की नुसताच तुझा
की नुसताच तुझा


असून अडचण नसता खोळंबा काय तुझा राज गं?
सुकर जगण्याचा भास, उन्मत्त स्वैराचार कसला तुला माज गं
सागराची धीरगंभीरता, निर्झराचा खळखळाट असा तुझा बाज गं
क्षणिक भावूक नंतरचा मायावी पाश , बेगडी तुझा साज गं
नसता केवळ भास, असता मगरूरी, निरंतर आस जिवघेणा तुझा सहवास गं
वाट्टेल तेंव्हा येशील अनं जाशीलही भल्या भल्यांना ना लागतो अदमास गं
आपलंही मानतेस, नसानसांत भिनतेस नशा तुझी झक्कास गं
आश्वासक अन् तू खोटा दूराभिमान तू, नेत्याचा मान तू, आन, बान शान गं
लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा -हास म्हणू, की शिवरायांच्या स्वराज्याचा उपहास म्हणू?
चुकत गेलेल्या आयुष्याचं गणित मांडू की, दैवाच्या भरवशावरंच सारं सोडून मोकळ होवू ?
हिरवं रान करण्या कुठवर घाम गाळू, रक्त सांडू, चुकलेल्या आयुष्याचं गणित कुठवर मांडू?
खरं-खरं तूच सांग मित्रा, निसर्ग, नियतीबरोबर तुझ्यासोबतही आयुष्यभर भांडू ?
सज्जनाच्या छाताडावर नाचणारी तलवार म्हणू की, वेसण नसलेला वळू म्हणू?
आपल्याच बंधूना कापणारा माथेफिरू म्हणू की, बेफाम सुटलेला वारू म्हणू?
काही - काही सुचत नाही अनिर्बंध सत्ता म्हणू की? तुला संगदिल प्रियतमा म्हणू ?
अक्कल खात्याचा जमाखर्च म्हणू? की नुसताच तुझा नंगानाच बघू?