हिरकणी शशिकलाताईस...
हिरकणी शशिकलाताईस...
सायंकाळचे साडेपाच वाजले होते. मोबाईलची रिंग वाजली. हँलो ताई कशा हाईता तुम्ही? मी शशिकला ताई बोलते वांगी बुद्रुकहुन. हो ताई मी मजेत तुमचा झाला का चहा पाणी... नाही ना ताई. आताशीच कामावरून आलेता अन् लाकुडफाटा आणलेता..चुलीसनी..मनात काय काय विचार घोंगावून गेले म्हणून सांगू की मला देवान किती छानस हाताच्या फोडाला जपावं तसं अलगद माझ्या बंगल्यात समाधानानं सुरक्षित ठेवलं. ना लाकुडफाटा गोळा करायचा ना ऊन्हात दिवसभर काम करायचं
पिण्यासाठी बी पाणी न्हाय वो ताई...पाण्याची लई वणवणच हाय ताई ऊन्ह त् ईतकं कडक हाय का शेतात काम करून माझा गोरापान चेहरा बघशाल तर लालबुंद झालाय ओ...हे संभाषण माझ्याशी करत होत्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भुमजवळील दहा किमी अंतरावरील वांगी बुद्रुक गावच्या कवयित्री जणू प्रति बहिणाबाई चौधरी भासल्या मला.
काशिकन्या वनश्रीताई पाटील यांच्या हिरकणी गृपमधे आमची ओळख झाली होती. ताई उद्यास्नी काशिकन्या येताय आमचेकडे तुम्ही येत्यात का...व..आमचेकडे .चुलीवरची भाकरी खाया..मी सांगितले ताई नाही मी येईल मागावून आता मी नाही येऊ शकत.. आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी हि हिरकणी आलेल्या पाहुण्यांच स्वागत खूप छान ग्रामीण पद्धतीने करते.गावरान जेवणानं तृप्तही करते.माणुसकीची मोठी भेट सोबत देते.
अशी ही हिरकणी आई वडिलांच्या गरीब परिस्थितीमुळे सावंतवाडीत मोलमजुरी करतांनाच शिकत होती. बालपण अतिशय हालाखीत गेले पाण्याखाली गेलेल्या शेतजमीनचा काहीच मोबदला न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. वडील पटी्टीचे कुस्तीगीर. हिंद केसरीचे मानकरी. पण परिस्थितीनं व्यसनाधीन झाल्यावर आईनं कसेतरी बहिणींचे लग्न केले. जेमतेम सातवी शिकलेली ही मुलगी लग्नानंतर सासरी खूप शेतीची कामे करत असतं चौदाव्या वर्षी विवाहसोहळा झाला नि सासरी शेतीची काही कामे जमत नसत. सव्वा महिन्याच्या लहान बाळाला पाठी लावून एका हातात गाय अन् डोक्यावर पाण्याचा हंडा.झाडाला गाय व झोळीत बाळ ठेवून लांबून पाणी आणायचं अशी परिस्थिती. सासरच्या घरातून वेगळं निघायची वेळ आली .लोक हसायचे की हिला काहीच काम जमत नाही म्हणून...पण आज या साऱ्या परिस्थितीवर या शशिकला गणपती गुंजाळ या हिरकणीनं मात करून आज समाजापुढं स्
वतःचं नाव मोठं केलं आहे. समाजाकडून या हिरकणींना शाबासकीची थाप मिळणे खूप गरजेचे आहे.
शशिकलाताईंनी आज त्यांचेभोवती माणसांचे मोहोळ जमा केले आहे. त्या ग्रामीण भागातील एक यशस्वी कवयित्री आहे. आता त्या शेतीकामात खूप तरबेज झाल्या आहेत. वेगवेगळ्या भाजीपाला फळभाज्यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करून ईतरांना मार्गदर्शन करतात. पतीची व मुलांची त्यांना प्रत्येक कामात भक्कम साथ आहे. पहाटे चारला त्या़चा दिनक्रम सुरू होतो. शेतीपूरक दुग्धव्यवसायही करतात.पती व निरज, धिरज ही दोन मुले त्यांना या कामी मदत करतात. त्या गाय पालन व बंदिस्त शेळीपालन याबाबत प्रशिक्षितही आहेत पती व त्या मिळेल त्या वेळेत टेलरिंग कामही करतात. आदर्श महिला बचतगटाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. कथा कविता श्लोक, चारोळ्या, जात्यावरच्या ओव्या हे त्यांचे लेखन समाजास अतिशय प्रबोधनात्मक आहे. त्यांचेपुस्तकेही प्रकाशित झाले असून या कामी पुतणे बालाजी गुंजाळ व राजेंद्र सरग सर यांची खूप मदत झाली. गावात त्यांना मानाची कवयित्री म्हणून मोठा मान आहे. या कामी पतींच नेहमी प्रोत्साहन असते. शशिकलाताई यांचेकडे विविध पुरस्कार व सन्मान चालत आले. अनेक वर्तमानपत्रातून कविता लेखन करतात. त्या समाजप्रबोधनात्मक व्याख्यानही देतात. अशा या बहिणाबाईंच जितकं कौतुक करावं तितकं थोडचं आहे. हे सगळे करतांना शशिकलाताई आपल्या कुटुंबातील सद्स्य सासू,पती, मुलांसह सर्व कौटुंबिक जबाबदारी अतिशय चांगल्या रितीने पार पाडतात. मुलगा धिरजने बदल लघुचित्रपटात काही केले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.
आज त्यांचेशी फोनवर बोलतांना मला एकाच गोष्टीचे खूप वाईटही वाटले व या हिरकणीबद्दल मला खूप अभिमानही वाटला. ते असे की, शशिकलाताईंना एका लघुचित्रपटात सासुची भुमिका करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले हा क्षण खूपच आनंददायी होता पण शेतातील त्यांचेकडे बैलगाडी नसल्याने कामासाठी दुसऱ्याची बैलं व गाडी आणली होती व ती दुसऱ्याची असल्याने हे शेतीचे काम करुन घेणे गरजेचे होते म्हणून शशिकलाताईंनी हा गोल्डन चान्स घालविला. खरंच किती हा समजदारपणा शशिकलाताई. तुमच्या कार्याला मी शेतकरी कन्या सलाम करते व तुमच्या पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा देते.