Pandit Warade

Romance

3  

Pandit Warade

Romance

झपाटलेले घर (भाग-१५)

झपाटलेले घर (भाग-१५)

6 mins
404


 भाग-१५)

    राधिका आणि सुजीत गाडीवर कॉलेजला जायला निघाले खरे, परंतु राधिका रोजच्या सारखी बडबड करत नव्हती. ती अगदीच मौनी माऊली बनून गाडीवर बसून होती. सुजीतला ही गोष्ट मना पासून खटकत होती. _'नेहमी प्रसन्न असणारी, गाडीवर खळाळून हसणारी, सतत बोलणारी राधिका आज अशी मौन का झाली? काय झालं असं? अशी निराश, सुकलेली कधीच रहात नसते ती.'_ सुजीत मनाशी विचार करत होता. _'नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. विचारलंच पाहिजे.'_ असा विचार करत सुजीतने रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत गाडी उभी केली. दोघेही खाली उतरले झाडाखाली बसले. तसा सुजीतने प्रश्न केला,

   "काय झाले राधिके, आज अशी गपगप का? तब्येत तर ठीक आहे ना? तुझं काही दुखतंय का? कुणी काही बोललं का? काय झालं ते मला नाही का सांगणार?" सुजीतच्या या प्रश्नावर राधिकेला एकदम रडूच कोसळले. काही केल्या हुंदका आवरेना. सुजीतलाही काय करावे कळेना.

   राधिका बिलकुल रडायची थांबेना. त्याच्या खांद्यावर डोके टेकवून ती मुसमुसून रडू लागली. 

"सुजीत, तू नक्की करशील ना माझ्याशी लग्न? देशील ना साथ मला जन्मभर?" रडवेल्या सुरात तिने विचारले.

  "म्हणजे? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तू अजून कालचे प्रकरण विसरली नाहीस वाटतं अजून. मला माफ कर राधा, काल तसं वागायला नको होतं मी. पण काय करू गळ्यात पडलेल्या गीताला टाळण्यासाठी कॅन्टीनमध्ये नेण्याशिवाय मला दुसरा पर्यायच सापडला नाही." सुजीतचे स्पष्टीकरण ऐकून तिला त्याही परिस्थितीत हसू आले. ती खळखळून हसली सुद्धा, पण लगेच गंभीरही झाली.

   "अरे, त्याबद्दल नाही म्हणत मी. तुझ्यावर विश्वास आहेच म्हणून तर मी आबांशी बंडाची भाषा बोलू शकले. आबा माझं लग्न करायला निघालेत. माझं शिक्षण पूर्ण होऊ द्या म्हटले तर काही केल्या ऐकत नाहीय. हट्टच धरून बसलेत." राधिकेने स्पष्टीकरण दिले. 

   "मग त्यात एवढं काय बिघडलं? लग्नाचं वय झाल्यावर कोणत्याही बापाला तिच्या लग्नाची चिंता करावीच लागते. त्यातल्या त्यात तू त्यांची लाडाची लेक. लाडक्या लेकीचं वेळेच्या आत लग्न करून मोकळं व्हावं असं वाटत असेल त्यांना." सुजीतचा समजावणीचा सूर. 

  "केवळ लग्नाचा विषय असता तर मी काही नाही म्हटले असते होय? परंतु ते माझं लग्न त्या रमेश सोबत लावू पाहताहेत. मी स्पष्टपणे नकार दिलाय. वेळ पडल्यास जीव देण्याची भाषा केली, केवळ आणि केवळ तुझ्याच भरवशावर. आबा अजूनही हट्ट सोडायला तयार नाहीत." राधिका अगदी रडकुंडीला आली होती.


   "हं! तर असं आहे होय? त्यात काय एवढं? आबा काय वाईट थोडंच करतील तुझं? आबा म्हणताहेत तर करून टाकायचं त्याच्याशी लग्न. मुलगा चांगला आहे, बरोबर शिकतो आहे. श्रीमंत आहे. तुझी आणि त्याची मैत्री आहे, हे तर साऱ्या जगाला माहीतही आहे. तुला तो आवडतो. तशीच त्यालाही तू खूप आवडतेस, तुला राजाच्या राणी सारखी सुखात वागवेल तो. त्याच्या सोबत लग्न केलंस तर तुम्ही दोघं राजा राणी सारखा सुखात संसार कराल." सुजीत जरासा मस्करीत बोलला. 

   "ऐ, तत्वज्ञान शिकवू नकोस. तुला मी नकोय का ते सांग फक्त. मला तू खूप खूप आवडतोस. लग्न करीन तर तुझ्याशीच, नाहींतर कुणाशीही नाही. हां! तुला जर मी आवडतच नसेल तर मग राहिलं. मी तुला मुळीच अडवणार नाही. माझी मी जीव देऊन मोकळी होईल आणि तुलाही मोकळी करीन तुझ्या आवडत्या मुलीशी लग्न करायला." राधिकेचा निर्वाणीचा सूर.

  राधिकेची अटीतटीची भाषा ऐकून सुजीत एकदम हादरलाच. 


   "अगं, कुणी सांगितलं तुला, मला तू आवडत नाहीस म्हणून? मी इथे आश्रिताचं जीवन जगतोय ना ते केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच. तू आहेस म्हणून तर मी अजून इथे आहे. तुझ्यामुळेच तर मी इथे आनंदात आहे. खळखळत्या निर्मळ सरिते सारखं तुझं निर्मळ जीवन मला जगायची उर्मी देतं. नाही तर बिन बापाच्या मुलाच्या जीवनात असं हास्य, असा आनंद तरी कुठून मिळायचा? आबांनी इथं आणलं, त्यापेक्षाही तुझ्या सारखं रत्न माझ्यासाठी दिलं. फार मोठे उपकार आहेत माझ्यावर त्यांचे. तुझं खळाळतं हास्य पाहिलं की शरीराचा थकवा कुठल्या कुठं पळून जातो, मनाची मरगळ दूर होते आणि मन ताजेतवाने होते. मात्र कधी काळी तू दुःखी दिसलीच तर माझं काळीज कसं तिळतीळ तुटतंय गं. तुझी साथ सोडणं म्हणजे या शरीरातला प्राण काढून बाजूला ठेवण्या सारखं आहे ते. काहीही झाले तरी जमोजन्मी तुझी साथ सोडणार नाही मी." सुजीतने तिला विश्वास दिला.

   "बघ हं! दगा देशील नाहीतर ऐनवेळी. तुझ्या भरवशावर मी आबांशी बंड करून घर सोडायचं ठरवलं. तुझ्याशी लग्न करून सुखाचा संसार थाटावा असं माझं मन म्हणतंय. परंतु आबा सहजासहजी तसं करू देणार नाहीत. त्यासाठी दूर दूर कुठेतरी निघून जावं वाटतं, जिथं कुणी आपल्याला बघणारच नाही अशा ठिकाणी. खरं सांग सुजीत, येशील ना माझ्या सोबत?"

  "अगं, आपण आता इथे वडाच्या झाडाखाली बसलो आहोत. तुम्ही बायका 'वट सावित्री'चे व्रत करून 'सात जन्मी हाच पती मिळावा' म्हणून ज्या वडाची पूजा करता, त्याच वडाची शपथ घेऊन हा सुजीत तुला वचन देतो. याच काय पण पुढच्या सात जन्मा पर्यंत, एवढेच नव्हे तर तुझी इच्छा असे पर्यंतही तुझी साथ सोडणार नाही. मग तर झालं?" सुजीतने तिला हमी भरली.

   "कित्ती कित्ती चांगला आहे ना माझा सूजीत. घरात 'असली हिरा' असूनही आबा कंदील लावून जगात शोधत का फिरताहेत? का असं करताहेत कुणास ठाऊक?" राधिका लाडात येऊन त्याचा गालगुच्चा घेत बोलली.

  "ऐ बाई, आपण रस्त्यावर आहोत याचं भान ठेव जरासं. रस्त्याने जाणारे, येणारे आपल्या विषयी काय विचार करत असतील कोण जाणे. निघायलाच पाहिजे आता. बघूया! आबा काय काय करतात? काय काय ठरवतात? नंतर आपण प्लॅन करू पुढचा. आता निघायलाच हवं, 'आधी कॉलेज, नंतर विवाह'. कॉलेजला जायला उशीर होतोय." सुजीत म्हणाला.

   "नको रे, आज मूडच नाहीय माझा कॉलेजला जायला. माझ्या मनावरचं मणांमणाचं ओझं दूर झालं. जगाची, परंपरांची, नात्यांची, सारी सारी बंधनं झुगारून दूर कुठे तरी जाऊ. मस्त मज्जा करू. सुखी संसाराचे स्वप्नं रंगवू. चल, माझ्या सारखी सुखी मीच असणार." ती लाडात येत बोलली.

   "अगं, असलं काहीही करू नकोस माझे आई. आपण कॉलेजला नाही गेलो तर तुझा तो रमेश साऱ्या गावभर आग लावून देईल, डंका वाजवेल आपल्या नावाचा. गावभर बोभाटा होईल. 'ज्याला आबांनी कीव येऊन आणलं, सांभाळलं आणि पोरगं पोरीला घेऊन पळालं' म्हणतील. चल ऊठ लवकर" असं म्हणत त्यानं खांद्यावर असलेलं तिचं डोकं बाजूला केलं.

  "हां! तेही खरंच आहे म्हणा. जग काय सुखानं जगू देतं कधी? तू म्हणतीस ते खरं आहे. एऑन असं काही केलं तर आत्याला किती त्रास होईल? आपल्याला घर सोडावंच लागलं तर आत्याला सोबत घेऊनच सोडू." राधिकेला गंगू आत्यांची आठवण झाली. 

  "ते बघू नंतर. आईचा विचार करावाच लागेल आपल्याला. पण तुला एक सांगू? आई कधीच होकार देणार नाही आपल्या पळून जाण्याचा प्लॅनला. आबांनी केलेल्या उपकाराच्या ओझ्यात दबलेलं तिचं मन आपल्याला कधीच बंड करू देणार नाही. तिला विश्वासात घेऊन आबांचं मन वळवायचं काम तिच्याकडं सोपवलं तर चांगलं राहील. तिचं मन वळवायचं काम मात्र तुलाच करावं लागेल." सुजीत म्हणाला.

  "नक्कीच करीन मी. आत्या वेळप्रसंगी आबांचं मन मोडतील पण माझं मन कधीच मोडणार नाहीत. खात्री आहे मला. चल निघुया आता कॉलेजला जायलाच पाहिजे." असं म्हणत ती उठून उभी राहिली.


   सुजीतने गाडी सुरू केली. राधिका खरोखर खूप प्रसन्न झाली होती. ती आता अगदी रोमँटिक मूडमध्ये आली होती. आपल्या उरोजांचा भार सुजीतच्या पाठीवर टाकून, ती त्याला म्हणाली,


   "सुजीत, थोडीशी मज्जा करायची का आज?" 


   "म्हणजे? विचार काय आहे आज राणी सरकारचा?" तोही उत्तेजित होत विचारता झाला. 


    "अरे, काही नाही. थोडासा उंदीर मांजराचा खेळ खेळावा म्हणत्ये. रमेश काही न काही कारण काढून मला भेटण्याची धडपड करत असतो हे चांगलं लक्षात आलं माझ्या. त्याला जरासा प्रतिसाद देत असंच झुलवत झुलवत खेळावं असं वाटतंय. तुही तुझ्या त्या कचकडीच्या बहुलीला खेळव. बिचारीच्या जीवाला तेवढंच सुख." राधिका खोडकर मूडमध्ये म्हणाली.


   "नको गं बाई. ते लचांड मला नाही झेपणार. तुला काय करायचं ते कर. मी असलं काही नाही करणार. माझ्याच्याने नाही जमणार ते." सुजीत म्हणाला.


   "जमवावंच लागेल तुला, मी सांगते म्हणून. मला वाईट वाटेल नाही तर." ती भलतीच मूडमध्ये आली होती.


   "ठीक आहे. बघतो प्रयत्न करून. परंतु तो खेळ खेळता खेळता मीच फसलो तर? तुलाच काढावं लागेल बाहेर. माझा खेळ पाहून मत्सर तर उभा राहणार नाही ना मनात?" सुजीतही तिची फिरकी घेत बोलला.

   "मी ही खेळत गुंतलेली असेन तेव्हा. आणि तशीच वेळ आली तर मी माझा खेळ सोडून येईल की तुझ्या मदतीला." ती म्हणाली. 

  "ठीक आहे. तुझ्या मनासारखंच होईल. पण आता सावध हो. व्यवस्थित बस. कॉलेज जवळ आलंय." असं म्हणत त्यानं तिचं खांद्यावरचं तोंड एका हातानं मागे सारलं. ती मागे सरकून दोघांच्या मध्ये दप्तर ठेऊन बसली. गाडी नेहमी प्रमाणे चालू लागली. 


*क्रमश:*


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance