हे सागरा, तुफान... तू
हे सागरा, तुफान... तू


किती अथांग रे उधाणलेल्या सागरा तुझे रुप. तुझी विशालता, तुझे औदार्य, तुझे सौंदर्य, तुझे रौद्र रुप, तुझे हास्य तर कधीकधी तुझे फेसाळलेले उंचच उंच लाटांचे रुप...
सामावून घेतलेत ना तू तुझ्यात माणसांचे विविध रंग, विविध जाती, विविध पंथ... विविधताच सारी... कितीतरी...
हजारो प्राणी, वनस्पती, सारे जलचर, किती रे शंख-शिपले, किती रे ते मत्स्यांचे आगार, डोळ्यांना नेत्रसुख देणारे सुंदर, सुंदर मोती... की जे मला खूप आवडतात ल्यायला. सर्वांचाच राजा रे तू...
अरे दयासागरा तुझी उत्पत्ती अवनीबरोबरच झाली. अन् तिचे सारे सौंदर्य तू खुलवलेस. सुंदर रुपडे दिले तिला.
तुला स्वतःचे जीवन नाही जगता आले. हे कळतयं मला. हे तुलाही माहित आहेच. तुला दुसऱ्याला जीवन देता देता तू स्वतः मात्र जीवन जगणे राहून जातंय तुझं.
मी तर काय, तुझी एक छोटीशी लाट... तुझ्या उधाण रुपावर भाळणारी. तुझी विविध रुपे हर क्षणाला न्याहाळणारी मी. तुझे तुफानी रुप न्याहाळणारी मीच ती.
आदिनाथाशी, राधा-कृष्णाशी, कधी राम, रहिमशी तू कधी काय बोलत असतो मनातले. ते हळूच ऐकते मी. शेवटी सरीता तुलाच भेटतेय ना रे. तुलाच समर्पित होते. तुझ्याकडे जगातील सर्वात मोठी संपत्ती... मिठाने तू सगळ्यांच्या जीवनात आस्वाद निर्माण करतो. हे उदधी जगात तुच एकमेव श्रीमंत...
रात्रीला दाट काळोखात तुला मी चुकणाऱ्याला मार्ग दाखवतानाही पाहिले आहे. पण उपकाराची भाषा तुला ठावे नाही. दुसऱ्याला देत राहणे हाच तुझा धर्म तू पाळत आलाय अगदी अनादिकाळापासून.
दुसऱ्यांना जीवन देण्यासाठी चटके सोसून वाफेच्या रुपात कितीतरी उंच... उंच निळ्याशार आकाशात जाऊन कापसासारखे नयनसुख देणाऱ्या नभात जाऊन साऱ्या वसुंधरेला श्रावणसरीने ओलेचिंब करून सजीवांना जीवदान देऊन समाजसेवेचे नव्हे संपूर्ण महीचे सवेचे व्रत घेणारा उधदी तू....
सर्वात मोठा व्रतस्थ तू... की ज्याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दालंकार अपूर्ण पडलेत... असा मोठ्या मनाचा दर्या... रे... तू...
माझी निर्मिती एक लाट... कधी अवखळ... तर कधी उधाणलेल्या... तुझ्यातूनच... झालेली....
कधी बुडणाऱ्याला हात देणारा तू... कधी कधी किनाऱ्यावर आणणारा तू... तुझ्या अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी मी सतत धडपडतेय रे... तू अथांग रे... मला नाही लागत कधी कधी तुझा ठाव नाही लागत मला. शेवटी मी लाट नि तू... सागर... अथांग... विस्तारलेला...
तुलाही हवा असतो रातराणीचा सुगंध.. अनेक पर्यटक येतात नि जातात. येतात लाटेचाही अनुभव घ्यायला. कधी रातराणीचा मोहक गजराही असतो माळलेला काळ्याभोर केसात... रातराणीचा तो गजरा होतो रे ओलाचिंब तुझ्या स्पर्शाने...
मग मी तुलाही देते क्षणभर तो रातराणीचा सुगंध. त्यावेळी किती बेभान असतोस तू... हे फक्त मी आणि मीच सांगू शकते नाही..?
त्यावेळी तुझ्या बेभान रुपावर मी ही भाळते रे...अन् किनाऱ्यावर आलेली मी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे परतते. फक्त अवघ्या अर्धा मिनिटातच पुन्हा... तुझ्यात विलीन होण्यासाठी कायमची... अगदी कायमचीच...