End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Preeti Sawant

Fantasy Others Children


3  

Preeti Sawant

Fantasy Others Children


कोकणातील आठवणी - भाग १

कोकणातील आठवणी - भाग १

3 mins 383 3 mins 383

कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर येतं ते निसर्गसौंदर्य. ह्या कोकणाला परशुराम भूमी असेही म्हटले जाते. अशा ह्या निसर्गरम्य कोकणात आहे माझ्या मामाचं गाव. तसे आमचं ही घर आहे कोकणात. पण काही वर्षांपूर्वी ते घर पाडल्यामुळे आता फक्त तिथे घराचा चौथरा बाकी आहे. त्याभोवती सगळीकडे नुसती झाडी पसरलेली दिसते. माझ्या पप्पांचा जन्म त्याच घरात झाला. माझी आजी बरीच वर्षे त्या घरात राहत होती. पण नंतर आजोबांनी मुंबईत खोली घेतली आणि मग आजी मुंबईत आली ती कायमची.


मग त्यांनतर मामाचं गाव आमचं गाव बनलं. माझी आजी ही माझ्या आईची सख्खी आत्या त्यामुळे तिचं आणि आईचं माहेर एकच. त्यामुळे गावी आल्यावर आम्ही इथेच उतरत असू. पण न चुकता आजी आम्हा भावंडाना आमच्या गावी नेऊन आमच्या घराच्या चौथऱ्याच्या पाया पडायला नेत असे आणि त्या घरात जिथे देवघर होते तिथे तांदूळ वाहून आम्ही पाया पडत असू. अजूनही जेव्हा पण आम्ही गावी जातो तेव्हा न चुकता आमच्या गावी जाऊन आमच्या घरासमोर नतमस्तक होतो.


असो, तर मामाच्या गावाच्या खूप आठवणी आहेत. रोज काहिनाकाही नवीन दंतकथा आजीकडून ऐकायला मिळत असत. एकदा काय झाले, आम्ही सगळी भावंड दुपारी आजोबांच्या बैलगाडीत बसून खेळत होतो. नुसती बैलगाडी आजोबा सावलीत उभी करून ठेवत असत. तर आम्ही बैलगाडीत बसलेले असताना अचानक वावटळ सुरू आली. वावटळ म्हणजे धुळीच वादळ. मी आजीकडून ऐकले होते की, असे वादळ दुपारी येते आणि जर त्या धुळीच्या भोवऱ्यात मीठ टाकले तर राक्षस दिसतो म्हणे. खरं खोटं देवास ठाऊक. पण तिच्या म्हणण्यानुसार कोणीतरी तसे केलेले. अशा वेळेला नेहमी खाली वाकायच. म्हणजे आपण त्या भोवऱ्यात सापडत नाही. असेही आजी म्हणत असे. मला ते आठवलेलं. मग आम्ही सगळेजण घाबरून खाली वाकलो होतो. मग थोड्यावेळाने बघितले तर ती वावटळ दूर निघून गेली होती.


अजून एक गमतीदार किस्सा आठवतो तो असा की, आजोबा रोज सकाळी गोठ्यातल्या गाई-बैलांना चरायला सोडायचे आणि संध्याकाळी ती गुरे आपोआप गोठ्यात परत येत असत. त्यांना घर कसे सापडे हे माझ्यासाठी अजूनही आश्चर्यचं आहे. तर झाले असे की, एक दिवशी आमचा एक तांबडा बैल संध्याकाळ झाली तरी घरी आला नव्हता. बाकी सगळी गुरे आली होती. आजोबांना माहीत होतं तो येईल घरी. पण तरीही मज्जा म्हणून त्यांनी आम्हाला त्याला शोधायला पाठविले. आम्ही सगळी बच्चापार्टी निघालो शोध मोहिमेला.


आम्हाला एक जागा माहीत होती जिथे हिरवागार गवत असायचं. तिथे जास्त गुरे-ढोरे चरायला जात असायची. आम्ही तिथे गेलो तर एक हुबेहूब आमच्या तांबड्या बैलासारखा दिसणारा बैल आम्हाला दिसला. मग आम्हाला वाटलं हा आमचाच बैल. मग काय त्याला हाकवत घेऊन आलो घरी. पण तो तर गोठ्यात जायला तयारच होईना मग आम्ही जबरदस्तीने त्याला गोठ्यात हाकवत नेले आणि तिथे बांधलं. त्या अनोळखी बैलाला बघून बाकी सगळी गुरे ओरडायला लागली. कारण त्यांना माहीत होतं की, हा आपला फॅमिली मेंबर नाही. त्यांचा आवाज ऐकून आजोबा बाहेर आले आणि त्या बैलाला बघून त्यांनी डोक्याला हात मारला आणि त्या बैलाला सोडून दिलं. तसा तो बैल धावतच गोठ्यातून पसार झाला. आम्हाला फार वाईट वाटलं की, आम्ही जबरदस्तीने त्याला इथे घेऊन आलो याचं. थोड्यावेळाने बघतो तर आमचा तांबडा बैल रमतगमत घरी येत होता. हे पाहून आम्हालाच फार हसू आले. ते दिवस खूपच मजेचे होते. 


आजोबा रोज आम्हाला नवनवीन टास्क द्यायचे. थोडक्यात पावसाळा यायच्या आधीची तयारी उन्हाळ्यात करून घेत असत. पण आम्ही मुले खूप एन्जॉय करत असू ते टास्क.


अजून एक किस्सा आठवतोय तो मालवण सफरीचा. म्हणजे एकदा आम्ही ठरवलं की, गाडी करून मालवण सफरीला जायचं. मला आरवलीच्या श्री वेतोबांचे दर्शन घ्यायचे होते. त्याचबरोबर श्री देवी सातेरीचं वारूळ असलेलं मंदिर सुद्धा पाहायचं होत. हे सगळं मी कोकणचा सांस्कृतिक इतिहास ह्या पुस्तकात वाचलेलं होत. मग आम्ही निघालो सगळे सफरीला. बरोबर आई, मामा यांनाच घेतलं. बाकी आम्ही सगळी चिल्लरपार्टी होतो.


आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच असे सगळं बघत निघालो. मग दुसऱ्या दिवशी सातेरी देवीचं मंदिर शोधत होतो. विचारता विचाराता आम्ही बिळवस गावातील पाण्यामधले सातेरी देवीचं मंदिर बघितलं. आम्ही उन्हाळ्यात गेलेलो म्हणून तिथे जास्त पाणी नव्हतं. पण तिकडच्या पुजाऱ्याने सांगितलं की, पावसात हे मंदिर पाण्यात असत.


सातेरी देवीचे ते अद्भुत मंदिर बघून मग आम्ही श्री वेतोबा क्षेत्राला भेट देण्यासाठी आरवलीला निघालो. वाटेत आम्ही हॉटेलमध्ये जेवायचे ठरविले होते. पण काय आश्चर्य संध्याकाळचे ४ वाजल्यामुळे ती बंद झाली होती. मग आम्ही उपाशीच वेतोबांचे दर्शन घेतले. किती प्रसन्न वाटलं होतं आम्हाला. सगळे भूक विसरून गेलेले. 

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Preeti Sawant

Similar marathi story from Fantasy