हिंमत
हिंमत


एकांकिका
(पात्र - शेतकरी पांडुरंग, शेतकऱ्याची बायको शेवंता, मुलगा अजय, मुलगी स्मिता)
(दृष्य - शेतकरी झाडाखाली बसून डोक्याला हात लावलेला)
शेवंता : का हो, डोक्याला हात लावून काय बसलेत?
पांडुरंग : काय करायचे दरवर्षी दुष्काळ असतो. आता कसे तरी पीक आले तर मालाला भाव नाही. कसे जगावे शेतकऱ्याने?
शेवंता : जाऊ द्या लई विचार करू नका? विचाराने काय मिळणार?
पांडुरंग : होय शेवंता तुझे पण खरे आहे. माणसाने लई विचार करू नये, पण ती वेळ आता आली आहे. पीकाच्या भरवशावर पतपेढ़ी, बँकांचे कर्ज काढले आहे ते फेडायचे कसे? रूपया खर्च करायचा आणि चार आणे कमवायचे. कष्टाची तर किंमतच नाही. सांग मग कर्ज वाढेल का कमी व्हईल? मला तुम्ही सगळे झोपल्यावर तोच विचार येतो. आपले पुढे कसे व्हईल?
शेवंता : जाऊ द्या भिक मागून खाऊ.
पांडुरंग : आपली जमीन बँकेत तारण आहे ती माझ्याच्याने सुटणार कधी?
(मुले अभ्यास करत असतात. आई-बाबांचे बोलणे ते ऐकतात)
स्मिता : बाबा जमीन गेली तर जाऊ द्या. पण आम्हाला तुम्ही हवे आहात. आम्ही कष्ट करू. मजुरीने काम करू पण तुम्ही खचून जाऊ नका.
पांडुरंग : मुली, तुझा भाऊ अजय खूप हुशार आहे, पण त्याला इंजीनिअरिंगला प्रवेश घ्यायला पैसे नाही. पैशाअभावी तो अकरावीत बसला. त्याच्यापेक्षा कमी गुण असलेले त्याचे मित्र इंजीनिअरिंगला शिकताय.
स्मिता : बाबा काही काळजी करू नका. वर्षभर मी, अजय सुट्टीच्या दिवशी कामाला जाऊ. पण त्याच्या शिक्षणात कमी पडणार नाही.
पांडुरंग : सगळे खरे आहे, पण आज ना उद्या मला तुझ्या लग्नाची पण चिंता सतावते. मुलगी वयात आल्यानंतर बापाच्या डोक्यात तिच्या भविष्याचा विचार घोळत असतो.
स्मिता : बाबा जोपर्यंत अजयचे शिक्षण पूर्ण होऊन तुम्हाला आधार होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. लग्न म्हणजे माझे करिअर नव्हे. मलाही खूप शिकायचे आहे. माझ्या लग्नाची चिंता अजिबात करू नका. मी तुम्हाला ओझे आहे का?
पांडुरंग : नाही बेटा तू, तू शिक माझी काही हरकत नाही. शेतीबरोबर आपण जोड व्यवसाय करू या. बकरी, कोंबडी आधार म्हणून ठेवू या. कारण निसर्गाच्या भरवशावर शेतकऱ्याने राहून उपयोग नाही. काही खरे नाही. कधी दुष्काळ तर कधी मालाला भाव नाही.
अजय : बाबा चिंता करू नका काही झाले तरी आमची काळी आई आम्ही हातातून जाऊ देणार नाही. तुम्ही हिंमत हारू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत.
पांडुरंग : शाबास रे वाघांनो! तुमच्यामुळे मला आता हिंमत मिळाली आहे. आता नाही मी चिंता करणार. आत्महत्या तर लांबच राहिली.