झपाटलेले घर - भाग-११
झपाटलेले घर - भाग-११
_*_राजकारणात कधीच कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही.*__आबांच्या बैठकीच्या खोलीत *ठळक* अक्षरात लिहिलेले वाक्य आज शब्दशः खरे ठरले होते. परंपरागत विरोधक असलेले *आबा* आणि *बापू* आज चक्क एकत्र बसून चर्चा करत होते. मुलांनी कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेची लढवलेली निवडणूक जिंकून गावाचे, पूर्वजांचे नांव गाजवले होते. तेही दोन्ही विरोधकांच्या मुलांनी एकत्र येऊन नवा इतिहास रचला होता. या दोघांना आजवर जमले नव्हते ते नव्या पिढीने घडवून दाखवले होते. रमेश नि राधिका एकत्र झाले, त्यामुळे राधिका निवडून आली, संसदेची सचिव झाली, अन् पूर्ण संसदेला आपल्या इच्छेनुसार वागायलाही भाग पाडले. साहजिकच आबा आणि बापूंचा ऊर अभिमानानं भरून आला होता.
"आबा, आम्ही इतक्या दिवस जे म्हणत होतो, पण तुम्ही ऐकत नव्हतात, ते मुलांनी मात्र करून दाखवले." गुलाबराव बोलू लागले.
बैठकीत गुलाबराव, बाजीराव, माणिकराव आणि आणखी एक दोन जण हजर होते, ज्यांना ' __गावाच्या विकासासाठी हे दोघे जण एकत्र यावे_ '. असे वाटत होते.
"कुणी काही म्हणा. पण मुलगी गुणी निघाली. राजकारण रक्तातच असल्यामुळे कॉलेजमध्ये चांगलेच नाव काढले पोरीनं." माणिकरावांनी आबाची बाजू घेत आपले म्हणणे मांडले.
"अहो, आमच्या रमेशने मदत केली म्हणून जमलं सारं. नसता एकटीची काय बिशाद होती?" बाजीरावांनी नेहमीप्रमाणे बापूंची बाजू घेत मत मांडले.
"हे बघा, दोघेही समजदार आहेत. गावचा विकास भांडणात नाही तर एकीत आहे. हे शिकवण्या साठीच त्यांनी आपल्याला हा धडा घालून दिला. ते दोघे जसे कॉलेज निवडणुकीत एकत्र आले तसेच या दोघांनी पण ग्रामपंचायत निवडणुकीत एक होऊन निवडणूक बिनविरोध करून गावचा विकास साधावा." गुलाबराव मध्यस्थीचा विचार करून बोलले.
"मुलगी केवळ आबांची नाही तर या गावची लेक आहे. तिच्या पराक्रमाचे कौतुक करायलाच पाहिजे. म्हणूनच आबांचे अभिनंदन करण्यासाठी आपण इथे एकत्र आलोत." बापू म्हणाले.
"तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचार बोलून दाखवू का?" माणिकराव आबांकडे जरा भीतीयुक्त नजरेनेच पहात बोलले.
"बोला ना माणिकराव. तुम्ही काय वाईट थोडेच बोलणार? काही तरी चांगलेच सांगणार असणार. मनात असेल ते अगदी बिनधास्त सांगा." आबांनी ग्वाही दिली.
"मला वाटते. मुलं जसे या निवडणुकी साठी एकत्र आलेत. तसे ते कायम साठी जर एकत्र आले तर किती चांगले होईल?" माणिकरावांनी आपले मत जरा भीत भीतच मांडले. बहुतेक आबांना किंवा बापूंना हा प्रस्ताव मान्य होईल याची त्यांना शाश्वती वाटत नसावी. त्यांच्या या प्रस्तावावर सर्व जण आबा आणि बापूंच्या चेहऱ्या कडे पहात होते. तसेच ते दोघेही एकमेकांकडे सहेतुक नजरेने बघत होते.
"आबांची जर काही हरकत नसेल अन् त्यांना आम्ही त्यांच्या तोलामोलाचे वाटत असू तर.." असं म्हणत बापूंनी आपले बोलणे अर्धवट सोडत आबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"तर? तर काय बापू? स्पष्टच बोला की. आज काही आपण निवडणुकीचा विचार घेऊन एकत्र आलो नाही. तुम्ही अभिनंदन करायला आलात. हे आम्ही आमचे भाग्य समजतो." आबांनी बापूंना आश्वस्त केले.
"आबा, आपण दोघेही आता एकमेकांना विरोध करायचे सोडून हातात हात घालून एकत्र यावे असे वाटते आहे. यात आपल्या दोन्ही घराण्याचे भलेच होईल." बापू अजूनही मनातला विचार स्पष्टपणे सांगत नव्हते.
"नक्कीच! गावच्या हितासाठी आपण इथून पुढे एकमेकांना विरोध करणे सोडून देऊया." आबाही बापूंचे मनातले विचार समजून घेण्या साठी जेवढ्यास तेवढेच बोलत होते.
"आपले वडील हयात होते तोवर ते कायम ग्रामपंचायतचे बिनविरोध सदस्य राहिलेत. तसे तुम्हीही नेहमी साठी बिनविरोध सदस्य रहावेत या साठी इथून पुढे मी राजकारणातून संन्यास घ्यायचा विचार नक्की केलाय." बापूंनी आपला निर्णय जाहीर केला. त्यांचा हा अनपेक्षित निर्णय ऐकून त्यांचे समर्थकही अवाक् झाले.
विशेषतः माणिकराव जास्त विचलित झाले होते. या दोघांना एकत्र करायचे असेल तर नाते संबंध जोडणे आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते. मागच्या निवडणुकीच्या वेळेसच त्यांनी बोलून दाखवले होते. आताही ते तेच सांगू इच्छित होते. बापूंनी ते स्पष्ट पणे सांगावे असे त्यांना वाटत होते. पण बापू का कुणास ठाऊक जरा दबकून बोलत होते. 'आबांनी आपला प्रस्ताव धुडकावला तर आपला अपमान होईल' असे त्यांना वाटत असावे बहुतेक.
"बापू, जरा मनातलं मोकळं करून टाका की. मला वाटतं तुम्ही दोघांनी आता मुलांच्या लग्नाचा विचार करावा. शक्य असेल तर, किंवा दोघांनाही मान्य असेल तर बापूंनी राधिकेचा सून म्हणून आणि आबांनी रमेशचा जावई म्हणून स्वीकार करावा. म्हणजे सारं काही गोड होईल. असं मला वाटतं." असं बोलून त्यांनी दोघांकडेही प्रश्नार्थक नजरेने पाहीलं.
"आबांची हरकत नसेल तर आम्ही राधिकेला सून करून घ्यायला तयार आहोत. अर्थात त्यांना आमचे स्थळ पसंत पडत असेल तरच." माणिकरावांच्या म्हणण्याला दुजोरा देत आबांच्या समोर बापूंनी संबंधाचा प्रस्ताव ठेवला.
"बापू आम्हाला जोडून घेऊ इच्छितात हे पाहून आम्हाला नक्कीच आनंद होत आहे. आमचे स्थळ त्यांना पसंत पडले हे आमचे परम भाग्यच आहे. आम्हीही यासाठी तयार व्हायला हरकत नाही. पण.." आबा बोलता बोलता अचानक थांबले.
"पण काय आबा?" माणिकराव अधीरतेने विचारते झाले.
"तुम्हाला माहीतच आहे माणिकराव, राधिका आमची एकुलती एक कन्या आहे. आई वेगळी पोर, लाडात वाढली तिचा विचार घेतल्याशिवाय एवढा मोठा निर्णय मी नाही घेऊ शकत. माफ करा बापू, मी तुम्हाला आज यावर नक्की काहीच सांगू शकत नाही. मला राधिके सोबत बोलूनच निश्चित करावे लागेल. तिचा होकार मिळाला तर मी लगेच कळवतो." आबांनी असे सांगताच सर्वांच्या जीवात जीव आला.
"काही हरकत नाही. आम्हालाही तशी काही घाई नाही. मनात आलं ते तुमच्या समोर ठेवलं. मीही रमेशला विचारलेलं नाही अजून, म्हणूनच बोलू की नको या संभ्रमात होतो. त्याला विचारून घेतो. मला खात्री आहे, तो नाही म्हणणार नाही." बापूही जरा मनमोकळे बोलते झाले.
"बरं काही हरकत नाही. मीही आज राधिका घरी आली की विचार घेतो तिचा. ती हो म्हटली की, मी लगेच येतो तुमच्याकडे. तुम्हीही रमेशला विचारा. त्याला आवडत असेल तरच, नाहीतर उगाच मनाविरुद्ध 'हो' म्हणायला लावू नका त्याला." आबा बापूंना म्हणाले.
"ठीक आहे. मग येतो आम्ही. भेटू लवकरच." असं म्हणत बापू उठायला लागले तसे आबांनी खुणेनेच त्यांना थांबायला सांगितले.
"चहा येतोय. तेवढा चहा घेऊन जा सर्वजण." आबांनी सर्वांना थांबवले.
चहापान झाले आणि सर्वजण बैठकीतून बाहेर पडले.
गंगूबाईने बैठकीतली चर्चा आतून ऐकली होती. एवढ्या साऱ्या चर्चेत सुजीतच्या नावाचा उल्लेखच केला नाही कुणी. सुजीतच्या नावाचा विचार सोडून चाललेली चर्चा ऐकून ती मनात नाराज झालेली होती.
"आबा, मुलं येतीलच आता. काय करायचे आज जेवायला?" बोलावेसे वाटत असूनही गंगूबाई आबांच्या आदरयुक्त भीतीमुळे फक्त एवढंच बोलू शकल्या.
"मुलांना आवडेल ते कर." आबांनी एवढे सांगितले पण पुढे बोलू की नको या विचारात गंगुबाई तिथेच थांबली.
"आबा, राधिका आता बरीच मोठी झालीय. तिच्या लग्नाचा विचार करायलाच पाहिजे आता." तिने भीत भीतच प्रस्ताव मांडला. आबा काय बोलतात हे ऐकण्यासाठी ती तिथेच घुटमळली.
"बघावेच लागेल. ही मंडळीही आत्ता तेच म्हणत होती. सर्व गोष्टी योग्य त्या वेळीच व्हायला पाहिजे. राधिका माझ्या काळजाचा तुकडा, या घरातून बाहेर जाणार या कल्पनेनंच मला कसंतरी व्हायला लागतंय. ती सासरी गेल्यावर कसं होईल ते होवो." आबा कासावीस होऊन बोलत होते.
'खरं तर तिला घराबाहेर पाठवायची गरजच कुठे आहे. सुजीत सोबत तिचे लग्न लावले तर ती याच घरात राहू शकणार आहे.' बोलायचे मनात असूनही गंगुबाई बोलू शकली नाही.
"बघू तिच्या नशिबात कोणते घर येते ते. तिलाही विचारावे लागेल. आणि हो! सुजीतचेही उरकून टाकू. त्याच्यासाठी ही बघतो एखादे स्थळ." नकळत आबांनी सुजीत - राधिकेची जोडी जमणार नाही असेच जणू सुचवले होते.
गंगुबाई मनातून नाराज झाली परंतु चेहऱ्यावर न दाखवता आत निघून गेली. संध्याकाळी सुजीत राधिका आले. पण कुणीही काही विषय काढला नाही. जेवण करून आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले.
रात्रभर गांगुबाईच्या डोळ्याला डोळा लागला नाही तिचा. 'आबा सुजीतचा जावई म्हणून का विचार करत नसतील? राधिकेला जर घराबाहेर पाठवायचे नसेल तर सुजीत आहेच की? त्याला जावई बनवायला काय हरकत असावी. का नको म्हणत असेल त्यांचं मन? त्यांच्या उपकारात जगते म्हणून का? माझ्या सुजीत मध्ये काय कमी आहे?' गंगुबाई विचार करून करून थकून झोपी गेली.
(क्रमशः)

