लाडक्या नवऱ्याला पत्र
लाडक्या नवऱ्याला पत्र
प्रिय दीपक,
काय म्हणू तुम्हाला? नवरा, सखा, मित्र, सुहृद, जिवलग, आणि सर्वकाही. तुम्ही माझे सर्वस्व आहात. सर्व काही आहात. एकोणतीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी माझा हात तुमच्या हाती दिला परंतु आजतागायत कधीही त्याबाबत मला पश्चाताप करण्याची पाळी आली नाही . माझ्यावर अतिप्रचंड प्रेम करणारा, माझ्या प्रत्येक गोष्टीचा, माझ्या जीवाचा विचार करणारा, असा साथीदार मिळणे मी माझे भाग्य समजते.
याचा अर्थ असा नाही गेल्या एकोणतीस वर्षात भांड्याला भांडे लागलेच नाही. उलट खूप वेळा लागले. अजूनही लागते पण ते सारे पेल्यातील वादळ असते. ते तिथल्या तिथे शमतेे. आपल्या दोघांचाही स्वभावाचा आहे की जिथे मनात गोष्ट धरणे, मनात डूख धरणे हे आपल्याला माहित नाही. आयुष्यात खूप चढ-उतार आले. पहिला महत्वाचा टप्पा 1999 जेव्हा काही कारणास्तव तुम्ही दोन वर्षे कंपनी बाहेर होतात, तेव्हाही मला कधी वाटले नाही की तुम्ही घरात बसलेले आहात. आणि तुम्हाला तर इतकी जाणीव होती की तुम्ही मुलाला शाळेत सोडायला पण स्कूटर न वापरता पायी पायी जात होतात. मी घरात बसलोय बायको एकटी संसार ओढते आहे याची तुम्हाला खूप जाणीव होती. उलट मीच ओरडत होते तुम्ही स्कूटर घेऊन जा म्हणून. आयुष्यातून तो प्रसंग निभावला .
आपली हिंडण्याफिरण्याची आवड मात्र समान, आठ-दहा दिवस फिरायला जाऊन आपण वर्षभराची एनर्जी घेऊन येतो. आयुष्यातला दुसरा प्रसंग मला करोना झाला त्यावेळी, माझ्या पेक्षा जास्त तुम्हीच आतून कोलमडला होतात. आणि माझ्यावर असणारे प्रचंड प्रेम तेव्हा दिसले. असो अशा किती गोष्टी असतील या आपण जोडीने हातात हात घालून सुखा दुःखाला सामोरे गेलो.
हा! आता प्रत्येकामध्ये दुर्गुण असतात, व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण दोष दोन्ही असते. अगदी सद्गुणांचा पुतळा कोणीच नसते. विनाकारण किरकिर करणे, आणि थोडासा कंजूषपणा हे तुमचे दुर्गुण पण आता त्यांची देखील सवय झालेली आहे. तुम्ही आहात तश्या गुणा दोषा सकट मला प्रिय आहात आणि परमेश्वराजवळ प्रार्थना देवा जन्मोजन्मी हाच नवरा दे जरा जरा नवीन मॉडेल केले तरी चालेल काही गुणदोष सुधारले तरी चालतील पण शेवटी आतील व्यक्ती मात्र दीपकच हवी.
तुमची
सौ ज्योती
