Pandit Warade

Romance Tragedy

3  

Pandit Warade

Romance Tragedy

झपाटलेले घर (भाग-१४)

झपाटलेले घर (भाग-१४)

5 mins
437


(भाग-१४)


   "राधा बेटीsss" प्रतिष्ठेचा विचार करत रात्रभर अस्वस्थ असलेले आबा सकाळी उठल्याबरोबर आपल्या मुलीला आवाज देत होते. _'एकुलती एक मुलगी. तिच्या मनासारखं घडू द्यावं का? पण लोकं काय म्हणतील? बापू स्वतःहून मागणी घालताहेत, त्यांना नकार कसा द्यावा? रमेशही चांगला मुलगा आहे. परंपरागत विरोध विसरून राधिकेला कॉलेज राजकारणात मदतच केली त्याने. त्याला जर नाकारले तर कायमसाठी आपल्याला विरोध करत राहील तो, बापूही नाराज होतील. विशेषतः गावकरीही नाराज होतील.'_ या विचाराने आबांना रात्रभर व्यवस्थित झोप लागली नव्हती. सकाळी उठल्याबरोबर त्यांनी राधिकेला आवाज दिला. 

   "काय आबा? आणखी काही हवंय का?" राधिकेने चहाचा कप घेऊन येत विचारले.

   "काही नाही. थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. थोडं लवकर आटोपून जराशी माझ्याकडे येशील कॉलेजला जायच्या अगोदर." असे म्हणून त्यांनी चहाचा कप तोंडाला लावला. 

   "ठीक आहे." म्हणत राधिका पट्कन आत गेली. ती जाताच आबा उठून मैनावतीच्या प्रतिमेसमोर जाऊन उभे राहिले.

  _'मैना, बघ आपली लाडकी. कसा हट्ट धरून बसलीय. या राजकारणाचा मला आता कंटाळा आलाय. बापूंनी स्वतःहून मागणी घातलीय. तोलामोलाचे स्थळ आहे. मुलगाही चांगला आहे. तिच्या बरोबरच शिकत आहे. आपली राधा कायम सुखात राहील. शिवाय गावात असल्यामुळे नेहमीसाठी डोळ्यासमोर राहील. होकार देऊ का? सुजीत सोबत ती सुखात राहील असं वाटत नाही. आयत्या बिळावर नागोबा असलेल्या सुजीतला तिला सुखात ठेवता येईल का? समाज काय म्हणेल? कुणाची कोण गंगुबाई? बाबांनी कुठून तरी उचलून आणलेली, तिच्या ना कुळाचा पत्ता ना खानदानीचा पत्ता. लोकं नावं ठेवतील. बघ तिला जरा समजव, सुजीत सोबत लग्न करायचं खूळ काढून टाक तिच्या डोक्यातलं.'_ असं म्हणत डोळे मिटून ते बराच वेळ तसेच राहिले. 


   आबांच्या बोलण्यावर राधिका विचार करू लागली. _'रात्रीच तर आबांना स्पष्ट सांगितलंय सारं, आता आणखी काय बोलायचं असेल. त्यांचं मत परिवर्तन झालं असेल का? एकुलत्या एक लाडक्या कन्येच्या हट्टासाठी स्वतःच्या इच्छेला मुरड घालतील असं वाटतं. आई असती तर तिला सर्वकाही मनमोकळं सांगता आलं असतं. आत्याजवळ बोलू का? नाही, आधी आई जवळच बोलावं. तिलाच सांगावं.'_ असा विचार करत ती मैनावतीच्या प्रतिमेकडे येण्या साठी हॉल मध्ये दोनदा डोकावली. परंतु प्रतिमे समोर आबांना उभे पाहून ती परत फिरली होती. 

   _'आई, बघ ना. आबा कसे मला या घरातून हाकलू पाहताहेत? तुला काय वाटतं? सुजीत सारख्या गुणी, संस्कारी मुलासोबत मी सुखी होऊ शकणार नाही? काय कमी आहे त्याच्यात? आबा केवळ त्यांच्या प्रतिष्ठेसाठी त्या रमेशच्या गळ्यात बांधायला निघालेत मला. तुला आवडेल तो जावई म्हणून? नक्कीच नाही, मला माहित आहे माझी निवड तुला नक्कीच आवडत असणार. आयुष्यात तुला आवडेल असंच करीन मी. माझं सुजीतवर अतिशय प्रेम आहे. लहानपणा पासून एकत्र राहिल्या मुळे जीव एकरूप झालाय आमचा. त्यालाही मी खूप आवडते, तो माझ्याशी लग्न करायलाही तयार आहे. त्याच्याशी लग्न केले तर मलाही इथेच राहता येईल. आबाला काही तरी सांगना आई.'_ असं म्हणत तिच्या डोळ्यात अलगद पणे अश्रू उभे राहिले. ती तशीच मौन होऊन उभी होती, तेवढ्यात...


  "राधिका$$, चल जेऊन घे, सुजीत येईलच एवढ्यात. कॉलेजची वेळ होईल." असं म्हणत गंगुबाईंनी आवाज दिला. तशी ती अश्रू पुसत गंगुबाई कडे गेली. 

   "का गं, काय झालं रडायला?" गांगुबाईंनी असं विचारताच राधिकेला रडू आवरलेच नाही त्यांच्या कुशीत शिरून तिने आसवांना वाट मोकळी करून दिली. 

   तिचे डोके वयवस्थित मांडीवर घेऊन गंगुबाई तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिली. तिचे रडून होईपर्यंत कुणीच काही बोलले नाही. रडून झाल्यावर...

  "आत्या, तुम्हीच सांगा मी काय करू? आबा त्या रमेश सोबत माझं लग्न लावून द्यायचं म्हणताहेत. मी तिथे कधीच सुखी राहू शकणार नाही आत्या." असं म्हणत ती पुन्हा रडायला लागली. 

   "ऊठ बाळा, अशी रडू नकोस." गंगुबाई समजावणीच्या सुरात बोलू लागली. 

  "आत्या, रडू नको तर काय करू? आबा मानायलाच तयार नाहीत. त्यांना माझ्या सुखापेक्षा स्वतःच्या प्रतिष्ठेची चिंता लागून राहिली आहे. आई असती तर तिला सांगून तयार केले असते आबांना." ती रडत रडत बोलत होती. 

   "मी बोलते आबांना. ऐकतील तर बरं होईल. काही जीवाला लावून घेऊ नकोस. आई वडील ठरवून देतील तेच मुलीचं घर असतं, तिथेच तिने विना तक्रार राहायचं असतं." गंगुबाई जगरहाटी सांगत होत्या. तेवढ्यात ...


  "राधा बेटीsss" आबांनी आवाज दिला. 

 "आले हं आबा" म्हणत तिने अश्रू पुसले आणि आबां कडे गेली. 

  "बैस अशी. काय ठरवलंस मग? मी म्हणतो ते लक्षात आलं ना सारं? मी रात्रभर विचार केला, आणि तुझ्या उज्ज्वल भविष्या साठी तुझे रमेश सोबतच लग्न लावावे असा निर्णय पक्का केलाय. मला वाटतं तुला हा निर्णय मान्य करायला काही हरकत नसावी." आबा त्यांच्या मतावर ठाम होते. 

  "आबा, का? का असा छळ करताय माझ्या या आयुष्याचा? मी तिथे मुळीच सुखी राहू शकणार नाही. मला बंड करायला लावू नका, मी सुजीत सोबतच लग्न करणार आहे. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा निक्षून सांगत आहे. नसता मी माझ्या जीवच काही तरी बरं वाईट.." तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत गंगूबाईने अचानक येऊन तिच्या तोंडावर हात ठेवत तिला चूप केले. 

   गंगुबाई अशी अचानक आलेली पाहून आबा आश्चर्य चकित झाले. 

   "तू? तू कशाला आलीस इथे? आमच्या बाप लेकीच्या मध्ये तू कशाला टपकलीस? आलीच आहेस तर तू ही ऐकून घे, मी राधिकेचं लग्न रमेश सोबत करायचं ठरवलं आहे. काळजी करू नकोस, मी सुजीतला वाऱ्यावर सोडणार नाहीय. त्याच्यासाठी सुद्धा मी मुलगी पाहतो आहे." आबा गंगुबाईला म्हणाले. 


  "मी सुजीत साठी म्हणत नाहीय आबा, राधाच्या भल्या साठीच सांगत्येय. स्त्रीचं मन ओळखायला स्त्रीच व्हावं लागतं. ते जिथे समर्पित झालं असेल तिथेच ती सुखाने राहू शकते. स्त्री मनाला मारून कधीच सुखी होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या मुलीच्या सुखापेक्षा प्रतिष्ठा मोठी वाटते. कधी नाही ते मी आज तुमच्यापुढे पदर पसरते आबा, मुलांच्या सुखाचा विचार करा. आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितले नाही. आज शेवटचं मागत्ये, नाही म्हणू नका. राधिकेच्या मनाविरुद्ध लग्न करून देऊ नका." असं म्हणत ती आबांच्या पायावर वाकली.

 "काही नको पाया पडायला. माझं ऐकायचंच नसेल तर सारेच माझ्या डोळ्या समोरुन दूर व्हा. मला एकटं राहू द्या, माझ्या निर्णयात काही बदल होणार नाही. शेवटचं सांगतोय ज्या कुणाला माझा निर्णय मान्य नसेल त्यांनी, माझ्या घरातून खुशाल बाहेर पडावं." रागाने आबा थरथरू लागले होते. 

  गंगुबाई आबांच्या भयंकर क्रोधाला ओळखून होती. तिने राधिकेला घेऊन हॉल मधून पाय काढता घेतला. आबा एकटेच सुन्न होऊन बसून राहिले. त्यांचा अहंकार दुखावला होता. अहंकार दुखावला की सारासार विवेक बुद्धी काम करत नाही, आपलाच निर्णय कसा योग्य आहे? हे ठरवायला वेगवेगळे तर्क करायला लागते. विचार करून करून स्वतःचाच निर्णय कसा योग्य आहे ते पक्के करत जाते. आबांचेही तेच झाले. विचार करून करून ते त्याच निर्णयावर येत राहिले.


   गुरांचे चारापाणी करून सुजीत घरी आला. गंगूबाईने अंघोळीला पाणी काढले होते, त्याने अंघोळ केली. कपडे घालून, तयार होऊन डायनिंग हॉलमध्ये आला. 

  "आई, नाश्ता तयार झाला का? लवकरच दे जरा, आज जरा उशीरच झाला. राधिकेचं आटोपलं का?" त्याने गंगुबाईला आवाज दिला.

   "हो आटोपलंच आहे, तुझ्यासाठी थांबलीय ती नाश्ता करायला. राधा, चल ये लवकर अन् नाश्ता करून घे बेटा." असं म्हणत शिरा आणि पोह्याच्या प्लेट्स घेऊन गंगुबाई डायनिंग हॉलमध्ये आली. फ्रेश होऊन राधिकाही आली. दोघांनी नाश्ता केला. नाश्ता करतांनाचे राधिकेचे मौन जरासे खटकलेच सुजीतच्या मनाला, पण वेळ झाल्यामुळे तो काही न बोलता गाडी काढायला गेला. त्याने गाडी काढली, राधिका दोघांच्या बॅग्ज आणि टिफिन घेऊन गाडीवर बसली आणि गाडी कॉलेजला जाण्यासाठी निघाली.


*क्रमशः*


   *काय होईल कॉलेजमध्ये गेल्यावर? लग्नाचा विषय कुठवर लांबतो? त्याला काय काय फाटे फुटतात? तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया लवकरच कळवा. भेटू पुढच्या भागात लवकरच.*


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance