Prajakta Yogiraj Nikure

Fantasy

4.6  

Prajakta Yogiraj Nikure

Fantasy

हमारी अधुरी कहाणी

हमारी अधुरी कहाणी

27 mins
1.8K


हमारी अधुरी कहाणी


                     सकाळचे १० वाजून गेले होते. शाल्मली घरातील आवराआवरी करण्यात व्यस्त होती. सकाळी उठून मुलाचे आवरून त्याला शाळेत पाठवणे , नवऱ्याला डब्बा करून देणे या सगळ्या कामात तिला बराच उशीर होत होता . त्याच वेळेस तिचा मोबाईल वाजला.

  

 “ ट्रिंग ट्रिंग ......... ट्रिंग ट्रिंग ......... “ मोबाईलची रिंग एकसारखी वाजत होती. शेवटी कंटाळून तिने तो कॉल रिसिव केला .


“ हॅलो , मिसेस अनुराधा रानडे बोलत आहेत का ? हॅलो ..... हॅलो ....... कोणी आहे का कॉलवर “

थोडा वेळ तसाच जातो पलीकडील ती व्यक्ती हॅलो ....... हॅलो ...... बोलत असते .


थोड्या वेळाने घरातील कसल्याश्या आवाजाने शाल्मली भानावर येते.

“ हॅलो … हॅलो ...... शाल्मलीचा कंठ दाटून येतो पलीकडील व्यक्ती पण मिसेस रानडे आहेत का हे विचारात असते.


“ हॅलो, मी मिसेस शाल्मली साठे पाटील बोलत आहे .”


थोडा वेळ कोणी काहीच बोलत नाही. बोलण्यात खूप मोठा पॉझ येतो फक्त दोघांच्या श्वासांचा जोरजोरात आवाज त्या फोनवर येत असतो शेवटी शाल्मलीच विचारते


“ तू समीर जोशी बोलत आहेस ना ..... हे बघ मी तुझा आवाज ओळखला आहे बोल ना ........ तू समीर बोलतोयस ना ..... “


“ हो , शाल्मली मी समीरच बोलत आहे पण तू कस ओळखलस मला “


“ अरे असं काय करतोस कधी काळी आपण खूप चांगले मित्र होतो विसरलास कि काय तुला कस ओळखणार नाही मी “


“ असं होय , अगं मी माझ्या एका क्लाएंटला कॉल करत होतो आणि योगायोगाने तो कॉल तुला लागला “ समीरला खूप आनंद झाला होता जिला आपण शोधत होतो तिच्याशी आज इतक्या वर्षांनी बोलतोय यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.


बराच वेळ शांतता होती दोघांनाही काय बोलावे हे कळत नव्हते. असे होते ना कधी कधी , आपली आवडती व्यक्ती खूप दिवसांनंतर आपल्याला भेटते तेव्हा काय बोलावे हेच नेमकं समजत नाही पण मनातून आपण त्या व्यक्तीशी काय काय बोलत नसतो हो ना ..... शेवटी शाल्मलीच बोलते .

“हो का , बरं काय करत असतोस तू आता “

“ काही नाही गं एका आयटी कंपनीमध्ये जॉबला आहे आणि तू काय करत असतेस “

“ मी ..... मी काय करणार आहे. एक गृहिणी आहे मी , मस्त सुरू आहे माझं “

शाल्मलीचा आवाज थोडा रडका झाला होता पण परत हसून तिने त्याला विचारले कि ,

“ मग आता काय करतात तुझी बायको मुले , कसं सुरू आहे मॅरिड लाईफ मजेत ना आणि राहतोस कुठे आता

तू “ शाल्मली

“ माझं जाऊ दे तुझ मॅरिड लाईफ काय म्हणतय मग आणि मी सध्या पुण्यात परत आलो आहे तू कुठे असतेस “ समीर

“ काही नाही रे मस्त चालू आहे एक आठ वर्षाचा मुलगा आहे मला आणि मी पण पुण्यातच आहे “ शाल्मली

“ अरे वाह मस्त , छानच कि मस्त रमलियेस वाटतं. बरं मला माझे बॉस बोलावत आहे मी जाऊन येतो. हा तुझाच नंबर आहे ना कि मिस्टरांचा आहे “ समीर

”नाही रे हा माझाच नंबर आहे , का रे “ शाल्मली

“अगं काही नाही मी करतो तुला नंतर कॉल चालेल ना कॉल केला तर नाही म्हटलं तुझं लग्न झालं आहे ना आता , विचारलेलं बरं “ समीर

“ एवढं का एक्सप्लेन करतोयस कधीही कॉल केला तरी चालेल ओके “ शाल्मली

“ मग आता ठेवतो मी नंतर करेल तुला कॉल फ्री झाल्यानंतर बाय “ समीर

“ बाय टेक केअर “ शाल्मली 

शाल्मलीने फोन ठेवून दिल्यानंतर तिचे हुंदके बाहेर येतात आणि तिचा तिच्यावर कंट्रोलच राहत नाही तिला काय होत आहे हेच तिचे तिला कळत नाही पण तो दिवस तिला खूप वेगळा जातो फोन ठेवून दिल्यानंतर ती एकदम पंधरा वर्षे मागे जाते. समीरची आणि तिची पहिली कॉलेजमधली भेट तिला आठवते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


“ आज काहीही करून माझी ऍडमिशन झालीच पाहिजे. रोज काहीना काही डॉक्युमेंट विसरते मी घरी पण आज आणल आहे सर्व.”

 शाल्मली आपल्याच विचारात इकडे तिकडे न बघता सरळ ऍडमिशन हॉलकडे चाललेली असते आणि तेवढ्यात ती एका मुलाला जोरात धडकते त्या मुलाचा जोरात धक्का लागल्याने तिच्या हातातील बॅग खाली पडते आणि त्याबरोबर ती पण खाली पडते. तो बिचारा तिला हात देऊन उठवतो पण त्याचा धक्का लागल्याने शाल्मली खाली पडलेली असते आणि आजूबाजूची मुले तिच्याकडे पाहून हसताना पाहून तिचा पारा वर चढतो ती त्याला एक जोरात कानाखाली देऊन तेथून पाय आपटत निघून जाते या एका मारात त्याला मात्र अख्ख ब्रह्माण्ड आठवत. आपला गाल एका हाताने चोळत तो तिच्याकडे केविलवाण्या नजरेने बघतच राहतो . शाल्मली मात्र रागारागात हॉलकडे निघून जाते.

त्यादिवशी शाल्मलीची ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये होऊन जाते. शाल्मली मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला तेथे ऍडमिशन घेते. कॉलेजच्या पहिल्या दिवशी जेव्हा ती तिच्या वर्गात जाते तेव्हा तो मुलगा तिच्या कलासरूममध्ये दिसतो आणि त्याला पाहून परत तिचा पारा चढतो हे बघून तो मात्र आपल्या गालावर हात ठेवून तसाच उभा राहतो . त्यांच्या कडे पाहून तिला मात्र हसू येतं आणि तिची चूक देखील तिला समजते. अगदी हळुवार मान खाली खालून ती त्याच्याकडे माफी मागायला जाते तो मात्र भीतीने अजूनही तसाच उभा  शाल्मलीकडे पाहत राहतो ती त्याच्याकडे जाते तरीही तो मात्र गालावरून हात काढायला तयार नसतो . आता मात्र ती त्याला या अवस्थेत पाहून जोरजोरात हसू लागते . त्याला कळतच नाही ती का हसत आहे ते तो आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतो

“ सॉरी , मी शाल्मली पाटील या कॉलेजमध्ये माझं न्यू ऍडमिशन आहे. ऍम एक्स्ट्रीमली सॉरी , त्यादिवशी तुमची काही चूक नसताना मी तुमच्यावर हात उचलला . मी त्या दिवशी खूप घाईत होते आणि चूक सगळी माझीच होती मीच इकडे तिकडे न बघता सरळ जात होते आणि त्यात तुम्ही माझ्यासमोर आलात आणि हे सगळं घडलं खरच मला माफ करा “  

आता चकित होण्याची वेळ समीरची होती त्यादिवशी रणचंडिकेचा अवतार धारण करणारी ही मुलगी आज कशी सोज्वळ वाटते.

“ अहो मी तुमच्याशी बोलत आहे “ शाल्मली

“ अं ......... हो हो , सॉरी माझं लक्ष नव्हतं आणि सॉरी नको बोलूस तु इट्स ओके आणि बायदवे मला अहोजाहो का करत आहेस. मी काही म्हातारा दिसतो का तुला की काठी टेकवत टेकवत चालत आहे आ काय हा यातलं काहीतरी करतोय का मग , तू मला अरे तुरे करू शकतेस मिस शाल्मली. मी समीर जोशी या कॉलेजमध्ये सेकंड इयरला आहे.

समीर तिच्या समोर हात पुढे करून “ नाऊ वी आर फ्रेंड्स “ शाल्मली देखील हात मिळवून त्याच्याशी मैत्री

करते . या कॉलेजमधील पहील्या दिवशी पहिला झालेला मित्र तो म्हणजे समीर जोशी.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

               तेवढ्यात दारावरची बेल कोणीतरी सतत वाजत असल्याचा आवाज शाल्मलीला येतो. ती घड्याळात बघते तर दुपारचा दीड वाजलेला असतो. पटकन उठून ती दार उघडायला जाते तर दारात तिचा मुलगा उभा असतो.

“ आई तू काय नाही आलीस मला घ्यायला मी आज साक्षीच्या मम्मी बरोबर आलो “

“ असे नाही रे बाळा सॉरी ना , मी परत नाही करणार हा असं. माझ्या बाळाला खूप भूक लागली असेल ना जा पटकन हात पाय धुवून घे मी तुझ्यासाठी एक खाऊ केला आहे तो खाणार ना तू जा मग पटकन हात पाय धुवून घे शहाणं माझं बाळ “

“ हो आई मी आलोच हा “

                  नाही शाल्मली तुला आता तुझं पहिलं प्रेम विसरायला हवं तो तुझा भूतकाळ होता आणि गौरव तुझा वर्तमान असं भूतकाळात रमून कसं चालेल. नाही मी परत नाही हरवणार भूतकाळात पण असं होतं का ? आपल्या आयुष्याचा एक भाग असतो आपला भूतकाळ आणि तो सहजासहजी कसा विसरता येईल माझ्या या भूतकाळात गोड आठवणी आहेत आणि त्या मला भरभरून जगायच्या आहे परत एकदा. हो मी जगणार त्या आठवणी परत एकदा आणि नाही अडवणार मी स्वतःला आता.

              शाल्मलीच्या मनात उलथापालथ सुरु होते काय करावं आणि काय करु नये याचं अस तिचं देखील खरंच होतं ना असं कसं आपण आपला भूतकाळ विसरून जाऊ शकतो ते कधीच शक्य होत नाही आयुष्याच्या वळणावर तो भूतकाळ परत कधीतरी आपला वर्तमान म्हणून आपल्या समोर येत असतो.

शाल्मली बरेच दिवस समीरच्या फोनची वाट बघत असते असेच दुपारच्या वेळी तिला एका अननोन नंबर वरून कोणाचातरी कॉल येतो तो कॉल ती रिसिव्ह करते . 

“ हॅलो शाल्मली , मी समीर बोलतोय सॉरी हा मी खूप दिवसांनी तुला कॉल केला पण काय करणार काम खूप होतं आणि रात्रीचा तुला कॉल कसा करणार म्हणून तुला रात्री कधी कॉल केला नाही मी “

“ अरे , थांब थांब किती ते एक्सप्लेन करतोयस तुझी जुनी सवय गेली नाही वाटतं संदर्भासहित स्पष्टीकरण प्रत्येक वेळी स्पष्टीकरण द्यायलाच हवं आहे का ? आणि हो खरे तर मी रागावले होते तुझ्यावर कॉल करतो म्हणाला आणि कॉल केलाच नाहीस पण आता तुझा आवाज ऐकला आणि राग कुठच्या कुठे पळून गेला बघ “

“ मग काय तर , आहेच माझा आवाज तसा त्याला मी तरी काय करणार माझा नुसता आवाजच काहीजणांचा राग दूर करतो “

“ हो का , मला माहीतच नव्हतं . तुला स्वतःचं कौतुक ऐकायला आणि करून घ्यायला खूपच आवडतं “

“ हो मग तुला नाही का वाटत असं कोणी तुझं कौतुक करावं तू हि त्यातलीच की ”

“ म्हणजे काय म्हणायचे आहे तुला “

“ बघ परत चिडली ना चिडकाबाई “

“ आता खेचू नकोस हा माझी काय ते नीट सांग आणि मला समजेल अशा भाषेत कळलं का मिस्टर जोशी “

“ मिस्टर जोशी होय , बरं तू नाही का नटून-थटून येऊन माझ्या मागे लागायचीस सांग ना समीर मी कशी दिसते ते कॉलेजमध्ये कोण छान दिसते ते आणि तुला हे सांगण्यासाठी मी बाकी मुलींकडे बघायला लागलो की तु मात्र चिडायची “

“ चिडू नको तर काय, माझं कौतुक करायला तू सगळ्या मुलींकडे बघायचास आणि नंतर माझ्याकडे बघून माझं कौतुक करायचा मग चिडणार नाही तर काय “

“ असं होय मला वाटलं .......”

“ तुला काय वाटलं ? “

“ जाऊदे , मी फोन यासाठी केला होता की तू मला भेटू शकतेस का उद्या “

“ अरे हे काय विचारणं झालं का ? हो मी नक्की भेटू शकते बरं कुठे भेटायचं आपण “

“ तुला आठवत का आपल्या कॉलेज जवळच कॅफे तेथे भेटायचं का आपण आपल्या आवडीचे ठिकाण “

“ हो चालेल, मी येईल सकाळी अकरा वाजता कॅफेमध्ये “

“ ओके चल बाय टेक केअर अँड ऍम वेटिंग फॉर यू ओके “

“ ओके बाय टेक केअर मीट यु टुमारो “

                              

                       बाहेर अंधारून आलं होतं ढग मागे पुढे सरकत होते. वेगवेगळ्या आकृत्या त्या ढगांमध्ये तयार होत होत्या वारासुद्धा स्वैर होऊन सु-सु करून वाहत होता आणि ढगांना पुढे घेऊन जात होता. आकाशात रंगांची उधळण केली आहे असे वाटत होते. छानश्या इंद्रधनुष्याच्या छटा चौफेर पसरल्या होत्या जणु काही कोणीतरी आकाशात रंग खेळत होते आणि त्या रंगांमध्ये छान कलाकृती तयार झाली होती. छान थंड आल्हाददायक वातावरण तयार झाले होते अगदी रोमॅण्टिक कधीही पाऊस पडण्याची लक्षणे दिसत होती आणि तो पहिला पाऊस पहिला मातीचा सुगंध बरसू लागला. जोरजोरात ढगांचा आवाज , विजांचा कडकडाट करून पाऊस धो -धो बरसू लागला. गरम झालेल्या मातीवर पाऊस पडल्यावर येणारा तो मातीचा सुगंध भान हरपून टाकत होता. शरीरावर एक थंड लहर वाहून जात होती अंगावर शहारे येत होते. किती मस्त तो पाऊस ना , खरच खूप छान वाटतं पावसात उभं राहून रडलं तरी कोणाला कळत नाही आणि या पावसातच मन कसे अगदी शांत होते.

            गॅलरीत उभा राहुन समीर कॉफीचा मग हातात घेऊन कॉफीचा आस्वाद घेत होता. त्याला आणि शाल्मलीला पावसात भिजायला , पावसात गुंग होऊन जायला , आपलं भान हरपून त्यात रमून जायला खूप आवडायचं पण गेली कित्येक वर्षे समीर पावसात भिजलाच नाही. खूप वेळा त्याला पावसात भिजायचा मोह व्हायचा पण कधी तो मनसोक्त पावसात भिजूचं शकला नाही. आपल्या गॅलरीत उभा राहून त्याला पावसाळ्यातील शाल्मली सोबत घालवलेले दिवस आठवत होते .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                           नुकतचं कॉलेज सुरू झालं होतं आणि पावसाळाही पण हल्ली पाऊस काही ठरलेल्या वेळेवर येत नाही तो नेहमी मागे पुढे सरकत असतो. कॉलेजचा पहिलाच दिवस तो सगळेच उत्साहात आणि जोमात सुट्ट्यांनंतर सगळे मित्र भेटणार म्हणून आनंदात. समीर आधीच कॉलेजमध्ये आला होता आणि त्याची नजर शाल्मलीला शोधत होती. आपले मित्र आपल्याशी काही बोलत आहे याचे देखील त्याला भान उरले नव्हते. सतत लक्ष गेटबाहेर पण शाल्मली काही दिसेना. तिला फोन करून विचाराव म्हटलं तर आजच्या सारखा मोबाईल काय प्रकरण आहे हेदेखील त्यांना माहीत नव्हतं .

                     ती येते की नाही येत याच विचारात असताना गेटमधून शाल्मलीची एन्ट्री झाली. छानसा गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस , त्या ड्रेसवर नाजुकशी नक्षी आणि तितकीच नक्षीदार अशी ओढणी , हातात नाजुकसे ब्रेसलेट आणि कानात लहान झुमके , कपाळावर चंद्रकोर समीर हरवूनच गेला तिला बघून पहिल्यांदा त्याला त्याच्या हृदयाची धडधड खूप मोठयाने होत आहे असं जाणवलं. गव्हाळ वर्णी , चाफेकळी नाक , मृगनयनी मोठाले पाणीदार डोळे त्यावर कोरीव अशा भुवया नाजूक गुलाबाच्या पाकळ्यां सारखे ओठ , लांब केशसंभार , नाजूक बांधा , उंचीला मध्यम अशी शाल्मली त्या ड्रेस मध्ये खूप खुलून दिसत होती तिचे हास्य पण खूप मोहक कोणीही चटकन तिच्या प्रेमात पडावे असे. बोलणे खूप लाघवी आणि कोणालाही सहज तिला पटवता यायचे तिच्या बोलण्याने समोरच्या माणसावर सकारात्मक परिणाम व्हायचा. शाल्मली आपल्या डोळ्यासमोर आली आहे हे देखील समीरला कळले नाही. तो तिच्याकडे डोळे फाडून बघत होता. शेवटी तिनेच त्याची तंद्री भंग केली.


“ ओ मिस्टर जोशी काय बघताय कधी बघितलं नाही का मला , असं काय बघताय “

“ लावण्य बघतोय , जणू स्वर्गातली परीच आज पृथ्वीवर अवतरली आहे असं वाटतंय. खूप छान दिसत आहेस तू “

समीरला शब्दच सुचत नव्हते आणि तो काय बोलतोय हे देखील त्याच त्याला कळत नव्हते .

“ खरं का , बस कर आता तुझा आगाऊपणा “

“ अगं खरचं बोलतोय मी खोटं का बोलू मी “

“ ते जाऊदे , मी जाते माझ्या क्लासमध्ये तू बस तेथेच आणखीन कोणी परी दिसते का ते बघायला “

“ तु ना शाल्मली ....... शाल्मली ...... अगं थांब मी पण येतोय शाल्मली ........ शाल्मली थांब”

                   शाल्मली तर लाजेने चूर झाली होती तिच्याही नकळत तिच्या गालावर लाली आली होती आणि आणखीन काही ऐकायच्या आधीच ती तेथून तिच्या क्लासमध्ये पळाली होती. समीर मात्र तिला आवाज देतच राहिला तो आवाज ऐकण्यासाठी शाल्मली मात्र तिथे होती कुठे. लेक्चर संपल्यानंतर ती कलासच्या बाहेर आली तो आधीच त्यांच्या कट्ट्यावर बसलेला होता.

                  बाहेर खूप अंधारून आलं होतं. कधीही पाऊस पडेल अशी लक्षणे दिसत होती वारा सुसाट वेगाने वाहत होता जमिनीवरील सर्व कचरा सु-सु करत गोल गोल हवेवर तरंगत होता सूर्य सुद्धा कुठे गुडूप झाला होता माहित नाही. अंधार झाला होता सर्वीकडे कॉलेजमधील फुल झाडांवरून फुलांचा सडा खाली पडत होता मोठ मोठ्या झाडांची पिवळी धम्मक पाने गळून त्याचा खच झाला होता. मुले-मुलीसुद्धा पाऊस येणार म्हणून घरी जाण्याची घाई करत होते काही वेळातच सर्व कॉलेज रिकामे झाले पण समीरला शाल्मली कुठेच दिसेना सर्व कॉलेज त्याने शोधून काढले पण तिचा काही पत्ताच नाही. नेहमी तर ती मला सांगून कॉलेज बाहेर जाते पण आज ती दिसतच नव्हती समीर खूप अस्वस्थ झाला होता ती न दिसल्याने. तेवढ्यात समीरला काहीतरी क्लिक झाले आणि तो कॉलेजच्या मागच्या बाजूला गेला तेथे पारिजातकाची , चाफ्याची, चमेलीची आणि बुचाची झाडे होती. या फुलांचा सुगंध किती छान येतो ना आपण कोणत्यातरी नवीन जगात आलो आहोत असे वाटते. या फुलांच्या सुगंधाने अगदी मन मोहवून टाकते. कशी ही मनाची स्थिती असो या फुलांच्या राज्यात आले की मन खूप हलके हलके होऊन तरंगायला लागते . 

                      समीर त्या फुलांच्या गंधाने मंत्रमुग्ध झाला होता. पावसाचे टपोरी थेंब त्याच्या अंगावर पडल्यावर तो या जगातून बाहेर आला. थंड अशी हवेची झुळूक त्याच्या शरीरावर रोमांच उभे करून गेली परत त्याला शाल्मलीची आठवण आली. त्याने चाफाच्या झाडाखाली बघितले तर त्याला शाल्मली तेथे दोन्ही हात पसरवून गोल गिरकी मारताना दिसली . पावसाचे थेंब जितके शक्य होईल तितके ती स्वतःमध्ये सामावून घेत होती . ओले मोकळे केस तिच्या सौंदर्याला चार चांद लावत होते चेहऱ्यावरून हळूहळू खाली येत पावसाचे थेंब जमिनीमध्ये अलगद मिसळून जात होते . पहिल्या पावसात भिजल्याचा आनंद तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. निरागस, अल्लड स्वतःच्याच जगात रममाण असणारी ती एक सुंदर परीच भासत होती. पहिला पाऊस असल्याने तप्त झालेल्या जमिनीने पाणी पटापटा पिऊन टाकले होते आणि त्याचा तो मोहवून टाकणारा सुवास सगळीकडे पसरला होता. त्यातच भर म्हणून पारिजातक, चाफा , चमेली , बकुळीची फुले, बुचाची फुले यांचा सुगंध सर्वीकडे पसरला होता.

             समीर शाल्मलीकडे एकटक बघतच राहिला. मनातून एक वेगळीच भावना जन्म घेऊ लागली होती ती म्हणजे प्रेमाची त्याच्याही नकळत तो शाल्मलीच्या प्रेमात पडला होता आणि त्यादिवशी त्याची कबुली त्याने स्वतःला करून दिली होती. अजूनही शाल्मली पावसात भिजत होती अगदी देहभान हरवून ती पावसामध्ये एकरूप झाली होती. आता आपल्याला निघावे लागेल याची जाणीव समीरला होताच त्याने तिला आवाज दिला. ती तर घरी जायलाच तयार नव्हती शेवटी कसतरी समीर तिला जबरदस्ती घरी घेऊन गेला. घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आले की आपण देखील पूर्णपणे भिजलो आहोत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


            हळूहळू पावसाचा जोर जरा ओसरला आणि समीरच्या मगातील कॉफी देखील संपली. किती छान होते ना ते दिवस मंत्रमुग्ध करणारे, शाल्मली सोबत घालवलेले, मित्रांबरोबर दंगा-मस्ती केलेले , एकाच बटर पावामध्ये कितीजणांच्या शेअरिंग असायची. नवीन काही आले की त्याची उत्सुकता देखील खूप होती पण आता सगळंच बदललं आहे . समीर स्वतःच्याच तंद्रीत होता आणि घड्याळात १० चा ठोका वाजला आणि तो त्या तंद्रीतुन बाहेर आला त्याला जाणीव झाली की , आता खूप उशीर झाला आहे. उद्या शाल्मलीला भेटायला जायचे आहे. झोपायला हवे आता.

                 इकडे शाल्मली देखील झोपण्याची तयारी करत होती पण झोप तर यायला हवी ना खूप वर्षांनी कोणीतरी जवळचा माणूस भेटला असेल ना तर एक वेगळेच फिलींग येत ना शाल्मलीला तर एक सारखी धडधड होत होती. कशी असेल ही भेट ? समीर कसा दिसत असेल आता , आपल्याला बघून तो काय म्हणेल आधीसारखं आम्ही आता बोलू शकेल का ? एक ना अनेक प्रश्न तिला भंडावून सोडत होते. एक एक आठवणी तिच्या डोळ्यासमोरून जात होत्या. असे वाटत होते की आता आता तर हे दिवस संपले आहेत पण कुठेतरी एक मन हे देखील सांगत होते कि हे दिवस संपले नसते तर आपण लहानच राहिलो असतो तर , किती बरं झालं असतं हा विचार करत असतानाच तिला कधी झोप लागली हे देखील तिला कळले नाही.

           सकाळी उठून तिने सर्व घरातली कामे आवरली मुलाला शाळेत सोडून आली आणि साक्षीच्या मम्मीला तिने सांगून ठेवले कि घरी यायला जर उशीर झाला तर त्याला घेऊन या. नवऱ्याला देखील तिने सांगून ठेवले होते की ती समीरला भेटायला जात आहे. यात तिच्या नवऱ्याला गौरवला काहीच प्रॉब्लेम नव्हता मुळात त्याने तिला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. तिच्या मनाप्रमाणे वागायला आणि तो कधीही तिच्यावर आडकाठी करत नसे नेहमी तो तिला समजावून घेत असे तिच्या मनाचा, विचारांचा नेहमी त्याला आदरच वाटत आला आहे. तिच्या मित्रांबद्दल कधीही आक्षेप त्याने घेतला नाही .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

          शाल्मली तिच्या कॉलेज शेजारील कॅफेत त्याला भेटण्यासाठी घरातून निघाली . कॉलेजमध्ये समीर कसा होता ना , कॉलेजमध्ये प्रत्येक इव्हेंटमध्ये त्याचा सहभाग होता. गिटार तर काय मस्त वाजवत होता ना. एका इव्हेंटमध्ये त्याने गिटार वर एक खूप रोमॅंटिक गाणं वाजवल होतं मला तर ते खूप आवडलं होतं. कोणतं बरं ते गाणं ......... हा आठवलं .

                                 

                                “ मेरा दिल भी कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है “


किती सुंदर पद्धतीने म्हटलं होतं ना मला तर खूप आवडलं होतं. त्यानंतर तर त्याला किती जणांनी विचारलं होतं कि ती कोण आहे म्हणून पण हा पठ्ठ्या कोणालाही पत्ता लागू देत नव्हता. सर्वच किती चिडवायचे त्याला त्या गाण्यावरून. मी देखील कुठे कमी होते हात धुऊन त्याच्या मागे लागले होते कि ती मुलगी कोण आहे हे सांग म्हणून. कॉलेज संपलं पण याने काही तीच नाव सांगितलं नाही पण माझ्या मनात मात्र कालवाकालव होत होती . त्यावेळी त्याला जर कोणी चिडवायचे तर खूपदा सांगावेसे वाटायचे त्याला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ते, पण कधी हिम्मतच नाही झाली सांगायची .

                कॉलेजमधल्या मुली तर नुसत्या त्याच्या मागेपुढे करायच्या. होताच तो तसा स्मार्ट लुकिंग, हँडसम , थोडा सावळा हसला की त्याच्या गालावर खळी पडायची. लोकांना पटवायची त्याच्याकडे एक वेगळीच कला होती. संगीतावर त्याचं खूप प्रेम होतं. संगीत त्याचा जीव की प्राण. गिटारवर गाणे सुद्धा तो खूप मस्त वाजवायचा आणि वार्षिक स्नेहसंमेलनाला त्याने वाजवलेले ,

                           

                                 “ कसम की कसम हे कसम से हमको प्यार है सिर्फ तुमसे “

            किती छान वाजवलं होतं आणि तेथेच माझ्या हृदयाचा ठोका चुकला या कार्यक्रमानंतर किती मुली त्याच्या मागे लागल्या होत्या. माझ्या तर मनाची नुसती घालमेल सुरू होती पण खूप चांगली घट्ट मैत्री होती आमची. माझं प्रेम व्यक्त करण्याने ती तुटेल का ? ही भीतीदेखील वाटत होती आणि त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम नसेल तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल हा विचार करून सुद्धा कधी मी माझ्या मनातलं नाही सांगितलं त्याला. तो कवितादेखील खूप सुंदर करायचा ना. दरवर्षी त्यांच्या कविता कॉलेजमध्ये वार्षिकात प्रकाशित होत होत्या. आताही करत असेल का तो कविता , वाजवत असेल का गिटार काही तर काहीच माहित नाही. मी कशी समोर जाऊ त्याच्या माझे मलाच कळत नाहीये .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                  शाल्मली आपल्याच विचारात गुंतली होती. रिक्षावाल्याने आवाज दिल्यानंतर तिला कळले कि ती कॅफेत येऊन पोहोचली आहे ते. ती रिक्षातून खाली उतरली आणि रिक्षावाल्याला पैसे देऊन ती त्या कॅफेमध्ये जाऊ लागली. मस्त ऐसपैस मोकळी जागा , कॅफेच्या चारही बाजूला शोभिवंत झाडे आणि फुलझाडे , बरोबर मध्यभागी टेबल ठेवलेले, त्या टेबलावर लाल लाल टवटवीत गुलाबाचे फुल , त्याच्या सुरुवातीलाच मोठी चार ते पाच बुचाची झाडे आणि त्या झाडाची पांढरी शुभ्र टवटवीत लांब दांडा असलेली फक्त चारच पाकळ्या असणारी फुले खाली पडली होती त्याचा सुगंध सगळीकडे पसरला होता. आपल्याला किती आवडायची नाही हि फुले त्याचप्रमाणे त्या बुचाच्या झाडा शेजारी चाफ्याचे झाड होते त्या फुलांचा देखील खाली खच पडला होता. आपण किती वेडे होतो ना कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये असताना जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपण सगळी फुले गोळा करायचो. घरी जाऊन मस्तपैकी त्याचे गजरे, हार बनवायचे आणि अख्या कॉलनीमध्ये ते वाटत बसायचं त्यात झेंडू, जाई ,जुई, मोगरा, गुलाब, चमेली, चाफा, सोनचाफा, केवडा, शेवंती,किती नाना प्रकारची फुले आपण तोडत होतो आणि त्याने आपले घर सजवत होतो. कॉलेज मधील मुली तर मला फुलवेडी म्हणत होत्या पण एकटा समिरच मला फुले गोळा करायला मदत करायचा त्याला देखील खूप आवडायची फुले.

                 त्याच कॅफेमध्ये समीर बराच वेळ पासून बसून होता शेवटी तो शाल्मली आली की नाही हे पाहायला बाहेर आला तर शाल्मली झाडाखाली उभी असलेली दिसली.

“ ही अजूनही फुलवेडीच दिसते मला “ समीर गालातल्या गालात हसत म्हणाला .

             तिच्याकडे तो निरखून पाहतो तर लाल रंगाची त्यावर काळा रंगाची किनार असलेली साडी तिने नेसलेली असते. हातात एक छोटं ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात घड्याळ, गळ्यात बारीक मण्यांचे मंगळसूत्र आणि कानात छोटे झुमके घातलेले असते. एका हातात पर्स तर दुसर्‍या हातात मोबाईल. अजूनही किती छान दिसते ना शाल्मली. दुपारी सुद्धा एखादी चांदणी जमिनीवर उतरून आल्यासारखे वाटते. आता ही ती तितकीच गोड निरागस अशीच वाटते. फुलांमध्ये रममाण होणारी , पावसाला मित्र मानणारी .

          शाल्मली अजून देखील तेथेच उभी असते. समीरने तिला आवाज दिल्यानंतर ती त्याच्याकडे पाहते आणि पाहतच राहते. ब्लॅक कलरची जीन्स त्यावर स्काय ब्लू कलरचा शर्ट आणि सौम्यसा परफ्युम मारलेला समिर तिला दिसतो. अजूनही हसल्यानंतर गालावर पडणारी खळी तिला स्पष्ट दिसते. पण तो समोर आल्यावर काय बोलावे हेच तिला सुचत नाही. बराच वेळ दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात शेवटी समिरच सुरुवात करतो.

“ हाय , शाल्मली कशी आहेस तू “

“ मी मस्त आहे “

“ तू कसा आहेस आणि अजूनही तुझी चॉईस काही बदलली नाहीये छान दिसतोय तू “

“ थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट तू सुद्धा छान दिसत आहेस “

“ थँक्यू , आता येथेच उभे राहून बोलायचं आहे का आपण “

“ नाही रे , ये ना आपण दोघे आतमध्ये जाऊ “ ते त्यांच्या कोपऱ्यातल्या टेबलावर जाऊन बसतात त्या टेबलाशेजारीच एक मोठी खिडकी असते त्यामधून बाहेरील नजारा खूप छान दिसत होता. बाहेरील चाफ्याची आणि बुचाची झाडे तिला मंत्रमुग्ध करत होती.

शाल्मली, तू काय घेणार ?

आपण कॅफेचीनो घेउयात का ?

“ का नाही माझी तर ती फेव्हरेट आहे “

समीरची ऑर्डर देऊन झाल्यावर दोघेही बोलू लागतात .

समीर आता काय करतोस तु ?

“ मी आता IT कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून काम करतो लवकरच वरच्या पोस्टवर प्रमोशन पण होईल आता ”

“ अरे वा छान आहे की, अभिनंदन तुझं अशीच प्रगती करत राहा . समीर आत्ता पण तू गिटार वाजवतोस का आणि कविता करतोस का ? “

“ नाही गं , आता वेळचं भेटत नाही आणि आत्ता इच्छा पण होत नाही गिटार वाजवायची आणि कविता करायची पण तुझ्या हे लक्षात आहे छान वाटतंय हे ऐकून “

“ असं का पण किती छान वाजवतोस तू गिटार आणि कविता पण किती छान करतोस मग असं का मध्ये सोडलं तू छान गिटार वाजवायचा कविता पण छान करायचा म्हणून तर लक्षात राहिला ना “

“ असं होय ते जाऊ दे तुझ काय सुरु आहे मग आता कि फक्त माझ्याबद्दलच विचारणार आहेस “

“ नाही रे असं काही नाही इंजिनियरिंग झाल्यावर तीन-चार वर्षे जॉब केला पण नंतर मुलामुळे नाही जमलं त्यामुळे घरीच लक्ष द्यायला सुरुवात केली मी आता केक शॉप आहे माझे आणि केक बनवायचे कलासेस घेते मी यामुळे मन सुद्धा लागून राहत आणि घराकडे लक्ष पण देता येतं “

“ तुझं स्वप्न तू पूर्ण केलं वाटत. तुझं स्वप्नच होतं ना एखादा छान स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून आणि ते तू पूर्ण केलं “

“ हो खूप छान वाटतं ते स्वप्न पूर्ण झाले की, हो ना “

“ हो अगदी बरोबर आहे तुझं, बाय द वे तू अजूनही फुलवेडी आहेस वाटतं हो ना “

“ हो , काय करणार तुला तर माहीतच आहे ना की मला बुचाची फुले आणि चाफ्याची फुले किती आवडतात ते “

“ हो मग काय तर मी कसं विसरणार मीच तर तुला मदत करायचो फुलं गोळा करायला बरं आता डोळे मिट ना तुझे तुझ्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे “

“ डोळे कशाला मिटू असच दे ते गिफ्ट मला “

“ तुला म्हटलं ना डोळे मीट म्हणून तर मीट “

“ ओके बाबा ‘

शाल्मली आपले दोन्ही हात पुढे करून बसते . समिर तीच्या ओंजळीत ते गिफ्ट ठेवतो.

“ आता उघड तुझे डोळे “

“ मला आधीच कळलेलं होत गिफ्ट काय आहे ते “

तिच्या ओंजळीत वेगवेगळ्या रंगांची चाफ्याची सुवासिक फुले आणि बुचाच्या फुलांची वेणी असते त्याचा सुगंध तर सगळीकडे पसरलेला असतो.

“ समीर, तुझ्या अजूनही लक्षात आहेत या गोष्टी तुझं गिफ्ट खरच खूप सुंदर आहे आणि माझी आवड अजूनही लक्षात ठेवल्याबद्दल तुझे खुप आभार “

“ अगं वेडी आहेस का तू आभार वगैरे काय आणि एवढं काय त्यात मला माहित आहे तुला फुले खूप आवडतात ते म्हणून आणली तुझ्यासाठी “

“ थँक्यू सो मच समीर , तू एक कविता म्हणशील का प्लिज “

“ हो म्हणेल पण हि कविता अपूर्ण आहे आणि आज ती कविता जिच्यासाठी तयार केली होती तिला माझ्या भावना सांगायच्या आहेत “

“ अरे वाह , शेवटी आज तू सांगणारच ती कोण होती ते पण तिला सांगायच्या आधी मला सांग हा “

“ हो तुलाच सांगणार आहे त्यासाठीच तर आज भेटलो ना आपण आज मला माझं मन मोकळं करायचं आहे आणि तुझ्याशिवाय कोणासमोर मी नाही बोलू शकत ना “

“ हो हो ...... आज सांगच मला ओके. कविता सादर करतोस ना “

“ हो कविता सादर करतो पण चुकीची असेल तर समजून घे कारणही अपूर्ण आहे आणि कधीही पूर्ण होणार नाही “

                                                       मनी वसे ते ओठी न येई

                                                       मनी वसे ते ओठी न येई

                                                       सांग रे वेड्या मना वाट तुझीच पाही ,

                                                       तू समोर दिसताच हृदयाची स्पंदने वाढू लागे

                                                       पण तुला कधी सांगू शकलो नाही

                                                       का हे असे कळेना मला

                                                       पण हे प्रेम अव्यक्तच राही


  “ समीर, खरच हि कविता अपूर्ण वाटते आणि तू लिहिली असही वाटत नाही तुझ्या पठडीतली नाही वाटत ही :

“ हो शाल्मली हि कविता लिहिण्यासाठी शब्दच सुचत नव्हते मला आणि माझं हे प्रेम अपूर्ण राहणार हे देखील कळले होते म्हणून मीही ती कविता पूर्ण नाही केली “

              समीरच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या खूप खोलवर असणारे त्याचे प्रेम आज त्याच्या डोळ्यात दिसत होते. शाल्मलीच्या नकळत त्याने आपले डोळे पुसले आणि खिडकीबाहेर एकटक नजर लावून बसला. तिला देखील कळत नव्हते कि आपण काय बोलावे यावर कारण आज तिचा सुद्धा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता . आज ती तिच्या संसारात किती हि आनंदी असली तरी मनाच्या एका कोपऱ्यात मात्र समीर अजूनही होताच ना. शेवटी तिने त्याला विचारले कि ,

“ पण तू हे नाही सांगितलं की तुझी बायको काय करते मुलं कशी आहेत ते सांग ना त्यांच्याबद्दल “

“ शाल्मली , मी लग्न नाही केलं अजून एकटाच आहे “

“ का ? शाल्मली तर उडालीच आ वासून तिने हा प्रश्न त्याला विचारला होता.

“ असंच नाही भेटली कोणी तशी की तिच्याशी लग्न करावे “

“ पण समीर आता वेळ पण निघून जात आहे तुझं. तू लग्न करायला पाहिजे होतं “

“ जाऊदे तो विषय आता आपण दुसर काहीतरी बोलू “

“ दुसरं तिसरं काही नाही मला सांग कॉलेजमध्ये तुला एक मुलगी आवडायची पण तू कधी तिचं नाव नाही सांगितलं मला. आता तरी सांग मला कोण होती ती आणि आताच तू म्हणालास ना आज सगळं सांगणार आहेस म्हणून तर सांग मला कोण होती ती “

“ तिचं नाव नाही सांगू शकत तूला आता तर तिचं लग्न झालं आहे मग सांगून काय उपयोग “

“ अरे असं का करतोस एकदा सांगून तर बघ आणि तू तेव्हाच का नाही सांगितलं तिला “

“ तेव्हा भीती वाटत होती तिला सांगितलं तर आमची मैत्री तुटेल म्हणून. खूप घट्ट मैत्री होती आमची नंतर कॉलेज संपल्यावर तिला सांगावसं वाटत होतं पण नेमकं मला जॉब निमित्त बाहेरगावी जावं लागलं आणि तिकडून परत आलो तर तिचं लग्न झालं आहे असं कळलं. ती कुठे राहते काय करते काहीच माहित नव्हतं आणि नंतर कधी वाटलं पण नाही लग्न करेल मी कोणाशी म्हणून पण थँक यु आज तुझ्यामुळे खूप हलकं वाटत आहे मला “

“ तू एकदा तिला सांगून बघायचं होतं कदाचित ती सुद्धा तुझ्या प्रेमात असेल तर “

तो तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहतो .

“ हो समीर निदान आता तरी सांग कोण होती ती “

“ खरं सांगू शाल्मली तू रागावणार नाहीस ना “

“ नाही रागवणार सांग तू “

“ ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तू स्वतः आहेस “

              असं म्हणून समीरने त्याची नजर खिडकीबाहेर नेली त्याच्या हातांची चलबिचल देखील सुरू होती आणि ही त्याची चलबिचल शाल्मलीच्या नजरेने पाहिली होती तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की आपण जे काही ऐकले आहे ते खरं आहे की खोटं . समीर परत एकदा तेच म्हणतो ,

“ हो शाल्मली माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं पण तू वेगळा विचार करून आपली मैत्री तोडणार नाहीस ना हा विचार करून मी कधीच नाही बोललो तुझ्याशी या विषयावर. बोल ना शाल्मली काय उत्तर असलं असत तुझं तेव्हा “

“ समीर माझं उत्तर हो असलं असतं तेव्हा , कारण मी पण तुझ्या प्रेमात होते पण कधी सांगण्याची हिंमत नाही झाली माझी आजही तू मनाच्या एका कोपऱ्यात आहे जी फक्त तुझी जागा असेल पण एक सांगू तुला तू आता तुझ्या आयुष्यात पुढे जावं असं मला वाटतं ऐकशील माझं करशील लग्न तू लवकरात लवकर “

“ तुझं उत्तर ऐकून खूप छान वाटलं मला पण हो जर तुला असं वाटत असेल की मी लग्न करावे तर तुलाच प्रयत्न करावे लागतील “

“ हो मी तयार आहे काय करावे लागेल मला “

“ तुलाच माझी शाल्मली शोधावी लागेल आहे कबूल आहे तुला “

“ हो नक्कीच दोस्त के लिए कुछ भी इतना तो मै कर ही सकती हू ना “ एक डोळा मारत तिने त्याला हळूच चिमटा काढला आणि जोरजोरात हसू लागली. आज तिला खूप हलकं हलकं वाटत होत. भावना व्यक्त केल्या कि कसलचं दडपण राहत नाही मनावर.

“ चल नौटंकी निघायला हवं आता आपल्याला “

“ ऐक ना समीर फक्त एकदा गाणं म्हण ना बाहेर बघ ढग दाटून आले आहेत कधीही पाऊस येईल असं वाटत आहे . आपलं प्रेम जरी पूर्ण नाही झालं तरी मैत्री पूर्ण झाली आहे आणि ही मैत्री आपण असेच कायम ठेवू चालेल ना तुला “

“ हो चालेल मला “

             बाहेर पावसाला जोरदार सुरुवात झाली होती ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासकट पाऊस धो धो बरसू लागला होता . समीरने देखील पावसाला अनुसरून गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते.

                                         

  “ अधीर मन झाले , मधुर घन आले

    धुक्यातुनी ....... नभातले....... सख्या....... प्रिया...........

      हळूहळू बाहेर बरसणाऱ्या पावसात समीरचे सूर मिसळून जातात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy