sarala deshmana

Inspirational

3.1  

sarala deshmana

Inspirational

उंच माझा झोका...

उंच माझा झोका...

7 mins
487


मी नेहमीप्रमाणे आजही सकाळी शाळेत गेले. थंडीचे दिवस होते स्कार्प अन् स्वेटरनं ऊब आलेली. कधीच नाही पण आज मी कशी विसरले कुणास ठाऊक. आज गळ्यात मंगळससूत्र न घालताच शाळेत आले होते.


मैत्रिणीनं मला विचारले, मॅडम गळ्यातील कोठे गेले?


मी पटकन गळ्याला हात लावला. मला फार कसेतरी झाले. पण मी तसे काही न दाखवता मनातच ठेवले. घरी आले, मला लगेच मंगळसूत्र या विषयावर कविता सुचली. मी सावित्रीच्या लेकी या गृपवरही मंगळसूत्र ही कविता पाठविली. थोड्या वेळानं मला एक फोन आला.


दिदी तुझी मंगळसूत्र कविता खूपच आवडली... असे स्पष्ट आवाजात समोरून बोलत होत्या त्या जालनाच्या काशीकन्या वनमालाताई पाटील! आम्ही एकमेकींचा परिचय करून घेतला व ओळख झाली ती कायमचीच.


माझा "कृष्णमंजिरी" काव्यसंग्रह करण्यासाठी त्यांची मोठी प्रेरणा होती. त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा त्या फार प्रेमळ बोलतात. छान मार्गदर्शन करतात. समोरच्याला समजून घेतात व प्रत्येक वेळी काही ना काही शिकवण मिळते हे खूप विशेष.


सारेच जन्माला येतात, मात्र इच्छा नसूनही देवाने जन्माला घातलेली ही मुलगी म्हणजे एक वनवाशीच... पण नंतर लक्षात यावं की देवाला हिच्याकडून काहीतरी चांगलं काम करून घ्यायचं होतं. म्हणून आली या धरेवर.


नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अस्ताणे येथे मामाच्या गावी ही वनपरी जन्मली ती जणू ओंजळीत काटेरी फूल घेऊनच.


मामाचं गाव म्हणजे जणू गोकुळचं. पहाटे पहाटे जाग यायची ती राम मंदिरातील काकड आरतीनं. तीन महिन्याच्या तान्हुलीला सोडून आई पुढील शिक्षणासाठी गेली. आजी, मावशी व तीन मामा यांनी सांभाळ केला.

    

वनमालाची आई म्हणजे नक्षत्राचं देणंच... कमालीची कुशाग्र, त्या काळी चौथीला बोर्डात पहिली आली होती. आजही तिचे फुलपात्र, ग्लास, ताटं या गोष्टीची साक्ष देतात. वनमालाताई दिसायला चारचौघीत खूप सुंदर नसली तरी सावळी व नाकी डोळी तरतरीत होती. पण बुद्धीत मात्र आईप्रमाणेच उजवी होती. अग्रजदादा, मधला आबा, अन् अनुज वनमाला... लहानपणीचं टोपण नाव मालू...

      

दादाशी कधीच जमलं नाही अन् आबाशी कधीच भांडण झालं नाही. सारं न मागता मिळत होतं तशी आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. सर्वजण आईला ताई व वडिलांना तात्या म्हणत असत. ताई व तात्या त्या काळी शाळेत बाई व गुरूजी. वडील अभ्यासाच्या बाबतीत कडक होते. त्यांच्या वर्गातील मुलांचे बाराखडी, उजळणी, परवचे सारे तोंडपाठ असायचे. तात्या दिसले की पोरं हातातील खेळ सोडून पळत असत. पण ताई मात्र दगडाला लिहायला लावणारी, तिचा कसाही विद्यार्थी असो त्याला वाचता व लिहिता येई. गणितात तिला भास्कराचार्य प्रसन्न होते. सारखे मित्रात राहणारे तात्या मुलांच्या लग्नाच्या वेळी माणसात आले. मग मात्र जबाबदारीची जाणीव झाल्यावर तात्या वडील झाले. वडिलांना सात बहिणी व दोन भाऊ. वडील मोठे होते त्यांची आई सिंहीण होती जणू. सारे जीवन सरस्वतीच्या पावलांनी झेलून जगाच्या जंगलात हे छावे घेऊन जगत होती. आईची मुलं जीव की प्राण होती. मालूला ती तिसरा मुलगाच समजत असत.

आईला वाटे मुलीनं खूप शिकावे. मालूला छान भरतकामही शिकवले होते.

    

ही मुलगी या वयात प्रेमात पडली. तिला सारखी ओढ लागलेली असायची. तिला त्यांच्याशिवाय क्षणभरही करमत नसे. संभ्रमात पडलात ना! अहो कुत्रे नि मांजरे ती. बापरे! केवढा हा लळा... या पिल्लावळाचा. यावरून फुकणी, झाडू, काठीनं मार खाऊन खाऊन पायाच्या पोटऱ्या निळ्याशार झाल्या होत्या. पण नाद काही कमी होईना. हुशार अशी मालू कुठेही एक नंबर सोडायची नाही हं... दहावीपर्यंत मुलींचा बाॅस हिचं. मधल्या सुट्टीत मुलींना सोबत घेऊन चिंचेच्या झाडावर चढणं, आंबट चिंचा स्कर्टमधे घ्यायच्या न तास चालू असला की मिठाबरोबर खायच्या. काय! सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी... अन् बोरं वेचून गोळा करण्याची तर गंमतच न्यारी...

   

तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूल येथे दहावीची परीक्षा होती. दहावीत तिसरा नंबर आला. बारावीला धुळ्यात तीनच मैत्रिणी राहायच्या. अभ्यास खूप असायचा. सायन्सला तिचा प्रवेश होता. प्रयोगशाळेत एकदा अॅसिड ओतले तेव्हा लाकूड जळाले, एकदा काचेच्या बाटलीत विंचू शिलबंद होता. हातातून बाटली दणकण पडली जीव घामाघूम झाला. पाठीवर दणकण दणका मिळाला अन् झाशीची राणी आठवून गेली. एक मुलगा प्रयोगासाठी पन्नास पैशाला बेडूक विकायचा. तो आज इन्सपेक्टर झाला आहे. त्याचा खूप राग यायचा. कोणी वाटेला गेलं की, त्याची सायकल पंक्चर झालीच समजा. सायकलीचे वाॅल भंगारवाल्याला विकून या मैत्रिणी कुल्फी खायच्या. पण पासही झाल्यात. केलेल्या कृत्याची कबुली द्यायला ही विसरत नव्हती.

   

वनमाला लग्नाजोगी झाली, आईच्या आतेबहिणीकडं दिले. त्याकाळी सासरच्यांना पंच्याहत्तर हजार रूपये हुंडा दिला. ही गोष्ट मनाला खटकली पण दुसरा पर्याय नव्हता. हुंडा म्हणजे सासरला मिळालेली फुकटची अनामत रक्कम. त्यातली काही रक्कम डि. एडसाठी वापरली. हळदीची साडी फक्त साठ रूपयाची होती. ती खूप रडली. वडील म्हणाले, "मी भरपूर साड्या देतो, ते पैसे काढून आणतो, मग जा लोकांचे बांध खुरपायला." तिला त्यामागचे मर्म कळाले.


लग्न झाले. नवीन घर, नवीन माणसे, कोणाचा कोणाला मेळ बसेना. "नवरा प्रकरण खूप वेगळं..." बस. एवढंच बोलणं पुरे! शेतीकाम माहिती नाही,पाणी आणायला बांधावरून दूरवर चालत जायचं. जोराचा जबरदस्त वारा व ऊसाची सळसळ... एकटी असायची. हंडा तिथंच फेकून पळून यायचे ऊसातून चोर, डाकू येतो की काय अशी मनात भीती वाटायची.

   

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नविनच काम आलं. गायी, म्हशींचं शेण काढायचं. एवढ्या जवळून कधीच म्हैस पाहिली नव्हती माहेरी... म्हणून म्हशीचे मोठे मोठे डोळे पाहूनच ती चार दिवस तापानं फणफणली. ऊस निंदायला जायला लागे. सारं अंग पाचाटानं चिरले जायचे. अंगाची खूप आग व्हायची. हे पाहून तिची आई खूप रडायची. सासुबाई विहिरीच्या कामावरही पाठवायच्या. याही परीक्षेत पास झाली होती. पण कैलासपती जरा विक्षिप्तचं. डि.एडला नंबर लागला. वडिलांनी एकच शब्द वापरला. आक्का पाहा आता तुझी परीक्षा बरं. दिड महिने तर डि.एडचा अभ्यास काही समजेनाच. तिच्यासाठी हे एक चॅलेंजच. १२० विद्यार्थांमधून फक्त तीनच विद्यार्थी पास. दोन मुलं व तिसरी मालू. पण नशिबानं यापुढे साथ देणं बंद केलं होतं.

      

जन्मत:चं काटेरी फूल ओंजळीत घेऊन आलेल्या मालूला त्या फुलाचे काटे आता चांगलेच टोचू लागले.

अशातच मोठे आॅपरेशन करावे लागले, एक गोंडस कृष्ण जन्माला आला नाव ठेवले बाळकृष्ण. पाच वर्षे झाली पण नोकरी मिळेना. सासू व नवरा रोज भांडण. नवरा प्रकरण दिवसोंदिवस खूपच महाग पडत चाललं होतं. आई-वडिलांच्या कृपेनं काहीतरी बरं चाललं होतं. दारू, पत्ते, बाई असे एकही वर्तन त्यांनी सोडलं नाही. कुठेही मारझोड, मैत्रिणी घरी आणणं तिला तोंड देणं सारं कठिणचं झालं होतं...

  

जालना येथून तिला काॅल आला. नकाशाशिवाय जालना पाहिलेलं नव्हतं. ती नोकरीसाठी तयार होईना. तेव्हा वडील म्हणाले, "अशक्य हा शब्द मुर्ख माणसांच्या शब्दकोशात असतो." ती एकटीच आली. नोकरीही लागली. मुलाला आई-वडिलांनी सांभाळलं.

    

नवरोबा दुरावत आहे हे समजत होतं. सारे कळत असूनही मनात दुःखाचं काहुर माजत होतं... इथून पुढे मात्र वनमालाच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं... इथूनच तिचं समाजकार्य सुरू झालं. भुकेलेला, तहानलेला,

शिक्षणाची भूक असलेला... यांना मदतीसाठी हात पुढे देण्यास सुरूवात झाली. सगळ्यांचं मन धरून एक विश्वासाचं घर तयार केलं.

इंगळी दोन पाय तुटले तरी चालतेच ना... हाच धडा तिनं स्वतःच्या मनाशी बांधला. आईने दिलेल्या हिमतीवर वनमालानं पुढचही शिक्षण पुर्ण केलं.


डि.एड., बी.एड., ए.एड., बी.ए., एम.ए., एम.लीब. अन् अजून बरंच काही. ती वेळप्रसंगी समाजाची आई, बहिण, मुलगीही बनली, तर कधी स्वच्छतादूतही. तिनं ८० गावांना निर्मलग्राम पुरस्कार मिळवून दिला.

    

महामहिम डॉ. अब्दुल कलाम यांचे हस्ते दिल्ली येथे राष्ट्रपती पुरस्काराची मानकरी झालेल्या वनमालानं देहू ते पंढरपूर पायी वारी करून समाजप्रबोधन केले. तेथेही मा. अशोकजी चव्हाण यांचेकडून सन्मान झाला. आतापर्यंत वेगवेगळ्या बत्तीस पुरस्काराने त्या सन्मानित आहे. दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना मोफत कपडे, शंभर मुलांना राईटिंग पॅड, दरवर्षी एका शाळेला कापडी पताका, विशेष म्हणजे कापडी पताका स्वतः शिवतात. आजपर्यंत छप्पन प्रशिक्षणे घेतली व समाजाला त्याचा फायदा करून दिला. याबद्दल सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण पुरस्कारही मिळाला. नेपथ्य पुरस्कार हा दरवर्षी ठरलेलाच असतो. त्यांनी त्यांच्या 

मनातील एक कल्पना प्रत्यक्षात आणली . ताईनं चांगले समाजकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील हिरकणींना एकत्र जोडलं... या हिरकणींना त्या त्यांच्या घरी बोलवतात. यासाठी त्यांचा एक हिरकणी गृप आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एका हिरकणीस त्या सन्मानित करतात. त्यात विविध सामाजिक काम करणाऱ्या समाजसेविका, डॉक्टर, कवयित्री, लेखिका, गृहिणी किंवा समाजासाठी जगावेगळं करून दाखविणाऱ्या अनेक हिरकणींचा त्या गौरव करतात. गेल्या चार वर्षापासून नि:शुल्क कवयित्रींचे काव्यसंमेलन भरवतात. प्रातिनिधिक स्वरूपात अनेक कविता संग्रह काढतात तेही निशुल्कच... हिरकणी पुरस्कार देतात. इतर ठिकाणी ज्यांना संधी मिळाली नाही अशा हिरकणींना त्यांच्या मनातलं स्टेजवर मनमोकळे बोलून देतात. या हिरकणींचं स्वतः समाजात नेहमीच गोडकौतुक करतात. यांना वाचनाची आवड असून त्यांचे स्वतःचे एक हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे. त्यांचे आई-वडील, ताई व तात्या यांचे स्मृतीप्रित्यर्थ अकरा पुस्तके प्रकाशित आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे फारशी जवळची मैत्रीण त्यांना नसली तरी मनात साचलेलं उद्रेक होऊन कागदावर येतं. त्यांची लेखणी ही त्यांची जवळची मैत्रीण आहे. या काशीकन्येला एकांत आवडतो. त्यांच्या आईचे नाव काशीबाई होते म्हणून त्या काशीकन्या या टोपण नावानं लेखन करतात.


आई-वडिलांना सर्वस्व मानणाऱ्या ताई आई-वडिलांनंतर स्वतःतील खूप काही हरवून बसल्या. आई वडिलांच्या विरहानं खूप पोरक्या झाल्या. त्यांचा मुलगा बाळकृष्ण हा त्यांचं विश्व आहे. मुलापेक्षाही तो मित्र जास्त आहे. आईबरोबर सर्व गोष्टी शेअर करतो. आईच्या मनातलं बरोबर ओळखतो. बी.ई., एम.टेक. करून तो सध्या विजयवाड्यात पि. एच. डी. करतोय. सूनेला पुढे शिकविले. दोन वर्षाचा लहान नातुही आहे.

  

ताई म्हणतात, “महिलांना संदेश काय देणार हो! तरीही सांगते आपला संसार आपल्याकडून सुधारत नाही म्हणून दुसऱ्याचा सुखी संसार कधीच बिघडवला नाही बिघडवूही दिला नाही.” हा विचार त्या करतात. स्वतःच्या कार्याचा झोका इतका उंच जाऊनही त्या दुसऱ्याला मोठेपणा देतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा मी पाहिला आहे. उगाच उपदेश करणं नाही जमत त्यांना. पटकन माघारही घेतात तर कधी हक्कासाठी, न्यायासाठी भांडतातही. कधी तडजोडही करतात. मनातलं निवांत देवाजवळ बोलतात. त्या आजही स्वतःचं काम स्वतः करतात. त्या कधीच कोणाला दोष देत नाही. कोणाचा हेवा करणे तर सोडाच, कोण काय म्हणेल याचे त्या फारसा विचार करत नाही. कारण आजतागायत जीवनाच्या वाटेवर अनेक हिंदोळे खात त्यांचा हा झोका उंच गेलाय.


वनमालाताई सध्या जि. प. क्रीडा प्रबोधिनी निवासी वसतिगृह जालना येथे रेक्टर म्हणून कार्यरत आहे. या एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. एक उत्कृष्ट साहित्यिक, सुंदर गायिका, नर्तिका, उत्कृष्ट वक्ता, शिंपी, संचयनी, स्वयंपाकी, उत्कृष्ट नियोजिका, एक आदर्श शिक्षिका, एक प्रेमळ आई. प्रभावी संघटक, नाटककार, कथाकार आणि... आणि... हो एक किडणी

नसून एकाच किडणीवर हा आजतागायत जीवनप्रवास चालला आहे. या शेवटच्या वाक्यानं माझं मन खूप हेलावलं.


अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्या आज खंबीरपणे उभ्या आहेत याचे सर्व श्रेय त्या त्यांच्या आईला व मुलाला देतात. शेवटी एवढंच म्हणावं वाटतं की, वनमाला या नावाप्रमाणचं वनवाशासारख्याच... भासल्या मला अन् माझ्या हृदयस्पर्शी... झाल्यात...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational