॉली जोडलेली आहे रस्ता बारका आहे त्यांना पास देण्यासाठी मी बाजूला गाडी लावली.

ड्रायव्हरने सांगितले त्याबरोबर पुढच्या केबिन मधली मंडळी थंडगार पडली कारण कोणालाच ट्रॅक्टर दिसत नव्हता. आवाज देखील येत नव्हता.

एक तर असा उशीर झालाय! केव्हा एकदा घरी पोहोचतोय असं झालंय आणि तुला आता गमजा सुचतीया व्हय?

तुला काय तंबाखू- बिंबाखू खायची असेल तर खा!. आणि लवकर लवकर चल.

अहो दाजी! मी कशाला गंमत करू?

एक तर दुपारधरन जीव कावलाय!

कवा एकदा घरला जाऊन पडतोय असं झालंय ! अहो खरच समोरून ट्रॅक्टर येतोय, तो पण तिकडे रस्त्याच्या बाजूला उभा राहिलाय मला वाटल तो पुढे येईल त्याला वाटतंय मी पुढे येईल.

रात्रीच्या प्रवासात सोबत असावी म्हणून मुलीकडचे चे दोन बापे गडी सोबत होते हळूहळू पुढे काय झालंय ही बातमी पाठीमागे पसरलेली, त्यातला एक जण ट्रकला लटकत लटकत पुढच्या केबिन पाशी आला आणि एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन त्याने पोराच्या बापाला विचारलं "पावन" तुमच्याजवळ आता नारळ आणि लिंब आहेत का? गावातून गाडी काढताना गाडी समोर नारळ फोडलेला होता. नवरा नवरी वरून भाताचे मुटकुळी उतरून टाकली होती तरीपण आता मध्येच काय म्हणून वर बाप तोंडाकडे बघू लागला. पावन तोंड बघत बसायची वेळ नाही सांगतो ते पटदिशी द्या.

मधल्या खिडकीतून तोंड काढून पाहुण्याने पाठीमागे ऑर्डर केले एक नारळ द्या, दोन लिंबू द्या ,अंधारात बोचकी -बाचकी शोधत शोधत कुठे झोपलेल्या पोरांच्या अंगावर पाय देत एक नारळ दोन लिंबू शोधून काढली. ड्रायव्हर दादा! बिनघोर ट्रक काढा," ट्रॅक्टर आपल्याला पास देईल"

"अरे हनुमंता! तुझ्याच बहिणीचं वऱ्हाड चाललंय आणि तू असा का मध्येमध्ये येतोस? जाऊदे बर आम्हाला! तो माणूस बोलला आणि आपल्या हातातला नारळ ठाप दिशी खाली आपटला. नेहमीपेक्षा ढुप्प ढुप्प वेगळा आवाज करीत नारळ फुटला. लिंबू कापून दोन्ही दिशेला टाकले आणि ड्रायव्हरच्या नजरेसमोरून तो ट्रॅक्टर संथपणे निघून गेला. ट्रॅक्टर चालवणारा समोर न बघता यांच्या ट्रक कडे बघत बघत गेला.

"याला काय झालं? खुन्नस देऊन बघायला ड्रायव्हर बडबडू लागला. मी तर याला साईड दिली होती,

तेवढ्यासाठी एवढा वेळ मी बाजूला गाडी घेऊन उभा राहिलो, इकडच्या लोकांचा तर उलटाच कारभार आहे.

चला चला भाऊ ,लवकर चला वेळ घालवू नका उशीर होतोय पाहुण्याने सांगितलं.

वऱ्हाडी सुखरूप घरी पोहोचले.

दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला खरी गोष्ट कळली, तो ट्रॅक्टर फक्त त्यालाच दिसत होता बाकी कोणाला दिसलाच नव्हता. त्याच गावचा हनुमंता नावाचा मुलगा शेतातून ट्रॅक्टर आणि ट्रॉली रात्रीच्या वेळी घेऊन येत असताना, रस्त्याचा अंदाज न आल्याने दरीत कोसळला होता आणि ड्रायव्हरचा जागेवर मृत्यू झाला होता .अधून मधून बऱ्याच लोकांना किंवा गावकरी मंडळींना रात्रीच्यावेळी घाटातून येताना सदर ट्रॅक्टर दिसत असे.

ही गोष्ट त्या गावातल्या पाहुणेमंडळी ला माहित होती म्हणूनच त्याने आपल्याकडची दोन माणसे सोबत दिली होती. तसा हनुमंत कोणाला इजा करीत नव्हता. या मंडळींनी तुझ्याच बहिणीचं वर्‍हाड निघालंय म्हटल्यानंतर तो निघून गेला. जाताना पण ड्रायव्हरचा ट्रक त्या जागीच पंक्चर झाला होता म्हणजे हनुमंताच्या मनात काय होते कोणास माहिती, कोणी साईड दिले नाही तर ते वाहन मात्र नक्कीच दरीत कोसळत होते.

त्यानंतर ड्रायव्हर मात्र दोन दिवस तापाने फणफणला आणि भीतीने घराबाहेर पडत नव्हता आयुष्यात पुन्हा कधीच आपण त्या घाटातून गाडी घ्यायची नाही हे त्याने मनोमन ठरवले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror