खरं प्रेम...
खरं प्रेम...


"मला खूप बोलायचंय रे तुझ्याशी. हवायस तू मला. बरंच काही सांगायचंय. फक्त तुलाच." असं म्हणत होती ती.'
माझा मित्र मला सांगत होता. बराच वेळ गप्पा झाल्या. निघालो, घरी परत येताना, तो जे काही बोलला, ते सारखं सारखं आठवत होतं.
आपल्याला कधीच कोणी 'असं' बोललं नाही ना?
जाणवलं, अचानक माझं मलाच.
मग हे चूक की बरोबर? मी कोणालाच 'कमावू' शकलो नाही आत्तापर्यंत. असं समजायचं का मी? कोणीच नाही प्रेमात पडलं माझ्या?
मला माहित्ये, मी मात्र पडलोय अनेक जणींच्या; पण सगळ्यांनाच कुठे आपण विचारतो?
'उगाच डोक्याला shot कुणी सांगितलाय? तसंही तिकडून होकार येईल, असं काही नाहीचे' असं म्हणत मी कधीच नाही सांगितलं कोणाला काहीच.
चुकलं का हे माझं?
कोणाशी तरी बोलायला पाहिजे होतं. at least एकदा तरी try करायला काय हरकत होती ?
जाऊ दे. आता जुनं आठवत बसण्यात तरी काय अर्थंय?
पण माझ्या प्रेमात कुणी कधी पडलंच नाही, हे किती नवल आहे ना?
मला माहित्येत ना माझ्यातले दोष; त्यामुळेच लांब गेले असणार ज्यांनी प्रेम केलं ते ही! म्हणजे, त्यांच्या मनात असं असेल,
"तो पण खूप छान आहे यार! पण..."
हा जो 'पण' आहे ना, तिथेच गंडलं सगळं!
आणि तसंही मुली थोडीच विचारतात मुलांना! मुलंच तर विचारतात.! आपल्यात नाही बाबा ती हिंमत!
समोरून 'नाही' ऐकल्यावर माझं काय होईल याची भीती वाटते. स्वतःला घाबरतो खूप याबाबतीत मी.
असो! या विषयावर जितका विचार करू तितका कमीच!
माझा फोन check केला.
आईचा msg आला होता. "निघालास का?"
आपल्या गुण-दोषांसकट आपल्याला स्वीकारलंय कुणीतरी... जाणीव झाली अचानक! हायसं वाटलं!
बस. इतकंच. बाकी काहीच नाही.
खरंच काही नाही.