झपाटलेले घर - भाग ८
झपाटलेले घर - भाग ८
"काही गरज होती का, त्यांच्या तोंडात पेढा भरवायची? स्वतःच्या मुलाचे थोडेसुद्धा कौतुक नाही. एवढी निवडणुकीची धामधूम एकट्याने या खांद्यावर पेलली. त्याचं थोडं तरी कौतुक करायचं होतंस. आपल्या परंपरागत विरोधकांचे कौतुक करायला निघालीय." रागाने रमेश सारजाबाईला अद्वातद्वा बोलत होता.
"अरे, जरी विरोधक असले, तरी ते केवळ निवडणुकी पुरते. आहेत तर आपलेच भाऊबंद, त्यांच्याशी असे फटकून वागून कसे चालेल? निवडणूक सरली की एकमेकांची मैत्रीच राहिली पाहिजे." सारजा बाई मुलाला समजून सांगायला लागल्या.
"तुला वाटतच असेल मैत्री व्हावी म्हणून, तर कर मैत्री अन् आण त्या पोरीला सून म्हणून घरात." रमेश.
"नक्कीच आणली असती, असली गुणवान, सुंदर, सोज्वळ मुलगी मिळायला भाग्यच असावं लागतं. घरात सोण्यासारखा मुलगा असतांना ते कशाला आपली मुलगी तुझ्यासारख्या मुलाच्या गळ्यात बांधतील? तो सुंदर आहे, हुशार आहे, सत्शील आहे, शिवाय नात्यात सुद्धा आहे. असा जावई सोडून इतर मुले शोधायची त्यांना गरजच काय?" सारजाबाई.
"ते काही असो. मी केवळ तिच्याशीच लग्न करणार आहे. काही झाले तरी मी तिला सोडणार नाही. तिचे लग्न होईल तर माझ्याशीच, नाही तर नाही. बघतोच ती कशी माझी होत नाही ते? जर माझी नाही तर कुणाचीच नाही, त्या सुजीतची तर नाहीच नाही." रमेशच्या शब्दशब्दातून जळफळाट व्यक्त होत होता.
बारावीचा निकाल लागला. वर्गातून राधिका प्रथम, तर सुजीत द्वितीय क्रमांकाने पास झाले. रमेशही कसाबसा काठावर पास झाला. येथेही नशिबाने त्याच्या बाजूने यश टाकतांना आखडता हात घेतला होता. त्यामुळे रमेशच्या काळजात राधिके विषयी आणखीच द्वेष उत्पन्न झाला होता. राधिका आणि सुजीतने तालुक्याच्या कॉलेज मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. रमेशने सुद्धा त्याच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.
कॉलेजला जाण्यासाठी राधिका, सुजीतला आबांनी बुलेट घेऊन दिली. दोघांचे कॉलेजला जाणे सुरू झाले. रमेश सुद्धा या दोघांवर लक्ष ठेऊन रोज नियमितपणे कॉलेजला जाऊ लागला.
कॉलेजमध्ये तिघेही मस्त रुळले होते. एका गावचे असूनही ते कधी एकत्र राहिले नाही. रमेशने नवीन मित्र जमवले होते, जे फारसे अभ्यासात लक्ष देत नसत. रमेशही अभ्यासात कधी लक्ष लावायचा नाही. *कॉलेज म्हणजे मजा करण्याची जागा* अशी या मित्रमंडळीची कल्पना होती. परिणाम व्हायचा तोच होत असे. रमेश प्रत्येक वेळी काठावर पास होऊ लागला. राधिका, सुजीत नेहमी प्रमाणेच पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने पास होत होते.
थर्ड इअरला असतांना कॉलेजच्या निवडणुकी मध्ये भाग घ्यायचा असा राधिकेने आग्रह धरला. सुजीत नको नको म्हणत असतांनाही तिने तिचा उमेदवारी अर्ज भरलाच. इकडे रमेश उमेदवारी अर्ज भरायच्या तयारीत असतांना द्विधा अवस्थेत सापडला. काही झाले तरी गावचा मामला आहे. राधिकेने फॉर्म भरला आहे, तिच्या बाजूने भरपूर मुला मुलींची साथ आहे. अशा वेळी आपणही उमेदवारी अर्ज भरून आपला पराभव कशाला करून घ्यावा? उगाच 'हात दाखवून अवलक्षण' कशाला करून घ्यावे? मित्रत्वाचा हात पुढे करावा का? पण ती स्वीकारेल का? तिने मैत्री नाकारून अपमान केला तर? अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली होती. रात्रभर असा विचार केल्यावर त्याने अर्ज न भरण्याचे निश्चित केले. अर्ज भरायच्या ऐन वेळेवर, "माझ्या मैत्रिणीने अर्ज दाखल केला आहे, तिची निवड बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा असून माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना मी विनंती करतो की, त्यांनी माझ्या प्रस्तावाला मान्यता द्यावी आणि त्यांचे अमूल्य मत राधिकेला द्यावे. तिला बिनविरोध निवडून द्यावे." असे मत प्रदर्शन करून त्याने आपली बाजू सावरून घेतली.
रमेशच्या गटातील एकदोन मित्रांना त्याचे हे वागणे जरा विचित्रच वाटले, त्यातल्या एकाने उमेदवारी दाखल केलीच. बिन विरोध म्हणता म्हणता मतदानावरच पाळी आली. निवडणूक बरीच चुरशीची झाली. मतदारांची पळवा पळवी झाली. कुणी हॉटेल वर घेऊन गेले तर कुणी कुठे सहलीला घेऊन गेले. बरेच जण ऐन मतदानाच्या वेळीच हजर झाले.
ठरल्या प्रमाणे चुरशीच्या शर्यतीत राधिका वरचढ ठरली. केवळ पाच मते जास्तीची घेऊन राधिका निवडून आली. विद्यार्थी संसदेत ती एकटीच महिला सदस्य असल्या मुळे सचिव पदी तिची निवड झाली. प्रचार्यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार झाला.
राधिका विद्यार्थी संसदेत निवडून आल्यावर आबांना तर खूप आनंद झाला. त्यातल्या त्यात रमेशने माघार घेतली आणि राधिकेला निवडून आणण्या साठी प्रयत्न केले, तसेच सचिव पद मिळवून दिले, हे ऐकून त्यांना आश्चर्यही वाटले.
रमेशच्या वागण्याचे बापूंनाही आश्चर्य वाटले. सारजा बाईंना त्यांनी बोलूनही दाखवले. त्यावर सारजा बाई बोलल्या,
"तुम्हा राजकारणी लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारणच दिसते. चांगलं कधी दिसतच नाही. बाहेरगावी जाऊन मुलाला समज आली असेल, काही झाले तरी एक गावाचे, मिळून मिसळून रहावे वाटले असेल."
"तसे झाले तर देवच पावला म्हणायचा. कुठे तरी हे थांबायलाच पाहिजे. या निमित्ताने मैत्री झाली तर चांगलंच होईल की." रामराव बापू म्हणाले. तेवढ्यात रमेश आला. "रमेश, हे जे काही चालले ते मनापासून आहे ना?"
"म्हणजे काय बापू? मलाही वाटतं ना ही कटुता चांगली नाही. प्रेमानेच चांगले राहत येते. बाहेरगावी रहायचे तर प्रेमानेच राहिले पाहिजे. म्हणून मी आता मैत्रीचा हात पुढे केला, आणि तिनेही तो स्वीकारला." रमेशने स्पष्टीकरण दिले.
'देवा, माझ्या मुलाला सद्बुद्धी दिली. तुझे खूप उपकार झाले.' असे मनात म्हणत बापूंनी आकाशाकडे बघत दोन्ही हात जोडून नमस्कार केला. रमेशने हातपाय धुतले आणि सर्वजण जेवायला बसले.
"बेटा राधिका, तू तर आता राजकारणात उतरलीस, जरा सावध रहात जा. मैत्री करतांना दहा दहा वेळेस विचार करत जा. राजकारणात आपल्याच लोकांकडून जास्त धोका असतो. कधी कधी विरोधकही मित्र बनण्याचं नाटक करत असतात, तेव्हा जपून पाऊल टाकायला शिक." आपले राजकारणातले अनुभव आपल्या मुलीला सांगत आबा बोलले.
"आबा, तुमचेच रक्त खेळतंय माझ्या धमनी मध्ये. आणि सुजीत आहेच ना माझ्या पाठीशी. तो ही तुमचाच भाचा. त्याने ग्रामपंचायत निवडणुकी प्रमाणेच ह्या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण धुरा समर्थ पणे सांभाळली, म्हणून तर निवडून येऊ शकले मी." राधिका म्हणाली. सुजीत मन लावून राधिके सोबत अभ्यास करतोय, शिवाय तिचा सांभाळही करतो, विशेष म्हणजे राधिकेला तो आवडतोय हे पाहून आबांनी स्वस्थतेचा श्वास घेतला. मनातून त्यांना बरे वाटले. त्यांच्या मनाचा कल सुजीतला जावई म्हणून स्विकारण्याकडे झुकू लागला होता. त्यांच्या चेहऱ्यावर तसे पाहून राधिकेलाही बरे वाटले, तीही मनातून खुश झाली. सुजीत कडे एक कटाक्ष टाकत स्मितहास्य केले आणि आपल्या खोलीत निघून गेली. सुजीतलाही आबांमध्ये झालेला बदल सकारात्मक वाटला. तो सुद्धा आपल्या खोलीत निघून गेला.
(क्रमशः)

