Pandit Warade

Romance Others

3  

Pandit Warade

Romance Others

झपाटलेले घर (भाग-१२)

झपाटलेले घर (भाग-१२)

6 mins
237


(भाग-१२)


  सहलीहून आल्यापासून कॉलेजमध्ये राधिकेचा मान वाढला होता. ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा या सारख्या लोकशाही प्रक्रियेतील महत्वाच्या निवडणुकांमध्ये जे घडायला हवे, परंतु घडत नाही ते या कॉलेज निवडणुकीमध्ये राधिकेने करून दाखवले होते. राजकारणामध्ये एकमेकांना विरोध होतच असतो, तो व्हायलाही पाहिजे. मजबूत लोकशाहीचे ते एक लक्षण आहे. परंतु आजकालच्या या निवडणुकांनी विरोधाची ठिणगी पुन्हा विझतच नाही, उलट ती भडका घेत राहते आणि त्यात एखाद्या घराण्याचा विध्वंसही होऊ शकतो. निवडणूक संपली तरी विवाद काही संपत नाही. उलट एकमेकांच्या तंगड्या कशा ओढल्या जातील हे पाहिले जाते. परंतु कॉलेज मधील ही निवडणुक आदर्श निवडणूक ठरली. अध्यक्ष आणि सचिव यांच्यातील वाद सहलीहून आल्यावर निवळला. पारोची समाधी, अजिंठा लेणी हे पाहून परत आल्यावर, सहलीसाठी एवढे चांगले स्थळ निवडल्या बद्दल अध्यक्षांनी राधिकेचे प्रत्यक्ष भेटून आभार मानले. 


   "राधिका मॅडम, माझ्याशी विरोध करून तुम्ही जे स्थळ सहलीसाठी निवडले ते खूपच प्रेक्षणीय स्थळ ठरले. मी उगाच विरोध करत होतो, तुम्ही जिंकलात हे सर्वांच्या साठी चांगले झाले. पारोच्या प्रेमाच्या कथेपासून आम्ही सारे अनभिज्ञ राहिलो असतो. सर्वांच्या तर्फे मी तुमचे आभार मानतो." अध्यक्ष समाधान पाटील म्हणाले.


  "अध्यक्ष महाराज, आपल्या आई वडिलांनी ठेवलेल्या नावाचे सार्थक केले तुम्ही. तुमच्या मताला एवढा विरोध होऊन देखील आहे त्यात समाधान मानणारी तुमची वृत्ती मला आवडली." राधिकाही खेळीमेळीच्या सुरात बोलली. 


  तेवढ्यात रमेश येऊन टपकला. "पाटील, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का?" रमेशने विचारले.


  "कोणती ब्वा?" समाधान पाटलाचा प्रश्न. 


   "अहो, मला तर ती पारोची प्रेमकथा ऐकतांना, पारोचा डॅशिंग स्वभाव आपल्या सचिवात उतरला असल्याचाच भास झाला." राधिकेला खुश करण्यासाठी रमेश बोलला.


  "परंतु तू स्वतःला रॉबर्ट गिल तर समजत नाही ना?" अध्यक्षांनी रमेशचीच फिरकी घेत वातावरण हलके फुलके केले. समाधान पाटलाच्या कोटीवर सर्वजण खळाळून हसले. "बरं येतो मी क्लासचा टाइम झालाय माझ्या." असं म्हणत पाटलांनी तेथून काढता पाय घेतला.


   "राधिके, खरंच पाटील म्हणाले ते काही खोटं नाही. पारोची प्रेमकथा फारसी कुणाला माहीतच नव्हती. आपल्यालाही नाही. बरं झालं कुणी तरी आठवण केली आणि आपण थांबलो." रमेशने पुन्हा एकदा विषय काढला. 


   "रमेश, आता किती दिवस ती सहल, त्या लेण्या, ती पारो, तिची समाधी या आठवणी काढणार आहेस. अरे, आता प्रथम सत्राच्या परीक्षेचा विचार कर, अभ्यासाकडेही बघ जरा." राधिकेने कर्तव्याची आठवण करून दिली.


   "होईल गं अभ्यास. तो कुठे जातोय पळून?" रमेश म्हणाला. 


   "मग मी पळून जात्येय असं वाटतं की काय तुला? मी इथेच आहे, मलाही अभ्यास करू दे अन् तुही अभ्यास कर. आपले पाहिले ध्येय शिक्षण पूर्ण करणे आहे. ते साध्य करण्यासाठी साधना करायलाच लागेल." राधिकेने त्याला पुन्हा एकदा सावध केले. 


  "बरं बाई, तू म्हणतेस तसं. पण अभ्यासाच्या नादात ती पारो आणि तिची प्रेमकथा विसरली नाही पाहिजे. बरं एक काम कर कॉफी प्यावीशी वाटतेय, एक तर पाज नाहीतर माझ्याकडून पी. चला कॅन्टीनमध्ये जाऊया." त्याच्या आग्रहाला ती टाळू शकली नाही. निमूटपणे उठून त्याच्या सोबत कॅन्टीनमध्ये गेली. 


   तिकडे सुजीत रिकाम्या वेळेत लायब्ररीत अभ्यास करत बसला होता. गीताच्या हे लक्षात आल्यावर ती सुद्धा लायब्ररीत गेली आणि सरळ सुजीतच्या समोरच्या टेबलवर पुस्तक उघडून बसली. अभ्यासात मग्न असलेल्या सुजीतचे तिच्याकडे लक्षच नव्हते. कलासची वेळ होत आली तशी लायब्ररीतली गर्दी कमी झाली. शेवटी लायब्ररीत ते दोघेच उरले. लायब्ररीयन तरी बरा तिथे हजर होता. नाहीतर प्रेमासाठी तळमळणाऱ्या या लैलाने (गीता) गळ्यालाच मिठी मारली असती. त्याची अभ्यास तपस्या कशी भंग करावी? या विचारात बेचैन गीता अस्वस्थ होत होती. शेवटी तिने हिंमत करून त्याच्या पायाला पायाचा स्पर्श केलाच. त्याचे लक्ष विचलित झाले, समोर गीताला बघून आश्चर्य दाखवत तो उद्गारला,


   "बोल, काय म्हणतेस गीता? का असा व्यत्यय आणलास अभ्यासात?" 


   "म्हटलं एवढ्या लवकर पारोची प्रेमकथा विसरलास की काय?" लडिवाळ सुरात गीता बोलली.


   "अगं ती एक अजरामर प्रेमकथा आहे. ती अशी विसरता येईल होय? अन् तिचा इथे काय संबंध? अभ्यासाच्या दिवसात अभ्यासच करायला पाहिजे. ती प्रेमकथा काही मार्क्स मिळवून देणार नाही परीक्षेत." सुजीतने तिला कर्तव्याची जाणीव करून दिली.

    

  "असं रे काय करतोस? मी कुठं नाही म्हणत्येय अभ्यासाला? पण थोडं आजूबाजूलाही पाहिलं पाहिजे. या वयात थोडीफार मौज मस्तीही केली पाहिजे." आवाजात मादकता भरत गीता बोलत होती. 


   "मी ही तेच म्हणतोय. हे वय अभ्यासाचे आहे, शिक्षणाचे आहे. शिक्षण पूर्ण झाल्या शिवाय इतर गोष्टीचा विचार नकोच नको." आपल्या मतावर ठाम रहात तो म्हणाला. 


   "तुझा हा विश्वमित्री बाणाच मला प्रभावित करतो आहे, उत्तेजित करतो आहे. मी तुझ्याकडे आपोआपच ओढली जात आहे. तुला काय सांगू, रात्र रात्र झोप लागत नाहीय मला. रात्रभर तळमळत असते मी. त्या कथेतला रॉबर्ट दुसरा तिसरा कुणी नसून माझा सुजीतच आहे असं मला वाटतं." गीता रोमांचित मूडमध्ये बोलत होती. 


  "आणि त्यातली पारो तूच असशील असंच ना? तो रॉबर्ट एक कलाकार होता. त्याला अर्थार्जन करण्यासाठी छानशी अन् आवडती नोकरीही होती. प्रेम करायला त्याला कशाची कमी होती? मी तर एक विद्यार्थी आहे. विद्यार्जन करण्याच्या वयात विद्यार्थ्याने केवळ विद्याच अर्जित केली पाहिजे." सुजीत सत्य तेच सांगत होता. परंतु गीताच्या बाबतीत ते सारे, _'पालथ्या घड्यावर पाणी'_ ठरत होते. गीता काही एक ऐकायला तयार नव्हती. शेवटी ही काही तशी ऐकणार नाही. चहा कॉफी काहीतरी घेतल्याशिवाय सोडणार नाही. असा विचार करून सुजीतने कॅन्टीनला जायचा प्रस्ताव समोर ठेवला, तशी गीता आनंदानं उठून चालायला लागली. 


  "बोल चहा, कॉफी घेणार? की काही नाश्ता घ्यायचा?" कोपऱ्यातला एक टेबल गाठून सुजीत विचारता झाला. 


   "ऐ, जिलबी गरम दिसते आहे, भजे आणि जिलबी घेऊया का?" गीता अति उत्साहात बोलत होती.


    "ठीक आहे. एक भजे आणि एक जिलबी घेऊन ये लवकर." वेटरला आवाज देत त्याने ऑर्डर दिली. 


   "एकच का रे? तू नाही घेणार? नको मग मीही नाही खाणार. कॅन्सल कर ऑर्डर." गीता नाराज होत म्हणाली.


    "अगं, तसं नाही. मला भूक नाहीय. शिवाय दोघे एकत्रच खाऊ की. तुझं पोट नाही भरलं तर पुन्हा मागवू ना. आधीच घेतलं तर थंड होईल ना." सुजीतने मार्ग काढत तिला समजावले. 


   "अरे व्वा! तू आणि मी एकाच प्लेटमध्ये खायचं? कित्ती मज्जा येईल ना? ऐ, आधी तू खायचं मग मी खाणार तुझं उष्टं. त्या अनाडी फिल्म मधल्या सारखं." गीता खूपच उत्तेजित होऊन बोलत होती. तिचा आवाजही वाढला होता. आधीच दुसऱ्या कोपऱ्यातल्या टेबल वर कॉफी घेत असलेल्या राधिकेचे लक्ष तिकडे वेधले गेले. आणि ती एकदम दचकून पहातच राहिली, तिचा सुजीत कुणातरी मुलीसोबत कॅन्टीनमध्ये आलेला होता. तिला ते पहावलं गेलं नाही. ती पट्कन उठली आणि काऊंटरवर जाऊन बिल देऊन बाहेर पडली, रमेश आला की नाही याचा विचारही न करता. रमेशने काहीच पाहिले नव्हते त्यामुळे त्याला काही तिच्या अशा उठण्याचे कारण समजले नाही. मनात नसतांनाही ती उठली म्हणून नाईलाजाने त्याला तिच्या मागे जावेच लागले. 


  रमेश आणि राधिका बाहेर जातांना सुजीतचे लक्ष तिकडे गेले. ' _राधिकेने आपल्याला गीता सोबत पाहिले तर नाही ना? तिने पाहिले असेल आणि हे सारे जर आबांना सांगितले तर? आपली काही खैर नाही.'_ या विचाराने तो बेचैन झाला. _'काही तरी करून तिला समजवावं लागेल.'_ परंतु गीता मजेत समोर आलेल्या भजे, जिलेबीचा आस्वाद घेत होती. सुजीत खातो की नाही? इकडेही तिचे लक्ष नव्हते.तिचे खाणे होईपर्यंत त्याला थांबणे भागच होते. गीताने सर्व खाऊन संपवले. सुजीतने बिल पेड केले आणि ते दोघेही बाहेर पडले. 


   इकडे रस्त्याने राधिकेला रमेश विचारत होता, 


   "राधिके, अगं असं अचानक काय झालं तुला तिथून निघायला?"


   'म्हणजे? यानं पाहिले नाही वाटतं सुजितला गीता सोबत, उगाच कशाला डांगोरा पिटत बसू मी?' असा विचार करत तिने बाजू सावरत क्लासचे कारण पुढे केले. "अरे, माझा इंग्लिशचा क्लास सुरू झाल्याचे मला आठवले. तुला तर माहीत आहेच मी इंग्लिशमध्ये जरा जेमतेमच आहे. म्हणून वाटले क्लास बुडवून नाही चालणार. म्हणून निघाले." तिने खोटेच सांगितले.

 

  "असं होय? मला वाटलं माझंच काही चुकलं की काय? असो येतो मीही माझाही समाजशास्त्राचा क्लास सुरू झाला आहे." असं म्हणत तो क्लास रूम कडे वळला. दोघेही आपापल्या कलासमध्ये गेले. 


   "सुजीत, मस्त झालं बघ. खूप छान टेस्ट होती नाही का भज्यांची? आणि जिलबी पण छान होती नाही का?" गीता सुजीतच्या हातात हात घट्ट पकडून चालता चालता बोलत होती. 


   "पोट भरलं ना तुझं?" सुजीतने त्रोटक पणे विचारलं.


   "हो भरलं की. ऐ, आपण रोज येत जाऊ इथे. मला खूप आवडली ही जागा." गीता अजूनही लव्हेरियाच्या अमलात होती, तर सुजीत मात्र अस्वस्थ होता. कधी एकदा राधिकेला गाठून तिची मनधरणी करतो असं त्याला झालं होतं. गीताला तिच्या क्लास रुमपर्यंत सोडून तो आपल्या क्लास मध्ये न जाता राधिकेच्या क्लास बाहेर उभा राहून ती बाहेर यायची वाट बघत होता.


*क्रमशः*


   *कसा वाटला हा भाग? पुढे कथेला कसे वळण मिळेल असं वाटतं? काय असावं असं तुम्हाला वाटतं? वाचा आणि जरूर प्रतिक्रिया कळवा, तुमच्या ओरमल प्रतिसादाच्या अपेक्षेत इथेच थांबतो. नमस्कार, भेटू लवकरच पुढच्या भागात. तोवर बाय


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance