हिंदोळा
हिंदोळा


आज ऑफिसमधून लवकर घरी आले होते. पाऊस वाढत होता आणि लोकल गाड्या बंद होण्याची चिन्हे दिसत होती. खरंतर लवकर घरी येऊन काय करायचं हा प्रश्नच होता! निसर्गरम्य वातावरणात, हातात गरम गरम काॅफीचा कप घेऊन, बाल्कनीत बसून घोट घोट घेत, आयुष्याची सांजवेळ न्याहाळावी, वगैरे सर्व दिवास्वप्न होतं. एकतर, आयुष्याची सांजवेळ आली नाहीये, आणि विचार करण्यासाठी इतर अनेक प्रश्न आहेत.
पण घोटा घोटाने काॅफी पिण्याचा विचार अगदीच वाईट नव्हता. मी कप हातात धरून सोफ्यावर बसले व मोबाईलवरचे व्हाॅट्सॲप पोस्ट वाचणार इतक्यात अननोन नंबरवरून फोन वाजू लागला. "हलो?" मी फोन का घेतला कुणास ठाऊक!
"सखी ना?"
दोन-तीन सेकंद मला अजिबात कशाचे आकलन झाले नाही. सखी? नाव खूप खूप ओळखीचे असून विस्मरणातले!
"कोण बोलतंय?"
"ओळखलं नाहीस?"
"नाही!" मी खोटं बोलते आहे याची जाणीव झाली.
"मी निशांत!"
मन हिंदोळा घेऊ लागलं! निशांत? बोलू की नको? कट करू की कसा आहेस विचारू? पण का विचारू? आज इतक्या वर्षांनी का? तेव्हा का नाही? मनाच्या कुपीत दडवलेलं आठवणीचं रत्न, कोणी तरी उकरून काढतंय असा भास होऊ लागला!
"हॅलो, बोल की! ओळखलं आहेस मला! तुझी जुनी सवय, समोरच्या माणसाला झुलवत ठेवायची!"
कुणी कोणाला झुलवलं होतं? विसरलास का? माझं मन आता बोलायची धडपड करू लागलं, पण वाणीने नकार दिला! "मला माहित आहे, तू रागावली आहेस, पण किती जुनी गोष्ट. आता रुसवा सोड सखे! मी परत आलोय!"
बाहेर अकस्मात वीज कडाडली आणि पावसाचा जोर वाढला. मन विचारात चिंब चिंब भिजलं, वावटळीत गिरक्या घेत भूतकाळात पोचलं!
"राँग नंबर!" असं म्हणून मी फोन कट कधी केला हे माझं मलाही कळलं नाही!