Sarita Sawant Bhosale

Drama Inspirational Others

3.3  

Sarita Sawant Bhosale

Drama Inspirational Others

कोरोना आला रे!!!

कोरोना आला रे!!!

5 mins
226


गावाच्या वेशी वरून गणू पळतच घरच्या दिशेने आला. धापा टाकत आजी आजी ओरडायला लागला तशी त्याची आजी नातू कुठे पडून हात पाय फोडून आला का काय अशा आवेशातच बाहेर आली.नातवाला समोर धडधाकट उभा बघून म्हणाली, "दिस्तुयस तर नीट..मग काय झालंय एवढं पळत यायला?? कोण गेलं का कोरोना आला गावात??"

 "होय आजी कोरोनाच आलाय आपल्या गावात"

"काय?? गप बस्स.. उगा कायतरी अभद्र बोलू नग या यळला. इतकं दिस गावात काय नाही आपल्या अन आताच कुठंन यील त्यो."


"आग तीच तर सांगतोय...तो मुंबई वरून आलेला की नाही माणूस जो शाळेत क्वारंनटाईन होता त्यालाच कसतरी व्हायला लागलं म्हणून घेऊन गेलेत आता ambulance मधून...मला वाटतंय बघ त्याला झाला असलं कोरोना आणि त्याला झालं की मग काय खरं नाही आपल्या गावाचं." गणुने सांगितलेली बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गावभर पसरली. मिनिटभर लोक पुतळा झाली आणि पुन्हा पूर्वस्थितीत येऊन नेलेला माणूस कोरोना पॉझिटिव्ह येऊ नये एवढीच प्रार्थना मनोमन देवाला करू लागली. पण तो पॉझिटिव्ह आलाच तररर???? रस्त्यात,दुकानात,पारावर,गल्ली बोळात एकच चर्चा..गावात कोरोना आला तररर???? रात्र कशीतरी सरून दुसरा दिवस उजाडला आणि गावातून नेलेल्या माणसाला कोरोना झाला आहे असा रिपोर्ट आला...तशी ही बातमी गावातील कानाकोपऱ्यात अगदी कुत्री, मांजरं, जनावर सगळ्यांनाच कळली. हातात असलेली कपबशी थरथरू लागली, कोणाचा चहाचा पहिलाच घोट नरड्यात अडकला...स्वयंपाक घरात हातातली भांडी जमिनीवर आदळून निनाद झाला...एका क्षणासाठी संपूर्ण गाव फ्रीज झालं. 

 

कोण माणूस, कुठला माणूस,कुठे राहतो..काय काम करतो...कुठून आला सगळं सगळं डिटेल चर्चा घरा घरात रंगली आणि सगळ्यांच्या पुढ्यात एकच प्रश्न....आता पुढे काय होणार??? तितक्यात गावात ambulance आली. कोरोनाबधित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आठ नऊ माणसांना भराभरा शोधून,गोळा करून ambulance मध्ये कोंबल आणि गावाच्या बाहेर गाडी गेली. वसू आक्का धावत पळत पुढे आली तस कोणीतरी विचारलं काय झालं आक्का??


"अग म्हणत्यात माझ्या पोराला बी नेलं...बघते की जरा" 


तोवर हौसा रस्त्याने ऊर बडवीतच आली, "आता काय करू..माझ्या नवऱ्याला त्या गाडीतन नेलं...तरी हारामखोराला सांगत व्हते घराबाहेर पडू नको पण मुंबईवरन मित्र आला आणि हा पागल झाला..आता कितीवर पडलं ही"


वसू आक्काही हौसाला साथ देत मोठमोठ्याने रडायला लागली. कधी नव्हे ते भगवान दादाच्याही डोळ्यात पाणी बघितलं.. डोळ्यातलं अश्रू पुसत ते म्हणत होते, "तरी आमच्या आबाला सांगीतलेल कोरोना आजार आलाय बाजूच्या गावात..कुठंच बाहेर जाऊ नका तरी त्यांनी ऐकलं नाही..आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी हे असं लांब घराबाहेर एकटच...कसं करणार ते..कस जमेल त्यांना" बोलणंही पूर्ण न होता दादांना हुंदका अनावर झाला. तशी त्यांची बायको त्यांना सावरत म्हणाली, "आबांना म्हणलं तरी काय ऐकलं नाही त्यांनी...आता तिथं कोण कस बघतील..काय खायला घालतील..त्यांना तर रोज भाकरीच लागते..तिथे भाकरी न खर्डा मिळल का...कधी परत यायचं आबा..का ओ आबा तुम्ही आमचं ऐकलं नाही" तिचही काळजीने काळीज आता पिळवटून निघालं. ज्यांना घेऊन गेले त्यांच्या घरच्यांची,नातेवाईकांचे डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. टिव्हीत बघितलेला, गावाबाहेर ऐकलेला कोरोना म्हणता म्हणता गावात आला आणि होत्याच नव्हतं करून गेला..आपल्या माणसांना अचानक आपल्या माणसापासून दूर घेऊन गेला...आणि अचानकच दूर गेलेल्या माणसाची उणीव जाणवू लागली..त्याच्या काळजीने घशाखाली अन्न जाणं मुश्किल झालं. सगळ्यांची तक्रार एकच होती की घराबाहेर पडू नका सांगितलं असताना का पडले हे लोक???

   

नातेवाईकांच टाहो फोडणं चालू असतानाच एक जण म्हणाला, "मुंबईवरुन आला आणि गावाला अशुद्ध करून गेला..तरी सांगत होतो यांना प्रवेशच देऊ नका गावात" त्या गृहस्थांच बोलणं मध्येच थांबवत एक तीसेक वर्षाचा तरुण म्हणाला,


"काका तुम्ही म्हणताय तो मुंबईवरून आला...मान्य आहे तो आला पण तो स्वतःहून क्वारंटाईनही झाला इथल्या शाळेत...पण त्याचेच काही मित्र मंडळी रोज त्याला भेटायला यायला लागली..त्याच्या घरचेही त्याला लांबून डबा देत असताना हे मित्र मंडळी मात्र खुशाल त्याच्या बाजूला जाऊन गप्पा मारत बसायचे तेही सगळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून. एक दिवस तर चक्क सगळ्यांनी ठरवून रात्रीची सार गाव झोपल असताना दारूची पार्टी केली...( दारू पिणाऱ्यांना दारू कुठूनही मिळतेच). रोज त्याला तंबाखू आणून दे, गुटखा आणून दे अजून काय पान सुपारी आणून दे हे सगळे धंदे गावातील लोकांनीच केलेत तेही सरकार घरात राहा सुरक्षित राहा अस बोंबलत असताना देखील. सांगा चूक कोणाची?? मुंबई वरून आलेव्यक्तीची की गाववाल्यांची??? एक दारूचा घोट, एक तंबाखूची पुडी, टाळीला दिलेली टाळी आज किती महागात पडली त्या मित्र मंडळींना देखील पण या बाबी कोण अधोरेखित करणार??? आता तुम्ही म्हणाल की मित्र मंडळी भेटायला जाईपर्यंत गावातली जबाबदार माणसं काय करत होती??? ती लक्ष ठेऊन होतीच जमेल तसं पण त्यांनाही वाटलं गावातील जनता सुज्ञ आहे...भारताची जबाबदार नागरिक आहे त्यामुळे नियम पाळून स्वतःसह इतरांच्या जिवाचीही पर्वा नक्कीच करतील. पण याचाच गैरफायदा घेऊन हे महाशय मैत्रीत्व निभवायला रात्रीचे चोरून पार्टी करायचे. दोष सुजाण नागरिकांचा की मग प्रशासनाचा?? पोलीस, डॉक्टर, सरकारी यंत्रणा, गावपातळीवरील टीम प्रत्येक जण आपापल्या परीने या परिस्थितीशी दोन हात करण्याचा प्रयत्न करतच आहे पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी योग्य ती काळजी घेणं आपलं कर्तव्य नाही का?? बाहेरून येणाऱ्यांना दोष देत बसण्यापेक्षा आपण कसे सुरक्षित राहू यावर भर दिला तर बऱ्याच गोष्टी टाळता येतील.


तरुणाच्या बोलण्याने सगळ्यांच्या डोळ्यात जळजळीतत अंजन घातलं..तेवढ्यातच आलेल्या पोलीस गाडीमुळे सगळे भानावर आले. आता पोलिसांचीही दांडकी पार्श्वभागावर पडण्याआधी सगळ्यांनी धूम ठोकली. दोषारोपच्या कात्रीत अडकलेली गावातली जनता क्षणभरात चहुबाजूला पांगली. गावात कोरोनाबधित रुग्ण आढळल्याने तुमचं गाव सील केलं गेलं आहे..कोणीही गावाबाहेर जाऊ नये व बाहेरील माणसास गावात प्रवेश निषिद्ध आहे अशी घोषणा झाली. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दांडकाचा रंग दाखवायला सुरू केली. घरोघरी जाऊन Thermal screening सुरू झालं. गाव निर्जंतुकीकरण करण्यात आलं. प्रत्येक जण आपला जीव मुठीत घेऊन घरात एकच विचार करत होता , "सुरक्षित घराचे दरवाजे तोडून काही जण घराबाहेर पडलेच नसते तर??? दारू,तंबाखू सारख्या व्यसनाचा मोहाचा एक क्षण टाळला असता तर??? अजूनही आठ नऊ जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे पण तरीही सुरक्षित छतापासून, आपल्या माणसांपासून अनोळखी जगात एकाकी जगणं जगण्याची वेळ तर आलीच ना आणि त्यातून काही जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेच तरर...तरर पुढे अजून किती जणांचा प्रवास असा गावाच्या बाहेर ambulance मधून होईल???...जे गेलेत ते सुखरूप परत येतील??? एकनाअनेक प्रश्न पण अनुत्तरित.


त्या दिवसानंतर गाव सुन्न झालं. संशयित म्हणून घेऊन गेलेल्या घरच्यांची अवस्था गावाने वाळीत टाकल्यासारखीच झाली. प्रत्येक नजर दुसऱ्या नजरेला संशयी वृत्तीने बघत होती. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला. कोण चुकलं कोण बरोबर यापेक्षा आपण आता कसे सुरक्षित राहू याचाच विचार अन काळजी सगळे घेऊ लागले पण एका चुकीमुळे सगळं गावं कोरोनाच्या दहशतीखाली जगायला लागलं. कोरोना गावात आला म्हणत उद्याचा दिवस चांगलाच उगवूदे या प्रार्थनेत सगळ्यांचे जीव गुंतले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama