खेळ दैवाचा...
खेळ दैवाचा...


तू नभांगणीची चटक चांदणी, मी वणव्याची ठिणगी गं
तू सावताचा मळा प्रिये; मी दुष्काळाच्या झळा गं
तू हवीहवीशी मंद झुळूक; मी घोंगावणार वादळ गं.
तू गोड गळ्याची रुदाली; मी काव कावणारा कावळा गं.
तू चिवचिवणारी चिमणी गं; मी नाहक बदनाम ढाण्या वाघ
तू बहरलेली बाग प्रिये, मी रखरखणारा वैशाख वणवा
तू बहिणाबाईची जीवनशाळा; मी संधीसाधू बगळा गं.
तू प्रश्नांचा भडीमार प्रिये, मी मुजोर सरकारी नोकर गं.
तू गांधीछाप चलनी नोट प्रिये; मी सदैव संभ्रमीत वोट प्रिये.
तू नागमोडी पायवाट प्रिये; मी अवघड वळणाचा घाट प्रिये.
तू तिसरे महायुध्द प्रिये, मी भांबावलेला राष्ट्रसंघ प्रिये.
तू काळजीवाहू सरकार प्रिये; मी हताश जनतेचा हुंकार गं.
तू थोडीसी अवखळ, बावरी राधा, मी कृष्णाची बासुरी.
तू गुलाबी पहाटे पडलेलं स्वप्न प्रिये, मी कष्टक-याचं अवघड जगणं.
तू तिथे अबोलअबोल अन मी इथे अशांत मनी थोपवेना कोलाहल
क्षितीजापरी आपुले अंतर, केवळ भास खेळ दैवाचा सगळा गं.