हृदयस्पर्शी
हृदयस्पर्शी
पुणे -बंगलोर हायवेपासून .. . 5 ते 6 किमी अंतरावर वसलेले कोल्हापूर म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली ही कोल्हापूरची कर्मभूमी,शाहूमहाराजांचा डोळे दिपविणारा भव्यदिव्य राजवाडा ,त्यासमोरील लक्ष वेधून घेणारी हरणं...मोर.. सर्वांना आकर्षक वाटणाऱ्या घोडागाडी व टांगे...प्रसिद्ध रंकाळा तलाव साडेतीन पिठापैकी एक पिठ म्हणजे कोल्हापूरची महालक्षी आई होय..पन्हाळगडाकडे जातांना लागणारी आपल्या प्रचंड विस्तारित पात्रानं बारमाही वाहणारी पंचगंगा नदीमाय ही कोल्हापूरचीच.नजर पुरणार नाही अशी लांबवर पसरलेली हिरव्यागार ऊसाची राने अन् पावलापावलावर दिसणारी ऊसाची गुऱ्हाळं.असे निसर्गरम्य सुंदर वातावरण कोणाला भावले नाही तर नवलचं...
मुलगी अबोलीची नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती.मला वेध लागले होते की आता मुलीचे भवितव्य पुढे काय? पण तिचे धेय्य अगोदरचं हाँटेल मँनेजमेंटचे असल्यामुळे माझी मात्रा चालेना.याबाबत स्वतः ती चौकशीत असायची याबाबत प्रवेश परीक्षाही तिने दिली होती.कोठे काँलेज आहेत याविषयी ती माहिती मिळवत असतांना तिला कोल्हापूरचा हाँटेल मँनेजमेंट करणारा एक विद्यार्थी ऋषिकेश याचा नंबर कोणाकडून तरी मिळाला त्याचेकडे याविषयी आम्हीही चौकशी केली असता तो म्हणाला आई तुम्ही नुसतं बघायला तर यावा की ..आमचेकडचे कोल्हापूरात..काँलेज.पण इतक्या दूरवर तिला पाठविण्याचा विचार आमच्या उभयंतांमधे नव्हता .पण तरीही या कोर्सबाबत अधिक माहिती मिळविणे आवश्यक होते.म्हणून आम्ही कोल्हापूरला जायचं ठरवलं.माझे यजमान,माझी चिमणीपाखरं अनिष व अबोली घरच्या गाडीनं आमचा प्रवास होता.आम्ही कुठपर्यंत आहोत यासाठी ऋषिकेश कितीदा फोन करून आमची दखल घेत होता.ओळख नाही की परिचय नाही फक्त फोनवर बोलणं .इतकीच ओळख.
पण त्याचं फोनवर बोलणं म्हणजे आई...या शब्दानं असतं...एक चांगला मुलगा म्हणून मी त्याचेवर विश्वास ठेवला . आम्ही कोल्हापूरकडे मार्गक्रमण करत होतो.रात्री ठिक अकरा वाजता आम्ही नागाव फाटा येथे पोहोचलो वेळ रात्रीची ... उड्डाणपुलामुळे व अपरिचित रस्त्यांमुळे सारे रस्ते वेगळे भासत होते.हायवेमुळे वाहतुकही चालू होती. फोनवर संपर्क केला असता ऋषी आमचे गाडीजवळ मित्र नितीन सोबत बाईकवर आला .आम्हाला भेटून त्याला खूप आनंद झाला होता यजमानांनी त्याचेशी बोलून आमची गाडी त्याचे गाडीमागे नागाव फाट्यापासून नेली.इतक्या उशिरा कोणाचे घरी जाणे योग्य नाही व आमचा परिचयही फारसा नसल्यामुळे आम्ही हाँटेलमधे राहणे पसंत करताचं ऋषीनं सोनल या मोठ्या शानदार हाँटेलमधे आमची व्यवस्था केली. आम्ही अगोदरचं रस्त्यात जेवणं करून आलो होतो.ग्लासभर गरमागरम दूध घेऊन झोपलो.आम्हाला सकाळी घरी जेवणासाठी आग्रह केला.त्याला मी उद्या येण्याचं सांगितले व त्याला घरी जाण्यास सांगितले .हाँटेलमधे आम्हाला छान सेवा मिळाली.सकाळी नास्ता केल्यावर जातेवेळी ऋषीमुळे हाँटेलमालकांनी आमचेकडून काहीही पैसे घेतले नाही .ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही मी मनात ठरवले व यजमानांना सांगितले की पुढचेवेळी पुन्हा आलो की आपण येथेच मुक्कामसाठी येऊ व पैसे देऊन राहू.
दुसऱ्या दिवशी आम्ही तयारी करून प्रथम आई महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी गेलो.आईचे दर्शनानं मन कसं प्रसन्न झालं होतं.शेजारीच राजर्षी शाहू महाराजांचा अतिशय सुंदर जुना राजवाडा आहे हा राजवाडा आम्हाला ऋषीने दाखवला.या वाड्यात शाहू महाराजांनी शिकार केलेल्या प्राण्यांची जपवणूक करून ठेवलेली होती. यानंतर ऋषीकेशने आम्हाला हाँटेल मँनेजमेटविषयी अधिक माहिती मिळवणेसाठी हाँटेल मँनेजमेंट काँलेजवर नेऊन तेथील प्रिन्सिपॉल यांचेशी भेट घडवून आम्हाला हाँटेल मँनेजमेटविषयी सर्व माहिती मिळवून दिली
.व तेथील परिसरही दाखविला.यासाठी आम्हाला जवळजवळ एक वाजत आला.सकाळपासून आमच्याबरोबर उपाशीपोटी ऋषीकेश फिरत होता.कोणत्याही प्रकारची फारशी ओळख नसतांनाही त्याने आम्हाला खूप सहकार्य केल.आई हवं तर अबोलीला तुम्ही आमचेकडे शिक्षणासाठी ठेवा ...असा त्याचा आग्रह..व विश्वासाचं बोलणं ...
आमचे स्वागतासाठी काय करावं असं त्याला वाटत होतं. यानंतर आम्हाला त्याने त्यांचे घरी नेलं.कोल्हापूर पासून 9 किमी. अंतरावर मौजे चिंचवड हे त्याचे गाव. पुणे बँगलोर हायवेला तावडे हाँटेलपासून 4 किमीवर हे गाव. तावडे हाँटेलपासून निगडेवाडी लागते नंतर कोल्हापूरची प्रसिद्ध बाजारपेठ समजली जाणारी गांधीनगर ही मोठी बाजारपेठ.सर्व वस्तू मिळणारी ही बाजारपेठ.येथून 2 किमीवर मौजे चिंचवाड हे ऋषिकेशचे गाव.जातांना रेल्वेगेट लागले.कोल्हापुरी गुळ बाहेरच्या राज्यात व देशात जावा म्हणून कोल्हापूर ते मिरज रेल्वे धावावी यासाठी शाहू महाराजांनी स्वखर्चाने हे काम केले आहे.
गावात विविध मंदिरे ,मशिद,जैन मंदिर आहे विविध जाती, धर्म ,पंथ एकजुटीने राहतात.गावात दोन शाळाही आहेत.पंचगंगेतून पाणी येणारी एक विहीर आहे.येथील बहुतांशी लोकांचा शेती हा व्यवसाय आहे.येथे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा हे लोक प्रयत्न करतात.तीन किमी वरील पंचगंगेच्या सहवासाने हे लोक स्वतःला फार भाग्यवान समजतात.कारण नदीला बारमाही पाणी असते.कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विभाग हा मुख्य विभाग म्हणून संबोधला जातो.अनेक शेतकरी या व्यवसायात अतिशय छान जम बसवून आहेत.त्यांची मुले परदेशातही शिक्षण घेतांना दिसतात.2019 सालीच्या महापुरात अनेक गावे पाण्याखाली गेलीत पण कोल्हापूरचा बळीराजा हरला नाही परिस्थितीवर मात कशी करावी हे त्यांना परिस्थितीनं शिकवलं असल्याने तो परत नव्याने कामाला लागला.
ऋषिकेश हा एक गरीब शेतकरी कुटुंबातील अतिशय सोज्वळ व नम्र मुलगा.जैन समाजाचे हे शेतकरी मुगदुम कुटुंबिय म्हणजे माणसातली माणुसकी जपणारी ..प्रेमळ माणसं.आमची गाडी त्यांचे घरासमोर आली .प्लास्टर न केलेला मोठा बंगला स्वकष्टाने पै ..पै...जमवून उभा केला होता.शेती फार नाही पण थोड्या फार शेतीवर उदरनिर्वाह करणारं हे कुटुंब.घरात गेल्यावर आम्हाला वरण भात,पोळी ,भाजी,व तोंडाला चव येणारं असं साधं पण चविष्ट जेवण आमची वाट पाहत होतं .साध्या पेहरावातील आई व बहिण ऋतुजा ..आजी..यांचा जेवणासाठीचा आग्रह..खरे तर सकाळची भूक लागून गेली होती.या अन्नपुर्णा मातेनं ऋषिकेशच्या आईनं आमचा आत्मा संतुष्ट केला होता.ऋषिकेशची आई घर व शेतातही काम करते.आजी घरात मदत करून गांधीनगरमधे भाजीपाला विक्री करते.आजोबांच वय 80वर्षे होऊनही ते काम करतात.शेतात जातात जर शेतात नाही गेलं तर त्यांना करमत नाही.ऋषिकेशचे वडीलही शेतीकाम करतात त्यांची घरातील शिस्त माझ्या नजरेआड जाऊ शकली नाही.हे जरी खरे असले तरी ऋषिकेश व ऋतुजावरील संस्कार व घरातील संस्कृती मला सर्व काही सांगून गेली होती. खेड्यात राहणारी शेतकऱ्याची ही मुलगी ऋतुजा बारावीनंतर ती सातारा येथे फाँरेन्सिक सायन्स पुर्ण करत आहे .थोड्या वेळाने घरामागील पडवीत गेलो तेथे एक गाय व वासरू पाहिले.शेजारी सर्व भाऊबंदांची घरे होती.
आता आम्ही एकमेकांचा निरोप घेणार म्हणून हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला.व आम्ही मुगदुम कुटुंबियांचा निरोप घेतला .चार किमी अंतर ऋषिकेश व त्याचा मित्र नितीन आम्हाला निरोप द्यायला आलेत .कोल्हापूरकरांच्या पाहुणचाराने आम्ही भागरावून गेलो होतो.स्मितहास्य करून कोल्हापूरी भाषेत बोलणारा ऋषिकेश आई ...यावा की पुन्हा आमच्याकडं चिंचवडला... पुढल्या वर्षी...म्हणून ...निरोप देत होता. आम्ही अनेक सुंदर हृद्यस्पर्शी आठवणींचा ठेवा बरोबर घेऊन व कोल्हापूरचे सारे सुंदर रूपडे डोळ्यात साठवून कोल्हापूरकरांचा निरोप घेतला.